मोगऱ्यांची मराठी रसिकास प्रार्थना!

Mogryahchi fule poetry
Mogryahchi fule poetryesakal

गंगाधर रामचंद्र मोगरे (१८५७ ते १९१५) यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील शिरगावचा... एलफिन्स्टन हायस्कूलमधून त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. रॉयल एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयात त्यांनी दीर्घकाल चाकरी केली.

विद्यार्थीदशेपासूनच कवीला काव्य लेखनाचा छंद जडला. मनोरंजन, इंदुप्रकाश, विविध ज्ञानविस्तार आदी नियतकालिकांतून त्यांचे काव्य प्रकाशित होत असे. कवीची बहुतेक कविता ‘मोगऱ्यांची फुले’ या पाच गुच्छांत विस्तारलेली आहे. कवीची काव्यरचना दीर्घ स्वरूपाची असून, मुख्यत्वे आर्या वृत्तात आहे. (saptarang latest marathi article by dr neeraj deo on mogryachi Phule marathi poetry nashik news)

Mogryahchi fule poetry
अन्यायकारक तफावत

कवीचे काव्य विपुल प्रमाणात असून, त्यात कित्येक विलापिका आहेत. विष्णुशास्त्री चिपळूणकर, दयानंद सरस्वती, तुकोजीराव होळकर, जियाजीराव शिंदे आदी भारतीय नेत्यांसोबतच लॉर्ड रिपनसारख्या इंग्लिश अधिकाऱ्यावरसुद्धा त्यांनी विलापिका लिहिल्या आहेत.

या साऱ्या सुबोध असून, त्यात सादर गुणग्राहकता असली, तरी तीत उत्कट भावनांची धार नाही. विलापिकात मृत्यूविषयक चिंतन नि मृत्योपरांत चिरंतन ध्येयाचा उद्‍घोष असावा, तो मोगऱ्यांच्या विलापिकात आढळत नाही, असा बहुतेक समीक्षकांचा अभिप्राय आहे.

विलापिकांपेक्षा उपहासिका मोगऱ्यांनी सरसपणे हाताळल्यात, असेच त्यांचे मत आहे. उपहासिका प्रासंगिक असतात, त्या केवळ त्याच विविक्षित काळात हास्यप्रचूर ठरतात. नंतर मात्र त्यांचे मूल्य नि अर्थ हरवून बसतो.

त्यामुळेच मराठी उपहासास काव्याचा जनक संबोधले जात असतानाही कवीची उपहासात्मक काव्ये प्रासंगिकता हरवून बसली, याला काही प्रमाणात अपवाद ठरावी अशी ‘पदवीचा पाडवा’ ही कवीची उपहासिका आहे.

Mogryahchi fule poetry
‘वळण’दार ‘श्री’गणेशा

कवीच्या कविता वाचताना त्यात कितीतरी काव्ये तत्कालीन ब्रिटिश शासकावर रचलेली दिसून येतात. विजयिनी विजयाष्टक वाचताना आरंभीच कवी जेव्हा व्हिक्टोरिया राणीचे गुणवर्णन करताना

प्रेमे पाळुनियां प्रजा विसरवी जी रामराज्यस्मृती,
धर्मन्याय युधिष्ठिरासम घरी दारी जिच्या राबती
केला लोक अशोक शोक हरुनी जीने अशोकापरी
ती राणी विजया निरंतर करो साम्राज्य पृथ्वीवरी


अशा पंक्ती रचतो, तेव्हा देशभक्त रसिकाचे हृदय पोळून उठते. तितक्यात रसिकाला सिकंदराच्या हिंदुस्थानवरील स्वारी या कवितेतील, त्याच्या राज्यात जन्मलेल्या परांगदा भारतीयाचे सिकंदराला भारतावर स्वारी करण्यापासून परावृत्त करणारे,

पुत्री जीच्या रिपूंचा समद पळविला संगरी दूर धीर

हे उद्गार दिसतात. तेव्हा कवीच्या या प्रासंगिक काव्यात उत्कट भावनांचा शोष का आहे? त्याचे कारण कळते. तितक्यात सह्याद्री कवितेत सह्याद्रीला पाहून त्याचे सौंदर्य न्याहळता न्याहळता कवीला शिवरायांचे स्वराज्य दिसू लागते नि पाठोपाठ त्याचा विलयही दिसू लागतो नि हळहळून कवी सांगतो-

सह्याद्रे! तुज पाहुनी प्रथम जो आनंद झाला मला
त्याचा एकही लेश यावरी नसे चित्तांत ह्या राहिला
आतां राहुनियां इथे असुखचि होणार आहे मला
दुःखे यास्तव आज सोडुनि तुला ही चालली कल्पना ।।


‘पारतंत्र्यात खितपत पडलेला सह्याद्री पाहून त्याला सोडून निघालेली कवीची कल्पना कवीच्या प्रच्छन्न देशभक्तीचा प्रकट पुरावाच आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कवीचे प्रस्तुत काव्य वाचताना त्यात उत्कट भावना नाहीत, हे म्हणण्याची कोणाचीही प्राज्ञा होणार नाही.

Mogryahchi fule poetry
एक होता पार्टनर...

मराठी स्वराज्याइतकेच कवीचे मराठी भाषेवर प्रेम आहे. त्यामुळेच मोगऱ्याची फुले गुच्छ २ चे प्रास्ताविकात तो प्रार्थितो,

स्वशिरी विस्ताराचा घेउनियां भार आपला बाळ
सेवेंतचि मराठी भाषेच्या नित्य घालवो काळ

हे पोकळ शब्द नव्हते, तर एका ग्रंथालयात सामान्य कारकून म्हणून तुटकीफुटकी वाङ्ममयसेवा करीत कवीने केलेल्या साहित्यसेवेचा हा उद्गार होता. कवीच्या उदयकाळी सर्वत्र इंग्रजीचाच बडीवार माजलेला होता. मराठी मृतभाषा होते की काय? असे थोरमोठ्यांना वाटू लागले होते. म्हणूनच कवी पुसतो-

अस्तित्वावर तुमच्या भाषेच्या जो चहुंकडूनिं घाला
पडला संप्रति आहे कोण तुम्हांविण निवारिता त्याला?


कवीच्या या प्रश्नात काय चुकीचे आहे? स्वभाषेवर हल्ला होतो, तेव्हा त्याचे निवारण त्या-त्या भाषिकाला स्वतःलाच करावे लागते. मँगो, बनाना, सेफ, सलाद, मार्केटसारखे परभाषी शब्द जर एखादा मराठी भाषिक वापरत असेल, तर त्याचे निवारण एखादी राजसत्ता कशी काय करू शकेल? कवी सांगतो, लोक म्हणतात हिंदी मधुमधुरा, ऊर्दू नटवी, गुजराथी मुग्धा, कानडी कलावती, तेलगू ललिता तर बंगाली वैचित्र्याने नटलेली आहे नि मराठीत हे गुण नाहीत अन् त्याचवेळी इंग्रजी

मी लाडकी नृपाची, हो मज सांगेल कोण माघारी?
ऐसें म्हणुनीं दारें अडवून बैसली इंग्रजी सारी

असे म्हणत सर्व संपदा अडवून बसलेली आहे, या ओळी वाचताना विचक्षण वाचकाला माधव ज्युलियनांच्या कवितेतील

जरी पञ्चखण्डातही मान्यता घे
स्वसत्ताबळे श्रीमती इंग्रजी,


या पंक्तीची हटकून आठवण झाली असेल म्हणजे मोगरे ते ज्युलियन दरम्यानच्या कवींना पडलेला प्रश्न समान होता. मोगरे पुढे सांगतात, की हिची वाढ नृपसत्तेने नाही, तर भक्तीने झाली आहे. ही कोणाच्या गळ्यात पडून नाही तर शुद्ध गुणांनी मोठी झाली आहे.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Mogryahchi fule poetry
किशोरदांच्या जगण्याची गोष्ट


कवीच्या काळी मराठीत लिहिणे हीन दर्जाचे मानले जात होते. नवीन साहित्यच निपजले नाही, तर भाषा कशी काय तगणार? म्हणून ‘मराठी ग्रंथकारांस प्रार्थना’ या कवितेत तो पुसतो,

म्हणतात जे ‘मराठी भाषा होणार ही असे नष्ट;
मिळणार काय करुनी व्यर्थ हिला वांचवावया कष्ट?’


जर माता मरणासन्न असेल, तर मुलाने तिला वाचविण्यासाठी औषधीपण देऊ नये काय? नक्कीच द्यावीत. मातेपेक्षाही भाषा श्रेष्ठ आहे, मोठी आहे. माता केवळ जन्मच देते. मात्र भाषा जीवनभर सर्व व्यवहार चालविते. माता बालपणीच बालकाचे रक्षण करते. पण भाषा एक पळही त्याला सोडत नाही. जिचे आपल्यावर इतके उपकार आहेत, त्या मातृभाषेची उपेक्षा करणे उचित नाही. त्यामुळेच ग्रंथकारांना साद घालताना तो भावनिक आवाहन करतो-

ज्यांच्या पराक्रमांची आनंदे गातसां तुम्ही गाणीं,
त्या शूर पूर्वजांची तुमच्या ही चालली लया वाणी ।


केवळ त्यांचेच नाही, तुमचेही स्वत्व नि अस्मिता तुम्हाला राखावयाची असेल, तर भाषेला सहाय्याचा हात देणे तुमचे परम कर्तव्य आहे. तुम्ही तुमची बुद्धी, प्रतिभा वापरून स्वभाषेत लिखाण कराल, तर आपोआप तुमची मातृभाषा अद्ययावत होत समृद्ध होत जाईल. खिन्न, उदास न होता तुम्ही हरतऱ्हेने प्रयास करा नि मग पाहा,

क्षयरोगमुक्त अंती तुमची होऊन देशभाषा ही
तुमच्या भव्य यशाने भरुन टाकील हो दिशा दाही


कवीचा हा विश्वास स्वानुभवावर आधारित होता, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण कवीच्या आरंभीच्या काळात मराठीची जी उपेक्षा होत होती, ती कमी होऊन कवीच्या अंतिम काळापावेतो मराठीचा लक्षणीय विकास झाला होता.

Mogryahchi fule poetry
शिवकालीन ग्राम निधी

रसिका! ही कविता कवीने सुमारे सव्वाशे-दीडशे वर्षांपूर्वी लिहिली. ज्यावेळी विदेशी इंग्रजांचे राज्य जोरावर होते. त्याकाळची परवशता समजण्याजोगी होती पण आज? स्वातंत्र्यानंतर सुमारे पंचाहत्तर वर्षांनंतर मराठी राजभाषा म्हणून सन्मानिल्या गेल्यानंतर मराठीची आजची अवस्था काय आहे?

महाराष्ट्रात मराठी शाळा दुर्लभ होताहेत, मराठीशिवाय अन्य भाषा न येणारे पालक कर्ज काढून मुलांना इंग्रजी शाळेत धाडताहेत. मराठी घरात, महाराष्ट्रात जन्मलेल्या सुशिक्षित म्हणविणाऱ्या नव्या पिढीला मातृभाषा मराठीच समजत नाही.

मराठीतील संख्यावाचक आकडे कळत नाहीत, सतरा नि सत्तरचा भेद समजत नाही आणि इंग्रजी आकड्यात मात्र चटकन कळतो. लिहिताना धेडगुजरी रोमन लिपी सोपी वाटते नि शास्त्रशुद्ध देवनागरी कठीण वाटते. लहान लहान कोवळ्या बालकांना, ज्यांनी अजून शाळाही पाहिलेली नाही.

आंबा, केळी ही नावंही कळत नाहीत, त्यांना मँगो, बनाना पटकन कळतात. खरं सांगायचे, तर महाराष्ट्रात राहताना, महाराष्ट्राचे खाताना, मराठीची मात्र लाज वाटते. अशा काळात उपरोक्त कवितेचे मोल मराठी भाषकांसाठी नि ग्रंथकारांसाठी किती प्रासंगिक आहे, हे सांगायचीही आवश्यकता नाही.
(लेखक प्रख्यात मनोचिकित्सक आहेत.)

Mogryahchi fule poetry
हास्याचा झरा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com