कलानगरीत फुटबॉल बहारतोय!

फुटबॉलचं रोपटं कोल्हापूर संस्थानकाळामध्येच रुजलं. स्वातंत्र्यापूर्वी इथं फुटबॉल संघांची स्थापना झाली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी क्रीडासंस्कृती इथं रुजवली.
Football
FootballSakal
Summary

फुटबॉलचं रोपटं कोल्हापूर संस्थानकाळामध्येच रुजलं. स्वातंत्र्यापूर्वी इथं फुटबॉल संघांची स्थापना झाली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी क्रीडासंस्कृती इथं रुजवली.

सध्या कोल्हापूरच्या चौकाचौकांत नजर टाकली की विश्‍वकरंडक फुटबॉलचा ज्वर दिसून येतोय. स्पर्धेतील सहभागी संघांतील स्टार खेळाडूंचे मोठमोठे कटआउट्स... त्यांच्यावर चाहत्यांनी व्यक्त केलेलं प्रेम... गल्ल्यागल्ल्यांमधून विविध देशांच्या फडकत असलेल्या पताका... सूचना फलकांवर सामन्यांची वर्णनं, त्याविषयीच्या बातम्या... कट्ट्यांवर रंगणाऱ्या सामन्यांविषयीच्या चर्चा... रात्र-रात्र जागून सामने पाहून पुन्हा सकाळी मैदानावर आपल्या आवडत्या खेळाडूप्रमाणे कामगिरी करण्यासाठी घाम गाळणारे फुटबॉल खेळाडू... हे कोल्हापूर शहराचं वैशिष्ट्य. येथील पेठांमधील सामन्यावेळी खचाखच भरणारं शाहू स्टेडियम आणि गोल झाल्यानंतर संपूर्ण स्टेडियममधून उमटणारा जोराचा जल्लोष... कोल्हापूरच्या फुटबॉलप्रेमाची साक्ष देतो. हे कोल्हापूर आहे... इथं सगळंच नाद खुळा असतं... फुटबॉलवरील प्रेमही नाद खुळाच आहे.

फुटबॉलचं रोपटं कोल्हापूर संस्थानकाळामध्येच रुजलं. स्वातंत्र्यापूर्वी इथं फुटबॉल संघांची स्थापना झाली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी क्रीडासंस्कृती इथं रुजवली. कोल्हापुरात स्थानिक पाच संघांत १९४०-४१ मध्ये फुटबॉल स्पर्धेचा नारळ फुटला आणि मैदानावरील एक रांगडं विश्‍व खुलं झालं. ए, बी, सी, डी व इ वॉर्डांतील संघ स्पर्धेत उतरले होते. फेडरेशन इंटरनॅशनल दि फुटबॉल असोसिएशनची (फिफा) स्थापना १९३० ला झाल्यानंतरचा दहा वर्षांनंतरचा हा काळ होता. पेठापेठांतील तालमींमध्ये कुस्ती व मर्दानी खेळांचा जोर होता, त्यात फुटबॉलची भर पडली आणि संघासंघांमध्ये ईर्षा पेरली गेली. पुढे संघांच्या किटचे रंग भाव खाऊन गेले.

फुटबॉलला आवश्‍यक सुविधांचा तुटवडा होता. पायात बूट घालून फुटबॉल खेळायचा असतो, याचा विचार येथील खेळाडूंत बिंबला नव्हता. सामन्याच्या मध्यंतराला लिंबूपाणी पिणं म्हणजे त्यांच्यासाठी विशेष होतं. अगदी गुडघे-ढोपरं फोडून फुटबॉल खेळण्याचा आनंद खेळाडू लुटत होते. कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनची स्थापना झाली आणि कोल्हापूरचा फुटबॉल आकार घेऊ लागला. ‘केळवकर साखळी फुटबॉल’ असं स्पर्धेचं १९५०-५१ ला नामकरण झालं. फुटबॉल संघांच्या आकड्यात भर पडत गेली. १९७५-७६ मध्ये सात संघ स्पर्धेत सहभागी झाले. १९९५-९६ मध्ये हा आकडा १५ इतका झाला. त्यानंतर १९९९-२००० पर्यंत बावीस संघ स्पर्धेत जिंकण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करू लागले. याच दरम्यान स्पर्धेचं ‘केएसए वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धा’ असं नामकरण झालं.

शाहू स्टेडियम बनलं फुटबॉलपंढरी

छत्रपती शाहू स्टेडियमवर ईर्ष्येने संघ खेळत राहिले. मैदानाच्या सीमारेषेवर बसून प्रेक्षक सामना पाहत असत. हळूहळू स्टेडियमचं रूपडं बदलू लागलं आणि प्रत्येक संघाच्या पाठीराख्यांची बसण्याची जागा निश्‍चित होत गेली. मैदानावर प्रेक्षकांच्या गर्दीचा उच्चांक सुरू झाला. शिवाजी तरुण मंडळ, दिलबहार तालीम मंडळ, प्रॅक्टिस फुटबॉल क्लब, पाटाकडील तालीम मंडळ, खंडोबा तालीम मंडळ, बालगोपाल तालीम मंडळ, कोल्हापूर महापालिका, जयभवानी स्पोर्टस् इन्स्टिट्यूट, संध्यामठ तरुण मंडळ, कोल्हापूर पोलिस फुटबॉल संघ, शाहूपुरी स्पोर्टस् संघातील खेळाडू मैदानात चमकदार कामगिरी करू लागले.

कोल्हापूरचं वर्तुळ भेदणाऱ्या खेळाडूंना समर्थकांनी डोक्यावर घेतलं. त्यांच्या पायातील कौशल्य संतोष ट्रॉफी चषक फुटबॉल स्पर्धेत दिसू लागलं. (कै.) अनिल मंडलिक, अकबर मकानदार, किशोर खेडकर, संभाजी जाधव, कैलास पाटील, संतोष तेलंग, संजय हंचनाळे, विजय कदम, राजू घारगे, अभिजित शिंदे संतोष ट्रॉफी खेळल्यानंतर फुटबॉलची चर्चा होऊ लागली. खेळाडूंनी व्यावसायिकतेचं अंग स्वीकारलं, तसा त्यांना भावही मिळू लागला. नाजयेरियन खेळाडूंच्या खेळाने कोल्हापूरच्या समर्थकांवर मोहिनी घातल्याने त्यांचे प्रत्येक संघात चेहरे झळकू लागले.

त्यांच्या खेळाची तुलना स्थानिक खेळाडूंसमवेत होणं साहजिक होतं. गुणात्मक फुटबॉलच्या दिशेने फुटबॉलमधील जाणकारांनी बोट ठेवलं. इथल्या फुटबॉलमध्ये २०१०पर्यंत स्पर्धेतील बक्षिसांचा आकडा वाढला. वैयक्तिक बक्षिसांची खेळाडू कशी लयलूट करतात, याचं दृश्‍य प्रेक्षकांनी अनुभवलं. मुंबई, पुणे, कोलकत्यापर्यंत कोल्हापुरी फुटबॉलचा गाजावाजा झाला. पुढे २०१२ ते २०१९ दरम्यान अजिंक्य नलवडे, जयकुमार पाटील, मोहित मंडलिक, अनिकेत जोशी, संकेत साळोखे यांनी संतोष ट्रॉफीतील निवड सार्थ ठरवली.

निखिल कदम हा तेवीस वर्षांखालील भारतीय संघ, पुणे फुटबॉल क्लब, डीएसके शिवाजीयन्स, मुंबई फुटबॉल क्लब, मोहन बागान (कोलकता), नॉर्थ ईस्ट युनायटेड, मोहामेडन स्पोर्टिंग, अनिकेत जाधव हा इंडियन ॲरोज, हैदराबाद एफसी, ईस्ट बंगाल, सुखदेव पाटील पुणे फुटबॉल क्लब, डीएसके शिवाजीयन्स, दिल्ली डायनामोज, एफसी गोवा, एकवीस वर्षांखालील भारतीय संघ, चर्चिल ब्रदर्स गोवा, तर इंद्रजित चौगले पुणे एफसी व डीएसके शिवाजीयन्सकडून भन्नाट खेळला. गडहिंग्लजच्या मातीतील खेळाडूंनीही सातत्याने कौशल्य दाखवलं.

कोल्हापूरच्या स्थानिक संघांत स्थान मिळविताना ते जिल्ह्याबाहेरील संघांतून खेळले. गडहिंग्लजचा शकील पटेल मुंबई कस्टम, बीईएमएल, हॅवर्डस २०००, मलबार युनायटेड (केरळ); नागेश राजमाने आरसीएफ, कस्टम, हेवर्डस; विक्रम पाटील इंडियन बँक, एजीएस चेन्नई, बीईएमएल; निखिल खन्ना इंडियन बँक व डीएसके शिवाजीयन्स; किरण मोहिते, चिमा बांदार, गजानन सुळेभावीकर १९ वर्षांखालील महिंद्रा युनायटेड, सौरभ पाटील साळगावकर फुटबॉल क्लब, अनिकेत कोल्हे व सागर पोवार डीवायएसएस, महेश सुतार पुणे फुटबॉल क्लबकडून खेळला. यंदा अभिषेक पोवार किक स्टार्ट एफसी बंगळूरकडून खेळत आहे. ओंकार घुगरे सेंच्युरी रियॉनकडून खेळल्यानंतर केरळ एफसीच्या संघात दमदार खेळाचं दर्शन घडवत आहे.

यंदापासून केएसएने ‘शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग’ असं साखळी स्पर्धेचं नामकरण केलं आहे. आजघडीला केएसएकडे ए, बी, सी व ग्रामीण विभाग गटांतर्गत एकूण १२५ संघांची नोंदणी आहे, त्यांमध्ये २८०० खेळाडूंचा समावेश आहे. फुटबॉल हंगामांतर्गत ३५० सामने होत असून, पैकी २०० सामने शाहू स्टेडियमवर खेळविले जातात. विशेष म्हणजे भारत विरुद्ध नेदरलँड महिला फुटबॉल संघातील आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना २०१३ ला स्टेडियमवर खेळविण्यात आला. राष्ट्रीय आय लीग पुरुष व महिला, ओएनजीसी सेकंड डिव्हिजन, इंडियन वूमन्स लीग, हिरो ज्युनियर गर्ल्स लीग, इंटर डिस्ट्रिक्ट फुटबॉल चॅम्पियनशिप सामन्यांचं आयोजन इथं झालं.

एशियन फुटबॉल कॉन्फिडरेशनतर्फे इथं ग्रॉस रूट ट्रेनिंगचं दोन वेळा आयोजन केलं. केएसएने १९८५-८६ला सॉकर रेफ्री परीक्षा ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनतर्फे घेतली. त्याचा परिणाम म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात अनेक पंच परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. इथल्या पंचांनी महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील विविध स्पर्धांत उत्कृष्ट कामगिरी करून कोल्हापूरचं नाव मोठं केलं आहे. कोल्हापूरच्या मातीतील महिला फुटबॉलपटूही कमी नाहीत, याचा दाखला येथील मुलींनी दिला आहे. तीन महिला फुटबॉलपटू यंदा पंच परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. आजपर्यंत एआयएफएफतर्फे डी लायसेन्स कोचिंग मुलांसाठी चार, तर मुलींसाठी दोन वेळा झालं. तसंच मुलींसाठी ई-लायसेन्स दोन वेळा झालं.

अलीकडच्या काळात ग्रामीण भागापर्यंत फुटबॉलचं लोण पसरलं आहे. गाव तिथं फुटबॉल संघ असं नवं समीकरण तयार होत आहे. काही संघ केएसएच्या मानांकनात स्वतःचं अस्तित्व टिकविण्यासाठी झगडत आहेत. काही संघ मानांकनातून घसरले जरूर; मात्र त्यांचं फुटबॉलवरचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही. फुटबॉलचा गुणत्मक विकास करण्यासाठी केएसएने कंबर कसली आहे. केएसएचे पेट्रन ऑफ चिफ श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचं फुटबॉल प्रेम सर्वश्रुत आहे. फुटबॉलपटूच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यात ते कधीच मागे राहिले नाहीत. विफाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहणारे मालोजीराजे छत्रपती ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या वित्त समितीच्या सदस्यपदी विराजमान झाले आहेत, तेही फुटबॉलच्या विकासासाठी नवे प्रकल्प घेऊन येत आहेत.

कोलकता, मुंबई, पुण्यानंतर कोल्हापूरच्या फुटबॉलची हवा देशभरात आहे. मुलींच्या फुटबॉल विकासासाठी वॉरियर्स ऑफ कोल्हापूर स्पोर्टस् क्लबची स्थापना झाली आहे, त्यातून भविष्यातील फुटबॉलला आकार देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कोल्हापूरकरांना फुटबॉलवर प्रेम कसं करावं, हे सांगावं लागत नाही.

चौकाचौकांत विश्‍वकरंडकाची छबी

फिफा वर्ल्डकप कतार इथं सुरू होण्यापूर्वीच कोल्हापुरातील चौकाचौकांत मेस्सी, रोनाल्डो, नेमार, एम्बापे यांचे मोठे फलक झळकले. ते कोणत्या देशाकडून खेळतात, याचं त्यांच्या लेखी महत्त्व नाही. फुटबॉल हा श्‍वास मानून जगणारा इथला समर्थक आहे. स्टार फुटबॉलपटूंच्या हेअर स्टाइलचा इथला फुटबॉलपटू फॅन आहे. त्यांची नक्कल करण्यात ते मागे राहत नाहीत. विशेष असं की, प्रतिकूल परिस्थितीशी झगडणाऱ्या, दुखापतग्रस्त असणाऱ्या खेळाडूंना आर्थिक मदत करण्यासाठी कोल्हापूरकर पुढं येतात. संघांतील खेळाडूंना किट, बूट देणारे चेहरे कधी पुढं येण्याचा प्रयत्न करत नाहीत. प्रसिद्धीपेक्षा फुटबॉलला ते महत्त्व देतात. त्यामुळे येत्या काही वर्षांत फुटबॉलमधील अनेक खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चमकताना नक्की दिसतील, असा विश्‍वास प्रेक्षकांना आहे. फुटबॉलच्या गुणात्मक विकासाचा कोल्हापुरी पॅटर्न नक्कीच उभारी घेईल, यात शंका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com