

Poona Guest House: A Legacy of Marathi Cuisine and Culture
Sakal
प्रशांत ननावरे - nanawareprashant@gmail.com
पुण्यातील मानाच्या गणपतींप्रमाणे काही मानाची खाण्याची ठिकाणेसुद्धा आहेत. या ठिकाणी जाऊन पदार्थांचा आस्वाद घेतल्याशिवाय पुण्याची खाद्यसंस्कृती आणि आदरातिथ्याची ओळख अपूर्ण आहे. ‘आमची कुठेही शाखा नाही’ ही पुणेरी पाटी पुसून टाकत खास कोकणी किंवा पेशवाई पद्धतीचे पारंपरिक मराठी खाद्यपदार्थ सर्वदूर पोहोचवण्याची त्यांची बांधिलकी कौतुकास्पद म्हणावी लागेल. नऊ दशकांची वाटचाल आणि चार पिढ्यांची चिकाटी ही ‘पूना गेस्ट हाऊस’ची फार जुजबी ओळख म्हणता येईल. कारण इथे मिळणाऱ्या साध्या व पंचपक्वान्नाच्या थाळीसोबतच खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवणारे कॉम्बो आणि पोटाची भूक व खिशातील दमडीनुसार मन तृप्त होईल असं बिनधास्तपणे खाण्याची सोय असल्याने ताटावरून उठणारी प्रत्येक व्यक्ती ‘अन्नदाता सुखी भव!’ हाच आशीर्वाद देत जागेचा निरोप घेते. ‘पूना गेस्ट हाऊस’मध्ये जेवताना आजूबाजूच्या भिंतींवर नजर फिरवल्यास किंवा हॉटेल मालकांशी संवादाचा योग आल्यास हे केवळ हॉटेल नसून ही वास्तू पुण्यातीलच नव्हे तर भारतातील एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र असल्याची आणि अचंबित करणारी आठवणी, किस्स्यांची मालिका उलगडत जाते. फास्टफूडच्या जमान्यात उसन्या इंटिरियरच्या तुलनेत अशी अस्सल आणि जिवंत वास्तू सापडणे दुर्मिळ, म्हणून फक्त जेवणासाठी नव्हे तर पिढीजात व्यवसाय कसा टिकवावा आणि वृद्धिंगत करावा याचा याची देही, याची डोळा अनुभव घेण्यासाठी या जागेला भेट देणं अत्यावश्यक ठरतं.