लाडोवाली रोड शूटआउट : २ (एस. एस. विर्क)

लाडोवाली रोड शूटआउट : २ (एस. एस. विर्क)

मला खात्री होती की कुणीतरी त्यांना पाहिलं असणार. आता त्यांना पाहिलं असण्याची शक्‍यता असणाऱ्या या ‘कुणाला तरी’ आम्हाला शोधायचं होतं. मी माझ्या अधिकाऱ्यांशी या संदर्भात बोललो; पण मी मांडलेल्या तर्कामुळे ते फार काही प्रभावित झाल्याचं दिसलं नाही. अशा पद्धतीनं मला अपेक्षित असणारा माणूस शोधून काढणं म्हणजे गवताच्या गंजीत हरवलेली सुई शोधण्यासारखं होतं; पण याआधी बऱ्याच प्रकरणांमध्ये मला अशा ‘हरवलेल्या सुया’ सापडल्या होत्या.

पूर्वार्ध वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सन १९८० च्या दशकातल्या पंजाबमधल्या बेछूट गोळीबारांच्या घटनांविषयी गेल्या आठवड्यात लिहिताना मी आपल्याला जालंधरमधल्या एका शूटआउटबद्दल सांगत होतो. १९८४ च्या दिवाळीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी लाडोवाली रोड भागातल्या एका मंदिराच्या परिसरात तीन अज्ञात तरुणांनी गोळ्या झाडून एका युवकाची हत्या केली होती. तिथं पोचल्यावर मी मंदिराचं ठिकाण पाहिलं. बाजारपेठेतल्या एका रिकाम्या जागेवर हे मंदिर होतं. मंदिराजवळ असलेला बाजारचा रस्ता अगदीच अरुंद होता. जेमतेम दहा फुटी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकानं होती. फाळणीनंतर पाकिस्तानचा भाग बनलेल्या पश्‍चिम पंजाबमधून आलेल्या काही विस्थापितांना जालंधरच्या या परिसरात सामावून घेण्यात आलं होतं. त्या वेळी दुकानाच्याच मागच्या बाजूला दुकानमालकाचं घर असायचं. दोन खोल्या, स्वयंपाकघर, टॉयलेट आणि मागं छोटंसं अंगण अशी त्या घरांची रचना होती. मंदिराची जागा मात्र बऱ्यापैकी मोकळी होती. मंदिराच्या डाव्या बाजूला शंभरेक यार्डांवर दुकानांची दुतर्फा रांग सुरू व्हायची. या हिंदुबहुल परिसरात तीन अनोळखी शीख तरुणांचा वावर कुणा ना कुणाच्या तरी नक्की लक्षात आला असणार. आता आधी आम्हाला ती व्यक्ती शोधायची होती. गोळीबारात बचावलेल्या अशोकला घेऊन एसएचओ पंडित अमरसिंग, पोलिस निरीक्षकही माझ्यापाठोपाठ पोचले होते. सगळे अधिकारी पोचल्यावर मी आधी दुसऱ्या दिवसाच्या बंदोबस्ताच्या जबाबदाऱ्या निश्‍चित केल्या. फिक्‍स पॉईंट्‌स, राखीव दलं, गस्तीपथकं यांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या. कर्फ्यू आदेशाची योग्य प्रकारे अंमलबजावणी व्हावी यासाठीही योजना आखली. खुनाचा गुन्हा दाखल करून इन्क्वेस्ट, शवविच्छेदन, मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देणं अशा कायदेशीर औपचारिकतांची पूर्तता करण्याबद्दलही दुसऱ्या एका टीमला सूचना दिल्या. गुन्ह्याचा तपास एसएचओंकडं सोपवण्यात आला. त्यानंतर अशोकनं आम्हाला गोळीबार झालेली जागा, तो जिथं खाली वाकला ती नेमकी जागा, रमेश जखमी होऊन पडला ते ठिकाण, आरोपींनी जिथून पुन्हा गोळीबार केला ती जागा, तिसरा आरोपी स्कूटर सुरू करून जिथं उभा होता ती जागा दाखवली. हल्लेखोरांनी साधारण दहा ते बारा फूट अंतरावरून गोळीबार केला होता. तिसरा आरोपी स्कूटरसह जिथं उभा होता ती जागा साधारणतः वीस फुटांवर होती.

आम्ही घटनास्थळाची बारकाईनं पाहणी करत असताना आम्हाला .३२ बोअरच्या पिस्तुलाचं आणखी एक रिकामं (वापरलेलं) काडतूस सापडलं. दोन रिकामी काडतुसं आम्ही आधीच जप्त केली होती. जखमी रमेशला ज्या ठिकाणी गोळी लागली, तो जिथं पडला तिथं त्याच्या रक्ताचे डाग पडले होते. आरोपी स्कूटरवरून पळाले तिथं मातीवर स्कूटरच्या टायरचा ठसा होता. या सगळ्या जागा आम्ही काळजीपूर्वक तपासल्या. त्या जागांचे फोटो घेतले. स्कूटर कुठल्या बनावटीची आहे, त्याचीही माहिती अशोकनं आम्हाला दिली. त्याच्या मते ती बजाज चेतक स्कूटर नुकतीच खरेदी केलेली असावी. दोन हल्लेखोरांपैकी एक जण साधारण विशीतला, उंच, गोरा आणि सडपातळ होता. पॅंट, शर्ट आणि काळ्या रंगाची पगडी असा त्याचा वेश होता, तर दुसरा बुटका, जाडसर आणि वयानंही पहिल्याच्या पेक्षा थोडा मोठा होता. कुर्ता-पायजमा आणि भगव्या रंगाची पगडी असा त्याचा वेश होता. तिसरा हल्लेखोर मध्यम बांध्याचा होता. तपकिरी रंगाची पॅंट, शर्ट आणि गडद तपकिरी रंगाची पगडी असा या तिसऱ्याचा वेश होता. अशोक जवळच राहायचा. हल्ला झाला त्या परिसरात त्याचं नेहमी येणं-जाणं होतं. ते तिन्ही हल्लेखोर पूर्णपणे अनोळखी होते, असं अशोक ठामपणे सांगत होता.

सर्वप्रथम मी मंदिरात जाऊन भगवान श्रीशंकराचं दर्शन घेतलं आणि ‘कृपा असू द्यावी,’ अशी प्रार्थना केली. पुजाऱ्यानं आम्हाला प्रसाद देऊन आशीर्वाद दिला. मी बाहेर आलो आणि हल्लेखोर जिथून पळाले होते, त्या बाजूला काही सहकाऱ्यांसह मी गेलो. आता अंधार पडला होता. आमच्या टीममधल्या काहीजणांकडं विजेऱ्या (टॉर्च) होत्या. त्या प्रकाशात आम्ही त्या कच्च्या रस्त्याची पाहणी सुरू केली. हा कच्चा रस्ता साधारणतः दोनशे यार्डांवर दुसऱ्या एका रस्त्याला मिळत होता. तो रस्ता पुढं ग्रॅंड ट्रॅंक (जीटी) रोडला मिळत होता. हल्लेखोर त्या कच्च्या रस्त्यावरून जीटी रोडकडं गेल्याचं दिसत होतं. कदाचित अशोक म्हणत होता त्यानुसार, हल्लेखोर खरोखरच त्या भागात नवखे असावेत. अशोक आणि रमेश जेव्हा मंदिरात गेले तेव्हा त्यांना त्या तिघांनी पाहिलं होतं. इतर काही लोक मंदिरातून बाहेर येत होते. हल्लेखोर नक्कीच आपल्या सावजाच्या प्रतीक्षेत असणार. ते जर त्या भागात नवखे असतील तर त्यांनी परिसराची टेहळणी करून पळून जाण्याचे रस्ते पाहून ठेवले असणार आणि तीन अनोळखी लोक जर त्या भागात असे फिरले असतील तर कुणाला तरी संशय आला असणार. मला खात्री होती की कुणीतरी त्यांना पाहिलं असणार. आता त्यांना पाहिलं असण्याची शक्‍यता असणाऱ्या या ‘कुणाला तरी’ आम्हाला शोधायचं होतं. मी माझ्या अधिकाऱ्यांशी यासंदर्भात बोललो; पण मी मांडलेल्या तर्कामुळे ते फार काही प्रभावित झाल्याचं दिसलं नाही. अशा पद्धतीनं मला अपेक्षित असणारा माणूस शोधून काढणं म्हणजे गवताच्या गंजीत हरवलेली सुई शोधण्यासारखं होतं; पण याआधी बऱ्याच प्रकरणांमध्ये मला अशा ‘हरवलेल्या सुया’ सापडल्या होत्या. लोकांनी पाहिलेल्या किंवा त्यांच्या लक्षात आलेल्या गोष्टी विसरण्याच्या आधी मला लोकांना भेटून असा माणूस शोधून काढायचा होता. 

मग मी एकट्यानंच बाजारात चक्कर मारायचं ठरवलं. ‘माझ्या मागं वीसेक फुटांचं अंतर ठेवून येणारा साध्या कपड्यातला एक सुरक्षा अधिकारी वगळता माझ्याबरोबर इतर कुणीही येऊ नका,’ अशा सूचना मी सगळ्यांना दिल्या. मी आधी रस्त्याच्या डाव्या बाजूनं निघालो. प्रत्येक दुकानात गेलो आणि ‘तुम्ही दुपारपासून कुण्या अनोळखी, संशयास्पद व्यक्ती त्या भागात पाहिल्या होत्या का,’ हे दुकानदारांना विचारायला सुरवात केली. मी गणवेशात होतो. ‘मी जिल्ह्याचा नवा सीनिअर एसपी आहे,’ अशी माझी ओळख मी प्रत्येक दुकानात जाऊन करून देत असे आणि ‘तुमच्या परिसरात झालेल्या खुनाच्या तपासासाठी मला तुमची मदत हवी आहे,’ असं त्यांना सांगत असे; पण रस्त्याच्या डाव्या बाजूच्या सगळ्या दुकानदारांशी बोलल्यावरही मला कुणाकडूनही काहीच माहिती मिळाली नाही. मग मी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मोर्चा वळवला. पळून जाण्यासाठी त्या भागाची, तिकडच्या योग्य मार्गाची टेहळणी गुन्हेगार करत असताना चुकून त्यांना पाहिल्याची शक्‍यता असणारं कुणीतरी सापडावं, असं मला वाटत होतं. दुसऱ्या रांगेतलीही जवळपास अर्धी दुकानं अशीच संपली. पुढचं दुकान एका केमिस्टचं होतं. मी त्या दुकानात जाऊन माझी ओळख सांगितली आणि तोच प्रश्न विचारला. दुकानमालक काही बोलण्याआधीच त्याचा दहा वर्षांचा मुलगा मला म्हणाला ः ‘‘अंकलजी, पापा दुकानात नव्हते तेव्हा मी तीन सरदारांना पाहिलं होतं. त्यातल्या एकानं माझ्याकडून कफ ड्रॉप्सही घेतले होते.’’ त्याचे वडील काही बोलायच्या आधीच मी त्यांना घेऊन दुकानातून मागच्या खोलीत गेलो. तो दुकानदार घाबरला होता; पण मी त्याला धीर दिला. तुमच्याकडून मला काही माहिती मिळाली आहे, हे कुणालाही कळणार नाही, याची त्याला खात्री दिली. त्या मुलानं मला पुन्हा सगळं सविस्तर सांगितलं. त्यानं केलेलं त्या तिघांचं वर्णन अशोकनं आम्हाला दिलेल्या वर्णनाशी जुळत होतं. भगवी पगडी बांधलेल्या बुटक्‍या माणसानं त्या मुलाकडून कफ ड्रॉप्स घेतले होते. मला काही माहिती मिळाली आहे, हे आमच्या अधिकाऱ्यांनाही कळू नये म्हणून मग मी उरलेल्या दुकानांमध्येही चौकशी केली.

तिन्ही संशयित आधी त्या भागाची टेहळणी करण्यासाठी आणि मग त्यांचं सावज निश्‍चित करण्यासाठी त्या परिसरात येऊन गेले होते हे स्पष्ट होतं. आता आम्हाला आमच्याकडच्या वर्णनांची माणसं शोधायची होती; पण त्याआधी माझ्यासमोर दुसऱ्या दिवसाचा बंदोबस्तही होता, म्हणून मी आधी दुसऱ्या दिवसाची कायदा व सुव्यवस्था यावर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं. 

दुसऱ्या दिवशी आम्ही संपूर्ण शहरात फिरत राहिलो. वेगवेगळ्या ठिकाणी शांतता समितीच्या बैठका घेतल्या. हल्ल्यात बळी पडलेल्या रमेशच्या मृतदेहाचं शवविच्छेदन, अंत्ययात्रा आणि अंत्यसंस्कारही झाले. आमच्या उपस्थितीमुळे लोकांमध्येही विश्वास निर्माण झाला; पण अजून गुन्हेगारांचा शोध लागलेला नव्हता. ही जाणीव मला अस्वस्थ करत होती. काहीएक विचार करून मी एसएचओंना काही लोकांसह घटनास्थळी यायला सांगितलं. ज्या वेळी गुन्हा घडला होता त्याच्या साधारणतः पंधरा मिनिटं आधी तिथं पोचण्याच्या सूचना मी एसएचओंना दिल्या होत्या. क्राईम सीन पुनर्निर्मित (रिकन्स्ट्रक्‍ट) करून गुन्हा जसा घडला त्याच क्रमानं मला त्या घटना तपासायच्या होत्या. ज्या बनावटीची स्कूटर हल्लेखोरांनी वापरली होती, तशी एक स्कूटरही आम्ही आणली होती. आदल्या दिवशी रमेश आणि अशोक जसे मंदिरातून बाहेर पडले, तसेच आमचे दोन लोक येणार...मग दोन हल्लेखोर त्यांच्यावर डमी गोळ्या झाडणार...त्यातला एक जण खाली कोसळणार आणि मग तिन्ही हल्लेखोर आधीच त्यांच्या तिसऱ्या साथीदारानं सुरू करून ठेवलेल्या स्कूटरवरून पळून जाणार...आमचा प्रत्येक माणूस प्रत्यक्ष जिथं घटना घडल्या तिथं असणार होता. आम्ही संपूर्ण घटनाक्रम दोन-तीनदा करून पाहिला. अचानकच मला काही तरी गवसल्यासारखं वाटू लागलं. अशोकला लगेचच माझ्याकडं घेऊन यायला मी एसएचओंना सांगितलं; पण थोड्या वेळानं एसएचओ परत आले ते अशोक सापडत नसल्याची बातमी घेऊनच. रमेशच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर अशोक कुणालाच दिसला नव्हता. एसएचओंनी अशोकच्या कुटुंबीयांना दुसऱ्या दिवशीपर्यंत अशोकला हजर करण्यास सांगितलं होतं.

दुसऱ्या दिवशीही अशोक बेपत्ता होता. त्याच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तो जिवाच्या भीतीनं पळून गेला होता. ‘अशोकला भीती वाटत असेल तर पोलिस त्याला संरक्षण देतील; पण तो असा लपून राहिला तर तो साक्षीदार होण्याऐवजी त्याच्यावरच संशयाची सुई रोखली जाईल,’ असं मी त्याच्या कुटुंबीयांना सांगितलं. त्याच्या बेपत्ता होण्यामुळे तपासावर प्रतिकूल परिणाम होणार असल्यानं आम्ही त्याच्याविरुद्ध अटक वॉरंटही मिळवू शकतो, याची त्यांना कल्पना दिल्यावर त्यांनी ‘एक-दोन दिवसांत अशोकला हजर करतो,’ असं आम्हाला सांगितलं; पण आम्ही त्यांच्यावर दबाव टाकत राहिलो.

दोन दिवसांनी त्यांनी अशोकला हजर केलं. घाबरून तो श्रीनगरमध्ये जाऊन लपला होता. त्या दिवशी रविवार होता. आम्ही काही सराईत गुन्हेगार पकडले होते. ग्रामीण भागातल्या एका पोलिस ठाण्यात मी रूद्रावतार धारण करून त्या गुन्हेगारांची चौकशी करत होतो. ती चौकशी सुरू असतानाच अशोकला आत आणण्यात आलं. तो आत आला तसं मी बाकीच्यांना बाहेर जायला सांगितलं आणि हल्लेखोरांनी वापरलेल्या स्कूटरचा नंबर अशोकला कडक आवाजातच विचारला. मी म्हणालो ः ‘‘मला माहितीय, तू तो नंबर पाहिला आहेस आणि तू तो मुद्दामच लपवतो आहेस.’’ अशोकला रडू फुटलं; पण ‘स्कूटरचा नंबर माहीत नाही,’ असंच तो सांगत राहिला. ‘‘तुला माहितेय, या स्कूटरच्या नव्या मॉडेलमध्ये हेडलाईट लावला की टेललाईटही (मागचा दिवा) आपोआप लागतो. तू स्कूटरच्या अगदी जवळ उभा होतास, त्यामुळे तुला तो नंबर सहज दिसला असणार. का लपवतो आहेस तू तो नंबर?’’ मी आणखी कडक स्वरात विचारलं. रडता रडताच तो म्हणाला ः ‘‘साब, ते लोक मलाही मारून टाकतील.’’ मी त्याला सांगितलं ः ‘भिण्याचं काहीच कारण नाही. तू नंबर सांगितलास हे कुणालाही कळणार नाही. तुला नंबर माहीत आहे, याची मला इतकी खात्री आहे, की रविवार असूनही मी डीटीओच्या (जिल्ह्यातल्या परिवहन खात्याच्या) कार्यालयात माझ्या टीमच्या काही माणसांना बसवून ठेवलं आहे; पण तू जर नंबर सांगितला नाहीस तर तूही हल्लेखोरांना सामील आहेस, असं म्हणावं लागेल.’’ 

यानंतर अशोकनं मला तो नंबर दिला. मी तो नंबर लगेचच ट्रान्स्पोर्ट ऑफिसरच्या कार्यालयात बसलेल्या माझ्या टीमला कळवला. मला जी माहिती अपेक्षित होती ती मिळाली असल्याचं थोड्याच वेळात मला टीमनं सांगितलं. त्या टीमला मी संध्याकाळी माझ्या कार्यालयात यायला सांगितलं आणि अशोकला त्याच्या कुटुंबीयांबरोबर परत पाठवून दिलं व त्याच्याकडून आम्हाला काहीच माहिती मिळालेली नाही, असंच आम्ही त्यांना दाखवत राहिलो.

संध्याकाळी माझ्या कार्यालयात भेटल्यावर गुन्हे अन्वेषण विभागाच्या डीएसपींनी (उपअधीक्षक) ‘ब्रेकिंग न्यूज’ दिली. एका विशिष्ट नंबरची स्कूटर त्या भागात पाहिल्याचं त्यांच्या गुप्त स्रोतांकडून त्यांना कळल्यानं त्यांनी चौकशी केली आणि ती स्कूटर कॅन्टोन्मेंट रेल्वे स्टेशन परिसरात राहणाऱ्या शरणजितसिंग यांची असल्याचं निष्पन्न झाल्याचं त्यांनी सांगितलं. शरणजितसिंग शिक्षक होते; पण अशोककडून हल्लेखोरांचं जे वर्णन मिळालं होतं, त्यापैकी कुठलंच वर्णन शरणजितसिंग यांच्याशी जुळत नसल्यानं, ‘आमच्या माणसांनी अजून काही कारवाई केलेली नाही; पण त्यांची चौकशी अजून सुरू आहे,’ अशीही माहिती त्यांनी दिली. 

सोमवारी सकाळी मात्र आम्ही सापळा रचला. रोजच्या प्रमाणेच सकाळी शरणजितसिंग स्कूटरवरून शाळेत जायला निघाले तेव्हा आमच्या मोटारसायकलस्वारांनी त्यांना घेरून थांबवलं आणि ‘आमच्याबरोबर पोलिस स्टेशनला चलावं’ असं त्यांना सांगितलं. मी चौकशी पथकासह पोलिस स्टेशनमध्येच होतो. शरणजितसिंग आमच्या दृष्टीनं संशयित नव्हते; पण त्यांची स्कूटर आणखी कोण कोण वापरतं असं विचारल्यावर त्यांनी त्यांच्या भावाचं - परमजितसिंग याचं- नाव सांगितलं. उंच, सडपातळ परमजित नेहमी काळ्या रंगाची पगडी वापरतो असंही त्यांच्याकडून समजलं. हे वर्णन आमच्याकडच्या एका संशयिताच्या वर्णनाशी जुळत होतं. परमजितसिंगचे दोन मित्र होते, प्रेमसिंग आणि मेजरसिंग. त्यांचंही वर्णन जुळत होतं. आम्हाला हव्या असणाऱ्या संशयितांपर्यंत आम्ही बहुतेक पोचलो होतो. इतके दिवस आम्ही तपासाबद्दल काहीच बोलत नव्हतो; त्यामुळे लोक आणि पत्रकार आम्हाला या खुनाचा तपास लावण्यात अपयशी ठरल्याबद्दल दोष देऊ लागले होते. बहुधा संशयितही अशाच समजात होते.

पण आता मात्र आम्ही वेगानं हालचाली केल्या. तीन वेगवेगळ्या टीमनी परमजितसिंग, प्रेमसिंग आणि मेजरसिंग यांना ताब्यात घेतलं. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून त्यांची स्वतंत्ररीत्या चौकशी करण्यात आली. ते तिघंही काही सराईत गुन्हेगार नव्हते. त्यांनी गुन्हा कबूल केला. वापरलेलं पिस्तूल आणि काही जिवंत काडतुसंही त्यांनी काढून दिली. या प्रकरणाचा तपास लागल्याची बातमी वणव्यासारखी पसरली. ओळख परेडसाठी भक्कम पुरावा गोळा करण्याच्या दृष्टीनं आम्ही तिन्ही संशयितांची ओळख उघड होणार नाही, अशा पद्धतीनं त्यांचे चेहरे झाकून टाकले. आमच्याकडं रिकामी काडतुसं, ती ज्या पिस्तुलातून झाडली गेली होती, ते पिस्तूल असे पुरावे होते. आरोप सिद्ध करण्यासाठी ते पुरेसे होते. मग आम्ही पत्रकार परिषद घेऊन वृत्तपत्रांना व इतर माध्यमांना माहिती दिली. गुन्हा उघडकीस आला आहे, यावर एसएचओ पंडित अमरसिंग यांचा अद्यापही विश्वास बसत नव्हता. पत्रकार परिषद आटोपल्यावर पंडितजी फार खूश दिसत होते. मला म्हणाले ः ‘‘जनाब, यह तो कमाल हो गई.’’ 

मी म्हणालो ः ‘‘पंडितजी, ही भगवान श्रीशंकराची कृपा आहे. त्याच्या मंदिरापासून आपण तपास सुरू केला होता. खरंच, कोणतीही दिशा नव्हती, पुरावा नव्हता आणि इतक्‍या कमी वेळात आपण गुन्हा उघडकीस आणला. हा चमत्कार त्यांच्या आशीर्वादाशिवाय घडून शकत नाही.’’

‘‘कुणीही चहा घेतल्याशिवाय जाऊ नका,’’ अशी विनंती पंडितजींनी सर्वांना केली. 

(उत्तरार्ध)

(या घटनेतल्या व्यक्तींची नावं बदलण्यात आलेली आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com