
सह्याद्रीचा माथा : नद्यांचे पावित्र्य जपा, स्वच्छतेकडे गांभीर्याने पहा !
अध्यात्म हे केवळ कर्मकांडापुरतं मर्यादित न ठेवता त्याला शाश्वत कामांची जोड देऊन पर्यायानं नागरिक आणि शहराचा विकास साधण्याचा प्रयत्न ‘अविरल गोदावरी’ प्रकल्पाच्या माध्यमातून केला जात आहे.
मुळात एखाद्या शहराचं दीर्घकालीन भवितव्य, विकासात्मक चित्र हे त्या शहराचं पर्यावरण, तेथील स्वच्छता आणि त्या शहरातून वाहणाऱ्या नदीची स्वच्छता आणि पावित्र्य यावर अवलंबून असतं.
नेमका हाच धागा पकडून नाशकातून वाहणारी गोदावरी स्वच्छ आणि सुंदर कशी राहील याची काळजी प्रत्येक नागरिकानं घेत त्यासाठी यथायोग्य योगदान द्यायला हवं. आपली नदी स्वच्छ राखण्यासाठी समाजातील मान्यवरांचा अधिक प्रबळ दबावगट निर्माण व्हावा.
या गटानं याकामी पुढाकार घेत सक्रिय सहभाग नोंदवायला हवा. नाशिकमध्ये ‘अविरल गोदावरी’च्या माध्यमातून हे प्रयत्न होत आहेत. खानदेशातील धुळे, जळगाव, शहादा, सारंगखेडा, अमळनेर आदी ठिकाणीही असेच प्रयत्न व्हायला हवेत... (saptarang latest marathi article sahyadricha matha by dr rahul ranalkar Protect sanctity of rivers take cleanliness seriously nashik khandesh)

Shree M & Dr. Rajendrasingh
भारतातील अनेक प्राचीन शहरे आणि गावे ही नदीकाठी वसलेली आहेत. यामागे त्याकाळी पाण्याची सहज उपलब्धता हे होते. बहुतांश ऋषिमुनींनी देखील तपश्चर्येसाठी नद्यांकाठी असलेली गावंच निवडली आहेत.
नदी हीच मानवासाठी खरी जीवनदायिनी आहे, तिच्या उगमापासून ती सतत मानव जातीच्या कल्याणासाठी जणू झटत असते. मानवी जीवन बहरण्यासाठी नदीचं योगदान अतिशय मोलाचं असतं. नदीकाठी शेती फुलते तसेच पर्यावरणही बहरते.
पशूपक्ष्यांपासून एक जीवनसाखळी निर्माण होते, त्यातून पुढे मानवी जीवन समृद्ध होत जातं. यामुळेच नद्यांचं पावित्र्य जपणं आणि तिची स्वच्छता करणं हे मानवाचं मुलभूत कर्तव्य आहे.
वस्ती वाढत गेल्यानं नद्यांचं आकुंचन होत गेलं. नदीच्या पाण्याचा अमर्याद वापर होत गेला. तिच्यातील जीवनसाखळीचं मूळ असलेल्या वाळूचा अमर्याद उपसा होत गेला.
नदीमध्ये अनेक प्रकारचे दूषित पाणी सोडण्यात आलं आणि मुख्य म्हणजे ती सतत प्रवाहित राहिली पाहिजे, यासाठी पुरेशी दक्षता न घेतली गेल्यानं नद्यांना बकालपणा येऊ लागला. नद्या प्रदूषित होऊ लागल्या.
तिच्या निर्मल जलाचे पावित्र्य कमी होते की काय? अशी भीती सध्या निर्माण झालेली आहे. आज सर्वच नद्यांच्या बाबतीत कमी अधिक फरकानं ही स्थिती निर्माण झाली आहे.
नद्या लुप्त तर होणार नाहीत ना? अशी वेळ पुढच्या, अनेक पिढ्यांवर येऊ नये यासाठी सर्वांनी अग्रक्रमाने या संदर्भात दक्षता घ्यायला हवी.
नेमक्या याच हेतूनं आध्यात्मिक गुरू, समाजसुधारक श्री एम आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये अविरल गोदावरीसाठी विशेष प्रयत्न होणार आहेत.
अविरल गोदावरी मोहिमेत दोन्ही मान्यवर सहभागी होणार आहेत. त्र्यंबकेश्वरला स्वच्छ केलेल्या पुरातन कुंडांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम देखील होत आहे. यानिमित्तानं आपल्या प्रत्येकात आपल्या शहरातील नद्यांच्या स्वच्छतेबाबत जाणीव निर्माण व्हावी, त्यातून प्रत्येक शहरात नद्यांच्या स्वच्छतेची मोहीम सुरू झाली तर खूप मोठे कार्य उभं राहू शकतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नद्यांच्या स्वच्छतेबाबत प्रचंड सतर्क आहेत. मोदी यांनी नमामी गंगेच्या धर्तीवर नमामी गोदा हा उपक्रम नाशिककरांसाठी दिला आहे.
अशा प्रत्येक उपक्रमांना नागरिकांनी, समाजातील जाणत्या, जागरूक नागरिकांनी पाठबळ दिल्यास लोकांमध्येही आपोआपच जाणीव विस्तारत जाऊन तेही या कामात सहभागी होतील, अशी आशा करुया.
उत्तर महाराष्ट्राचा विचार करता नाशिकची गोदावरी, मालेगावची गिरणा-मोसम, धुळ्याची पांझरा, अमळनेरची बोरी, जळगावातून वाहणारी गिरणा, नंदुरबारची पाताळगंगा, शहाद्याची गोमाई, शिरपूरची अरूणावती आदी नद्यांबाबत निश्चितपणे गांभीर्याने विचार तिथल्या सजग नागरिकांना, लोकप्रतिनिधींना करावा लागणार आहे.
या शहरांमध्ये नागरिक पुढे आले तर खूप मोठं काम उभं राहू शकतं. धुळ्यातून वाहणाऱ्या पांझरा नदीला गतवैभव प्राप्त झाल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच पाण्याचा प्रश्न कायमचा सुटू शकेल.
मालेगावजवळून जाणारी गिरणा आणि शहरातून वाहणारी मोसम या दोन्ही नद्यांची स्वच्छता करणे अत्यंत गरजेचे आहे. मोसमला आलेले बकालपण दूर केल्यास ही नदी मालेगावची जीवनदायिनी नक्कीच बनू शकते.
शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यास हातभार लावू शकते, परिसरातील शेती फुलवू शकते. पण त्यासाठी समाजातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, पर्यावरणप्रेमी एकत्र येऊन पुढाकार घेतला पाहिजे.
शिरपूरची अरूणावती, शहाद्याची गोमाई, अमळनेरची बोरी आदी नद्यांचं असंच आक्रसणे सुरू राहिलं तर या नद्यांचं अस्तित्व नाहीस होईल, तो काळ फार दूर नाही. अन्यथा नद्यांचे नदीपण हरवून त्या ओसाड तरी होतील. ही वेळ येऊ द्यायची की नाही, हे सर्वस्वी आपल्या हाती आहे.
क्वालिटी सिटी मिशन
धर्मक्षेत्र असलेल्या नाशिकचा समावेश केंद्र सरकारच्या क्लालिटी सिटी मिशनमध्ये झालेला आहे. या निमित्तानं शहरातील मान्यवर व्यक्ती आणि संस्था एकत्रित आलेले आहेत. हे नाशिकसाठी निश्चितपणानं एक मोठं यश आहे.
क्वालिटी सिटीमध्ये देखील नदीचं अनन्यसाधारण असं स्थान आहे. कोणत्याही शहराची प्रगती, विकास हा तेथील पर्यावरण, नदीची स्वच्छता या गोष्टींवर अवलंबून असतो. पर्यावरण चांगलं असेल तरच शहराच्या लौकिकात भर पडते.
धार्मिकनगरी असल्याने नाशिकचं धार्मिक पर्यटन नदी स्वच्छतेमुळे अधिक बहरु शकतं. अन्य शहरांच्या ठिकाणी नद्यांची काळजी घेतली गेली तर एक नदी अनेक विहिरी जिवंत करू शकते.
पर्यायानं शेती फुलून मानवी जीवन सुखकर होऊ शकतं, ही बाब ध्यानात घ्यायला हवी, अन्यथा पावसाळ्यातून एक-दोन पुरावेळी वाहणारी नदी नंतर बारमाही कोरडी राहील हे मानवाच्या कल्याणासाठी, भवितव्यासाठी नक्कीच हितावह नाही.