सह्याद्रीचा माथा : ''एमडी''मुळे धर्मनगरी बनतेय ''उडता नाशिक''

नाशिकची ओळख अधिक समृद्ध करायची की ''उडता नाशिक'' ही नवी ओळख नाशिकला द्यायची, याची जबाबदारी कुणाला तरी घ्यावी लागणार आहे...
Dr. Rahul Ranalkar
Dr. Rahul Ranalkaresakal

बरोबर सात वर्षांपूर्वी ''उडता पंजाब'' या सिनेमानं अनेक संवेदनशील मनांना हादरे दिले होते. या सिनेमात पंजाबला कशारितीनं ड्रग्जनं घेरलंय, याची भीषणता दर्शवली होती. त्यानंतर ड्रग्जच्या संदर्भात ''उडता पंजाब'' जणू मापदंड बनला.

गेल्या काही दिवसांत नाशिकचं नाव ड्रग्जच्या अनुषंगानं देशपातळीवर चर्चेत आलं. वास्तविक नाशिक भोवतीचं वलय वेगळं आहे. नाशिकची ओळख कुंभमेळ्यामुळे आहे, प्रभू रामचंद्रांचा सहकुटुंब सहवास या परिसरात झाला.

गोदावरी, पंचवटी, रामतीर्थ, त्र्यंबकेश्वर, आदिशक्ती सप्तश्रृंग ही नाशिकची खरी ओळख. द्राक्ष, कांदा या दोन्हींमुळे नाशिक आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले.

आता नाशिकची ओळख हीच राहू देत अधिक समृद्ध करायची की ''उडता नाशिक'' ही नवी ओळख नाशिकला द्यायची, याची जबाबदारी कुणाला तरी घ्यावी लागणार आहे... (saptarang latest marathi article by dr rahul ranalkar on MD Drug Crime Case rise in nashik)

नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. देशभरातील लाखो साधुसंत नाशिक नगरीत दाखल होतात. कुंभमेळ्याच्या काळात साधुंची ओळख असलेल्या गांजा-चिलीममुळे साधुग्राममध्ये घमघमाट पसरलेला असतो.

पण अगदी तोलामापाच्या भाषेत बोलायचं झाल्यास गांजापेक्षा एमडी अर्थात मेफोड्रीन हे ड्रग्ज शंभर पटीनं भयानक आहे. याचा अर्थ गांजाचं समर्थन केलं असा अजिबात घेऊ नये. एमडीची भयानकता दर्शवण्यासाठी ही तुलना आवश्यक वाटली.

एमडीच्या आहारी गेलेले तरुण-तरुणी या सेवनासाठी कुठल्याही स्तरावर जाण्यास तयार होतात. तरुणींचा उल्लेख यासाठी केला आहे, की तस्करी करणारे पुरवठादार आणि दलाल हे जरी बहुतांश पुरुष असले तरी असंख्य महाविद्यालयीन तरुणींना एमडीच्या अंमलाखाली ओढण्यात आलं आहे. 

वस्तुतः ड्रग्जची तस्करी हा प्रचंड महाकाय अशा आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा भाग आहे. पंजाबला ड्रग्जच्या अंमलाखाली का आणण्यात आलं? अनेक कारणांपैकी सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे पंजाबला आतून पोकळ बनविणं हा होता.

शत्रू राष्ट्राला भारतीय सैन्य दलांची ताकद कमी करायची होती. शीख बटालियन आणि शीख लाईट इंफ्रन्ट्री हे भारतीय सैन्याचा कणा आहेत. हा कणा मोडून काढण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आलं.

शीख बटालियन आणि इंफ्रन्ट्रीला नव्या दमाचे सैनिक मिळू नयेत, पंजाबी कुटुंबांमध्ये रुजलेली सैन्यात भरती होण्याची परंपरा खंडीत व्हावी यासाठी या गोष्टी रचल्या गेल्या. सध्याच्या परिस्थितीत पंजाबमधील ड्रग्जची व्याप्ती अत्यंत गंभीर वळणावर आहे.      

Dr. Rahul Ranalkar
धर्म आणि लुईस गावाचं नातं

महाराष्ट्राचा विचार करता मुंबई आणि पुण्यात ड्रग्जचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. देशाची आर्थिक राजधानी आणि देशाच्या शिक्षण पंढरीला खिळखिळी करण्याचा हा उद्योग आहे.

त्या पाठोपाठ जर नाशिकपर्यंत धागेदोरे अधिक घट्ट होत असतील, तर ही धोक्याची घंटा वेळीच ओळखायला हवी. नाशिकमधील अनेक क्षेत्रातील बड्या व्यक्ती या रॅकेटमध्ये असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नाशिक पोलीस आणि सगळ्या संबंधित यंत्रणा त्या दृष्टिने कार्यान्वीत झालेल्या आहेत. कदाचित पुढच्या काही दिवसांत अजून धक्कादायक खुलासे आणि नावं समोर येतील. मात्र आता हे संपूर्ण रॅकेट उदध्वस्त करण्याची वेळ आलेली आहे.

नाशिकमधील आणि उत्तर महाराष्ट्रातील युवा पिढी जर ड्रग्ज सेवनाच्या आहारी जात असेल, तर ती समाजासाठी मोठी शोकांतिका आहे. सर्व स्तरातील जाणत्या लोकांनी पुढाकार घेऊन पोलीस प्रशासनासह सर्व यंत्रणांना वेळीच मदत करायला हवी.

एनजीओंच्या माध्यमातून जागरुक जनतेनं या कामात उतरायला हवं, अन्यथा वेळ निघून गेलेली असेल अन् नाशिकला ''उडता नाशिक'' म्हणून नवी ''कलंकित'' ओळख मिळालेली असेल.

हे होऊ द्यायचं नसल्यास सजग जनतेनं वेळीच सक्रिय होण्याची गरज आहे. हे करत असताना सज्जन शक्तींचं एकत्रिकरण झाल्याशिवाय दुर्जनांशी लढा देता येणार नाही, ही गोष्टही ध्यानात घ्यायला हवी...

Dr. Rahul Ranalkar
वैद्यकीय सेवेचा वसा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com