चंदनाच्या विठोबाची, पितृहृदयाची हळवी गाथा !

B. Raghunath
B. Raghunathesakal

भगवान रघुनाथ कुळकर्णी अर्थात बी. रघुनाथ (१९१३ ते १९५३) यांचा जन्म सातोना येथील. कवीचा जन्म नि आयुष्य निजामी राजवटीत गेलेले होते. तेथे मराठीस राजाश्रयही नव्हता नि पोषक वातावरणही नव्हते.

तरीही कवीने सुमारे दोन काव्यसंग्रह, पाच कथासंग्रह नि सात कादंबऱ्या लिहून मराठीचे दालन समृद्ध केले. केवळ वीस-पंचवीस वर्षांत कवीने साकारलेले वाङ्‍मय कर्तृत्व लख्खपणे दृष्टीत भरते. एवढी सारस्वत सेवा करूनही हा सारस्वत मराठी दालनात उपेक्षितच राहावा, हे दुर्दैव होय. (saptarang latest marathi article on marathi poet b raghunath bydr neeraj deo nashik news)

B. Raghunath
‘व्हेंटिलेटर’ ची अतिदक्षता

भगवान रघुनाथ कुळकर्णी अर्थात बी. रघुनाथ (१९१३ ते १९५३) यांचा जन्म सध्याच्या जालना जिल्ह्यातील सातोना येथील. कवींच्या जन्माच्या वेळी हे गाव परभणी जिल्ह्यात होते. कवी परभणीत सरकारी नोकरी करत असे.

कामावर असतानाच वयाच्या अवघ्या चाळिसाव्या वर्षी त्यांना मृत्यू आला. कवीचा जन्म नि आयुष्य निजामी राजवटीत गेलेले होते. तेथे मराठीस राजाश्रयही नव्हता नि पोषक वातावरणही नव्हते. कवीची घरची परिस्थिती हलाखीची होती, तरीही कवीने सुमारे दोन काव्यसंग्रह, पाच कथासंग्रह नि सात कादंबऱ्या लिहून मराठीचे दालन समृद्ध केले.

कवीने वयाच्या तेराव्या वर्षी काव्यरचनेस आरंभ केला नि वयाच्या चाळिसाव्या वर्षी जगाचा निरोप घेतला. ही बाब लक्षात घेतली तर केवळ वीस-पंचवीस वर्षांत कवीने साकारलेले वाङ्‍मय कर्तृत्व लख्खपणे दृष्टीत भरते.

एवढी सारस्वत सेवा करूनही हा सारस्वत मराठी दालनात उपेक्षितच राहावा, हे दुर्दैव होय. निधनोत्तर परभणी नगरात उभारलेले कवीचे स्मारक मराठी रसिकांची कृतज्ञताच दर्शवीत उभे आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

कवीने लिहिलेल्या सुमारे १५० कवितांतील अनेक कवितांनी रसिकमनाची पकड घेतलेली होती. ‘ते न तिने कधी ओळखले’ कवितेत कवी आपली प्रीत तिने ओळखली नाही, याची हळहळ व्यक्तविताना लिहितो,

दिले उशाला काळीज ठेवून

स्पंदनात पण ते दुखले

ते न तिने ओळखले ।

किती नेमक्या नि नेटक्या शब्दांत कवी आपली यातना उलगडतो. खरी यातना तर हीच, की त्याला आपले प्रेम शब्दांनी सांगावे लागते. त्यातही दुःख असे, की जिच्यासाठी जळतो तिलाच ते कळू नये. काळीज म्हणजे हृदय नि ते उशाला ठेवणे म्हणजे डोक्याजवळ ठेवणे. हृदयात उठणारे प्रेम नेणीवेतून अलगद उतरते.

B. Raghunath
परंपरागत धान्ये गेली कुठे ?

कवी तो डोक्याजवळ म्हणजे जाणिवेजवळ नेऊन ठेवतो. जाणीव जागी असते तेव्हा ती समाजाचा, भल्याबुऱ्याचा नको तितका विचार करते. त्यामुळेच असेल दुखणारे काळीज तिला कळालेच नाही. ते कळावे म्हणून तो चक्क काळजाच्या पायघड्या घालतो.

आज तिच्या वाटेवर अंतर

काट्यावरी अंथरले

ते न तिने ओळखले ।

तिला काटे टोचू नये, या प्रेमळ भावनेने त्याने त्याचे काळीज त्याने तिच्या पदपथावर अंथरले, पण हाय! तिला तरीही कळाले नाही. कदाचित, काटा न टोचल्याने अर्थात जगराहाटीची आंच न लागल्याने तिला याचे प्रेम कळलेच नसावे इतकी नाजूक, हळवी, संवेदनशील प्रेम कविता लिहिणाऱ्या कवीचे प्रांजळ मन जीवनमूल्यांविषयीपण तितकेच हळवे नि संवेदनशील आहे. त्यामुळेच जगात पसरलेली दांभिकता पाहून ‘आज कुणाला गावे’ कवितेत ते विचारते,

वेश स्वदेशी, घोष सभांतून

देव देखणे भुललो पाहून

वरवरचा परि शेंदूर तयांचा

कसले स्तवन म्हणावे?

‘देव देखणे’, ‘वरवरचा शेंदूर’ या शब्दांतून तो सारी दांभिकताच चव्हाट्यावर मांडतो. त्यामुळेच कोणाला गावे? कोणाचे स्तवन करावे? या कवीच्या प्रश्नाचे उत्तर सुजाण वाचकाच्या मुखातून अनाहूतपणे ‘कुणाचेच नाही!’ असेच येते.

या मूल्यहीनतेतून कवीच्या काव्यात उपरोध नि उपहास वाहू लागतो ‘ढवळ्यावरती फासा काळे’ सांगत याने कलीयुगाची कळी खुलली, असे कवी सांगतो तेव्हा नकळत ‘जैसा कली राजा झाला’ म्हणणाऱ्या समर्थोक्तीची याद येते.

अर्थात दोहोंचा भाव एक असला तरी व्यथेची पखरण वेगळी आहे. कवीला वाटते या जगाला सहज, सरळ करायचे असेल तर रक्त नि अस्थींचे सिंचन करीत जावे लागेल. तरीही कधी कधी त्याच्या मनात उदासीनता दाटून येते.

त्याचेच प्रतिबिंब कवीच्या ‘पुन्हा नभीच्या लाल कडा’ या काव्यमय शीर्षकाच्या सुबक कवितेत पडलेले दिसते. त्यात कवीकडून उदासीनता घेऊन चांदणे सावलीत झुरताना कवी पाहतो. यातील चांदणे मूलतः प्रसन्न असून सावली शीतल असते, पण कवीच आपली उदासीनता तेथे पेरून येतो, असा गहन अर्थ कवीने त्यात भरलेला दिसतो.

याशिवाय कवीच्या उन्हात बसली न्हात, कशाला मुखी पुन्हा तांबुल?, पानझड, मुद्रिका इत्यादी कविता सुंदर आहेत तर सांज ही सर्वांगसुंदर रचना आहे, असा समीक्षकांचा अभिप्राय आहे.

‘मुलीस आला राग’ नि ‘चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली’ या दोन कविता कन्येविषयी त्याच्या मनात असलेल्या प्रेमाची साक्ष देतात. यातील चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली, ही कविता आज आपण पाहू.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

B. Raghunath
प्रयोजनवादाची नवी पायाभरणी

कवितेचे शीर्षक काहीसे मोठे नि गद्य वाटत असले तरी वेधक आहे. कवितेची पार्श्वभूमी अशी आहे, की कवीची मुलगी मोठी होऊन सासरी गेलेली आहे. तिची इतर खेळणी हरवली आहेत; पण त्यातील एकच खेळणे चंदनाचा विठोबा तो केवळ विठोबा असल्याने टिकून राहीलाय. त्याला पाहून कवीला वाटते,

चंदनाच्या विठोबाची

माय गावा गेली

पंढरी या ओसरीची

आज ओस झाली

त्याची ती लहानगी मुलगी त्या विठोबाला न्हाऊ, पुसू घालायची, वास्तपुस्त करायची; पण तीच सासरी गेल्याने कवीला वाटते त्या चंदनी विठोबाची जणूकाही आईच गावाला गेली. ती जेव्हा असायची तेव्हा तिच्या गिलक्याने ओसरीवर पंढरी अवतरायची. पण आज तीच तेथे नसल्याने ती ओसरी ओस पडली.

लहान मुलं घरात वावरतात तेव्हा केव्हा ही एकदाची समजदार होऊन घरातील यांचा गलका कमी होईल, असे आई-वडिलांना वाटते. पाहता पाहता मुलं मोठी होऊन शिक्षण, नौकरी, विवाहामुळे दूर जातात तेव्हा सारे घर ओस वाटायला लागते.

तो नेमका भाग कवीने येथे साकारला आहे. नकळत उठून तो विठोबा असलेल्या कोनाड्याजवळ जातो. तेथे त्याला तिची जपलेली भातुकलीची काही खेळणीही पडलेली दिसतात तेव्हा त्याला वाटते,

कोनाड्यात उमडून

पडे घरकुल

आज सत्य कळो येई

दाटीमुटीतील

ते कोनाड्यात उमडून-दुमडून पडलेले घरकूल पाहून त्याला खऱ्या संसारातील सत्य उमजायला लागते. संसारातील सत्य म्हणजे सत्ता-संपत्ती नाही, समजदारी पण नाही, तर निखळ, निरागस, निष्पाप प्रेम हेच होय.

B. Raghunath
भैरप्पा एक जिवंत आख्यायिका!

तितक्यात, त्याचे लक्ष एका बोळक्याकडे जाते. कधीही हातात न घेतलेले ते रिकामे बोळके तो मायेने हातात घेतो. त्याच्या कन्येने बालपणी मायेने हाताळलेले ते बोळके हाताळताना जणूकाही कन्येच्या प्रेमळ स्पर्शाचीच अनुभूती त्याला होते.

काही दिसे भरलेले

रित्या बोळक्यात

गवसले आजवर

जे न रांजणांत

रसिका! किती आशयघन, अर्थसंपन्न ओळी आहेत या! रिकाम्या बोळक्यात त्याला काहीतरी भरलेले दिसते. किती गंमत आहे पाहा ! कवी ज्या बोळक्यांना रिकामे म्हणतो त्यातच काहीतरी भरलेले त्याला दिसते.

ती भरलेली गोष्ट म्हणजे आठवणींचा खजिना आहे. त्या आठवणी आर्द्र, हळव्या आहेत, शिवाय त्या कोणतीही भौतिक मागणी नसलेल्या अपेक्षारहित आहेत. त्यात केवळ मुलीच्या कल्याणाची निरपेक्ष कामना आहे.

काही घेण्याची नाही तर केवळ नि केवळ काहीतरी देण्याची भावना आहे अन् सर्वकाही दिल्यावरही ‘आपण तिला विशेष काही देऊ शकलो नाही’ची सलणारी खंत आहे. जीवनाचे खरे सार हेच आहे, हे लक्षात येताच रिकाम्या बोळक्यात जे दिसले ते रांजणातही नाही, याची जाणीव कवीला होते.

बोळके म्हणजे भातुकलीतील संसार तर रांजण म्हणजे खरा संसार किंवा असेही म्हणता येईल, की बोळके म्हणजे निष्काम हळवी भावना, तर रांजण म्हणजे शुष्क तत्त्वज्ञान होय. तत्त्वचिंतन निष्काम कर्माचा शुष्क संदेश देते, तर पित्याचा हळवा स्नेह निष्काम कर्म व्यवहारात उतरवतो. त्यामुळे ते रिते बोळके कवीच्या रित्या मनाला रिझवित जाते.

कवीची ही कविता वाचताना वाचकांना बींच्या ‘माझी कन्या’ या कवितेचे स्मरण होईल. पण ती कविता लहानग्या कन्येच्या बाळहट्टाला पिता कसा कौशल्याने हाताळतो ते दाखविते, शिवाय तीत कवीचा स्वानुभव नाही तर कल्पनाविलास आहे.

मात्र या कवितेत कवीचा स्वानुभव चितारलेला आहे, असे त्याच्या कन्येनेच सांगितलेले आहे. या कवितेत कन्या नसल्याचा जी व्यथा चित्रित केली ती एक प्रकारे कृतार्थ व्यथा आहे. कारण कन्या लग्न करून सासरी गेलेली आहे.

तेथे ती आईच्याच भूमिकेला पोचली आहे. त्यामुळे कवीला जबाबदारीतून पार पडल्याचा आनंदही आहे. तरीही तिची आठवण, तिचे लडीवाळ बाळपण त्याच्या मनात दाटून गर्दी करतात. त्याच्या या आठवणी दुःखाशी नाही तर गतकाळातील सुखाशी तादात्म्य पावणाऱ्या आहेत.

गतकाळात आठवणी जशा सुखद आहेत तशाच आताच्याही सुखदच आहेत. व्यथा फक्त जुन्या सुखद घटनांना कायमचे पकडून ठेवता येत नाही अन् ते स्वाभाविकही आहे, त्याची जाण कवीला असल्याने प्रस्तुत कविता मोहक बनते.

वाचक कविता वाचताना कवीच्या पितृहृदयाशी तादात्म्य पावतो. त्याचेही कन्येच्या आठवणीने व्यथित होणारे वा भविष्यात व्यथित होऊ शकणारे पितृहृदय कवीची तीच भावना त्याच्या मनात जागवित जाते. त्यामुळेच प्रस्तुत कविता केवळ कवीचा आत्मानुभव न राहता रसिकांच्या पितृहृदयाची हळवी गाथा बनते, असेच म्हणावे लागते.

B. Raghunath
मुलं फुलताना !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com