‘सेल्फी’श विकृती

वैयक्तिक आयुष्य चव्हाट्यावर आणणे आजकाल आवडीचे झाले आहे. सारं सोशल मीडियावर टाकणे ही मानसिक गरज झाली आहे. आपल्या हातात मोबाईल असला म्हणजे सेल्फी काढलाच पाहिजे.
Selfie
Selfiesakal
Summary

वैयक्तिक आयुष्य चव्हाट्यावर आणणे आजकाल आवडीचे झाले आहे. सारं सोशल मीडियावर टाकणे ही मानसिक गरज झाली आहे. आपल्या हातात मोबाईल असला म्हणजे सेल्फी काढलाच पाहिजे.

- रवींद्र धुरजड

वैयक्तिक आयुष्य चव्हाट्यावर आणणे आजकाल आवडीचे झाले आहे. सारं सोशल मीडियावर टाकणे ही मानसिक गरज झाली आहे. आपल्या हातात मोबाईल असला म्हणजे सेल्फी काढलाच पाहिजे, आलेली पोस्ट फॉरवर्ड केलीच पाहिजे, आपलं जे काय चाललं ते पोस्ट केलंच पाहिजे अशी ‘फाॅरवर्डी संस्कृती’ जोर धरत आहे.

एक माझा गावाकडचा मित्र आहे. आजकाल सायकलिंग करतो. खूप लांब जातो. त्याचे सायकलिंग झाले की शरीरावरून निथळणाऱ्या घामाच्या धारांची पर्वा न करता कधी सेल्फी काढतो आणि व्हाट्सॲपवर टाकतो, असे त्याला होऊन जाते. या धडपडीत सायकल पडते. हेल्मेट तिरपे होते. रेंज नसली आणि सेल्फी सेंड झाला नाही की त्याला कसनुसं होतं. सायकल घेऊन रेंजमध्ये येतो. फोटो सेंड झाला आणि व्हॉट्सॲपवर दोन निळ्या टिकमार्क दिसल्या की त्याचा आत्मा शांत होतो. एका बोलावलेल्या कारच्या मागे सायकली लटकवून परतीचा प्रवास सुरू होतो.

सायकल चालवणे हे शारीरिक आरोग्यास एकदम छान आहे. दीर्घ आणि दर्जेदार शारीरिक आयुष्य जगायचे असेल तर ते अभिनंदनीय आहे, पण या मित्राच्या ‘सायकल सेल्फी’ला लाईक केले नाही तर त्याला राग येतो. तो अस्वस्थ होतो.

‎थोडक्यात काय तर वैयक्तिक आयुष्य चव्हाट्यावर आणणे आजकाल आवडीचे झाले आहे. एक आमचा मित्र सहपरिवार चीनला गेला होता. अर्थातच घराला कुलूप लावून. चुपचाप फिरावे इथपर्यंत ठीक आहे, पण गड्याने फोटो टाकले ना एफबीवर! ‘‘टुडे वि आ इन शांघाय’’, ‘‘वि आ ष्ट्यँडिंग ॲट तिनानमेन स्क्वेयर’’ असे फोटो एका टेक्नो-सॅव्ही चोराने फेसबुकवर बघितले अन्‌ इकडे भारतातलं त्याचं घर पूर्ण साफ केलं. पोलिसांनी चौकशी केल्यावर असं लक्षात आलं, की या पिंटूने चायना एन्जॉय करण्याऐवजी तिथली प्रत्येक मोमेंट भारतातल्या लोकांना असूया वाटावी यासाठी फेसबुकवर शेयर केली होती. चोर त्याच्या घरात चोरी करताना इतके रिलॅक्स होते, की पोलिसांना ते लोक स्वयंपाक करून यथेच्छ जेवून, चोरी करून गेल्याचं दिसलं.

‎कुटुंबातल्या एखाद्याचं प्रेरणादायी कार्य, उत्तुंग यश, सुखद अनुभव, दुःखावेग, माहितीपूर्ण असं कंटेंट किंवा सार्वजनिक उपयोगाचं काहीही असलं तर ते समूहावर शेयर करणे वाजवी आहे आणि समर्थनीयसुद्धा; पण ‘‘मी सध्या इथे आहे’’, ‘‘आय एम एन्जॉइंग’’, ‘‘आय एम डुईंग सो अँड सो’’ असं सकाळपासून लोकांना सांगायची काही गरज नसते. जे लोक लाईक देतात किंवा इमोजी वापरून प्रतिक्रिया देतात, त्यांना हे फोटो वगैरे आवडलेलेच असतातच असं नाही. अंगठे वर केले एकदाचे की हे अतिउत्साही कार्यकर्ते खुश, अशी खात्री त्यामागे असते. आपल्या हातात मोबाईल असला म्हणजे सेल्फी काढलाच पाहिजे, आलेली पोस्ट फॉरवर्ड केलीच पाहिजे, दुसऱ्याच्या घरी मयत किंवा अंतिम संस्कार चाललेले असले तरी आपण आपलं आता जे काय चाललेलं असेल ते पोस्ट केलंच पाहिजे अशी ‘फॉरवर्डी संस्कृती’ आता जोर धरू लागली आहे.

पूर्वी घरातली गोष्ट घरातच राहत असे. भांडणे, रुसवे-फुगवे, आंतरिक कलह हे बाहेर येत नसत. आत्ताच्या काळात तर घरच्या भांडणाचे व्हिडीओ किंवा घरच्या भांडणामुळे मी आत्महत्या करत आहे, असा आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओही अनेकांनी बघितला असण्याची शक्यता आहे.

‎संकटात पडलेल्यांना वाचवणे किंवा मदत करणे सोडून जर कोणी चित्रीकरण करत असेल तर या विकृतीचे समर्थन कसे करता येईल? ‎कृत्रिम सृजनशीलतेला उत्तेजन देणारे भरपूर ॲप्स उपलब्ध झाल्याने फॉरवर्डी संस्कृतीला तर अक्षरशः ऊत आला आहे. स्वतःचे जे काही असेल ते टाका मोबाईलवर, असा ‘सेल्फी’चा विस्तृत अर्थ आहे. सेल्फी‘श’ मधला ‘श’ भाषिक दृष्टीने काढलेला असला तरी ‘स्वार्थी भावना’ त्यात तशीच उरलेली आहे. स्वतःचं जोपासलेलं आयुष्य लोकांच्या ताटात त्यांची इच्छा नसताना का परोसतात हे कळत नाही. सणवार आणि महनीय लोकांच्या पुण्यतिथ्या, जयंत्या या वेळी शुभेच्छा देतानाही यांचा स्व इतका जागृत असतो की यांचा टेम्प्लेटमधला फोटो त्या महनीय विभूतींपेक्षा मोठा म्हणजे ‘लार्जर दॅन लाईफ साईज’ असतो. ते बिचारे महान लोक त्याच फोटोत उजवीकडील वरच्या कोपऱ्यात जीव मुठीत घेऊन केविलवाण्या नजरेने आपल्याच विचारधारेपासून हा गंपू किती प्रवाहपतित झाला आहे, हे उद्विग्न होऊन बघत असतात.

व. पु. काळे म्हणतात त्याप्रमाणे माणूस गर्दीत हरवत नाही, तो एकटा असला म्हणजे हरवतो. या जगात आता माणूस इतका हरवला आहे, की स्वतःला शोधण्यासाठी त्याला असं टुकार, सामान्य, स्वतःच्या फायद्याचं काम केलं तरी जगाला सांगावंसं वाटतं. मग कोणी हे कर्तृत्व लाईक केलं तरच तो स्वतःला सापडतो आणि त्याला हायसं वाटतं. या आभासी जगात आनंद किंवा दुःख किती सवंग करून घेतलं आपण!

rpd2008@yahoo.com

(लेखक प्रशासकीय अधिकारी असून, त्यांनी राज्यभरात विविध पदांवर काम केले आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com