अजिंक्य मनाच्या उभारीची कथा

वस्तुस्थितीशी थोडंफार साम्य आढळताच एकदम निष्कर्षाला येऊन पात्र - प्रसंगांच्या गळ्यात तडकाफडकी नावनिशीवार चिठ्ठ्या डकवण्याचा उतावळेपणा त्यांनी करू नये...
Disclaimer drama artist education
Disclaimer drama artist educationsakal
Summary

वस्तुस्थितीशी थोडंफार साम्य आढळताच एकदम निष्कर्षाला येऊन पात्र - प्रसंगांच्या गळ्यात तडकाफडकी नावनिशीवार चिठ्ठ्या डकवण्याचा उतावळेपणा त्यांनी करू नये...

‘माझ्या रसिक वाचक - प्रेक्षकांना मनापासून सांगायचं ते इतकंच की, या नाटकातील कथावस्तू, घटना आणि व्यक्तिरेखा सर्वस्वी नसल्या तरी प्राधान्याने कल्पितच आहेत. वस्तुस्थितीशी थोडंफार साम्य आढळताच एकदम निष्कर्षाला येऊन पात्र - प्रसंगांच्या गळ्यात तडकाफडकी नावनिशीवार चिठ्ठ्या डकवण्याचा उतावळेपणा त्यांनी करू नये...’

असं एक डिसक्लेमरवजा निवेदन नाटककार वसंत कानेटकरांनी आपल्या ‘हिमालयाची सावली’ या नाटकाच्या संहितेच्या सुरुवातीला दिलेलं आहे. (तत्कालीन) ‘अनेक नामांकित व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वांचे विविध रंग त्यात मिसळले आहेत... वास्तव आणि कल्पित यांचं मिश्रण करून एक वेगळंच रसायन तयार करण्याचा मी यत्न केला आहे...’ असंही त्यांनी पुढं त्यात म्हटलंय.

हे अर्थात मान्य होण्यासारखं नाही. कारण गावापासून दूर पार माळरानावर ‘अनाथ अबलाश्रम’ काढणारे, जोडीला ‘महिला शिक्षण मंदिर’ही चालवणारे आणि पाठोपाठ ‘पुनर्विवाह मंडळ’सुद्धा सुरू करणारे नाटकातील नानासाहेब ऊर्फ गुंडो गोविंद भानू पाहताच आपल्या डोळ्यांसमोर दुसरं-तिसरं कुणी नाही, तर अण्णासाहेब अर्थात धोंडो केशव कर्वे हे एकमेवच उभे राहतात!

मग ओघानेच बाया कर्वे, र. धों. कर्वे ते इरावती कर्वे... अशी मांदियाळीच जणू प्रकट होते. आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीत मोठाच वाटा असणारं हे असामान्य कुटुंबच त्यांच्या सुख-दुःखांच्या ताण्याबाण्यासकट ‘हिमालयाची सावली’तून मराठी मनाला पुन्हा एकदा भिडलं. या नाटकाला गेल्याच महिन्यात पन्नास वर्षं पूर्ण झाली. सहा फेब्रुवारी १९७२ रोजी हे नाटक रंगमंचावर आलं होतं.

Disclaimer drama artist education
State Drama Competition : पती-पत्नीचे नाते उलगडणारे ‘खुराडं’

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीसचा तो काळ. कमालीचे ध्येयनिष्ठ व तितकेच कर्तव्यकठोर असणाऱ्या प्रो. भानूंच्या कुटुंबाची ही गोष्ट. समाजातील वंचित व त्याहूनही अधिक शोषित घटक असणाऱ्या स्त्रियांविषयीची आंतरिक कणव व तळमळीतून प्रो. भानूंनी एखाद्या व्रतासारखं त्यांच्यासाठीचं कार्य हाती घेतलं, नव्हे त्यात स्वतःला वाहूनच घेतलं.

या कामात त्यांच्याबरोबर त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाही सहभागी व्हावं लागलं. तत्कालीन लोकापवादाची पर्वा न करता ‘अनाथ अबलाश्रम’ आणि ‘महिला शिक्षण मंदिर’ उभारूनच ते थांबले नाहीत, तर या कामी पूर्ण वेळ देण्यासाठी कॉलेजातील आपली घसघशीत पगाराची नोकरीही सोडली.

पाठोपाठ त्यांनी ‘पुनर्विवाह मंडळा’ची स्थापना केली व तत्त्वाचा भाग म्हणूनच स्वतःही विधवेशी पुनर्विवाह केला. याच सावित्री म्हणजेच बायोला त्यांचा संसार आपल्या खांद्यावर घ्यावा लागला. आदर्श समाज बांधण्याच्या नादात स्वतःचं घर विस्कटलेल्या भानूंच्या आयुष्यातील शेवटच्या काही वर्षांची कहाणी म्हणजे हे नाटक आहे.

Disclaimer drama artist education
Marathi Drama : परिस्थितीशी झटणाऱ्यांची कहाणी ‘मुसक्या’

भानूंचा मोठा मुलगा जगन्नाथ बापाशी असलेल्या बेबनावामुळेच घर सोडून लांब आफ्रिकेत जाऊन राहिला आहे. धाकट्या पुरुषोत्तमालाही जाणीव नव्हे तर खात्री आहे की, पदवी परीक्षेत मिळवलेल्या आपल्या सुवर्णपदकाचं बापाला फारसं कौतुक नसणार आणि पुढचा मार्ग आपला आपल्यालाच शोधायला ते सांगणार.

त्याच्या विलायतेतल्या शिक्षणाची तजवीज करायला आपल्या नावे असलेल्या विम्याची मिळालेली रक्कम कामी येईल, या मनसुब्यात बायो असतानाच त्या पैशांतूनच आश्रमाची जागा खरेदी होत असल्याचं तिला कळतं.

ज्या भानूंना जाब विचारायचा ती निश्चय करते, ते भानू मुळात घरी पोहोचतातच मारहाण झालेल्या अवस्थेत! ‘समाजाला न रुचणारी सुधारणा घाईगर्दीने करायचा अट्टहास केला तर लोक देतील ते शासन निमूटपणे पत्करलंच पाहिजे...’ हीच त्यावर त्यांची स्वतःची प्रतिक्रिया आहे!

Disclaimer drama artist education
State Drama Competition : जळगाव केंद्रातून ‘हालगी सम्राट’ प्रथम

कार्याच्या दूरगामी धोरणाच्या दृष्टीने आश्रम आणि पुनर्विवाह मंडळ एकमेकांपासून दूरच योग्य ठरतील म्हणून केवळ त्यांच्याविषयीच्या आदर व लोभापोटी त्यांच्या कामात पूर्णवेळ मनःपूर्वक राबणाऱ्या बायोच्या भावाला - तातोबाला भानू आश्रमापासून दूर पाठवत घरही वर्ज्य करतात.

कळस म्हणजे बायोला सतत समोर बघत आश्रमातल्या बालविधवांना पुनर्विवाहाची ओढ लागू नये म्हणून बायोलाही आश्रमात येण्यास मज्जाव करतात. त्यांच्या लेखी वैयक्तिक भावभावनांपेक्षा ध्येयधोरणं महत्त्वाची! त्यामुळे भानू आणि आसपासच्या आपल्या माणसांमधील नाती व बंध शाबूत ठेवण्यासाठी बायोला असह्य तगमग बाजूला ठेवून अथक धडपड करावी लागते.

त्या घडीला आजवर दाहक सावलीसारखी सोबत करणारी बायो पुढं होत त्यांना आधार तर देते, मात्र आधाराविना त्यांनी पुन्हा उभं रहावं, अशी दुर्दम्य ऊर्जाही पालवू पाहते ! ‘हिमालयाची सावली’ ही अखंड ताटातुटीची आणि त्यातून शिल्लक राहिलेल्या अजिंक्य मनाच्या न संपणाऱ्या उभारीची कथा आहे, असं श्रेष्ठोत्तम व्यासंगी विचारवंत नरहर कुरुंदकरांनी म्हटलं होतं.

नात्यानात्यांमधली, श्रेयस-प्रेयसामधली, ध्यासा-प्रयासामधली, योग-वियोगामधली... अशा अनेकविध प्रकट-अप्रकट ताटातुटी या नाटकात आहेत. असामान्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याच्या कानेटकरांच्या ध्यास आणि प्रयासातला ‘हिमालयाची सावली’ हा विजयी टप्पा आहे, असा निर्वाळाही कुरुंदकरांनी या नाटकाबद्दल लिहिताना दिला होता.

सत्तर-ऐंशीच्या दशकात व पुढंही सातत्याने व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी नाटकं देत असतानाही कानेटकरांनी ‘मत्स्यगंधा’, ‘मीरा मधुरा’, ‘इथे ओशाळला मृत्यू, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘विश्ववृक्षाची छाया’.... अशा अनेक नाटकांमधून असामान्य, अलौकिक व्यक्तित्वांमधल्या माणूसपणाचा शोध घेण्याचा प्रयत्न त्या व्यावहारिक चौकटीतही केला.

श्री. म. माटे यांनी कायम आपल्या लेखनातून ‘उपेक्षितांचं अंतरंग’ उलगडण्याचा जणू धर्मच जपला. आपल्या या नाटकांमधून ‘उन्नतांचं अंतरंग’ शोधण्याच्या कानेटकरांच्या प्रयत्नांची गणनाही त्याच श्रेणीत करावी लागेल..

आदर वा भक्तिभावापुढे जात हा शोध घेण्यात इतर नाटकांच्या तुलनेत ‘हिमालयाची सावली’ला अधिक यश आल्यानेच कुरुंदकरांनी हा यातला नवा टप्पा असल्याचं नोंदवलं. मराठी व्यावसायिक नाटकांसाठीही वेगळ्या कारणाने हा टप्पा नवा ठरला. ‘नटसम्राट’ हे वयोवृद्ध व्यक्तिरेखेला केंद्रस्थानी ठेवणारं नाटक होतं, तर त्याही पुढे जात ‘सावली’त वयोवृद्ध स्त्री व्यक्तिरेखेलाही केंद्रस्थानी आणलं...

कानेटकर आपल्या असामान्य व्यक्तिरेखेच्या शोधात भानूंना शरण गेले; पण प्रत्यक्षात त्यांच्या हातून बायो एवढी भव्य साकार झाली की, बायो आकाशाप्रमाणे सर्वांना आच्छादणारी होऊन तिने हिमालयसुद्धा आपल्या सावलीत घेतला!

दर्जेदार निर्मितीचा वसा घेतलेल्या मोहन तोंडवळकरांच्या ‘कलावैभव’ने आणलेलं हे नाटक दस्तुरखुद्द डॉ. श्रीराम लागूंनी दिग्दर्शित केलं होतं. अर्थातच प्रो. नानासाहेब भानूंची भूमिकाही त्यांनीच केली होती.

‘नटसम्राट’मध्ये डॉक्टरांसोबत कावेरीची भूमिका त्याच तोलमोलाने ज्या शांता जोगांनी केली होती, त्याच शांताबाईंनी इथं बायो साकारली. त्यांची ही भूमिका आजवरच्या मराठी रंगभूमीवरच्या अक्षय भूमिकाशिल्पांपैकी एक आहे.

असामान्य अभिनय प्रतिभा रंगमंचावरचा अवघा अवकाश कसा व्यापू शकते, याचं दर्शनच या लहानखुऱ्या चणीच्या महान अभिनेत्रीने घडवलं. ‘नटसम्राट’च्या ‘सरकारां’च्या या दिगंत ‘सावली’पर्यंतच्या प्रवासात डॉक्टर साथीला होते.

या वेळी ‘नॉन स्ट्रायकर’च्या भूमिकेत राहून त्यांनी शेवटी स्कोअर केला. नाटकाच्या शेवटच्या प्रवेशात अर्धांगवायूचा झटका सोसलेल्या भानूंची वाणी बहुतांश हरपली आहे, एकच अगम्यसं वाक्यं पुनःपुन्हा त्यांच्या तोंडून फुटत असतं.

ते एकच वाक्य डॉक्टरांनी प्रसंग आणि भावांप्रमाणे निरनिराळ्या पद्धतीने उच्चारत विकल शरीरातली अपराजित जीवनेच्छा पूर्ण प्रकट केली!... शांताबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचं तर या भूमिकेशी एक अद्‍भुत अद्वैतच निर्माण झालं होतं.

शांताबाई गेल्या तेव्हा दिग्दर्शक प्रकाश बुद्धिसागरने आपल्या श्रद्धांजलीपर लेखाला दिलेलं शीर्षक केवळ समर्पकच नव्हे तर अविस्मरणीय होतं : ‘सावली विसावली’.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com