बिचारा कार्यकर्ता

रविवार असूनही त्या दिवशी घरातला अलार्म सकाळी सहा वाजताच वाजला. आवाजानं डोळे उघडले आणि डोळ्यांपुढं एकदम बॉम्बे हॉस्पिटल आलं.
Leader and Activists
Leader and Activistssakal

रविवार असूनही त्या दिवशी घरातला अलार्म सकाळी सहा वाजताच वाजला. आवाजानं डोळे उघडले आणि डोळ्यांपुढं एकदम बॉम्बे हॉस्पिटल आलं. नागपूरचा एक पत्रकारमित्र कॅन्सरनं त्रस्त होता. भीमेश मुतुला यांच्या मदतीनं त्याला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करायचं होतं. आवरलं आणि निघालो. तेवढ्यात भीमेशचा निरोप आला. गेल्या आठ दिवसांत मुंबईत दहा-पंधरा पत्रकार वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये उपचार घेत होते. हल्ली पत्रकारांमध्ये आजाराचं प्रमाण का वाढलंय, हेच कळत नाही...

वाशीच्या थोडं पुढं गेल्यावर रस्त्यात एक जुनी सुमो गाडी बंद पडलेली दिसली. गाडीतले चारजण खाली उतरले व ढकलत ढकलत गाडी रस्त्याच्या कडेला नेण्याचा प्रयत्न करू लागले. खड्ड्यामधून गाडी ढकलत नेणं तेवढं सोपं नव्हतं. मागचे वाहनचालक घाई करत होते. मी गाडी बाजूला लावली व त्यांना मदत केली. वाहतूक सुरळीत झाली. हे लोक कुठल्या तरी कार्यक्रमाला निघाले होते. चौघंही घामाघूम झाले होते. कपडे घामानं चिंब होते.

मी विचारलं : ‘‘कुठं चाललात?’’ त्यांनी एका सभागृहाचं नाव सांगितलं. एका नव्या पक्षाच्या वर्षपूर्तीनिमित्तच्या कार्यक्रमाला ते चौघं निघाले होते. चौघांपैकी एकानं जवळच्याच गॅरेजवाल्याला बोलावून घेतलं. इंजिनमध्ये बिघाड होता. गाडीच्या कामाला दोन तास लागणार होते. तीन हजार रुपये खर्च येणार होता. रक्कम ऐकून चौघं एकमेकांकडे पाहू लागले.

माघारी येताना गाडी घ्यायची, असं चौघांनी ठरवलं. मी पुढं माझ्या कामासाठी निघण्याच्या बेतात होतो. थोडं पुढं आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, या ठिकाणी कोणतीही गाडी थांबणार नाही. ‘‘बसा माझ्या गाडीत. मी तुम्हाला सोडतो,’’ मी त्यांना म्हणालो. त्यांना फार आनंद झाला. आम्ही एकमेकांशी परिचय करून घेतला. गप्पा सुरू झाल्या.

सतीश भावसार (पंढरपूर), अमर राजुरे (कऱ्हाड), निखिल जाधव (कागल), श्रीराम देशपांडे (रत्नागिरी) अशी त्यांची नावं. चौघं चार भागांतले. कुणी कुठल्या पक्षात किती वर्षांपासून काम केलं...आत्ता ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षात ते का आले आहत...पूर्वी ते ज्या ज्या पक्षांमध्ये होते, त्यांनी तिथं जे जे काम केलं त्या कामाचं स्वरूप कसं होतं...त्यांना राजकारणात असणाऱ्या मोठ्या लोकांकडून काय अपेक्षा होत्या आणि त्यांची घोर निराशा कशी झाली...अशी भली मोठी कहाणी चौघांनी मला सांगितली.

ते चौघं म्हणजे आजच्या काळातल्या, राजकारणात मरमर मरणाऱ्या प्रत्येक सच्चा, प्रामाणिक कार्यकर्त्याचं प्रतीक होते. स्वतःचं कुटुंब, स्वतःचं करिअर, कुटुंबीय या सगळ्यांना वाऱ्यावर सोडून आपल्या आमदारासाठी, आपण ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाच्या कामासाठी या चौघांनी त्यांचं तारुण्य घालवलं होतं...पण हाती काय लागलं? तर काहीच नाही.

आता चौघांनी गेल्या वर्षभरापासून एका नव्या पक्षाचा झेंडा हाती घेतला होता. मी एकेकाशी बोलत होतो.

सतीश म्हणाले : ‘‘माझे आजोबा-वडील एका जुन्या पक्षाचे कट्टर समर्थक. त्यांनी त्यासाठी आयुष्य वेचलं. अनेक वर्षं सत्ता असूनही गावात अजूनही साधा रस्ता झालेला नाही. त्या भयानक रात्रीची आज जरी आठवण झाली तरी अंगावर काटा येतो. त्या रात्री मी आमदारभाऊंच्या सभेनिमित्त तालुक्याच्या ठिकाणी होतो. ‘आईची तब्येत फार बिघडली आहे...ती कोणत्याही क्षणी या जगाचा निरोप घेऊ शकते,’ असा माझ्या घरून निरोप आला.

मी लगेचच घरी निघालो तर उद्या होणाऱ्या सभेचं काय होईल असा प्रश्न माझ्यासमोर होता. सकाळी सकाळी आई गेल्याचा मला निरोप आला. मी सभेचं सर्व नियोजन केलं आणि घराकडे निघालो. आपण शेवटच्या क्षणी आईशी बोलू शकलो नाही, याचा सल माझ्या मनात कायमचा राहिला. आमदारभाऊ सभा करून कंटाळल्यामुळे अंत्यसंस्काराला येऊ शकले नाहीत. त्या सभेमुळे भाऊ निवडणूक जिंकले. विजयानंतर भाऊंनी पक्ष बदलला. आम्हाला धक्का बसला. भाऊंनी सारं काही एका दिवसात संपवलं होतं.’’

अमर म्हणाले : ‘‘काळानुरूप अनेक पक्षांची आणि त्यांच्या नेत्यांची आम्हाला भुरळ पडली. आमचे वडील, आजोबा हेही एका जुन्या पक्षाशी संबंधित; पण पुढं कुणाच्या ना कुणाच्या तरी सांगण्यावरून आम्ही सातत्यानं पक्ष बदलत राहिलो. कुणी कुणाचा वाली नाही, असं चित्र सगळ्याच पक्षांमध्ये. प्रत्येकाला सत्ता हवी असते. दिवस-रात्र पक्षासाठी, नेत्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांविषयी कुणाला काही देणं-घेणं नसतं.’’

श्रीराम आणि निखिल यांनीही आपापले अनुभव सांगितले.

चौघांच्या बोलण्याचा सूर एकच होता : ‘आम्ही इतकी वर्षं वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम केलं...पक्ष कुठलाही बदलला तरी, कुणासोबतही गेलो तरी आमच्या भागातल्या सर्वसामान्य लोकांशी आमची नाळ घट्ट जुळलेली आहे. आम्ही कोणत्या पक्षात आहोत, याचं लोकांना काही देणं-घेणं नाही. त्यांचं काम आम्ही करायचो.’

गप्पा सुरू असतानाच निखिल यांच्या मुलाचा फोन आला.

निखिल यांनी तो फोन सगळ्यांना ऐकवला. निखिल यांचा मुलगा भाऊराव हा लष्करात आहे. तो काही दिवसांसाठी घरी आला होता. दोन दिवसांनी तो परत जाणार होता. ‘या आठ दिवसांत मुलाशी एकदाही बोलता आलं नाही,’ याची खंत निखिल यांनी व्यक्त केली.

त्यांनी एक आठवण सांगितली : ‘‘मी राजकीय कार्यकर्ता होतो, म्हणून मला कुणी मुलगी देत नव्हतं. आई-बाबांच्या पुण्याईनं कशी तरी मुलगी मिळाली; पण पुन्हा तिचं बिचारीचं एकप्रकारे वाटोळंच झालं. मुलं झाली, ती कशी मोठी झाली, ती कशी शिकली, ती कशी परस्पर कामाला लागली, हे त्यांचं त्यांनाच माहीत. मी केवळ कार्यकर्ता म्हणून नेत्यांच्या मागं धावत राहिलो.’’

आम्ही सभागृहाजवळ पोहोचलो. पहिल्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाचं वातावरण तिथं जाणवत होतं. कार्यक्रमाला थोडासा अवधी होता. तोपर्यंत आम्ही समोरच्या कॅन्टीनमध्ये गेलो.

निखिल म्हणाले : ‘‘माझी बायको दहा वर्षांपासून कॅन्सरपीडित आहे. तिच्या आजाराकडे मी वेळेत लक्ष दिलं असतं तर ती, आज मरणार की उद्या मरणार, अशी वाट पाहावी लागली नसती. अनेक वर्षं तिनं दुखणं अंगावर काढलं. आम्ही आधीचा पक्ष सोडला, तेव्हाच आम्ही ठरवलं होतं, यापुढं कुठल्याही पक्षामध्ये जायचं नाही. आहे तो शेतीचा तुकडा कसायचा...कुटुंबाला वेळ द्यायचा; पण नंतर विचार केला की, आणखी एका पक्षात काम करावं, म्हणून या पक्षात आलो. आमचं चौघांचं त्यावर एकमत झालं.’’

ते चौघंही हाडाचे कार्यकर्ते होते. आपल्या पक्षावर नितांत प्रेम करणारे होते; पण कुठल्याही पक्षानं त्यांना कधीही साथ दिली नाही, असं त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं.

आम्ही नाश्ता उरकून सभागृहाच्या गेटवर थांबलो. माझा निरोप घेऊन चौघंही आत जाणार इतक्यात त्यांच्या पक्षाच्या मुख्य नेत्याची गाडी आली. चौघांनी त्यांना नमस्कार केला. त्यांच्याकडे न बघताच मुख्य नेता निघून गेला. चौघंही नाराज झाले. मात्र, ती नाराजी लगेचच झटकून ते सभागृहात गेले.

राजकारणात जे कार्यकर्ते आहेत ते सारेच वाईट नक्कीच नाहीत; अनेकांनी खूप काम केलेलं आहे आणि पक्षानंही त्यांना मोठं केलेलं आहे...पण या कार्यकर्त्यांचा वापर केवळ राजकारणासाठी होतोय हे वाईट आहे.

मी बॉम्बे हॉस्पिटलकडे निघालो.

मी विचार करू लागलो... ‘बरं झालं, आपण कुठल्या पक्षाचे कधी कार्यकर्ता झालो नाही ते. सध्या जवळपास सगळ्याच पक्षांतले जुने-नवे कार्यकर्ते द्विधावस्थेत आहेत. या कार्यकर्त्यांचा नेता रोज नव्या पक्षात जाण्याचा विचार करतोय. त्याच्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्याची गावातल्या लोकांशी नाळ जुळलेली असते. ते बिचारे अडचणीत येतात. मी ज्या चार कार्यकर्त्यांशी गप्पा मारल्या केवळ त्या चौघांचाच हा प्रश्न नाही, तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात काम करणाऱ्या प्रत्येक सच्चा कार्यकर्त्याचा हा प्रश्न आहे.... राजकारणाच्या दलबदलू नीतीमुळे संभ्रमावस्थेत असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हा प्रश्न आहे. जुन्या चळवळींमधला कार्यकर्ता आजही ‘मी कार्यकर्ता आहे’ यावर समाधानी आहे. आजची स्थिती तशी नाही. एक चमत्कारिक मरगळ, संभ्रमावस्था आजच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. याला जबाबदार कोण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com