russia ukrain war
russia ukrain warsakal

युद्धाचा दीर्घ संघर्ष

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे विरोधक ॲलेक्सी नवालनी यांचा रशियन तुरुंगात संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर रशियात काय सुरू आहे, असा प्रश्न चर्चेत आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे विरोधक ॲलेक्सी नवालनी यांचा रशियन तुरुंगात संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर रशियात काय सुरू आहे, असा प्रश्न चर्चेत आहे. युक्रेन संघर्षाला दोन वर्षे लोटली. अजून किती काळ युद्ध सुरू राहणार? व्लादिमीर पुतिन यांना पर्याय काय? इत्यादींसारख्या अनेक मुद्द्यांवर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील सेंटर फॉर रशियन आणि सेंट्रल एशियन स्टडिजचे सहायक प्राध्यापक डॉ. अमिताभ सिंग यांच्याशी साधलेला संवाद.

ॲलेक्सी नवालनी यांच्यावर २०२० मध्ये ‘नोविचोक’ नावाचे नवे एजंट वापरून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता. सोव्हिएत रशियाच्या काळापासून विरोधकांवर विषप्रयोग केला जातो. ॲलेक्सी यांच्यावर जर्मनीत उपचार झाले. मात्र, ते पुतिन यांना विरोध करण्यासाठी पुन्हा रशियात परतले. याचाच अर्थ त्यांनी मरण्याची मानसिक तयारी केली होती.

रशियासाठी ही मोठी आणि पहिली घटना नाही. २०१५ मध्ये पुतिन विरोधक बोरिस नेमिस्तव; तर २००६ मध्ये एना पोलिस्काया या संपादकाची हत्या झाली होती. या सर्व घटनांमध्ये रशियन सरकार किंवा सत्ताधाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे.

नवालनींचा मर्यादित प्रभाव

ॲलेक्सी नवालनी यांची रशियातील लोकप्रियता तशी मर्यादित होती. पुतिन यांना आव्हान दिल्यामुळे ते विरोधी पक्षाचा चेहरा झाले होते. पाश्चिमात्य माध्यमांनी त्यांना मोठी प्रसिद्धी दिली. यू-ट्युबसारख्या सोशल माध्यमांचा त्यांनी प्रभावी वापर केला. पुतिन यांच्यावर त्यांनी सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप केले. परिणामी, ते पुतिन यांच्या रडारवर आले. मात्र, रशियात विरोधी पक्ष नावालाही नाही.

पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये पुतिन सत्तेत परतणार आहेत. ‘लेवाडा सेंटर’ नावाची एक सर्वेक्षण संस्था आहे. त्यांचे सर्वेक्षण अचूक मानले जाते. त्यांच्या सर्वेक्षणात पुतिन यांची लोकप्रियता ७० ते ७५ टक्के आहे. गेल्या निवडणुकीत रशियन कम्युनिस्ट पक्षाला १२ टक्के मते मिळाली होती. मात्र, तो पक्षही पुतिन यांना प्रखर विरोध करत नाही.

नवालनी पुतिन यांना पर्याय होते?

नवालनी २०११चे पहिले प्रखर राष्ट्रवादी विचाराचे होते. रशियाबाहेरील नागरिकांना देशाबाहेर हाकलून लावण्याचे त्यांनी समर्थन केले होते. ते उजव्या विचारसरणीचे होते. २०११ नंतर त्यांच्या विचारात बदल झाला. मात्र, ते रुढार्थाने कधीच लोकशाहीवादी नव्हते. रशियामधील ताकतवान शासकांना आव्हान देणे कधीच सोपे नव्हते.

ज्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला त्यांना देशाबाहेर हाकलून लावण्यात आले, तुरुंगात डांबले गेले किंवा ठार मारण्यात आले. नवलानी यांना रशियाच्या राजकारणाची दिशा कधीच बदलायची नव्हती. त्यांच्या रूपाने केवळ माणूस बदलणार होता. व्यवस्था तीच राहणार होती. नवालनी हा पर्यायी चेहरा असणे पुतिन यांना मान्य नव्हते.

रशियात विरोधी पक्षाला हळूहळू समाप्त केले गेले. लोकशाहीत विरोधकांना एक स्पेस मिळते. त्यामध्ये संघटना, पक्ष स्थापन करणे आणि मुक्त माध्यमे यांचा समावेश असतो. मात्र, पुतिन यांनी विरोधकांना स्पेस मिळू दिली नाही. रशियाच्या राजकीय व्यवस्थेत विरोधकांना स्थान नसून ते केवळ पुतिन आणि त्यांच्या राजकारणासाठी राखीव आहेत. या सर्व व्यवस्थेमुळे रशियात विरोधी पक्ष कधीच प्रभावी झाला नाही. तुर्कीसह अन्य देशांतही विरोधी पक्षाची अशीच परिस्थिती आहे.

युद्धानंतर लोकप्रियता वाढली

रशियामध्ये सध्या सुरू असलेल्या निवडणुकांमध्ये पुतिन हेच विजयी ठरणार आहेत. पुतिन यांच्यासह सर्व जगाला हे माहिती आहे. दुसरे म्हणजे युक्रेन युद्धात पुतिन हे अपयशी ठरले, असे म्हणता येणार नाही. आजच्या घडीला युक्रेनचा २० टक्के भूभाग रशियाच्या ताब्यात आहे. रशियन लष्कराने महिनाभरापूर्वी आबदेरिका या महत्वाच्या भागाचा ताबा घेतला.

रशियाच्या इतिहासावर नजर टाकल्यास रूसमध्ये युद्ध लढण्यापेक्षा ते लांबवण्यावर यश अवलंबून आहे. लेनिनग्राडची लढाई आणि १८१० मध्ये मॉस्कोच्या राखरांगोळीनंतरही झारने शरणागती पत्करली नव्हती. त्यामुळे हे युद्ध जेवढे जास्त काळ खेचले जाईल तो युक्रेनचा पराभव मानला जाईल. सध्या या युद्धात रशियाचे पारडे जड आहे.

युद्धानंतर रशियावर असंख्य आर्थिक निर्बंध लावले गेले. मात्र, दोन वर्षांनंतर बघितल्यास त्याचा रशियाच्या अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम झाला नाही. उलट रशियन अर्थव्यवस्था अधिक मजबूत झाली. रशियाला नवी बाजारपेठ उपलब्ध झाली. मात्र, या युद्धावरील खर्चामुळे रशियावर परिणाम झाला. या युद्धामुळे पुतिन आणि रशियाची प्रतिमा डागाळली. मात्र, शेवटी युद्ध एखाद्या राज्याच्या ताकदीची चाचपणी असते. युक्रेन युद्धामुळे पुतिन रशियात अधिक लोकप्रिय झाले आहेत.

‘नाटो’चा विस्तार रोखण्यात अपयश

युक्रेनच्या युद्धानंतर फिलनंड, स्वीडन हे देश ‘नाटो’च्या मार्गावर आहेत. युद्धानंतर ते असुरक्षित झाले. युक्रेननंतर आपला क्रमांक लागेल, असे त्यांना वाटणे स्वाभाविक होते. मात्र, या देशावर हल्ला करण्याचा पुतिन यांचा विचार कधीच नव्हता. पूर्व सोव्हिएत संघातील देशामधील रशियन भाषिकांना अधिक सुरक्षित करणे हा रशियाच्या राजकीय धोरणाचा एक भाग आहे. त्या अंतर्गत युक्रेनचा रशियन भाषिक भूभाग रशियाने घेतला. मात्र, पुतिन यांना ‘नाटो’चा विस्तार थांबवायचा होता. मात्र, त्याच्या उलट परिस्थिती आहे. रशिया दोन्ही बाजूंनी घेरला गेला आहे. एकंदरीत रशियाच्या हिताला धक्का लागला आहे.

पुतिन यांचे अपयश

युद्धात रशियाला सामरिक, धोरणात्मक अपयश आले आहे. केवळ १५ दिवस किंवा फार तर महिनाभरात युक्रेन जिंकू, असे रशियाला वाटले. मात्र, तसे झाले नाही. दुसरे म्हणजे, पाश्चिमात्य देश युक्रेनला मदत करणार नाही. तसे करण्यापूर्वी आम्ही युद्ध जिंकू हा रशियाचा विचारही फोल ठरला. मात्र, या अपयशानंतर रशियाने आपले धोरण बदलले. पुतिन यांना जिंकलेला भूभाग रशियात विलीन करायचा आहे. त्यांना तो सोडायचा नाही. त्यामुळे त्या चर्चेत रशियाला सारस्य नाही.

रशियामध्ये पुतिन यांची लोकप्रियता त्यांच्या एकाधिकारशाहीच्या धोरणामुळे नाही. पुतिन यांनी रशियन अर्थव्यवस्थेला बळकट केले. त्यांनी कर्जाच्या डोंगरातून रशियाला बाहेर काढले. त्यांनी अर्मेनिया, जॉर्जिया युद्ध जिंकले. त्यांनी क्रिमिया ताब्यात घेतला. युक्रेनचा २० टक्के भूभाग घेतला. त्यांची सशक्त राष्ट्राध्यक्ष म्हणून एक प्रतिमा आहे. त्याचा फायदा त्यांना होतो.

सत्तेला धोका नाही

पुतिन हे रशियाच्या वसाहतवादी मानसिकतेचे समर्थक आहेत. स्टॅलिनच्या काळात बर्लिन ते उत्तर कोरियापर्यंत रशियाची सत्ता होती. आजही रशियन जनतेच्या डोक्यातून स्टॅलिन आणि झारशाही गेलेली नाही. पुतिन सत्तेवर असो वा नसो, जो नवा शासक त्यांच्या जागेवर येईल त्यालाही हेच धोरण पुढे सुरू ठेवावे लागणार आहे. त्यामुळे पुतिन यांना सत्तेवरून घालवूनही पाश्चिमात्य देशाच्या हाती काहीच लागणार नाही, हे स्पष्ट आहे.

गाझात उफाळलेल्या संघर्षामुळे युक्रेन युद्धावर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. या घटनेमुळे जगाचे लक्ष दुसरीकडे वेधले गेले आहे. मात्र, प्रत्यक्षात युक्रेनला मिळणारी आर्थिक मदत आणि शस्त्रास्त्र पुरवठ्यावर काही परिणाम झालेला नाही. या संघर्षात युक्रेन आता कमजोर दिसतोय. मात्र, मार्चनंतर जेव्हा पुन्हा एकदा मैदानावरचे युद्ध सुरू होईल त्या वेळी युक्रेनला आवश्यक ती मदत मिळणार आहे.

अमेरिकेतील सत्ताबदलाचा परिणाम काय?

डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की, ते सत्तेवर येताच २४ तासांत युद्ध संपवतील. मात्र, ते कसे होईल ते त्यांनाच माहिती नाही. ट्रम्प सत्तेवर आले तर युक्रेनला मिळणारा आर्थिक आणि शस्त्र मदतीचा ओघ कमी होईल. नाटो काही अंशी कमजोर होईल. मात्र, त्या परिस्थितीत युरोपियन महासंघ युक्रेनच्या बाजूने ठाम उभा राहील. अमेरिकेलाही या युद्धातून तातडीने आपले हात बाहेर काढता येणार नाहीत. एकंदरीत काही मानसिक परिणाम सोडल्यास अमेरिकेतील सत्ताबदलाचा फारसा परिणाम या युद्धावर होणार नाही.

युद्धाचा अंत केव्हा?

युक्रेन युद्धाचा शेवट होणार नाही. जगभरात अनेक युद्धे अनेक वर्षांपासून सुरू आहेत. त्याला फ्रोझन कॉन्फ्लिक्ट असे म्हणतात. म्हणजे ते युद्ध थंड आहे. मात्र, केव्हाही त्याचा भडका उडू शकतो. युक्रेन युद्ध पुढील दहा वर्षांत फ्रोझन कॉन्फ्लिक्ट म्हणून कायम राहील. ते कमी तीव्रतेचे युद्ध म्हणून सुरू राहील. अचानक युद्धविराम होईल, संघर्ष थांबेल तर पुढे संघर्ष चिघळेल. युक्रेन युद्धात दोन्ही देशांनी कठोर भूमिका घेतल्या आहेत. रशिया आपल्या ताब्यातला भाग सोडायला तयार नाही, तर हा भूभाग परत मिळवल्याशिवाय न थांबण्याची भूमिका युक्रेनची आहे. त्यामुळे हे युद्ध सुरू राहील. यात कुणी विजयी किंवा पराभूत होणार नाही. दोघांच्या अपेक्षांमध्ये खूप अंतर आहे.

vinod.raut@esakal.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com