दगडांच्या देशा : प्रामाणिक प्रयत्नांची सिद्धता!

Gargoti museum nashik
Gargoti museum nashikesakal

लेखक - के. सी. पांडे

आयुष्यातील आपल्या ध्येयपूर्तीसाठी मार्गक्रमण करीत असताना आपले प्रयत्न हे मनापासून असले पाहिजे. जर आपण मनस्वी प्रयत्न केले, तर निसर्गाच्या सर्व शक्ती आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. आपण ठरविलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी अथवा ते प्रत्यक्षात निर्माण होण्यासाठी आपणास साथ देते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

अल्पावधीतच माझा व्यवसाय वाढू लागला. देश व प्रदेशात व माझी आणि गारगोटीची एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती. त्यानुसारच सर्व गारगोटी एका छत्राखाली आली पाहिजे म्हणून मी एक गारगोटी संग्रहालय निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले अन् ते प्रत्यक्षात उतरविण्याचे ठरविले. १९९५ ते ९८ च्या कालावधीत आमचे सुरू असलेले काम तेव्हा पूर्णत्वास आले. ही वास्तू पूर्ण झाल्यानंतर माझं आयुष्यातील सर्वांत मोठे स्वप्न साकार झाल्याची प्रचिती मला आली. मला अनेक प्रश्न या व्यवसायाबद्दल विचारले गेले होते. हा व्यवसाय कसा, कुठून, केव्हा सुरू केला. या व्यवसायाचे नेमके स्वरूप काय आहे. असे एक ना अनेक प्रश्न मला माझे नातेवाईक, मित्रांसह अनेकांनी विचारले. त्यामुळे गारगोटी म्हणजे काय चमत्कार आहे, हे मला जगाला दाखवून द्यायचे होते. त्यामुळेच कदाचित गारगोटी संग्रहालयाची स्थापना करणे हे माझे सर्वांत मोठे स्वप्न होते. व्यवसाय करत असताना माझी सर्व क्षेत्रांतील लोकांशी चांगला परिचय होता. जनसंपर्क करणे, मैत्री राखणे, मैत्री जपणे हा माझा मूळ स्वभाव होता. त्यातून माझे अनेकांशी मैत्रीपूर्ण संबंध विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी प्रस्थापित झाले. जेव्हा गारगोटी संग्रहालयाचे उद्‍घाटन करायचे ठरले तेव्हा जागतिक कीर्तीचा हा व्यवसाय व त्यामुळे जगभर झालेली ओळख यामुळे संग्रहालयाचे उद्‍घाटन देखील तितक्याच म्हणजेच जगात लौकिक असलेल्या व्यक्तीच्या हातून व्हावे, ही माझी मनस्वी इच्छा होती. उद्‍घाटन तर अनेक होतात, पुढेही होत राहतील; पण गारगोटी संग्रहालयाचे उद्‍घाटन ही एक वेगळी, अलौकिक घटना होती. कारण तेव्हा गारगोटीबद्दल फारशी कुणालाच माहिती नव्हती. गारगोटीचे स्वरूप, गारगोटीबद्दल जाणून घेण्याची जिज्ञासा अनेकांच्या मनात निर्माण झालेली होती. याच मूळ कारण होतं, ते म्हणजे मला अल्पावधीतच या व्यवसायात मिळालेले यश. त्यामुळे अनेक जणांना गारगोटीबद्दल आकर्षण वाटत होते, कुतूहल वाटायला लागले होते.

Gargoti museum nashik
धागा घट्ट मैत्रीचा...

व्यवसायानिमित्त आणि माझ्या स्वभावामुळे माझी अनेकांशी झालेल्या मैत्रीमध्ये माझे परमस्नेही तथा मित्र आरएसएसचे माजी सरसंघचालक राजेंद्र सिंग ऊर्फ रज्जू भय्या यांचे माझ्यावर विशेष प्रेम होते. माझ्या या आगळ्यावेगळ्या छंदाबद्दल, व्यवसायाबद्दल त्यांना नेहेमी अभिमान वाटत असे. देशाचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना गारगोटी संग्रहालयाच्या उद्‍घाटनासाठी मी निमंत्रण दिले. पंतप्रधान वाजपेयी यांचे येणे जवळपास निश्चित झाले होते. अटजींची तारीखही मिळाली होती. पण त्या वेळी देशात एक मोठी घटना घडली आणि ऐनवेळी पंतप्रधानांचा दौरा रद्द झाला. प्रखर हिंदुत्ववादी, जाज्वल्य देशभक्तीचे प्रतीक असणारे पंतप्रधान वाजपेयी अपरिहार्य कारणामुळे येऊ शकले नाहीत. यामुळे माझा प्रचंड हिरमोड झाला. त्या वेळी माझ्या मनात विचार घोंगावू लागला, की आता कुणास बोलावायला हवे. माझ्यासमोर चटकन एक नाव आले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे. देशभरात हिंदुत्ववादी नेतृत्व म्हणून बाळासाहेब ठाकरे यांची ओळख होती. या व्यक्तीस आपण गारगोटी संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करायचे, असा मी निश्चय केला. सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे माझे सुरवातीपासूनच मित्र होते. ते नेहमीच मला मार्गदर्शन व पाठबळ देत आले आहेत. तेव्हा ते शिवसेनेचे आमदार होते. कोकाटे यांच्या माध्यमातून मी बाळासाहेब ठाकरे यांना आमंत्रण देण्याचे ठरविले. सुरवातीस म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा एक प्रचिती मला आली.


Gargoti museum nashik
हळव्या नातेसंबंधांचे सहजसुंदर चित्र!

बाळासाहेबांनी आमंत्रण स्वीकारले. आपले प्रयत्न मनापासून असले, प्रयत्न प्रामाणिक असतील, तर यश मिळतेच हा माझा विश्वास पुन्हा एकदा सिद्ध झाला. आपल्या वाटेत येणाऱ्या सर्व अडथळ्यांना ईश्वर अनेक रूपांत येऊन आपली मदत करतो. मात्र हे सर्व करत असताना प्रामाणिकपणा, आर्थिक व्यवहारातील पारदर्शकता, चिकाटी, तत्पर सेवा, सेवाभाव इत्यादी गुण अंगीकारल्यास आपल्याला यशाचे शिखर गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

(लेखक सिन्नरस्थित गारगोटी आंतरराष्ट्रीय संग्रहालयाचे संस्थापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com