भारताच्या आर्थिक सुबत्तेचा अभिमान

एस. जयशंकर यांचे ‘व्हाय भारत मॅटर्स’ पुस्तक वाचण्याची इच्छा खरे तर ते प्रकाशित झाल्यापासूनच होती. मात्र, काही कारणास्तव वेळ जुळून येत नव्हती.
why bharat matters book
why bharat matters booksakal

- विशाखा बाग

भारताच्या आर्थिक सुबत्तेची यथोचित मांडणी ‘व्हाय भारत मॅटर्स’ पुस्तकात करण्यात आली आहे. भारताच्या जागतिक भरारीचे वास्तविक चित्रण त्यात वाचायला मिळते.

एस. जयशंकर यांचे ‘व्हाय भारत मॅटर्स’ पुस्तक वाचण्याची इच्छा खरे तर ते प्रकाशित झाल्यापासूनच होती. मात्र, काही कारणास्तव वेळ जुळून येत नव्हती. एका अर्थी ते चांगलेच झाले, असे म्हणायला लागेल. त्याचे कारण म्हणजे हे पुस्तक वाचण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित पुरेसा वेळ बाजूला काढणे गरजेचे आहे.

या पुस्तकात सांगितला आहे भारताचा राजकीय इतिहास आणि सद्य भारताची आर्थिक सुबत्तेकडे होत असलेली वाटचाल. त्याचबरोबर प्रामुख्याने मागील दहा वर्षांत राजकीय धुरंधर नीतीने परराष्ट्रांशी वाढवलेले हितसंबंध आणि त्या सर्वांमुळे सध्या जागतिक पटलावर भारताची सर्व अर्थाने उंचावलेली प्रतिमा. या सर्व गोष्टींचे मुद्देसूद आणि वास्तविक चित्रण विविध उदाहरणांच्या आधारे या पुस्तकामध्ये करण्यात आले आहे.

एस. जयशंकर हे भारताला लाभलेले एकमेव खंदे परराष्ट्र मंत्री आहेत, हे मला वाटते बऱ्याच जणांना मान्य असेल. या पुस्तकातील एक वाखाणण्याजोगा वेगळा पैलू म्हणजे जयशंकर यांनी वेळोवेळी परराष्ट्रीय संबंध जोपासताना एकाच वेळी धोरणात्मक निर्णय कसे घ्यावे लागतात, हे सांगितले आहे. असे निर्णय घेताना जयशंकर यांनी आपल्या पौराणिक आणि प्रागैतिहासातील वेगळ्या ऐतिहासिक महापुरुषांचे महत्त्व आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे दाखलेसुद्धा पुस्तकात अत्यंत विस्तृतरीत्या मांडलेले आहेत.

हजारो वर्षांपासून भारताच्या इतिहासात राजनीतीचे धडे घालून दिलेले आहेत आणि त्याचा उपयोग सद्यःस्थितीतील विविध निर्णय घेण्यापर्यंत कसा होतो हे त्यांनी अत्यंत धाडसीपणाने, विषयाची योग्यप्रकारे सांगड घालून बाहेरच्या जगाला दाखवून दिले आहे. रामायण व महाभारतातल्या गोष्टींची अन् पात्रांची सध्याच्या भारतीय परराष्ट्र धोरणाशी योग्यप्रकारे सांगड घालून एकप्रकारे त्यांचे महत्त्व आताच्या पिढीला सांगण्याचे आणि ते भारताबाहेरच्या जगातसुद्धा पोचवण्याचे काम या पुस्तकातून झाले आहे.

‘व्हाय भारत मॅटर्स’ पुस्तक अकरा वेगवेगळ्या भागांमधून विभागण्यात आले आहे. प्रत्येक भाग एक वेगळा मुद्दा, एक वेगळा विषय आपल्यासमोर ठेवतो. ‘फॉरेन पॉलिसी ॲण्ड यू’ या भागामधून आपल्याला भारताची परराष्ट्रीय नीती आणि धोरण सामान्य भारतीयांसाठीसुद्धा किती महत्त्वाचे आहे, हे कळायला लागते.

भारतातील सामान्य माणूस ते भारताबाहेर गेलेले विद्यार्थी, नोकरवर्ग आणि व्यापार वर्ग या सर्वांसाठीच परराष्ट्रीय धोरण किती महत्त्वाचे आहे, हे त्यामध्ये सांगितलेले आहे. क्वाड आणि जी २० समिट कॉन्फरन्समुळे भारताचे नाव ‘विश्वमित्र’ म्हणून कशाप्रकारे पुढे आले, याची मांडणीही पुस्तकात आहे.

तंत्रज्ञान, व्यापार, कुशल मनुष्यबळ आणि त्या सर्वांबरोबर भारताची अस्मिता कायम राखून जागतिक पटलावर आखलेले परराष्ट्रीय धोरण या सर्व गोष्टींमुळे भारताचा दबदबा आज जगभरात निश्चितच उमटलेला आहे. भारताची आर्थिक विश्वसत्ता म्हणून ओळख अजून मजबूत होण्यासाठी जी काही आर्थिक धोरणे आवश्यक आहेत त्या दृष्टीनेच बाहेरील देशांबरोबर आपण आर्थिक आणि परराष्ट्र नीती धोरण आखत असतो, हे सर्व या पुस्तकामध्ये जयशंकर यांनी मुद्देसूदरीत्या मांडलेले आहे.

भौगोलिकदृष्ट्या आपल्याभोवती असलेल्या देशांशी आणि जगातील इतर अनेक राष्ट्रांबरोबर गेल्या दहा वर्षांत आपले संबंध मजबूत झाले असल्यामुळेच अनेक जागतिक कठीण संकटांमधून भारतीयांना परत आणण्यात आपल्याला यश आले असल्याची सत्य परिस्थिती पुस्तकामध्ये जयशंकर यांनी मांडली आहे. आपल्याभोवती असलेल्या दुसऱ्या देशांना मात्र हे जमलेले नाही हेही तेवढेच खरे. ‘ऑपरेशन गंगा’, युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुटका, ‘ऑपरेशन देवी शक्ती’, काबूलमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित घरी परत आणण्यासाठीचे प्रयत्न इत्यादी अनेक उदाहरणे पुस्तकात देण्यात आली आहेत.

आपली संस्कृती, कला, वारसा आणि सर्वधर्मसापेक्ष भाव कायम राखून इंडियापासून भारतापर्यंतचा प्रवास, त्यामुळे जगभरात भारतीयांना मिळणारी मानाची वागणूक आणि भारतीयांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलला आहे, हेसुद्धा तुम्हाला पुस्तकात वाचायला मिळते.

पुस्तकातील ‘द रोड नॉट टेकन’ नावाच्या भागात मुख्यत्वेकरून पाकिस्तान आणि चीन देशांबरोबरचे संबंध, स्वातंत्र्यपूर्तीच्या काळानंतरसुद्धा अतिशय महत्त्वाच्या प्रदेशांच्या आणि सीमारेषेबद्दलच्या केलेल्या अक्षम्य चुका, अजूनही यूएन सिक्युरिटी कौन्सिलमध्ये भारताला न मिळालेले स्थान या आणि अशा पद्धतीने घेतलेल्या निर्णयांचे परिणाम अजूनही भारताला सहन करावे लागत आहेत, याबद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती लेखकाने दिली आहे.

कोविडकाळात जवळपास ७० लाख नागरिकांना ‘वंदे भारत’ मिशनअंतर्गत भारतात कसे सुखरूप परत आणण्यात आले, भारतीय बनावटीची लस शंभर देशांना आपण पुरवली; परंतु त्यासाठी लागणारे कच्च्या मालाचे साहित्यसुद्धा त्यांपैकी अनेक देशांकडून आपल्याला मिळाले होते हे पुस्तकातील ‘द स्टेट ऑफ द वर्ल्ड’ भागातून सांगायला जयशंकर विसरलेले नाहीत.

परराष्ट्र नीती आणि धोरण हे फक्त संकटकाळी नागरिकांना ने-आण करण्यासाठीच नाही; तर भारताच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, अर्थकारण मजबूत करण्यासाठी, व्हिसा नियम शिथिल करण्यासाठी आणि भारतीय वस्तूंना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यापासून ते बाहेरील देशातसुद्धा रोजगार उपलब्धतेपर्यंत सर्व काही त्यात येते. आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी धोरण आखण्यातसुद्धा मागच्या काही वर्षांत भारताने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे, हेसुद्धा जयशंकर यांनी विस्तृतपणे सांगितले आहे.

एखादा देश सांभाळणे आणि त्यासाठी परराष्ट्रीय धोरण आखताना त्या देशातील महत्त्वाच्या व्यक्तींना देशाबाहेर जावे लागणे, हे किती महत्त्वाचे आहे हे सर्व भारतीयांनी यापुढे समजून घेऊन ही गोष्ट लक्षात ठेवावी, अशी प्रेमळ ताकीदसुद्धा जयशंकर यांनी दिली आहे. भारतातील सर्व सुजाण आणि सजग नागरिकांनी, इतिहासप्रेमी विद्यार्थ्यांनी आणि जगभरातील तसेच ज्यांना भारताबद्दलची माहिती करून घ्यायची आहे त्या सर्वांनीच मनात कोणताही पूर्वग्रह न ठेवता वाचायलाच हवे असे हे पुस्तक नक्कीच आहे.

gauribag7@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com