ज्याकाळात कवी ही कविता करत होते, त्याकाळी पारतंत्र्यामुळे लोकांत एक प्रकारचे दास्यभाव, मालिन्य आले होते. ते दूर सारण्याचा प्रयोग कवीने केलेला दिसतो. त्या मुळे या कवितेचे मोल आणखी वाढते. शिवाय मराठ्यांच्या महापराक्रमी इतिहासाचे विस्मरण होण्याच्या या काळात ही कविता विशेषत्वाने मोलाची ठरते. (saptarang Latest Marathi Article by Dr Neeraj Deo on Marathi poetry nashik news)
दिनकर गंगाधर केळकर (१८९६-१९९०) उपाख्य कवी अज्ञातवासी. कवीपेक्षाही पुराण वस्तू संग्राहक म्हणून महाराष्ट्रास अधिक ज्ञात आहेत. सुमारे शंभर वर्षांपूर्वी १९२० पासून त्यांनी विविध प्रकारच्या पुराणवस्तू जमविण्यास आरंभ केला. आजमितीला हजारो पुराण वस्तूंचा साठा त्यांच्या संग्रहालयात आहे. यातील कित्येक वस्तू घेण्यासाठी त्यांनी अक्षरश: सोन्याचे दागिने विकून तांब्या-पितळेच्या यःकश्चित वस्तू खरेदी केल्या होत्या. प्रस्तुत संग्रहालयास त्यांनी त्यांच्या दिवंगत मुलाचे ‘राजा दिनकर केळकर संग्रहालय’ असे नाव दिले. १९७९ मध्ये त्यांनी जिवाभावाने जमवलेला अन् जपलेला हा अमूल्य खजिना राज्य शासनाकडे सुपूर्द केला. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
कवी केवळ कवीच नसून संपादक विचारवंत होता. काव्याचा विचार करता कवीला निसर्ग, काव्य, प्रेम असे विविध विषय भावत; पण त्याच्या विशेष रुचीचा विषय होता इतिहास! त्यातही मराठ्यांचा भारतव्यापी विजयी इतिहास अधिकच रुचत असे. त्याचेच प्रतिबिंब कवीच्या ‘पुणे दरबारी!’ कवितेत पडलेले दिसून येते.
कवितेच्या आरंभीच यशाचा आलेख मांडताना तो ओजस्वी सुरात सांगतो,
शत्रूच्या खड्या समशेरी
वांकती पुणे दरबारी
पेशवे मऱ्हाटी स्वारी
तळपती तिखट तल्वारी
मऱ्हाटमोळ्या पेशव्यांच्या दरबारात इंग्रज, हैदर, मोगल, पोर्तुगीज, निजाम असे वेगवेगळ्या खंडात पराक्रम गाजविणारे, मी मी म्हणणारे शत्रू दचकून उभे राहात. याचाच दाखला देताना कवी अभिमानाने सांगतो, ‘अरे, दुनिया ज्याला वाघ म्हणत घाबरते, तो म्हैसूरचा वाघ टिपू सुलतान पाहा. मराठ्यांचे सैन्याची चाहूल लागताच चौखूर सैरावैरा पळू लागला. मराठ्यांच्या तळपत्या तलवारीचा सामना करण्याची हिंमत पण त्याच्यात नव्हती. कारण मराठ्यांच्या यशाचा चौघडे दाही दिशेस झडत होते. एकाहून एक सरस सरदार पैजेचे विडे उचलत होते अन् विजयी होऊन परतत होते. कवीच्या या उक्तीत अतिशयोक्ती तिळमात्र नव्हती. त्याच वेळी इंग्रजी सत्तेचे वर्णन करताना तो सांगतो-
इंग्रजी बावटा धीट
पाहा, थरथरत
ऐकतो भेरी
तळपती तिखट तल्वारी
किती कमी, किती सकस अन् परिपूर्ण वर्णन आहे हे ! इंग्रजी साम्राज्य अजून विस्तारले नाही, पण त्यांचा धीटपणा अन् हिंमत वरील दोन शब्दांत कवीने अचूक पकडली. मूठभर इंग्रज ज्या हिकमतीने वावरत त्यांचे कौतुक शिवकालीन इतिहासकारांनीसुद्धा अधोरेखित केलेले आहे. तो धीट बावटासुद्धा पेशव्यांची रणभेरी ऐकून थरथर कापत होता.
कवी पुढे सांगतो, ‘पुण्यातील रणरंग नवनव्या मोहिमा फत्ते करण्यात दंग होते. त्यांचे जाणे-येणे अन् यशाच्या झडणाऱ्या ललकाऱ्या या पुण्यात घुमत होत्या.
दिल्लीचे मोठमोठे सरदार, इतकेच कशाला खुद्द बादशाह पुण्याच्या पराक्रमापुढे अदबीने झुकत होता. कारण भीमथडीवर जमलेले मावळे आता मूठभर नाही तर लाखो होते. ते गरीब बिचारे राहिले नव्हते, तर खंद्या घोड्यावर स्वार होऊन तयार होते. आदेश होताच क्षणात भीमथडीवरून नर्मदा पार करत गंगथडीला लीलया पोचत. त्यामुळेच कवी अभिमानाने सांगतो,
केवढी! पुण्याची भीती
पाहा, कापती
चळचळा वैरी
तळपती तिखट तल्वारी ।
कवीने केलेले तत्कालीन पुण्याचे हे वर्णन कपोलकल्पित नव्हते हेच इतिहासाच्या पानोपानी सापडते.
कवीची प्रस्तुत कविता अत्यंत कमी शब्दांत पण संपूर्ण सार सांगणारी आहे. एवढ्या मोजक्या शब्दांत इतके सारे सांगायला निव्वळ शब्दांची ओळख असून भागत नाही, तर इतिहासाचे अचूक मर्म ओळखता यायला हवे. जे कवीला सहज साधले आहे.
ज्याकाळात कविवी ही कविता करत होता त्याकाळी पारतंत्र्यामुळे लोकांत एकप्रकारचे दास्य भाव, मालिन्य आले होते. ते दूर सारण्याचा प्रयोग कवीने केलेला दिसतो. त्यामुळे या कवितेचे मोल आणखी वाढते. शिवाय मराठ्यांच्या महापराक्रमी इतिहासाचे विस्मरण होण्याच्या या काळात ही कविता विशेषत्वाने मोलाची ठरते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.