लोणार सरोवर : दुर्लक्षित पर्यटनस्थळ (डॉ. बी. एम. करमरकर)

b m karmarkar
b m karmarkar

लोणार सरोवराचं पाणी गुलाबी झाल्याची बातमी गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाली आणि विदर्भातलं हे सरोवर पुन्हा एकदा चर्चेत आलं. या सरोवराची निर्मिती कशी झाली असावी, याविषयी मतप्रवाह आहेत. असं असलं तरी या सरोवरासारखा भव्य व नयनरम्य नैसर्गिक आविष्कार आपल्या भारतात आहे याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. असं सरोवर इतर कोणत्याही पाश्चिमात्य देशात असतं तर तिकडच्या मंडळींनी त्याची उत्तम प्रकारे निगा राखली असती. आपल्याकडे या दृष्टिकोनाचा अभाव जाणवतो. भारताला निसर्गानं भरभरून दिलं आहे; पण आपण अशा स्थळांची दैना केली आहे.

‘लोणार सरोवराचे पाणी झाले गुलाबी’ अशी बातमी वर्तमानपत्रांत नुकतीच येऊन गेली.
बातमी वाचून या सरोवराबाबतची अनेकांची उत्सुकता जागी झाली.
‘नेमकं कुठं आहे हो हे लोणार सरोवर?’ असं अनेकांनी विचारलं.
विचारणाऱ्यांपैकी बहुतेकजण अजिंठा लेणी पाहून आलेले होते; परंतु अजिंठ्यापासून अवघ्या ऐंशी किलोमीटरवरच्या लोणार गावाजवळचं (जिल्हा : बुलढाणा, विदर्भ) हे सरोवर बहुतेकांना माहीतच नव्हतं. म्हणजे, लोणार सरोवराच्या अगदी जवळपास जाऊनही ते न पाहताच हे सर्वजण परत आले होते.
निसर्गाचा उत्कृष्ट आविष्कार असलेल्या या सरोवराची भव्यता व सौंदर्य शब्दात सांगता येण्याजोगं नाही. सरोवराच्या काठावर उभं राहूनही त्याचा सारा परिसर दृष्टिक्षेपात येत नाही. पक्षी होऊन उंच उडता आलं तरच संपूर्ण लोणार सरोवर व त्याच्या आजूबाजूचा परिसर दिसू शकेल!
लोणार सरोवराच्या भूशास्त्रीय अभ्यासासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर-मराठवाडा विद्यापीठा’तर्फे मिळालेल्या अनुदानातून मी लोणार सरोवराचं व त्याच्या परिसराचं भूशास्त्रीय सर्वेक्षण (Geological Survey) अनेक वर्षं केलं आहे, त्याचबरोबर लोणार सरोवरासंबंधी प्रसिद्ध झालेल्या भूशास्त्रीय शोधनिबंधांचा आणि वाङ्मयाचा अभ्यासही केला आहे.

जगातलं तिसऱ्या क्रमांकाचं मोठं सरोवर
लोणार सरोवरासारखी गोलाकार आकाराची सुमारे १९८ सरोवरं जगात आहेत. आकारमानाच्या दृष्टीनं लोणार सरोवराचा त्यात तिसरा क्रमांक लागतो. जगातलं सर्वात मोठं ‘अशांती’ नावाचं सरोवर आफ्रिकेतल्या घाना या देशात आहे. त्याचा व्यास दहा हजार ६१ मीटर असून खोली ३५१ मीटर आहे. दुसऱ्या क्रमांकाचं सरोवर कॅनडातल्या न्यू क्वेबेक इथं आहे. त्याचा व्यास तीन हजार ४४५ मीटर असून खोली ३९६ मीटर आहे.

लोणार सरोवराचं भूरूप वर्णन
लोणार सरोवराचा आकार वाडग्यासारखा आहे. त्याच्या समोरासमोरील दोन काठांवरील अंतर (व्यास)
एक हजार ८२९ मीटर असून, त्याच्या काठापासून मध्यभागी असलेल्या खाऱ्या पाण्यापर्यंतची खोली १७४ मीटर आहे. लोणार सरोवराचं वैशिष्ट्य म्हणजे, खारं पाणी असलेलं आणि बेसॉल्ट खडकात निर्माण झालेलं जगातलं ते एकमेव सरोवर आहे. सरोवराच्या काठापलीकडच्या भागात उगम पावून त्याच्या काठावरून सरोवराला जाऊन मिळणारे सुमारे वीस नाले आहेत. त्यापैकी ‘सीतान्हाणी’जवळचा ‘धारा नाला’ सर्वात मोठा व खोल आहे.

मध्यभागी असलेलं खारं पाणी व सभोवतालचे खडकांचे उभे कडे यांच्या मध्य भागात गाळयुक्त माती असून पश्र्चिमेच्या भागात संरक्षित वनक्षेत्र आहे. सरोवराचा काही मध्यभाग खाऱ्या पाण्यानं व्यापलेला असतो. त्याचं क्षेत्रफळ सरासरीनं १०५ ते ११५ हेक्टर इतकं असतं, तसंच खाऱ्या पाण्याच्या स्तंभाची सरासरी उंची ३.५ मीटर असते. सरोवरातल्या खाऱ्या पाण्याचा पीएच (क्षारता) १०.२ ते १०.५ इतका असतो. रासायनिक पृथक्करणानुसार खाऱ्या पाण्यात ४.२ टक्के सोडियम क्लोराईड, १.९० टक्के सोडियम कार्बोनेट आणि १.३० टक्के सोडियम बाय कार्बोनेट असतं. समुद्राच्या पाण्यात ४ टक्क्यांच्या आसपास सोडियम क्लोराईड असतं. याचा अर्थ लोणार सरोवराचं पाणी समुद्राच्या पाण्यापेक्षाही जास्त खारट आहे आणि म्हणूनच त्याच्या पाण्यात जलचर प्राणी राहू शकत नाहीत. सरोवराच्या पाण्यात ०.१४ टक्के

बोरॉनही आढळून येतं. या पाण्यात काही प्रमाणात फ्लोराईड असल्याचं दिसून आलं आहे.

सरोवराचं पाणी झालं गुलाबी!
लोणार सरोवराच्या पाण्यात १४ ते १६ प्रकारच्या नीलहरित शैवाल वनस्पती (Algae), काही सूक्ष्मजीव आणि थर्मोफिलिक बॅक्टेरियांचे स्पोअर्स आहेत, याआधी झालेल्या सरोवराच्या पाण्याच्या अभ्यासात हे आढळून आलं होतं. पाण्यातल्या नीलहरित शैवालामुळेच सरोवराचं पाणी हिरवट-निळं दिसतं. मात्र, नेहमी हिरवट-निळ्या दिसणाऱ्या पाण्याचा रंग गुलाबी झाल्याची बातमी दहा जून २०२० ला प्रसिद्ध झाली व अंधश्रद्धायुक्त अफवांचं अमाप पीक आलं; पण त्याचबरोबर अनेक वनस्पतीशास्त्रज्ञांनी आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांनी पाण्याचा रंग बदलण्याची शास्त्रीय कारणं दिल्यानं अफवांचा धुरळा खाली बसला. सर्वच शास्त्रज्ञांच्या मतात (कधीही न दिसणारी) बरीचशी एकवाक्यता होती.

सरोवराच्या पाण्याचा रंग बदलणं ही गोष्ट तशी आश्चर्यकारक आणि असामान्य नाही, असं बहुतेक शास्त्रज्ञांना वाटतं. उन्हाळ्यातला तीव्र सूर्यप्रकाश, पाण्याच्या तापमानात झालेली वाढ, बाष्पीभवनानं सरोवरातलं पाणी आटल्यानं पाण्यात वाढलेलं क्षारांचं प्रमाण या कारणांनी पाण्यातल्या होलो बॅक्टेरिया (Halobacteria Algae) आणि ड्यूनालिईयेला सलिना (Dunaliella Salina) यांची पाण्यात फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि त्यांच्या कार्यात बदल झाला. परिणामी, सरोवराच्या पाण्याचा रंग बदलला असं मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे. होलो बॅक्टेरिया उन्हाळ्यात पाण्यातले क्षार मोठ्या प्रमाणात शोषून घेतात, त्यामुळे त्यांच्या शरीरात क्षारांचं प्रमाण वाढून ते क्षारांनी संपृक्त (saturate) होतात. होलो बॅक्टेरियातल्या पाण्याचं संतुलन टिकवण्यासाठी ते सरोवरातलं पाणी मोठ्या प्रमाणात शोषून घेऊन फुगतात आणि शेवटी फुटतात. त्यामुळे त्यातलं बॅक्टेरियोरूबेरिन हे गुलाबी रंगद्रव्य तलावातल्या पाण्यात पसरतं व तलावातल्या पाण्याचा रंग गुलाबी होतो. ड्यूनालिईयेला सलिनाचा मूळचा रंग हिरवा असतो. त्यातलं बीटा कॅरॉटेनॉईड(Carotenoids) नावाचं रंगद्रव्यही तापमान वाढलं की मोठ्या प्रमाणात वाढतं व त्यामुळेही पाण्याचा रंग बदलतो.
रंग बदलण्यामागं असलेली उपरोल्लेखित सगळी कारणं सर्वसाधारणपणे सर्वच शास्त्रज्ञांनी दिलेली आहेत. शास्त्रज्ञांनी दिलेली कारणं हा कदाचित ‘केवळ अंदाज’ असू शकेल.

तीव्र सूर्यप्रकाश, तापमानातली आणि पाण्यातली क्षारांची वाढ, सरोवराचं पाणी आटणं या घटना काही याच वर्षी झालेल्या नाहीत. दरवर्षी हे सारे बदल होतच असतात. मग प्रश्न येतो की, याच वर्षी पाण्याचा रंग का बदलला? सन १९७२ व सन १९८१ या दोन वर्षी इतका तीव्र उन्हाळा होता की सरोवरातल्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन सरोवर कोरडं पडलं होतं असं स्थानिक लोक सांगतात. मग त्या वर्षी पाण्याचा रंग का बदलला नाही? महाराष्ट्रातील प्रमुख प्रयोगशाळांनी पाण्याचे नमुने गोळा केले असून त्यांचं परीक्षण ते करत आहेत. त्यामुळे पाण्याचा रंग बदलण्याचं निश्चित कारण समजण्यासाठी अजून काही दिवस थांबावं लागणार आहे. लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग बदलण्याची घटना यापूर्वी कधीच झाली नव्हती. भारतात असलेल्या इतर सरोवरांतल्या पाण्याचा रंग बदलल्याची नोंद नाही. मेळघाटचे चीफ कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट एम्. एस. रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार, इराणमधल्या ‘उमरिया’ सरोवराच्या पाण्याच्या रंगात असाच बदल झाल्याचा पुरावा आहे.

लोणार सरोवराची भूशास्त्रीय रचना
सरोवराच्या काठाखाली असलेल्या उभ्या कड्यात, एकमेकांवर रचल्यासारखे बेसॉल्ट (Basalt) खडकांचे पाच थर आहेत. अनेक ठिकाणी दोन बेसॉल्ट खडकांच्या थरांमध्ये काहीसे चपटे आणि थोड्या अंतरापर्यंत असलेले तांबड्या रंगाचे गेरूचे पट्टे (Red Tachylytic Basalt) आहेत.

सर्व दिशांतील बेसॉल्ट थरांचा कलतेपणा
लोणार सरोवराच्या काठापलीकडील परिसरात असलेले बेसॉल्ट खडकांचे थर क्षितिजसमांतर (Horizontal) आहेत; परंतु लोणार सरोवराच्या उभ्या कड्यात दिसणारे पाचही थर काठाला लागून असलेल्या बाहेरच्या बाजूला सर्व दिशांनी कलते झालेले (Quaquaversal Dip) असल्याचं सर्वेक्षणात दिसून आलं आहे. सरोवराच्या काठावरच्या बेसॉल्ट खडकांचे थर सर्व दिशांत बाहेरच्या बाजूला कललेले असणं हा फार मोठा पुरावा लोणार सरोवराची निर्मिती कशी झाली हे ठरवण्याच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे.

लोणार सरोवर म्हणजे ज्वालामुखीचं कुंडच
भारतात ब्रिटिश राजवट सुरू झाल्यानंतर सन १८२३ पासून लोणार सरोवराचा भूशास्त्रीय अभ्यास अनेक भूशास्त्रज्ञांनी केला. सन १८५३ पासून १९६५ पर्यंत जवळजवळ सर्व भूशास्त्रज्ञांनी, या सरोवराची निर्मिती ज्वालामुखीच्या केंद्रीय उद्रेकामुळेच झाल्याचं दाखवून दिलं, त्यामुळे सन १९६५ पर्यंत लोणार सरोवर हे ज्वालामुखीचं कुंडच असल्याचं मान्य केलं जात होतं.
सन १९६० नंतर चांद्रमोहिमेसाठी अमेरिकी व रशियन शास्त्रज्ञांनी चंद्राच्या पृष्ठभागाचं सर्वेक्षण सुरू केलं. चंद्रावर असलेल्या असंख्य लहान-मोठ्या विवरांची निर्मिती उल्कापातामुळे झाली असल्याचं अनुमान त्यांनी काढलं. त्यानंतर लोणार सरोवर उल्कापातामुळेच निर्माण झालं असावं असं बरेच भूशास्त्रज्ञ मानू लागले. तरीही लोणार सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झाली असं मानणाऱ्या भूशास्त्रज्ञांनीही ‘लोणार सरोवर उल्कापातामुळे निर्माण झालं, असं निखालसपणे सांगता येण्याजोगा पुरावा नाही,’ असं त्यांच्या शोधनिबंधात लिहिलं आहे. (डॉ. फ्रेड्रिक्सन् व डॉ. दुबे, सन १९७३).

एखाद्या घनपृष्ठभागावर दुसरी गोलाकार घनवस्तू वेगात येऊन आदळली तर ज्या ठिकाणी आघात होतो त्याच्या आजूबाजूला सर्व दिशांत जाणारे लांबलचक तडे पडतात, तसंच जिथं आघात होतो त्या भागाची बरीच मोडतोड होते असा नेहमीचा अनुभव आहे. लोणार सरोवराच्या काठावर खडकांचे उंच उभे कडे आहेत, तसंच सरोवराच्या बाहेरच्या बाजूला खडक लख्ख उघडे पडलेले आहेत. त्या खडकांत कुठंही उल्केच्या आघातामुळे पडलेले तडे दिसत नाहीत, तसंच काठावरच्या खडकांचीही मोडतोड झालेली दिसत नाही.

आघात खालून झाल्याचा पुरावा
उल्केच्या वरून झालेल्या आघातामुळे, मूळचे क्षितिजसमांतर असलेले
बेसॉल्टचे थर आतल्या बाजूला, जिथं आघात झाला आहे, त्या केंद्राकडे कलले जाण्याची शक्यता होती. मात्र, वस्तुस्थिती अशी आहे की सरोवराच्या काठावर कड्यामध्ये जे थर दिसतात ते बाहेरच्या बाजूला सर्व दिशांत सुमारे २० अंशांमध्ये कललेले आहेत. याचा अर्थ ज्वालामुखीच्या उद्रेकापूर्वी खालच्या दिशेनं एका केंद्रावर दाब निर्माण झाला असणार. (आकृती क्रमांक २)
‘टाटा आयर्न अँड स्टील कंपनी’नं, तसंच ‘स्मिथ्सोनियन विद्यापीठा’तर्फे ३०० ते ३५० मीटर खोलीपर्यंत एकूण २८ विंधनछिद्रं घेतली गेली. त्यांत ३५० मीटर खोलीपर्यंत खडकांचे तुकडे झाल्याचं आढळून आलं. (आकृती क्रमांक ३).
‘लोणार सरोवर अश्मी उल्केच्या आघातानं झालं आहे,’ असं मानणाऱ्यांचं मत जवळजवळ सर्व पुरावे केवळ गृहीतकावर आधारलेले असावेत असं आहे; परंतु लोणार सरोवर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झालं असं म्हणणाऱ्या शास्त्रज्ञांनी दिलेले सारे पुरावे शास्त्रीय निकषांवर सिद्ध होणारे आहेत; त्यामुळे लोणार सरोवर म्हणजे ज्वालामुखीचं विवरच आहे हे मानणं सयुक्तिक होईल.

अक्षम्य दुर्लक्षित पर्यटनस्थळ
लोणार सरोवराला राज्य शासनानं पर्यटनस्थळ म्हणून मान्यता दिली असली तरी ‘नाव सोनूबाई, हाती कथलाचा वाळा’ अशी अवस्था या पर्यटनस्थळाची आहे. कोणत्याही भागाचा विकास पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असतो. लोणारच्या परिसरात लहरी व कमी पर्जन्यमान असल्यानं लोणारच्या परिसरात पाण्याचं दुर्भिक्ष्य कायमच असतं. उन्हाळ्यात लोणार गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या बोरखेडी आणि देवळगाव किणपा या तलावांमधलं पाणी आटतं, त्यामुळे उन्हाळ्यात गावाला महिन्यातून एकदा कमी दाबानं आणि कमी वेळ नळानं पाणीपुरवठा केला जातो.

आर्थिक सुस्थितीतल्या काही लोकांनी त्यांच्या घराच्या आवारात पाचशे ते एक हजार फूट खोलीपर्यंत नलिकाकूप (Borewells) घेतले आहेत; परंतु गावातल्या सर्वसामान्य माणसाची परिस्थिती फार दयनीय आहे. अनेकदा १५ लिटर पाण्याच्या प्रत्येक बॅरलसाठी एक रुपया त्यांना मोजावा लागतो. या पाण्याची गुणवत्ता काय असेल हा एक संशोधनाचा विषय आहे. वैयक्तिक व सामाजिक स्वच्छता पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. पाण्याचं दुर्भिक्ष्य असल्यानं लोणार गावात स्वच्छता असण्याची अपेक्षाच करता येत नाही.
लोणार सरोवराच्या पूर्वेला लोणार-मंठा रस्त्याच्या पलीकडं एमटीडीसीनं भव्य विश्रामगृह बांधलं आहे. विश्रामगृहापासून सुमारे दोन किलोमीटरवरच्या जानूनाजवळील तलावाच्या खालच्या बाजूला घेतलेल्या एका नलिकाकूपातून विश्रामगृहाला पाणीपुरवठा केला जातो. लोणार गावालाही अनेकदा याच
नलिकाकूपावाटे पाणीपुरवठा केला जातो.

या पर्यटनस्थळाचा विकास होण्यासाठी मोठ्या प्रमाणात व कायमस्वरूपी पाणीपुरवठा झाला पाहिजे. जालना-चिखली रस्त्याला लागून असलेल्या खडकपूर्णा धरणातून पाईपलाईनद्वारे लोणारला पाणीपुरवठा व्हावा अशी स्थानिक लोकांची मागणी आहे. पाण्याचं दुर्भिक्ष्य, त्याचबरोबर गावातला वीजपुरवठा अनेकदा काही तास खंडित असतो. या साऱ्या गोष्टींमुळे पर्यटकांना उतरण्यासाठी चांगल्या हॉटेल्सचा विकासही होत नाही. लोणार सरोवराच्या परिसरात फार मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झालेली आहे. पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे नवीन झाडं जगवता येत नाहीत, त्यामुळे या पर्यटनस्थळाच्या परिसरात कायमच रखरखीतपणा जाणवतो. गावातले मुख्य रस्ते व त्यांना येऊन मिळणारे गल्ली-बोळातले रस्ते यांची अवस्था वर्णन करण्यापलीकडची आहे.
लोणार सरोवराच्या भागात लोकांची वर्दळ कमी व्हावी म्हणून लोणारच्या काठावर सभोवार कुंपण घालण्यात आलेलं आहे. पूर्वेला व दक्षिणेला अशी दोनच प्रवेशद्वारं ठेवण्यात आलेली आहेत. तरीही आलेले पर्यटक कागदाचे बोळे, प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्या कुंपणाच्या आत सहज भिरकावून देतात.

सार्वजनिक ठिकाणांचा वापर आपण एखाद्या धर्मशाळेसारखा करतो. कुठंही घाण करणं ही आपली प्रवृत्ती आहे. आपल्या पूर्वजांनी खडक कोरून निर्माण केलेल्या सौंदर्याच्या खाणी असलेल्या वेरूळच्या लेण्यातील कोपऱ्यांत पान खाऊन पिचकाऱ्या मारणारे लोक मी पाहिले आहेत; त्यापुढे लोणार सरोवराची काय कथा!
लोणार सरोवरासारखा भव्य व नयनरम्य नैसर्गिक आविष्कार कोणत्याही पाश्चिमात्य देशात असता तर त्यांनी त्याचं सोनं केलं असतं व त्याची उत्तम प्रकारे निगा राखली असती. भारताला निसर्गानं भरभरून दिलं आहे; पण माणसानं त्याची दैना केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com