‘मातेचे श्रम निष्कलंक अपुल्या बाळार्थची ! जाणणे’

Mother and Child
Mother and Childesakal

‘निर्माता जन जो हिचा, निपुण तो आहे कवी हो कवी!’ असे ज्यांच्याविषयी म्हणत राजकवी चंद्रशेखरांनी ज्यांच्या कवितेचे वर्णन ‘वाटे आज शरत्‌प्रभात नटूनी ही येतसे राजसा!’ अशा बहारदार काव्यपंक्तीत केले होते, ते कवी म्हणजे विठ्ठल भगवंत लेंभे (१८५०-१९२०). त्यांचा जन्म पुण्यातील तळईजवळील ढमढेरे येथे झाला. आर्थिक अडचणीमुळे त्यांचे मॅट्रिक होऊ शकले नाही. त्यांनी आयपीजी रेल्वेत सुमारे ४२ वर्षे नोकरी केली. नोकरीनिमित्त ते अवघा महाराष्ट्र फिरले अन्‌ निवृत्तीनंतर पुणे येथे स्थायिक झाले. तेथेही अखेरच्या क्षणापर्यंत त्यांना काम करत, कष्टत उदरनिर्वाह करावा लागला. त्यातच १ ऑगस्ट १९२० ला, म्हणजे ज्यादिवशी लोकमान्य टिळक निधन पावले, त्याच दिवशी त्यांचे निधन झाले.

लेंभेंच्या कवितेचे वैशिष्ट्य म्हणजे पल्लेदार व भारदस्त शब्दांची योजना होय. अनेक विलापिका त्यांनी लिहिल्या. त्यातही पत्नीच्या निधनानंतर लिहिलेली शोकावर्त विलापिका अत्यंत सरस उतरली आहे, असे समीक्षकांचे मंतव्य आहे. प्रस्तुत लेखकाला ही विलापिका पाहावयास मिळाली नाही. याशिवाय कवीने आनंदकंद, सुरतरंगिणी, खंडिता ही खंडकाव्ये, तर कृतांतकैतव, एकनाथवियोग, विष्णू शास्त्री चिपळूणकरांवर ‘विष्णूनिधन’ ही काव्येही लिहिलीत. याशिवाय कवीने काही कादंबऱ्या व नाटकेसुद्धा लिहिली. आज आपण कवीची ‘मातेचे प्रेम’ ही स्फुट कविता पाहणार आहोत. आई हे मानवी जीवनातील अत्यंत जिव्हाळ्याचे, आत्मीयतेचे सत्य होय. खरंतर माता या शब्दातच प्रेम अन्युस्यूत असते. माता अन् प्रेम असे वेगळे निर्देश करायची आवश्यकता नसते. एकार्थी मातेचे प्रेम ही माता या शब्दाची द्विरुक्ती होय. कवी अगदी पहिल्याच कडव्यात विचारतो, की

Mother and Child
स्त्री जन्म म्हणुनी न व्हावे उदास...

आहे पैल समुद्र, तत्तल तुवा बा काय रे पाहिलें।
किंवा तत्सिकताकणा निजबळे आहेस का मोजिले॥
पाहें अंबर हें वरी, गणियली उंची तयाची तरी।
नाही; धिक ! गणिशी अगाध जननीप्रेमा कसा यावरी॥

समुद्राचा तळ तू कधी पाहिलास का?, वाळूचे कण तू कधी मोजलेस का? या आकाशाची उंची तू कधी मोजलीस का? असे प्रश्‍न विचारत कवी स्वत:च उत्तरतो नाही ना! मग आईचे प्रेम मोजण्याचे धारिष्ट्य कसे काय करतोस? त्याला म्हणायचे आहे, की समुद्राच्या न मोजता येणाऱ्या खोलीसारखे मातेचे प्रेम गहन आहे. वाळूच्या कणासारखे अगणित आहे अन् आकाशाच्या अतुल्य उंचीसारखे ते उत्तुंग आहे. हे माहीत असल्यानेच कवी कवितेतील प्रश्‍नांना प्रश्‍नार्थक चिन्ह घालत नाही. शेवटच्या चरणात सरळच ‘नाही’ असे उत्तर देत, आईचे प्रेम गणायला निघालेल्यांना धिक्कारत मोकळा होतो. येथे प्रश्‍न उभा राहतो, आईचे प्रेम कोण मोजते? सामान्यत: आपण सारेच ते मोजत असतो. माझ्यापेक्षा भावावर वा बहिणीवर तू अधिक प्रेम करते, या लडिवाळ आरोपापासून मोठेपणी संपत्तीच्या वाटपाच्या वेळी, तर कधी कधी बायकोच्या ‘तुमच्या आईचे तुमच्यावर प्रेमच नाही’ या मौलिक ज्ञानदानावर विसंबून आपण चालत असतो. त्यांना धिक्कारत कवी हा अंतर्मुख करणारा प्रश्‍न विचारतो.
‘आकाशी फिरणाऱ्या सूर्याशी तू कधी दोन शब्द बोलून आलास काय? इंद्रसभेत देव करीत असलेली कामे तू बघितलीस का?’ असे प्रश्‍न विचारण्यामागे कवीला सांगायचे आहे, की यांची कामे स्वार्थरहित आहेत, हे तुला जाणता आले, तरच मातेचे निस्पृह प्रेम तुला कळेल. ‘रात्रंदिवस खपून मधमाशी जसे मधुरतम मध जगाला देते. अगदी तशीच आईसुद्धा आपल्या बाळासाठीच श्रमत असते.’ हे प्रतिपादन करताना कवी,
‘मातेचे श्रम निष्कलंक अपुल्या बाळार्थची! जाणणे’ अशी द्वाही मिरवतो.

पुढे तो म्हणतो, ‘तू उत्तर- दक्षिण ध्रुवावर, कोणत्याही ताऱ्यावर, कोठेही जा, तेथेही तुझ्या अंतरंगात जननीचे वत्सलचित्र तुला गवसेल’ कवी म्हणतो, ‘तुला प्रेमाचे कोमल, अतिदिव्य किंवा बुद्धीचे शुद्ध अन् सत्य सिद्धांत हवे असतील, तर ब्रह्मांड व्यापणारी आईची प्रेमळ दृष्टी तू एकवार पाहा. तुला त्यात हे सारे सहज गवसेल. या प्रेमळ दिव्यदृष्टीनेच हे सारे जग उत्पन्न झाले आहे.’ जर आई नसती, तर नाती तरी कशी जन्मली असती? असा कवीचा सरळ सवाल आहे. पुढे तो म्हणतो, ‘आईचा हाच प्रेमळपणा अंगी बाणवून सज्जन संतपदाला पावले. नव्हे नव्हे; त्यांच्यासाठी ही भवनदी पार करणारी नौकाच ठरली. आपण उच्चकोटीच्या संतांना माउलीची उपाधी त्यामुळेच तर देत असतो. पण, माउलीला या उपाधीची गरजच नसते. कारण तिची माया वायूच्या पटलात, धरणीच्या पोटात, आकाशाच्या मायेसारखी पसरलेली असते. त्यामुळे ते ईश्‍वरी वैभव आहे, असे कवीला वाटते. पण, तत्क्षणी त्याला वाटते, एवढेच नाही, तर माउलीची प्रेमळ दृष्टी ईश्‍वरावरच कृपा करीत असते. आतापावेतो कवी माउली न म्हणता, माउलीची प्रेमळ दृष्टी असेच म्हणतोय. कारण माउली ही व्यक्ती असून, माउलीची प्रेमळ दृष्टी ही वृत्ती आहे, भाव आहे असे त्याला दाखवायचे आहे. व्यक्ती दोषपूर्ण असू शकतो, कदाचित स्वार्थीही असू शकतो; पण विविक्षित भाव अन् वृत्ती तशी नसते. ही त्यामागील धारणा असावी. हे सांगत असतानाच कवीला आचार्य शंकराच्या ‘कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति’ या अजरामर ओळी स्मरल्या असतील अन् कवीला ध्यानात येते, की माउलीरूपी व्यक्ती नसेल, तर निव्वळ वृत्ती कोठून येणार? म्हणून तो अंतिम पंक्तीत म्हणतो,

Mother and Child
कार्यक्षमता वाढवण्याची गुरुकिल्ली

धन्या प्रेमळ दृष्टि ती त्रिभुवनीं धन्याचि ती माऊली

रसिका! सुमारे १७२ वर्षांपूर्वी जन्मलेल्या या सारस्वतांच्या काव्यमाळेतील बहुतेक मणी काळाच्या ओघात ओघळून लुप्त झाले आहेत. त्यातून वाचलेल्या मण्यातील हा एक होय. हा मणी सर्वोत्तम असो वा नसो पण सहृदय नि सुबोध नक्कीच आहे.

(लेखक प्रख्यात मनोचिकित्सक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com