

लेखक : राजाराम पानगव्हाणे
बँकिंग प्रणाली हा जगभर परवलीचा शब्द सध्या बनलेला आहे. बँका कशा सुरु झाल्या, हा शब्द कसा आला. बँकांचा आणि अर्थव्यवस्थांचा अनन्यसाधारण असा संबंध आहे. जगातील अर्थव्यवस्थांच्या सध्याच्या सुदृढीकरणासाठी बँकांचे मोठे योगदान आहे. इतिहासाचा मागोवा घेतल्याशिवाय भविष्यातील वाटचाल सुकर होऊ शकत नाही, म्हणूनच बँकांच्या संदर्भातील विषयावर टाकलेला हा दृष्टिकोन गरजेचा ठरतो...
(saptarang latest marathi article by rajaram pangavhane on Development of banks development of economy nashik news)
भारत हा एक विकसनशील देश आहे. प्रामुख्याने शेतीवर आधारित असलेल्या आपल्या अर्थव्यवस्थेत आता हळुहळू इतर क्षेत्रांचे आर्थिक योगदान वाढत आहे. देशातील नागरिक आर्थिकदृष्ट्या साक्षर झाली आहेत.
यामध्ये बँकिंग क्षेत्राचे मोठे योगदान आहे. देशाच्या खेडोपाड्यात पोहोचलेल्या बँकांच्या जाळ्यामुळे जनतेला आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यात यश मिळाले आहे. एकूणच काय तर इटालियन मूळ असलेला बँक हा शब्द आता भारतातील घराघरांत पोहोचलेला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे बँक मानले जाते.
देशातील वित्तीय क्षेत्रातून जवळपास ७० टक्क्यांहून अधिक निधी या माध्यमातून प्रवाहित होत असतो. देशातील वित्तीय क्षेत्राचा हा सर्वांत आघाडीचा भाग आहे. बँक म्हणजे काय? संकल्पना कशी अस्तित्वात आली? बरं ही अस्तित्वात येण्याच्या अगोदर लोकांचे आर्थिक व्यवहार होत नव्हते का?असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात.
जगात पैशांच्या देवाणघेवाणीचे व्यवहार फार पूर्वीपासून चालू आहेत. पूर्वी लोक अन्नधान्य सोन्या-चांदीच्या वस्तू किंवा इतर किमती वस्तू सोनार किंवा सावकार यांच्याकडे ठेवून त्या मोबदल्यात पैसे घेत असत. आता हे बहुतांश व्यवहार बँकेच्या माध्यमातून होत असतात.
बँकिंगचे मूळ पुरातन काळापासून चालत आलेल्या सावकारी व नाण्यांची अदलाबदल तथा सराफी या व्यवसायात आढळते. भारतातही या व्यवसायातूनच पतपेढ्यांची निर्मिती झाली. या पेढ्या पाश्चिमात्य पद्धतीचे बँकिंग येईपर्यंत भारतीयांच्या बँकिंग व्यवहाराचे एकमेव साधन होत्या.
बॅबिलियनमध्ये देवस्थाने कर्ज, व्यवहार करत असत. तसेच खरेदी विक्रीसाठी व्यापारी आवश्यक प्रकारचे अधिकोषीय व्यवहार करत असे. बॅबिलियनमध्ये इगीबी बँक प्रसिद्ध होती. इटालियन भाषेतील बँका या शब्दावरून बँक शब्दाची उत्पत्ती झाली, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
तसेच जर्मन भाषेमध्ये याचा अर्थ संयुक्त उपक्रम असा देखील होतो. बँक याचा अर्थ काउंटर असा देखील मानला जातो. बँक हा शब्द सर्वसाधारणपणे ११५७ मध्ये पहिल्यांदा वापरला गेला, असे संदर्भ सापडतात. बँकेला मराठी भाषेत अधिकोष असे म्हटले जाते.
अधिकोषाचा अर्थ मोठे भांडार किंवा मोठा कोश असा होतो. जिथे सामान्य जनता आपले अधिकचे पैसे साठवू शकते. देशाच्या अर्थव्यवस्थेत बँकांना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. बँक ही एक वित्तीय संस्था आहे. याद्वारे जनतेचे पैसे जमा करणे, त्यांना कर्ज रक्कम देणे, आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करुन देणे अशी प्रमुख आर्थिक कामे केली जातात.
बँकेची सर्वसामान्य व्याख्या अशी करता येईल, की जिथून पैशांची देवाण-घेवाण करता येते, अशी संस्था म्हणजे बँक होय. तसेच ज्या संस्थेकडून व्यवसाय करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना पैसे दिले जातात तसेच अधिकची रक्कम उपलब्ध होते त्याला बँक म्हणता येईल.
सध्याच्या युगात आर्थिक विकास साधत असताना यामध्ये बँकांची भूमिका फार महत्त्वाची आहे. ग्रीक इतिहासात अधिकोष म्हणजे असे ठिकाण जिथे पैशांची अदलाबदल केली जाते. अर्थशास्त्रात बँकेला मनी लेंडर असेही संबोधले जाते. बँकेमधून पैशांचे स्थलांतर होत असते, असे वर्णन अर्थशास्त्रात आढळते. प्राचीन काळापासून बँकांची व्याख्या विविध विचारवंतांनी केल्या आहेत.
हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस
चौदाव्या शतकात देवस्थाने, सार्वजनिक संस्था, खाजगी संस्था, वित्तीय व्यवहार करीत असे. विशेषतः ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे व नाण्यांचा कस पाहणे ही कामे सराफ मंडळी शहरा शहरांत करत असत. सोने तथा चांदीची नाणी यांची हलवा हलवी टाळण्यासाठी स्थानिक पातळीवर पत व्यवहार केला जायचा.
या व्यवसायाचे अनुकरण रोम व इजिप्तमध्ये केले गेले. रोमन कायद्यान्वये बँकेत पैशांचा भरणा करून कर्जाची परतफेड करण्यास मान्यता देण्यात आली. या व्यवहाराची नोंद करण्यासाठी अधिकारी नेमले जात.
रोमन साम्राज्याच्या पडत्या काळात व्यापार व बँकिंग या दोघांचेही मोठे नुकसान झाले. मध्ययुगीन काळात बँकिंगचा उदय बाराव्या शतकात इटलीमध्ये मोठमोठ्या शहरांमधून झाल्याचे आढळते. बाकासारख्या टेबलामागे बसून व्यवहार होत असत.
तेथूनच बँकर हा शब्द बँकेरियस यावरून आला असावा, असेही मानले जाते. बँकिंगच्या उत्क्रांती बद्दलची माहिती मोठ्या प्रमाणात १४व्या शतकापासून उपलब्ध आहे. मध्ययुगीन युरोपमध्ये बँकेच्या ठेवीमधील पैसे हस्तांतरित करण्यासाठी ऋणकोनी साक्षीदारांच्या समक्ष बँकेला तोंडी आदेश द्यावा लागेल व त्याला धनकोची मान्यता आवश्यक असेल, असा नियम होता.
तेरावा शतकात ऋणकोच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या आदेशात व्यवहारासाठी उपयोगात आणण्याची प्रथा सुरू झाली. सोळाव्या शतकात जत्रा स्थानी मालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार, व्यापारांमध्ये पैशांची देवघेव न करता बँकरच्या खाते वही त्याच्या नोंदीद्वारे होत असे.
जत्रा समाप्तीवेळी त्याच्या या नोंदीची वजाबाकी होऊन जे देणे शिल्लक राहील ते रोखीने किंवा पुढील जत्रेला वटविले जाईल, असे मानले जात असे. येणाऱ्या हुंडीला हुंडीने व्यापारी फेडत असत.
आधुनिक व्यापारी बँकिंगचे खरे जनक बार्सिलोना शहरातील बँकर होय. ठेवी स्वीकारत त्या ठेवींचा उपयोग ठेवीदारांना आपले देणे भागवण्यासाठी बँकरच्या खातेवाईक नोंदी करून करता येई. हे व्यवहार धनकोच्या समक्ष करावे, असा नियम होता.
युरोपमध्ये सार्वजनिक बँक प्रस्थापित करण्याबद्दल १३५६ पासून विविध योजना होत्या. परंतु १५०० च्या अखेरपर्यंत त्यांना पक्के मूर्त स्वरूप येऊ शकले नाही. व्हेनिसमध्ये बँक स्थापन झाली. या बँकेच्या माध्यमातून ठेवीची रक्कम हस्तांतरित करणे, हुंड्या वटवणे ही कार्य होत असे.
परंतु तेव्हा कर्ज देण्यास मनाई होती. त्यामुळे उत्पन्न नसल्याने ती ठेवींवर व्याज देत नसे. हे सर्व कार्य या बँकेच्या माध्यमातून विनामूल्य होत असे. बँकेचा खर्च सरकारी उत्पन्नातून भागवण्यात येई. पुढे पुढे बँकेने मुख्यत्वे सरकारला कर्ज देण्यास सुरुवात केली.
त्यातून बँका अडचणीत येऊ लागल्या. कालांतराने तत्कालीन बँका हळुहळू टप्प्याटप्प्याने सुधारित अवस्थेत पोहोचल्या. सतराव्या शतकापासून बँकिंगची उत्क्रांती वेगाने होऊ लागली. विशेषतः इंग्लंड व अमेरिका या देशात बँकांच्या कार्यपद्धतीचा प्रचार व प्रसार ब्रिटिश साम्राज्यांतर्गत झाला.
युरोपात प्रत्येक देशात परंपरेप्रमाणे समस्यांप्रमाणे बँकिंगच्या कार्यपद्धतीत बदल होत गेला. विशेषतः साम्यवादी देशांमध्ये बँका व वित्तीय संस्था यंत्रणाला एक वेगळे स्वरूप प्राप्त झाले. त्याचप्रमाणे अमेरिकेतही या यंत्रणेचे स्वरूप व कार्यपद्धती वैशिष्ट्यपूर्ण आहे. ज्या देशात बँकिंग व्यवसाय विसाव्या शतकाच्या अगोदर अस्तित्वात आला.
तेथे दोन गोष्टी प्रामुख्याने आढळून येतात. एक म्हणजे सुरुवातीच्या काळात बँका स्वतःच्या नोटा काढत. दुसरी म्हणजे मध्यवर्ती बँक बँकिंगमध्ये अगदीच बाल्यावस्थेत होती. पूर्ण संकल्पना अस्तित्वात येण्यासाठी अनेक प्रकारच्या विविध स्तरावर अडचणी होत्या.
१८व्या शतकाच्या उत्तरार्ध मध्यवर्ती बँकिंगचे स्वरूप स्पष्ट होऊ लागले. तरीदेखील बँकांच्या पूर्ण विकासाच्या इतिहासात इंग्लंडमधील घटनांना विशेष स्थान दिले गेले आहे.
(लेखक हे ब्रम्हाव्हॅली शिक्षण समूह संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.