
शिवसेनाप्रमुख : ऊर्जेचा एक अखंड स्रोत
''शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे उर्जेचे अखेंड स्रोत. त्यांच्याशी चर्चेने माणूस आतबाहेरून प्रफुल्लीत होई. त्यांच्याशी संवाद साधणे म्हणजे स्वतःला अंर्तबाह्य एक अनामिक बदलाची चाहूल लागायची. त्यांचा स्पष्टवक्तेपणा अखंड देशाला परिचित आहे, त्यामुळे गारगोटी संग्रहालयाच्या उद्घाटनाचे निमंत्रण देताना झालेला संवाद हा आजही प्रचंड उर्जा देणारा आहे, तो मी कधीही विसरू शकत नाही.'' - के. सी. पांडे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यासमोर गारगोटीबद्दल माहिती द्यायला मी सुरुवात केली. त्यांनी अत्यंत शांतपणे माझी प्रत्येक वाक्य न वाक्य ऐकून घेतले. माझं वाक्य पूर्ण झाल्यानंतर त्यावर त्यांना जर काही शंका किंवा प्रश्न असेल तर मग ते मला विचारत. मी त्याबद्दलची माहिती त्यांना सांगितली. एवढ्या मोठ्या कर्तुत्वाची उंची गाठलेली व्यक्ती माझ्या गारगोटी या जगावेगळ्या छंदाबद्दल इतके काळजीपूर्वक ऐकत होती समजून घेत होते याबद्दल मला आश्चर्यच वाटले. सर्व शांतपणे ऐकून घेतल्यानंतर त्यांनी मला विचारले,‘मिस्टर पांडे मला तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचा छंद व त्यातून निर्माण झालेला जगप्रसिद्ध व्यवसाय हा मला समजला, पण एक प्रश्न माझ्या मनात आहे तो मी तुम्हाला विचारतो’. त्यांनी म्हटले की,‘तुमचा हा सर्व व्यवसाय याची व्याप्ती याची बाजारपेठ हे सर्व परदेशात अधिक आहे. तरीही तुम्ही या संग्रहालयाचे नाव अस्सल मराठी गारगोटी असे का ठेवले? जर इंग्रजी संबंधित एखादं नाव तुम्ही तुमच्या व्यवसायाला दिले असते तर तुमचा व्यवसाय समजायला परदेशात अधिक सोपा झाला असता, असे नाही का वाटत तुम्हाला?
यावर मी त्वरित उत्तर दिले. गारगोटीचा जन्म महाराष्ट्रातील मातीतून होतो. आपण आपल्या संस्कृतीमध्ये जमीन अथवा माती यास आई मानतो, मी माझ्या व्यवसायासाठी अथवा वैयक्तिक फायद्यासाठी माझ्या आईचे नाव बदलणार नाही, असे मी त्यांना स्पष्टपणे उत्तर दिले. त्यावेळी मला जे मनात सुचले जे माझ्या मनात होते, तेच उत्तर मी दिले. ते ऐकल्यानंतर शिवसेनाप्रमुख ठाकरे खूप प्रभावित झाले. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव त्यांची देहबोली ही माझ्या बाबतीत अत्यंत सकारात्मक बोलू लागली असे मला चटकन जाणवले. हे उत्तर ऐकल्यानंतर त्यांना माझ्याबद्दल अभिमान वाटल्याचे जाणवले आणि त्यांनी त्वरित गारगोटीला येण्याचे आमंत्रण स्वीकारले. एक महिन्याच्या आतच त्यांनी गारगोटीला येण्याची तारीखही दिली. हा माझ्या आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय क्षण होय. हा क्षण मला माझ्या आतापर्यंतच्या वाटचालीत कायम प्रेरणा व ऊर्जा देत राहिला. त्यानंतरही अनेक वर्ष शिवसेनाप्रमुख ठाकरे व त्यांचे सर्व कुटुंबीय यांच्या मनात गारगोटीबद्दल कायम एक खास जागा निर्माण झाली. ठाकरे कुटुंबातील असा एकही सदस्य नाही, की जो गारगोटीला येऊन गेलेला नाही. एका भेटीतून व माझ्या एका उत्तराने प्रभावित झालेले शिवसेनाप्रमुख ठाकरे यांचा माझ्यावरील प्रेम व स्नेह भविष्यातील अनेक दिवस माझ्यावर आशीर्वाद रुपी कायम राहिला.

Gargoti Museum Nashik
ग्रीन व व्हाईट ॲपोपलाइट
गारगोटी संग्रहालयात असलेल्या अनेकांपैकी ग्रीन व व्हाईट ॲपोपलाइट विशेष आकर्षण. यात पोटॅशियम क्लोरीन, कॅल्शियम सिलिकेट, पाणी व ऑक्सिजन याची भूगर्भामध्ये प्रक्रिया होऊन तयार झालेला हा गारगोटी मिनरल होय. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हा गारगोटी दगड आढळतो. प्रामुख्याने पुणे व जळगाव येथे आढळण्याचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये दोन रंग असतात, एक हिरवा व दुसरा पांढरा. या व्हाईट ॲपोपलाइट गारगोटी मिनरलचा उपयोग मेडिसिन भस्म फर्टीलायझर अशा अनेक उद्योगांमध्ये केला जातो. प्रामुख्याने घरांमध्ये अथवा ऑफिसमध्ये ठेवल्यास प्रेम, आनंद, एकाग्रता, अंतर्मनाची शांतता याबाबतीत पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते. आयुष्यात, जीवनात तणावरहित जीवनशैली निर्माण होण्यास सुरुवात होते असे मानतात.
(लेखक सिन्नरस्थित गारगोटी संग्रहालयाचे प्रमुख आहेत.)