क्रिकेटमधला जंटलमन...! (डॉ. मिलिंद ढमढेरे)

dr milind dhamdhere
dr milind dhamdhere

रणजी क्रिकेट स्पर्धेत चेतन चौहान दिल्ली संघाकडून खेळले आणि पुढंही त्यांची कारकीर्द दिल्लीतूनच बहरली. मात्र, त्यांच्या क्रिकेटची सुरुवात झाली ती पुण्यातून. सुरुवातीला ते महाराष्ट्राकडून खेळले. पुण्याशी त्यांचं जवळचं नातं होतं. क्रिकेटमधून ते खेळाडू म्हणून निवृत्त झाले होते तरी त्यानंतरही त्यांनी विविध जबाबदाऱ्या सक्षमपणानं सांभाळल्या. त्यांच्या कारकिर्दीचा वेध...

चांगल्या माणसानं कीर्तीचं शिखर गाठलं, तरी ज्या मातीतून तो तयार झाला, त्या मातीचं ऋण तो कधीच विसरू शकत नाही. भारताचे एकेकाळचे सलामीचे फलंदाज चेतन चौहान यांनी महाराष्ट्राला 'गुडबाय' करीत दिल्लीकडून खेळताना आपली कसोटी कारकीर्द समृद्ध केली, तरीही पुण्यामध्ये त्यांच्यावर झालेले क्रिकेटचे संस्कार आणि पुण्याचं ऋण ते कधीच विसरू शकले नाहीत. त्यामुळंच जेव्हा केव्हा पुण्याचा माणूस त्यांना दिल्लीत भेटत असे, तेव्हा ते त्याच्याबरोबर पुण्याच्या क्रिकेटविषयी भरभरून बोलत असत.

चौहान यांनी नेहमीच सलामीला येऊन संयमी फलंदाज आणि फिरकी गोलंदाज म्हणून क्रिकेट कारकीर्द गाजविली. खेळाडू म्हणून कारकीर्द संपल्यानंतर भारतीय संघाचे व्यवस्थापक, दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेतील विविध पदांवर आपल्या कुशल कार्यशैलीचा ठसा त्यांनी उमटविला होता. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्रातही काम केलं. दोन वेळा खासदार म्हणून काम करताना त्यांनी संसदेत खेळाडूंविषयी अनेक प्रश्न मांडून त्यांची उकल करण्यात यश मिळवलं होतं. सध्याही ते उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळातही कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जात होते.
चौहान यांच्या क्रिकेट कारकिर्दीचा पाया पुण्यातच रचला गेला. त्यांना कमल भांडारकर यांच्यासारख्या महान गुरूंकडून क्रिकेटचं बाळकडू घेण्याची संधी मिळाली. या संधीचा लाभ चौहान यांनी घेतला नसता तर नवलच. अतिशय तंत्रशुद्ध आणि प्रचंड आत्मविश्वास असलेला खेळाडू म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. वाडिया महाविद्यालयाकडून खेळताना त्यांनी आंतरमहाविद्यालयीन, तसंच आंतरविद्यापीठ स्तरावरील स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली. त्याचबरोबर त्यांनी बारिया करंडक आणि विझी करंडक स्पर्धेतही चमकदार खेळ केला. या कामगिरीमुळेच त्यांना महाराष्ट्राच्या रणजी संघात स्थान मिळालं. १९६७-६८ ते १९७४-७५ या मोसमांत त्यांनी महाराष्ट्राकडून खेळताना आपल्या संघास अनेक सामन्यांमध्ये पहिल्या डावातील आघाडीचे पाच गुण आणि निर्णायक विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. मधु गुप्ते यांच्यासमवेत त्यांनी सलामीसाठी ४०५ धावांची विक्रमी भागीदारी केली होती. संघाकडून खेळताना वैयक्तिक विक्रमापेक्षा संघाच्या यशाला ते महत्त्व देत असत. संघातील नवीन आणि युवा सहकाऱ्याला मार्गदर्शन करण्यात, त्याच्या वैयक्तिक अडचणी सोडविण्यात ते नेहमीच पुढे असत. महाराष्ट्राकडून खेळताना त्यांना १९६९ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. मात्र, त्यांचं हे पदार्पण अपयशी ठरल्यामुळे त्यांना भारतीय संघाकडून वगळण्यात आलं. तरीही निराश न होता त्यांनी महाराष्ट्राकडून स्थानिक सामन्यांमध्ये सातत्यानं फलंदाजीत चमक दाखवली.

चौहान यांची ही कामगिरी ज्येष्ठ क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी यांच्या चाणाक्ष नजरेतून सुटली नाही. त्यांनी चौहान यांना दिल्ली संघाकडून खेळण्याचा आग्रह केला. सुरुवातीला चौहान महाराष्ट्र सोडण्यास तयार नव्हते. बेदी यांनी केलेल्या प्रचंड आग्रहानंतर चौहान दिल्लीकडून खेळण्यास तयार झाले. त्यांच्यासाठी हा बदल निर्णायक ठरला. तिथं गेल्यानंतरच त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अधिक फुलली गेली.
सलामीचे उत्कृष्ट सहकारी,
लिटिल मास्टर सुनील गावसकर यांच्या यशाच्या चढत्या कमानीला चौहान यांचा हातभार लाभलाय. गावसकर यांना चौहान यांच्या रूपानं एक उत्तम साथीदार मिळाला. या जोडीनं ५९ डावांमध्ये ५३.७५ च्या सरासरीनं ३,०१० धावा केल्या. त्यामध्ये सलामीसाठी दहा वेळा, तर चौथ्या विकेटसाठी एकदा अशा अकरा वेळा शतकी भागीदारी रचल्या. १९७९ मध्ये इंग्लंडविरुद्ध त्यांनी केलेली २०१ धावांची भागीदारी अजूनही सर्वांच्या स्मरणात आहे. भलेही चौहान यांची शैली आक्रमक नसेल; परंतु सामना जिंकण्यासाठी किंवा पराभव टाळण्यासाठी जो भक्कम पाया उभारण्याची आवश्यकता असते, तो पाया रचण्यात ते हुकमी फलंदाज मानले जात असत.

भीती हा शब्दच नाही !
चौहान यांच्या शब्दकोशात 'भीती' हा शब्दच नव्हता. १९७६-७७ च्या रणजी मोसमात जबड्यावर शस्त्रक्रिया झाली असतानाही त्यांनी दिल्लीकडून खेळताना हरियानाविरुद्ध नाबाद १५८, पंजाबविरुद्ध २००, तर कर्नाटकविरुद्ध १४७ धावा अशी तीनदा शतकं टोलविली होती. १९८५ मध्ये मुंबई विरुद्धच्या सामन्यात उजव्या अंगठ्यास फ्रॅक्चर असतानाही त्यांनी पहिल्या डावात ९८, तर दुसऱ्या डावात ५४ धावांची खेळी केली होती. मैदानाबाहेरही त्यांच्या धाडसी वृत्तीचा प्रत्यय अनेक वेळा त्यांच्या सहकाऱ्यांना आला होता. १९८४ मध्ये पुण्यातील दुलीप करंडकचा सामना संपल्यानंतर उत्तर विभागाचा संघ दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी झेलम एक्स्प्रेसनं दिल्लीस परत येत होता. त्याच दिवशी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यामुळे अनेक ठिकाणी लोकांनी शीख लोकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. वाटेत एका स्टेशनवर उत्तर विभागाचे खेळाडू असलेल्या डब्यात काही लोक शिरले आणि त्यांनी नवज्योतसिंग सिद्धू आणि राजिंदरसिंग घई यांना मारण्याची धमकी दिली. चौहान यांनी आवाज चढवीत या लोकांना चांगलंच सुनावलं. चौहान यांचा आक्रमक पवित्रा पाहिल्यानंतर धमकी देणारे लोक डब्याबाहेर गेले. आजही हा प्रसंग आठवला, की नवज्योतसिंग आणि अन्य सहकाऱ्यांच्या अंगावर काटे उभे राहतात.
चौहान यांनी ४० कसोटींत ३१.७५ च्या सरासरीनं २,०८४ धावा केल्या. या कारकिर्दीत त्यांना एकही शतक झळकावता आलं नाही. मात्र, १६ अर्धशतकं टोलविताना त्यांनी डेनिस लिली, बॉब विलीस, जेफ थॉमसन, इम्रान खान, सिकंदर बख्त आदी भेदक अशा वेगवान गोलंदाजांना आत्मविश्वासानं तोंड दिलं. करिअरमध्ये नेहमीच त्यांनी वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा भारतीय संघाच्या हितास प्राधान्य दिलं.

भारतीय क्रिकेट संघाचे व्यवस्थापक म्हणून काम करताना २००१ मध्ये भारतास ऑस्ट्रेलियन भूमीवर ऐतिहासिक विजय मिळाला होता. २००७-०८ मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर असताना हरभजनसिंग आणि अँड्र्यू सायमंड्स यांच्यात झालेल्या वादाचं पर्यावसन जातीय वादामध्ये झालं होतं. त्या वेळी हा दौरा स्थगित होण्याची शक्यता निर्माण झाली होती. तथापि, चौहान यांनी भारतीय संघाचे व्यवस्थापक म्हणून काम करताना अतिशय मुत्सद्दीपणानं हे प्रकरण हाताळलं आणि दौरा पुढे सुरू राहिला.
नवी दिल्ली येथील फिरोजशाह कोटला मैदान हे त्यांच्यासाठी प्राणाहून प्रिय होतं. ६५ व्या वर्षीसुद्धा दररोज नियमितपणे व्यायामासाठी ते येत असत. नवीन खेळाडूंना मार्गदर्शन करणं, दिल्ली क्रिकेट संघटनेद्वारे विविध उपक्रम आयोजित करणं यातच ते कार्यमग्न असायचे. भारतीय क्रिकेट क्षेत्रात लोढा समितीची अंमलबजावणी करण्याची वेळ आली, त्या वेळी इतरांचा विरोध असला तरी त्यांनी शेवटपर्यंत त्याचं समर्थन केलं होतं.

सतत इतरांसाठी झगडणाऱ्या चौहान यांनी कोरोनाबाधित लोकांचं जनजीवन सुरळीत करण्याचा ध्यास घेतला होता. दुर्देवानं हे काम करीत असतानाच त्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्यामधून ते बाहेर येऊ शकले नाहीत. ज्या समाजानं आपल्याला लोकप्रियता मिळवून दिली, त्या समाजाचं ऋण फेडत असतानाच चौहान यांची इनिंग अर्ध्यावर संपली, याहून दुसरं दुर्दैव नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com