कर्तव्याची जाणीव आणि निष्ठा गर्जे किल्ले सिंहगडावर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sinhgad

कर्तव्याची जाणीव आणि निष्ठा गर्जे किल्ले सिंहगडावर!


लेखक - देवदत्त गोखले

ज्याच्या नावातच शौर्याचे प्रतीक आहे, तो म्हणजे सिंहगड. सिंहासारखाच धिप्पाड असलेला हा किल्ला अनेक लढायांच्या खुणा अंगावर घेऊन आजही इतिहास, ती स्वामीनिष्ठेची आणि शौर्याची कथा जगाला गर्जून सांगत असतो. कामावरील निष्ठा, बांधिलकी आणि कर्तव्याची जाणीव हे त्रिकुट कार्यसंस्कृतीचा अविभाज्य घटक आहे, हेच आपल्याला सिंहगड शिकवितो. कामावरील विलक्षण निष्ठा, स्वराज्यावर असलेलं प्रेम आणि वाचनाची बांधिलकी यांनी या गडाचा दगड अन् दगड भारलेला आहे.

सिंहगड हा मुख्यतः प्रसिद्ध आहे, तो नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे! याचं मूळ नाव कोंढाणा. समुद्रसपाटीपासून सुमारे चार ४०० फूट उंचीवर असलेला हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलूख या गडावरून दिसतो. त्यामुळे टेहळणीच्या दृष्टीनेही हा किल्ला महत्त्वाचा होता. १६४७ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला व या गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. परंतु, पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना द्यावे लागले, त्यामध्ये सिंहगडही होता. शिवाजी महाराजांनी आग्र्याहून आपली सुटका करून परत आल्यावर मोगलांना दिलेले हे किल्ले परत घ्यायला सुरवात केली. त्या वेळी तानाजी मालुसरे यांनी ‘कोंढाणा मी घेतो’ असे वचन महाराजांना दिले. तानाजींनी जेव्हा ही जबाबदारी घेतली, तेव्हा खरंतर त्यांच्या एकुलत्या एक मुलाचे लग्न ठरले होते. परंतु स्वराज्याचे कर्तव्य मोठे मानून ते या अवघड मोहिमेवर गेले. वचन दिल्याप्रमाणे कोंढाणा काबीजसुद्धा केला. पण त्यांना या युद्धात वीरमरण आले. तानाजी यांच्यासोबत इतरही अनेक मावळ्यांनी या लढाईत बलिदान दिले. यात सूर्याजी मालुसरे, वृद्धावस्थेत पोचलेले शेलारमामा यांचा पराक्रम अद्वितीय आहे. या सगळ्यांचे बलिदान, साहस आणि अचूक नियोजनामुळे हा किल्ला काबीज करता आला.

हेही वाचा: रशिया खरोखरच युद्धखोर आहे?

सिंहगडावर बऱ्याच वास्तू बघावयास मिळतात. यात पुणे दरवाजा म्हणजे एकामागे एक असलेले तीन दरवाजे आहेत. तसेच खंदकडा, घोड्यांच्या पागा, दारू कोठार, लोकमान्य टिळकांचे घर, कोंढणेश्वर मंदिर, अमृतश्वराचे प्राचीन मंदिर, तानाजी मालुसरे स्मारक, प्रसिद्ध देवटाके, गडाच्या पश्चिमेस कल्याण दरवाजा आणि झुंजार बुरूज या वास्तू आहेत. झुंजार बुरजावरून समोरच राजगड, तोरणा हे गड दिसतात. खाली पानशेतचे खोरे दिसते. पूर्वेकडे लांबवर पुरंदर दिसतो. झुंजार बुरजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पायवाटेने तानाजी कड्याकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे. येथूनच तानाजी मालुसरे मावळ्यांसह वर चढले होते. राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी दिसणारी घुमटी म्हणजेच छत्रपती राजाराम महाराज यंची समाधी. मोगली फौजेला सतत अकरा वर्षे टक्कर देणाऱ्या छत्रपती राजाराम महाराजांचे सिंहगडावर निधन झाले.

कार्यसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग म्हणजे कामावरील बांधिलकी आणि प्रेम. कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं. फक्त ते पूर्ण मन लावून केलं तर त्या कामाला एक वेगळंच महत्त्व प्राप्त होतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कामाशी आणि संस्थेशी एकनिष्ठ असणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या सवयी, वागणूक आणि प्रामाणिकपणा प्रत्येक काम निष्ठेने पूर्ण करण्यास मदत करतात. तसेच आपली मूल्ये आणि तत्त्व कणखर असतील, तर निष्ठा अबाधित राहते. नुसतीच निष्ठा असून चालत नाही, तर त्याला कर्तव्याच्या जाणीवेची जोड देणंदेखील तितकंच महत्वाचं आहे, हेही आपल्याला सिंहगड शिकवतो. तानाजींनी एकीकडे कोंढाणा सर करण्याची जबाबदारी घेतली, तर दुसरीकडे त्यांच्या एकुलत्या एक मुलाचं लग्न ठरलं होतं. परंतु स्वराज्याचे कर्तव्य मोठे मानून ते आधी मोहिमेवर गेले आणि अत्यंत अवघड मोहीम यशस्वीसुद्धा केली. कर्तव्याची जाणीव असणं किती महत्वाचं आहे, याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. मावळ्यांची हीच कर्तव्याची जाणीव आणि निष्ठा आजही किल्ले सिंहगडावर गरजते, यात शंकाच नाही.

(लेखक गोखलेज ॲडव्हान्सड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (गती) जळगावचे संचालक आहेत.)

हेही वाचा: संवादकौशल्याचे नितळ प्रतिबिंब किल्ले 'रायगड'

Web Title: Saptarang Marathi Article About Sinhgad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..