संग्रहालयाचं अनोखं विश्व... (राम पराडकर)

Ram-Paradkar
Ram-Paradkar

पुढचं दालन ‘सबकुछ ब्रॅडमन !’ असं. अनेक गोष्टी सुसंगतरित्या मांडून ठेवलेल्या इथं दिसतात. त्यानं वापरलेल्या बॅटस् आहेत. स्वेटर्स आहेत, आणि असं बरेच काही. एका शोकेसमध्ये त्याच्या दोन बॅटस् ठेवलेल्या होत्या. एका बॅटनं त्यानं फक्त तीन षटकांमध्ये शतक ठोकले होते. त्याकाळी आठ बॉलचे षटक असे. दुसऱ्या बॅटनं दोन्ही डावात त्याने शतके ठोकली होती. (१९३२ साली) एका शो केसमध्ये त्याने वापरलेल्या बॅगी ग्रीन कॅप ठेवलेल्या आहेत. एका खाली एक अशा...

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जगविख्यात क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमनचं गाव बौराल. ऑस्ट्रेलियातल्या सिडनी - कॅनबेरा महामार्गावर थोडं आतमध्ये. हे अगदी छोटंसं खेडेगाव. अतिशय देखणं आणि चित्रमय! बघत रहावं असं. लख्ख रस्ते, दुतर्फा गर्द झाडी, खाली पडणारे उन्हाचे कवडसे, मागे टेकड्यांच्या रांगा! त्यासुद्धा मागच्या निळ्याशार आकाशाच्या पार्श्वभूमीवर दिसतात. ‘बौराल’ गावाच्या या अशा प्रथम दर्शनानं आम्ही मोहरून गेलो. हे सर्व बघून जरा कुठे भानावर येतोय न येतोय तो आम्ही ‘ओव्हल क्रिकेट ग्राऊंड’पाशी येऊन पोहोचलो. हेही असेच छोटेसे ग्राऊंड! छोट्याशा खेडेगावाला साजेसे आणि एकदम हिरवेगार. जणू काही हिरवं कार्पेटच पसरलंय की काय असं वाटावे. ग्राऊंड गोल आणि चारही बाजूने उघडे. एका बाजूला छोटे पॅव्हेलियन. त्यापुढे प्रेक्षकांसाठी एक छोटा स्टँड. जेमतेम पन्नास एक खुर्च्यांचा असेल. हेच ते ब्रॅडमनचे ग्राऊंड ! जिथं ब्रॅडमन आयुष्यातली पहिली मॅच खेळला.

पुढं त्यानं आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अमाप यश मिळविले. इतकं की तो ‘ऑल टाईम ग्रेट’ क्रिकेटर झाला. झालेही बहुत, होतीलही बहुत, परंतु ‘या सम हा! असा क्रिकेटर!’ इतका की तो ऑस्ट्रेलियन आम जनतेचा गळ्यातला ताईत बनला. एवढा क्रीडा क्षेत्रातला हुकमी एक्का जवळ असताना त्याचा लाभ उठविला नाही तर तो ऑस्ट्रेलियन्स कसले? त्यांनी बौराल गावातच त्याचं पहिलं संग्रहालय उभारलं. ओव्हल मैदानाच्या मागच्या बाजूला. १९८९ साली त्याचे उद् घाटन झालं. स्वत: सर डॉन ब्रॅडमन यांनीच ते केलं. म्हणजे ब्रॅडमनचं भाग्य बघा. स्वत:च्या संग्रहालयाचं स्वत:लाच उद् घाटन करायला मिळालं. किती लोकांच्या वाट्याला असं भाग्य येतं?

आज बौराल हे क्रिकेटची पंढरी झालेलं आहे. क्रिकेटर येतात. क्रिकेटप्रेमी येतात आणि मोठ्या संख्येने पर्यटकही येतात आणि दैवताला नमन करून जातात. मला ‘ऑसी’ लोकांचं एका बाबतीत नेहमी कौतुक करावेसे वाटते. ते म्हणजे पर्यटकांना आकृष्ट करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. आपल्याकडे बरोबर उलटी स्थिती आहे. 

माझ्या सिडनीच्या २००८ या वर्षातल्या भेटीत मी पहिल्यांदा हे संग्रहालय बघितलं. आमच्या १२/१३ या वर्षातल्या भेटीत परत बघण्याचा योग्य आला. पाहतो तो अजून एक अत्याधुनिक संग्रहालय  शेजारी उभारलेलं, एकदम आधुनिक! बहुतांश जुन्याच गोष्टी याही म्युझियममध्ये होत्या. फक्त त्या अधिक आकर्षक पद्धतीने मांडल्या होत्या. आजच्या काळाला अनुरूप अशा. म्हणजे दृकश्राव्य माध्यमावर जास्ती भर होता. म्युझियम कुठेही कंटाळवाणे होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतलेली होती. ही वास्तू ‘इंटरनॅशनल क्रिकेट हॉल ऑफ फेम’ या नावानं ओळखली जाते. लोक कॅनबेराला जातांना येथे हमखास थांबतात.

गेल्या गेल्या समोर येतं ते ‘सोव्हेनीर शॉप’ ! म्हणजे भेट देणार्‍याला मोहात पाडणारे शॉप. आठवण म्हणून एखादी तरी वस्तू खरेदी करण्यासाठी उद्युक्त करणारे दुकान. मांडणी अर्थातच भुरळ पाडणारी. तिथं क्रिकेटचं बहुतांश सामान होतं. खेळण्यासाठी नव्हे, तर घरातल्या शोकेस मध्ये मांडण्यासाठी ! क्रिकेटवरची, बॅडमनची, पुस्तकं, फोटो होते. कॅलेंडरं होती. ऑस्ट्रेलियाची कॅलेंडरे होती. आणखीनही बरेच काय काय होते. सुदैवाने आमचा नातू लहान होता. त्यामुळं त्यानं हट्ट करण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे आम्ही सरळ  पुढे गेलो. पुढच्या दालनात समोर आला तो १९४८ या वर्षातला ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीमचा फोटो. भला मोठा आणि कृष्णधवल. कर्णधार ब्रॅडमन मध्यभागी बसलेला. माझ्याओळखीचे कोणीच नव्हते. पण नील हार्वे, नॉर्मन ओनील, रे लिंडवाल बहुधा त्यात असावेत. मला क्रिकेटची गोडी लागली ती रिची बेनोचा संघ भारतात १९५९ साली आला. साधारण तेव्हापासून. आपण त्यांच्या विरूध्द जिंकलेली कानपूर टेस्ट आठवली. जसू पटेल आणि पॉली उम्रीगर यांनी ती मॅच जिंकून दिली होती. त्यात हार्वे आणि ओनील आघाडीचे फलंदाज होते. ती सर्व मॅच रेडिओवर ऐकलेली आठवली. आणि क्रिकेटने भारून गेलेला तो काळही आठवला. पण तेव्हा असं वाटलही नव्हते की कधीकाळी आपल्याला ब्रॅडमन म्युझियम पहायला मिळेल. पण भाग्यात होतं. म्हणून पहायला मिळालं. दुसरे काय म्हणणार?

दुसऱ्या दालनात सुरवातीलाच क्रिकेटचा इतिहास सांगणारे पॅनेल दिसले. दक्षिण इंग्लडमधले मेंढपाळ मेंढया चरायला नेत असत. तेव्हा वेळ घालविण्यासाठी दंडुक्याने बॉल मारत असत. तीच क्रिकेटची सुरवात म्हणे. खूप जुनी घटना आहे ही. तो दंडुका तिथं ठेवलेला आहे. पुढे अ‍ॅशेसची’ माहिती सांगणारे एक पॅनेल दिसले. त्यात ’अ‍ॅशेस’ कसं सुरू झालं, याची माहिती दिली होती. १८८२ मध्ये इंग्लड ७ धावांनी ऑस्ट्रेलियाबरोबर हारले. हा पराभव इंग्लडमधल्या क्रिकेटप्रेमी मंडळींना जिव्हारी लागला. त्यांनी चिडून पेपरात एक जाहिरात देऊन टाकली. ती अशी ‘ २९ ऑगस्ट १८८२ रोजी इंग्लिश क्रिकेटचे ओव्हल मैदानावर निधन झाले । ईश्वर मृत आत्म्याला शांती देवो । ’

दुःखातिरेकाने गांजलेल्या मित्रमंडळींचा मोठा समूह. देहाचे अंत्यसंस्कार झाल्यावर अस्थी (Ashes) ऑस्ट्रेलियाला पाठवले जातील. तेव्हापासून जिंकणारा संघ अ‍ॅशेस घेऊन जातो आणि आपल्याकडे ठेवतो. अ‍ॅशेसचा इतिहास असा गंमतीशीर आहे.

पुढचं दालन ‘सबकुछ बॅडमन !’ असं दालन. अनेक गोष्टी सुसंगतरित्या मांडून ठेवलेल्या इथं दिसतात. त्याने वापरलेल्या बॅटस् आहेत. आहेत. स्वेटर्स आहेत, आणि असं बरेच काही. माणसानं एकदा उत्तुंग यश मिळवलं की अशा छोटया छोटया गोष्टींना सुध्दा महत्त्व येते. एकेकाळी मी क्रिकेट वेडा होतो. पण आता त्या वेडया टप्प्यातून पूर्णपणे बाहेर आलेलो आहे. त्यामुळे मला त्याचे फार नवल वाटले नाही. पण जगांत अजूनही भरपूर क्रिकेट प्रेमी आहेत. क्रिकेटवेडे सुध्दा आहेत. एका शो केसमध्ये त्याच्या दोन बॅटस् ठेवलेल्या होत्या. एका बॅटने त्याने फक्त तीन षटकांमध्ये शतक ठोकले होते. त्याकाळी आठ बॉलचे षटक असे. दुसऱ्या बॅटनं दोन्ही डावात त्याने शतके ठोकली होती. (१९३२ मध्ये ) एका शोकेसमध्ये त्याने वापरलेल्या बॅगी ग्रीन कॅप ठेवलेल्या आहेत. एका खाली एक अशा.

एके ठिकाणी एकाच दिवशी निरनिराळया ठिकाणी काय काय महत्वाचे घडले त्याचे तीन फलक होते.

  • ३ जानेवारी १९२९ - बॅडमनचे पहिले शतक. इंग्लंडविरुद्ध  मेलबर्न येथे. 
  • ३ जानेवारी १९४८ -  भारताविरूध्द दोन्ही डावात शतके, मेलबर्न येथेच. 
  • ३ जानेवारी २००३ -  स्टीव्ह वॉ ने १०,००० रन्स पुऱ्या केल्या. बॉर्डर आणि गावसकरच्या मागोमाग. 

याच दालनात दोन अप्रतिम फोटो लावलेले होते. दोन्ही रंगीत. एकात बॅडमन बरोबर लेन हटन, गॅरी सोबर्स होते. तर दुसर्‍यात शेन वार्न आणि आपला सचिन तेंडुलकर आहे. सचिनने भेट दिलेला एक स्वेटरही ऐटीत मिरवत होता. ता. २२/९/२००८ रोजी भेट दिलेला. पण सर्वात वेधक दालन आहे ते ‘दृकश्राव्य’ माध्यमाचे दालन. त्यासाठी पाच मोठे टी.व्ही. स्क्रीन्स भिंतीवर लावलेले आहेत. एक स्क्रीन ब्रॅडमनसाठी खास राखीव ठेवलेला आहे. त्याच्यावर ’डॉन’ प्रत्यक्ष खेळतांना आपण पाहू शकतो. हा स्क्रीन सतत चालू असतो. आम्ही दहा मिनिटे उभे राहून त्याची खेळी पाहिली. आणि ब्रॅडमनची खेळी पाहिली याची धन्यता वाटली. पण ज्यांनी गावसकर पाहिला आहे, तेंडूलकर पाहिला आहे त्याला वेगळं आणखीन काय वाटणार ?

मला फक्त ‘ऑसी’ लोकांचं कौतुक वाटतं. त्यांनी वेळीच त्याच्या गोष्टी संग्रहित करून मांडल्या. पुढे व्हिडिओ चित्रीकरणाचा जमाना लोकप्रिय झाल्यावर त्याचं नवीन संग्रहालय केलं. आणि अशा टी.व्ही. चित्रीकरणाला प्राधान्य दिले. त्यामुळं त्यांना स्वार्थही साधता आला आणि परमार्थही. आपलं ‘बी.सी.सी.आय.’ खरं तर एवढं श्रीमंत आहे. त्यांनी मनात आणलं तर ते केव्हाच करू शकले असते पण त्यांना फक्त स्वार्थच दिसतो. ते सुध्दा परमार्थात तरबेज असणार्‍या देशांत ! वाईट वाटतं.

दृकश्राव्याचे हे जे दालन आहे. त्याला क्रिकेटचे जगत’ (World of Cricket) असे संबोधले जाते. जगातल्या सर्व मॅचेस येथे संग्रहित करून ठेवलेल्या आहेत. त्याचे चार भाग केलेले आहेत. अमुक वर्ष ते अमुक वर्ष या स्क्रीनवर पहाता येतील. पुढचा कालखंड दुसर्‍या टी.व्ही स्क्रीनवर अशी पध्दतशीर विभागणी केलेली आहे. नुसत्या ‘टच स्क्रीन’ मुळं तो स्क्रीन उघडतो आणि आपल्याला सारं काही बघता येतं. हे दालन म्हणजे क्रिकेट प्रेमी लोकांना मेजवानीच आहे.

येथे एक कार्यक्रम मला योगायोगानेच पहायला मिळाला. तो म्हणजे आपल्या राहुल द्रविडला ‘सभ्य क्रिकेटपटू’ हा २०१२ मध्ये पुरस्कार जाहीर झाला होता. हा पुरस्कार बॅडमन फाऊंडेशन तर्फे जागतिक पातळीवर देण्यात येतो. क्रिकेटमधील उत्कृष्टता’ हाच निवडीचा एकमेव निकष नसतो. तर ज्यांनी निडरता, धैर्य, आणि स्वच्छ चारित्र्य अर्थात मैदानावर आणि मैदानाबाहेरदेखील जोपासले आहे, अशांनाच हा सन्मान मिळतो. कारण हे गुण ऑस्ट्रेलियाचे जगदविख्यात क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य घटक होते. म्हणजे एक प्रकारे हा ब्रॅडमन पुरस्कार देखील आहे. द्रविड बरोबर ब्रेट ली याला देखील हा पुरस्कार त्यावर्षी मिळाला होता. आम्ही भेट दिली त्यावेळी एका स्क्रीनवर हा ‘सभ्य क्रिकेटपटू’ पुरस्कार सोहळयाचा कार्यक्रम सुरू असलेला दिसला. मी लगेच थांबलो. त्यात संपादित अंशच होते. पण तरी कार्यक्रम ‘प्रत्यक्ष’ पाहिल्याचा आनंद मिळाला. आणि तोही अतिशय अनपेक्षितपणे. या संग्रहालयाबद्दल आणखीनही लिहिता येण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. पण थोडक्यात गोडी.

शेवटी मला समाधान एकाच गोष्टीचं वाटतं, की द्रविडला मिळालेला पुरस्कार सोहळा मला स्क्रीनवर का होईना पहायला मिळाला. तो सुध्दा चक्क बौराल गावातल्या ब्रॅडमन संग्रहालयामध्ये ! याहून अधिक भाग्य ते कोणतं?

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com