सह्याद्रीचा माथा : ‘जायकवाडी’साठी पाणीवाटप, दुष्काळ अन वास्तव!

Dr. Rahul Ranalkar
Dr. Rahul Ranalkaresakal

नाशिक- अहमदनगर विरुद्ध मराठवाडा असा पाणीसंघर्ष गेल्या कित्येक वर्षांपासून वेळोवेळी उफाळून येत आहे. गोदावरी उर्ध्व खोऱ्यातील या पाणीवाटपासंदर्भात नेमलेल्या एच. टी. मेंढेगिरी समितीने सुचविलेला समन्यायी पाणीवाटपाचा मुद्दा या वादाचे मूळ आहे.

या समितीच्या शिफारशी या कालबाह्य झाल्या असून, त्याचा दरवर्षी आढावा न घेता फक्त मराठवाड्याचा विचार करूनच आकडेवारी पुढे केली जाते आणि वस्तुस्थिती लपविली जाते, असा नाशिक- अहमदनगरकरांचा आक्षेप आहे.

‘जायकवाडी’तील साठा ६५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याने नाशिक- अहमदनगरमधून पाणी सोडले जावे, अशी मराठवाड्याची मागणी असते. यंदाच्या भीषण दुष्काळाने मेंढेगिरी समितीच्या निकषालाच छेद दिला आहे.

यंदा नाशिक जिल्ह्यातच दुष्काळी स्थिती असल्याने मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यात येऊ नये, अशा मागणी करीत नाशिककर सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात हा वाद आणखी चिघळणार, असे दिसते.

एकूणच, नाशिक असो किंवा खानदेश आपल्या वाट्याचे पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी लवकरात लवकर अडविणे, हाच यावर खरा तोडगा असू शकतो. (saptarang latest marathi article sahyadricha matha by dr rahul ranalkar on Water allocation for Jayakwadi dam drought and reality nashik jalgaon)

अवर्षणग्रस्त मराठवाड्यासाठी पिण्याचे पाणी व सिंचनाची व्यवस्था व्हावी आणि ‘गोदावरी’तील महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी अडविले जावे, यासाठी १९६५ मध्ये जायकवाडी धरणाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.

या धरणाच्या प्रथम प्रकल्प अहवालानुसार गोदावरीच्या उर्ध्व खोऱ्यातील विशाल कॅचमेंट एरिया गृहित धरण्यात आला होता. पश्चिम घाटावर मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने तो वाहून येऊन गोदावरी धरण भरेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता.

त्यासाठी पावसाच्या आकडेवारीचा गेल्या १५ वर्षांतील डाटा प्रमाण मानण्यात आला होता. पण, धरण पूर्ण होईपर्यंत पाऊस आणि गरजा यांचे वाढत गेलेले आणि व्यस्त झालेले प्रमाण मात्र कुणीही विचारात घेतले नाही.

नाशिक हा पावसाचा जिल्हा असला तरी तेथेही कधीतरी पाऊस दगा देऊ शकतो आणि दुष्काळ पडू शकतो, याचा नंतरच्या सर्व घडामोडींत विचार करण्यात आला नाही.

दुसरीकडे आपल्या हक्काचे; पण पश्चिमेकडे वाया जाणारे पाणी अडविण्याची आताच गरज आहे, हे धोरणकर्त्यांनी फारसे मनावर घेतले नाही. त्याचा फटका आता नाशिक- अहमदनगरसह मराठवाड्याला बसत आहे आणि त्यातून पाण्यासाठी संघर्ष उभा राहत आहे.

Dr. Rahul Ranalkar
संसदांच्या संसदेची वारी

गेल्या ५० वर्षांत नाशिक- अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगरचा विस्तार वाढला, लोकसंख्या वाढली, औद्योगीकरणामुळे पाण्याची गरज वाढली. दुसरीकडे पावसाचा अनियमितपणाही वाढला.

गोदावरी खोऱ्यात धरणांची निर्मिती झाली, त्यामुळे ‘जायकवाडी’त जाणारे पाणीही काही प्रमाणात अडविले गेले.

लोकसंख्या आणि गरज वाढत असताना पावसाचे प्रमाण कमी होत गेल्याने अहमदनगर- नाशिक विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष अधूनमधून उडू लागला होता, तेव्हाही राज्यकर्त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही.

त्यामुळे मूळ दुखण्यावर इलाज न झाल्याने ते वाढत गेले. यंदा तर नाशिक जिल्ह्यात भीषण दुष्काळ आहे. नाशिक आणि अहमदनगरमध्ये यंदा झालेल्या पावसापेक्षा मराठवाड्यात शेवटच्या टप्प्यात जास्त पाऊस झालेला आहे, ही स्थिती आहे.

असे असतानाही मराठवाड्याला पाणी सोडणे म्हणजे नाशिककरांवर अन्याय आहे, असे सांगत नाशिककरांनी तीव्र संताप व्यक्त करीत प्रसंगी जलसमाधी घेऊ; पण पाणी सोडू देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने संघर्ष उभा राहिला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अमृता पवार यांनी याप्रश्नी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर येत्या ५ डिसेंबरला सुनावणी होणार आहे, त्यानंतरच या प्रश्नावर तोडगा निघणार आहे.

Dr. Rahul Ranalkar
रोमँटिक व्हेनिस

उर्ध्व गोदावरीची श्रीमंती वाढवावी

गोदावरी खोऱ्यातील हक्काचे अप्पर वैतरणाचे पाणी मुंबईकरांना आयतेच दिले जाते. नाशिककरांच्या वाट्याचे हे पाणी जरी आपल्याला मिळाले तरी मराठवाडा विरुद्ध नाशिक- अहमदनगर हा संघर्ष उद्‌भवणार नाही.

दुसरे म्हणजे मुळात या खोऱ्यातील पाण्याची श्रीमंती वाढविण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे विशेषतः उर्ध्व गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी शासनस्तरावर विचाराधीन असलेल्या योजनांना गती देऊन या योजना प्राधान्याने पूर्ण करणे गरजेचे आहे.

खानदेशातही ‘तापी’चे मोठ्या प्रमाणात पाणी पश्चिमेकडे वाहून जाते. आपल्या हक्काचे हे पाणी अडविण्यासाठी आजपर्यंत आलेल्या अनेक सरकारांनी केवळ आश्वासने दिलीत; पण पाणी मात्र अडविले गेले नाही, ही खानदेशवासीयांची शोकांतिका आहे.

भविष्यात असाच संघर्ष तेथेही उद्‌भवू शकतो. यामुळे पश्चिम वाहिनी नद्यांचे वाहून जाणारे पाणी अडविणे, त्यावर सर्वमान्य तोडगा काढणे हेच शासनाचे आद्यकर्तव्य आहे.

नाशिककरांनी उपस्थित केलेले मुद्दे

- ‘जायकवाडी’च्या पाण्यासाठी असलेल्या मेंढेगिरी समितीचा आहवाल चुकीचा.

- दरवर्षी पावसाच्या स्थितीची समीक्षा करण्याचे का टाळले जाते?

- त्या- त्या वर्षाच्या स्थितीचा आढावा घेत पाण्याचे सूत्र ठरवावे.

- नाशिकपेक्षा मराठवाड्यात यंदा पाऊसमान चांगले आहे.

- यंदा नाशिकमध्येच भयाण दुष्काळ, तरीही ‘मेंढेगिरी’चा अहवालच प्रमाण कसा?

- मराठवाड्याच्या जनतेसाठी सरकारने आधीच नियोजन का केले नाही?

- यंदा दुष्काळाची शक्यता वर्तविण्यात आलेली असताना ‘जायकवाडी’तून मार्चमध्ये पाणी का सोडले

Dr. Rahul Ranalkar
लांबचे आणि जवळचे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com