मोदी - कालखंडाचा चिकित्सक वेध

सकाळचे मुख्य संपादक श्रीराम पवार यांचे २०१९ नंतरच्या मोदी कार्यकाळाची चिकित्सा करणारे ‘मोदी २.०’ असे तीन ग्रंथ नुकतेच प्रकाशित झाले आहेत.
Modi 2.0 Books
Modi 2.0 Bookssakal

- प्रा. रणधीर शिंदे, saptrang@esakal.com

सकाळचे मुख्य संपादक श्रीराम पवार यांचे २०१९ नंतरच्या मोदी कार्यकाळाची चिकित्सा करणारे ‘मोदी २.०’ असे तीन ग्रंथ नुकतेच प्रकाशित झाले आहेत. हे लेखन ‘सकाळ’च्या सप्तरंग पुरवणीतून ‘करंट-अंडरकरंट’ या नावाने सदररूपानं प्रकाशित झालं आहे.

‘आमूलाग्र राजकीय बदलांची नांदी’, ‘राजकीय शक्‍यतांच्या शोधात’ आणि ‘वैचारिक स्वप्नपूर्तीच्या दिशेने’ या तीन ग्रंथांतून त्यांनी मोदी कालखंडाचा परामर्श घेतला आहे. या काळातील भारतातील राजकीय सत्ताकारणाचा इत्यर्थ आणि अन्वयार्थ त्यांनी मांडला आहे.

अलीकडील राजकीय लेखनाला लेखक-पत्रकारांच्या सापेक्ष भूमिकेमुळे एकसुरीपणा प्राप्त झाला आहे. ती मांडणी समर्थनार्थ किंवा विरोधात्म बाजूने केली जाते. सत्तापालटानंतर बदललेल्या भारताचं चिकित्सक चित्र मांडलं जात नाही, त्यामुळे या काळातील राजकीय विश्‍लेषकांची दोन राहुट्यांमध्ये विभागणी झालेली दिसेल. अर्थात, या प्रकारच्या लेखनदृष्टीस इतरही कारणं आहेतच.

श्रीराम पवार यांचं लेखन गेल्या चार वर्षांतील राष्ट्रीय घटना-घडामोडींच्या प्रतिसादातून निर्माण झालेलं आहे, त्यामुळे या घडामोडींचा राष्ट्राच्या वाटचालीवर प्रभाव आणि परिणाम करणाऱ्या घटनांचे त्यास संदर्भ आहेत. त्यांच्या या राजकीय विश्‍लेषणास या काळातील बहुमुखी समाजसंदर्भ आहेत आणि त्यांनी केलेली मीमांसा महत्त्वाची आहे. यामध्ये मोदींच्या दुसऱ्या टप्प्यावरील कार्यकाळाची सर्वांगीण अशी चिकित्सा आहे.

एका अर्थाने मोदी राजवटीच्या यशापयशाचा हा लेखाजोखा आहे. दशकातील राजकीय बदलांच्या नोंदी त्यात आहेत. तसंच, भूतकालीन घटनांचा एक अध्याहृत असा संदर्भपट यामागे आहे. भारतीय समाज आणि राजकारण पटलावर उपस्थित प्रश्‍नांच्या क्रिया-प्रतिक्रियांमधून उद्‌भवलेल्या संघर्ष-टकारावांच्या मांडणीतून हे लेखन निर्माण झालं आहे.

आंतरराष्ट्रीय पटलावर प्रभाव टाकणाऱ्या घटनांपासून राष्ट्र-राज्य घटनांचे संदर्भ त्यांच्या लेखनात आहेत. साधारणतः या त्रिदल ग्रंथात दशकातील राजकारणाच्या वाहत्या दिशांचं विहंगमावलोकन आहे. बदललेल्या ‘भारतचित्रा’तील असंख्य घटना-घडामोडी आणि संघर्षभूमी काळाविषयीचं हे कथन आहे.

भारतीय राजकारणातील भाजपपूर्वीचा काळ आणि भाजपसत्ता कालखंडातील एकमेकांवरील पडसादांच्या परिणामांची चिकित्सा आहे, त्यामुळे या सबंध लेखनात बदललेल्या राजकारणाची चर्चा केंद्रीय स्वरूपात आहे. राजकारणातील घटना-घडामोडींची उकल करताना या घटनांचा भूतकाळाशी असणाऱ्या संवाद-विसंवादी धाग्यांचा उलगडा केला आहे.

श्रीराम पवार यांच्या या ग्रंथांतील लेखनाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, भारतातील निवडणुकांचं विश्‍लेषण, ते महत्त्वाचं आणि वेगळं असं आहे. २०१९ नंतरच्या भारतातील निवडणुका, पक्षीय राजकारणाचे अंतःप्रवाह, त्यांच्या दिशा, बदल व प्रादेशिक पक्षांच्या कामगिरींची केलेली चिकित्सा महत्त्वाची आहे.

एका अर्थाने भारतातील निवडणुकांमागील ‘सत्ताकेंद्री’ वाटचाल आणि दिशांचा हा साक्षेपी असा मागोवा आहे. ‘एकल’ नेतृत्वापासून, जातीय मतपेढ्यांची गोळाबेरीज ते त्यातल्या संघर्ष, संवाद-विसंवादाची मांडणी केली आहे. गेल्या काही वर्षांतील भारतातील राजकारणाची, ‘मतपेढीकेंद्री’ राजकारणाची दिशा त्यामधून अधोरेखित झाली आहे.

यात भारतातील बदलत्या राजकारणाचा व समाजमनाचा कानोसा आहे. वेगवेगळ्या राज्यांमधील स्थिती, भूगोल, सामाजिकतेच्या पार्श्वभूमीवर राजकीय स्थितीवर वेगळा प्रकाश टाकला आहे. भारताची दक्षिणभूमी, उत्तरभूमी ते पूर्वांचल प्रदेशातील निवडणुकांवरील पवार यांची अर्थनिर्णयने महत्त्वाची आहेत. त्या त्या प्रदेशातील राजकारणाचे सूक्ष्म असे बारकावे त्यात आहेत.

निवडणुकीच्या सत्ताकेंद्राला महत्त्व देणाऱ्या, त्या टिकवून ठेवणाऱ्या या काळातील महत्त्वाच्या बदलांकडे ते पुनःपुन्हा लक्ष वेधू इच्छिताहेत. ते म्हणजे, या काळात भारतीय समाजपटलावर आकाराला आलेला बहुसंख्याकवाद व त्यास प्राप्त झालेलं अतोनात महत्त्व. भाजपने सतत बहुसंख्याकवादाला महत्त्व दिलं. या प्रकारच्या राजकारणाची व्याप्ती वाढवण्यात भाजपला यश आहे, त्यातून एकल दृष्टीला महत्त्व मिळालं.

भाजपने या रणनीतीचा पाठपुरावा केला. लोकप्रिय बहुसंख्याकवादाचं गजबजलेलं लोकप्रिय चर्चाविश्व घडविण्यात भाजप यशस्वी ठरला. याचं मूलगामी असं विवरण पवार यांनी विविध लेखांमधून केलं आहे. या काळात बहुसंख्याकवादाला खतपाणी घालण्यात आलं.

याबाबतीत काही वेळा सत्ताधारी आणि विरोधकांतही एकमत झालं. या बहुसंख्याकवादी सुलभीकरण स्वरूपाच्या राजकारणाची भेदक अशी मांडणी त्यांनी केली आहे. या बहुसंख्याकवादाने समाजासमाजांत ध्रुवीकरण केलं. भारतातील या पालटलेल्या वस्तुस्थितीचा साक्षेपी असा लेखाजोखा त्यांनी मांडला आहे.

पवार यांनी राज्याराज्यांमधील निवडणुकांमागील केलेलं विश्‍लेषण महत्त्वाचं आहे. भारतासारख्या बहुल आणि गुंतागुंतीच्या राष्ट्रातील निवडणुकांचा प्रश्‍न अधिक जटिल बनलेला आहे. त्या त्या प्रदेशातील प्रश्‍न आणि प्रभाव टाकणाऱ्या गोष्टींचा निवडणुकांवर आणि सत्ताप्राप्तीवर परिणाम झालेला आहे. यादृष्टीने विविध राज्यांमधील निवडणुकींचा पवार यांनी घेतलेला परामर्श महत्त्वाचा आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, उ. प्रदेश, बिहार, प. बंगाल व इतर राज्यांमधील निवडणुकांच्या माध्यमातून सत्तासोपान मार्गाचं घडविलेलं दर्शन महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातील २०१९ च्या निवडणुका आणि त्यानंतरच्या सत्ता स्थापनेच्या नाट्यमय घडामोडींमागील केलेलं समालोचन वैशिष्ट्यपूर्ण आहे. गेल्या काही दिवसांतील महाराष्ट्रातील नाट्यपूर्ण राजकीय घडामोडींचं चित्र या विश्‍लेषणाशी सुसंगत आहे.

महाराष्ट्रातील सत्ताढोंग आणि सत्ताकोंडीच्या नामुष्कीच्या कहाणीचे त्यांनी मांडलेले पदर महत्त्वाचे आहेत. या राजकीय कोंडीच्या संदर्भात त्यांनी ‘राजकारणात कितीही बलाढ्य वाटणाऱ्यांची कोंडी छोट्याशा पीछेहाटीने होऊ शकते, हे भारतीय राजकारणाचं वैशिष्ट्य’, हे नोंदविलेलं निरीक्षण महत्त्वाचं आहे.

२०१९ नंतरच्या भाजपच्या दुसऱ्यांदा मिळवलेल्या सत्ताटप्प्यावरील भारतव्यापी यशाची कारणं या तीनही ग्रंथांत आहेत. १९ मध्ये भाजपला अनेक राज्यांत यश मिळालं. या पर्वाचे मोदी नायक ठरले. हे ‘नायकपण’ आकाराला आणण्यात कळबिंदू ठरलेल्या घडामोडींचं पवार यांनी केलेलं विश्‍लेषण मूलभूत स्वरूपाचं आहे. एका अर्थाने मोदी नेतृत्वाच्या यशाचा हा ताळेबंद आहे.

‘राजकीय नॅरेटिव्हवर नियंत्रण ठेवण्यात व मुख्य प्रवाहातील स्पर्धात्मक राजकारणात अजेंडा निश्‍चित करण्यात भाजपला यश’ मिळाल्याचं ते सांगतात. याकाळात बहुसंख्याकवादातून हिंदुत्वाचं चर्चाविश्व घडवलं गेलं. तसंच, ‘मोदी ब्रॅंडचं वैशिष्ट्य म्हणजे, भावनाप्रधान राजकारण’, याचा पुरेपूर वापर भाजपने केला. यासाठी मतदारांना धर्म, इतिहास, परंपरेविषयी भावनिक साद घालण्यात आली.

खऱ्या लोककल्याणाच्या प्रश्‍नांऐवजी ‘गंगाने बुलाया हैं’सारख्या भावनिक नॅरेटिव्हचा लोकमानसावर प्रभाव पडला. याप्रकारचं दशकभरात विविध प्रकारचं नॅरेटिव्ह निर्माण केलं गेलं. या नॅरेटिव्हकडे श्रीराम पवार पुनःपुन्हा वाचकांचं लक्ष वेधू इच्छित आहेत. हवं तसं नॅरेटिव्ह रचणं हा सत्तासोपानाचा मार्ग आहे. पराकोटीच्या आत्मविश्वासातून या काळात विविध प्रकारची नॅरेटिव्ह रचली गेली. त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा भाजपला झाला.

या नॅरेटिव्ह रचितांमधून नवी प्रतीकं, चिन्हं, रंगभाषा लोकसमूहावर थोपवली गेली. त्यामधून इतिहासाची, भूतकाळाची जाणीव क्षीण आणि विकीर्ण करण्यात आली. या नॅरेटिव्हमागील विविध आंतरसंबंधांची केलेली उकल महत्त्वाची आहे. उदा.- पं. नेहरू, महात्मा गांधी, सरदार पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस या प्रतिमांचा याकाळात कशा पद्धतीने वापर केला गेला याची नोंद या लेखनात आहे. अनैतिहासिकतेला उठाव देणारं प्रतिमाभंजन आणि वस्तुस्थितीचा अपलाप करणारं नॅरेटिव्ह मोठ्या प्रमाणात निर्माण केल्याचं पवार सांगत आहेत.

भाजपच्या राजकीय यशाच्या महामार्गाची पवार यांनी जशी चिकित्सा केली आहे, तशीच काँग्रेसच्या अपयशाचीदेखील केली आहे. प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसच्या पडझडीचा चित्रफलक त्यांच्या लेखनात आहे. भारतीय राजकारणात ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या वाटचालीचं सामर्थ्य आणि मर्यादांचं त्यांनी केलेलं विश्‍लेषण मूलभूत स्वरूपाचं आहे.

गांधी घराणं, दीर्घकाळातील दरबारी निष्ठावान, कमकुवत नेतृत्व आणि नव्या पेचांमुळे काँग्रेसला यश मिळालं नाही. अपयशी ठरलेली व्यूहरचना व प्रचारनीतीमुळे काँग्रेस क्षीण आणि कमकुवत झाली, त्यामुळे काँग्रेसच्या पराभवाची व पडझडीची त्यांनी केलेली मीमांसा महत्त्वाची आहे. ‘काँग्रेसच्या एकेकाळच्या गजबजलेल्या भरल्या वाड्याचे खांब कलथून गेले आहेत, तरीही वाड्याच्या मालकाचा-चालकाचा थाट संपलेला नाही’ यांसारख्या विधानांतूनही त्यांची दृष्टी लक्षात येईल.

याबरोबरच सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांना नामोहरम करण्याचं आणि शबलित करण्याचं तंत्र वापरलं गेलं, तशा प्रकारच्या प्रचारी रणनीतीचा अवलंब केला गेला. याची अनेक उदाहरणं पवार यांनी दिली आहेत. केवळ सोयीचे मुद्दे सांगायचे आणि विरोधकांना कायम दोष देण्याचं तंत्र या काळात वापरलं गेल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं आहे.

या तीनही ग्रंथांत या काळातील भारतातील महत्त्वाच्या प्रश्‍नांवर लेखन आहे. काश्‍मीर प्रश्‍नावरील बरेच लेख या ग्रंथांत आहेत. काश्‍मीरचा प्रश्‍न, भारत-पाकिस्तान फाळणी, पुढाऱ्यांची भूमिका ते ३७० कलम रद्द करण्यापर्यंतच्या प्रवासाच्या दीर्घ चित्रफलकाची मीमांसा पवार यांनी केली आहे. काश्‍मीर प्रश्‍नावरील सर्वांगीण स्वरूपाचं हे लेखन आहे.

या विश्‍लेषणात काश्‍मीरचा इतिहास, भौगोलिक रचना, लोकमानस, दहशतवादी कारवायांचं स्वरूप, केंद्र भूमिका यावरील विस्तृत आणि मूलगामी स्वरूपाचं विवरण आहे. तसंच, या घटना-घडामोडींमागील भूतकाळाच्या संदर्भपटाची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे पवार यांच्या विश्‍लेषणदृष्टीस तुलनात्मक काळपटाचं परिमाण प्राप्त झालं आहे.

शेतकरी आंदोलनं, अर्थसंकटं, बेरोजगारांचे जीवघेणे प्रश्‍न, राष्ट्रीय सुरक्षा, कोविडकाळ, व्यक्‍तींच्या खासगी आयुष्यावरील पाळत व्यवस्था, बॅंक घोटाळे, राज्यपाल आणि राज्यसंस्था यांमधील तणाव, जातीय राजकारण, नोटाबंदी, हवाई हल्ले यांवरील लेख विश्‍लेषणात्मक आणि त्या त्या प्रश्‍नाची सखोल जाण दर्शविणारे आहेत.

कोविडकाळ व कोविडकाळानंतरच्या भारतातील समस्यांचा वेध आहे. सार्वजनिक आरोग्याचा प्रश्‍न, राज्यसंस्थेची दिशाहीन भूमिका, स्थलांतरित मजूर अडचणी आणि अडथळ्यांची केलेली मांडणी महत्त्वाची आहे. याबरोबरच पूर्व व ईशान्येकडील राज्यांमधील संघर्ष आणि टकरावावरील लेखन महत्त्वाचं आहे. यामध्ये अस्वस्थ भारताचं वर्तमान दडलेलं आहे.

याबरोबर गेल्या चार वर्षांत निर्माण झालेल्या आंदोलनाचा परामर्श त्यांनी घेतला आहे. पवार यांच्या मांडणीत आणखी एका प्रश्‍नाला सतत स्थान आहे. ते म्हणजे, या काळात केंद्र आणि राज्य यांच्यातील टकरावाची मांडणी आहे. राष्ट्र-राज्यातील संबंधांचं दुराव्यात आणि विसंवादात रूपांतर झालं आहे. या विसंवादाची मांडणी त्यांनी केली आहे.

श्रीराम पवार यांच्या या लेखनाचं वैशिष्ट्यं म्हणजे, हे लेखन कमालीचं तटस्थ आणि भावनाविरहित, वस्तुनिष्ठ स्वरूपाचं आहे. अलीकडील काळात मोठ्या प्रमाणात राजकीय लेखन हे पक्षपाती वा विशिष्ट भूमिका समर्थनाच्या स्वरूपाचं आढळतं. या पार्श्वभूमीवर पवार यांचं लेखन सम्यक, तटस्थ आणि चिकित्सक आहे. श्रीराम पवार यांची राज्य-राष्ट्रीय घडामोडींची जाण विलक्षण आहे.

तसंच, त्यांचं व्यासंगक्षेत्र हे बहुविध स्वरूपाचं आहे. त्यांची लेखनभाषा ही बोलण्याची, सांगण्याची आहे, त्यामुळे ‘समजावून’ सांगण्याचा टोन त्यामध्ये प्रभावी आहे. याशिवाय नैमित्तिक आणि ताज्या घडामोडींवरील तात्काळ प्रतिसादरूपी लेखन करणं ही अवघड अशी किमया असते. असे तात्कालिक विषय संवेदनशीलही असतात. मात्र, पवार यांनी या लेखन प्रपंचाचा आवाका विस्तृत आणि विश्‍लेषणात्मक केला आहे. या लेखनाच्या शेवटाकडे पाहिलं तर एक लक्षात येतं ते असं की, या लेखनाचा स्वर हा दिशादर्शक स्वरूपाचा आहे.

त्यामध्ये राज्यसंस्थेने लोकहितासाठी काम करावं असं अप्रत्यक्ष सूचन आहे. ‘होयबांची सरशी’, ‘नवचाणक्‍यांचा सत्ताभ्रम’, ‘पाळत’, ‘राज्याची लक्षणं’, ‘पंजाब का धुमसतो’, ‘पुतळ्यांचं राजकारण’, ‘नेहरू का खुपतात’, ‘ये तो होनाही था’, ‘नजर आहे प्रत्येकावर’, ‘धाव रे रामराया’, ‘काही लपवायचं आहे’ ही लेखशीर्षकं जरी पाहिली, तरी या लेख आशयातील स्पष्टता लक्षात येईल. पवार यांच्या या राजकीय वृत्तांत लेखनाचं नातं मराठीतील जुन्या वृत्तपत्रीय लेखनपरंपरेशी आहे. मराठीतील लोप पावलेल्या स्तंभलेखनाची आठवण करून देणारं हे लेखन आहे.

त्यामुळे एकंदर गेल्या चार वर्षांतील भारतातील राजकीय घडामोडींवरील हे महत्त्वाचं असं लेखन आहे, ते विश्‍लेषणात्मक आणि अन्वयार्थप्रधान आहे. २०१९ नंतरचे राजकीय बदल, राजकीय शक्‍यतांचा शोध आणि वैचारिक स्वप्नपूर्ती या त्रिमिती दर्शनबिंदूतून त्यांनी बदललेल्या भारतीय राजकारणाची मीमांसा केली आहे. या त्रिवेणी दर्शनातून भारतीय राजकारणाच्या अंतःप्रवाहांचं व वर्तनव्यवहाराचं चिकित्सक असं दर्शन घडवलं आहे. या चार वर्षांतील विविध प्रकारचे टकराव, संघर्ष-संवादकाळाचं वाचन त्यात आहे.

बदललेल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक भूगोलाविषयीचं हे साक्षेपी लेखन आहे. ‘नया भारत’, ‘अच्छे दिन’, ‘गंगाने बुलाया है’, ‘चौकीदार चोर है’ त्याचबरोबर संकटं आणि स्वप्नं, वास्तव आणि ढोंग यांतील सत्तासमूह मानसशास्त्र व वर्तन व्यवहाराचा त्यांनी मांडलेला आलेख महत्त्वाचा आहे. समकालीन राजकारण आणि समाजकारण अंतरंगातील करंट-अंडरकरंट याचा चित्रफलक जाणून घेण्यासाठी हे लेखन महत्त्वाचं ठरतं.

1) पुस्तकाचं नाव : मोदी २.० आमुलाग्र राजकीय बदलांची नांदी

पृष्ठं : २०४

मूल्य : २६० रुपये

2) पुस्तकाचं नाव : मोदी २.० राजकीय शक्यतांच्या शोधात

पृष्ठं : २२२

मूल्य : २८० रुपये.

3) पुस्तकाचं नाव : मोदी २.० वैचारिक स्वप्नपूर्तीची दिशा

पृष्ठं : २४०

मूल्य : २९९ रुपये.

तिन्ही पुस्तकांचे लेखक : श्रीराम पवार

प्रकाशक : सकाळ प्रकाशन, पुणे (०२० - २४४०५६७८, ८८८८८४९०५०)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com