तिचा जिवलग! (निरुपमा भालेराव)

nirupama bhalerao
nirupama bhalerao

...पण अचानक तिला तिच्या खिडकीच्या बाहेर एक छोटंसं, हिरवंगार रोपटं दिसतं. कसलं हे रोपटं? काय त्याचं नाव? काहीच माहीत नाहीये तिला...पण ते अतिशय देखणं आहे, रुबाबदार आहे! तिला ते फार फार आवडलंय...त्याची ती इवली इवली हिरवी पानं... त्याच्या त्या नाजूक, कोवळ्या फांद्या...आता ती रोजच खिडकीपाशी येऊन त्याला भेटू लागली...

तिची आणि त्याची ओळख झाली ती तिच्या डायनिंग हाॅलच्या खिडकीतून. तो तिली भेटला या खिडकीतच.
सप्तरंगांपैकी एकेक रंग भरत बांधला होता हा टुमदार इमला. कशाची म्हणून कशाचीच कमतरता नव्हती राजा-राणीच्या या महालात. महाल आपला होता...सारं काही आपलंच होतं...पण खिडकीतून बाहेर डोकावलं की सारं काही परकं वाटायचं. बाहेरचं ते सगळं जगच अनोळखी होतं. ते समोरून जाणारे उदास डांबरी रस्ते...रस्त्याच्या पलीकडचे ते जुने-पुराणे बंगले...त्या बंगल्यांमधून डोकावणारा सामसूमपणा...बंगल्यांच्या आवरातले ते मरगळलेले बाग-बगीचे...नारळाची आणि आंब्याची काही कंटाळलेली म्हातारी झाडं...!

हे सगळं बघून तिचं मन अधिकच खिन्न व्हायचं. हे खिन्न मन मग गतकाळाच्या डोहात सूर मारायचं आणि मग एकामागून एक असे हळुवार तरंग उठत जायचे...
तिचा तो तिकडचा ऐसपैस बंगला. त्यातली ती रेखीव टवटवीत बाग. गुलाब, मोगरा, जाई, रातराणी, निशिगंध, सायली, अबोली, जास्वंद आणि चाफा यांच्या सुगंधित दरवळाची उधळण करणारी मोठी बाग. बंगल्याच्या सभोवताली पहारा देणारी ती उंचच उंच नीलगिरीची झाडं, स्वच्छ, हिरवागार असा तो सळसळणारा तरुण पिंपळ...घरातल्या मोठ्या कारभाऱ्यासारखा जबाबदारी पेलणारा आणि एेटीत डोलणारा तो आंबा...थोडी खाली मान झुकवलेला, लाजरा असल्यासारखा वाटणारा; पण मनानं स्वार्थी असणारा आणि आपली गोड गोड फळं पानांआड दडवून ठेवणारा तो चिकू...आपल्या फांद्या वाटेल तिकडे जाऊ देणारा, मोकळ्या मनाचा हडकुळा पेरू...आपल्या लांबच लांब मोठ्या पानांचा पदर वाऱ्यावर हेलकावणारी केळी...नववधूसारखी लाजरी-बुजरी, अदबीनं सरळ उभी राहणारी पपई...थोडी सावळी; पण नखरेल सीताफळ...स्वतःच्या अंगोपांगी लगडलेले मादक फुलांचे गुच्छ ऐटीत मिरवणारा, आपल्याच नादात राहणारा, थोडासा एकलकोंडा असा उंचच उंच बूचवृक्ष...गेटच्या थोडं डावीकडे आपल्या घट्ट मैत्रीचं नातं जपणारे ते दोघं जिवलग...गुलमोहर आणि चाफा...भर ग्रीष्मात भरगच्च फुलतात ते! तिथूनच सुरू होऊन मोठा वळसा घेत उजवीकडे गेटपर्यंत गेलेली दगडी कुंपणभिंत...ही भिंत जणू या सगळ्या वृक्षवल्लींना एका कुटुंबासारखी एकोप्यानं ठेवण्यासाठी रात्रंदिवस ऊन्ह-पावसात उभी असते...अशा या वृक्षवल्लींच्या कुटुंबात
किती समरसून जायची ती तेव्हा...
...आणि आता या नवीन ठिकाणी एकांतवास भोगतेय. तिला आठवतेय तिकडच्या आंब्याच्या झाडावर येणारी ती शाही भारद्वाज पक्ष्यांची
जोडी...पेरूवर फडफडत येणारे ते चपळ राघू. लालबुंद गुलमोहरावर कुहू, कुहू करणारे कोकीळ...चाफ्याच्या त्या करड्या फाद्यांवर बागडणाऱ्या असंख्य साळुंक्या...बुचाच्या उंचच उंच झाडावर भरारी घेणाऱ्या चिमण्या...काव, काव करत प्रत्येक झाडाचा पाहुणचार घेणारे कावळे...आणि सूर्यास्ताची चाहूल लागताच आकाशातून रांगेनं घरी परतणारे ते शुभ्र बगळे...
दिवसभर चिवचिवाट करून थकलेली सगळीच लहान-मोठी पाखरं तिन्हीसांज होताच वेगवेगळ्या झाडांच्या अंगा-खांद्यावर निर्धास्तपणे विसावायची...चिडीचूप व्हायची.
पहाटे जाग यायची ती या पक्ष्यांच्या किलबिलीनंच. कुठून येतं त्यांच्यात एवढं चैतन्य कोण जाणे! इकडून तिकडे...खालून वर...वरून खाली...या फांदीवरून त्या फांदीवर...तर कधी आकाशात...किती किती धिंगाणा हा.
काही पाखरांनी झाडांवर सुरेख, सुबक घरटी बांधली आहेत, तर काहींनी गोजिरे खोपे तयार केले आहेत. काहींची अंडी, तर काहींची पिल्लं या खोप्यांमध्ये, घरट्यांमध्ये सुरक्षित आहेत. कुटुंबवत्सल पाखरांचं अवघं जग जणू या झाडांभोवतीच आहे. या पक्ष्यांप्रमाणे, या पाखरांप्रमाणे तिचंही मन या झाडाझुडपांत रमतं...ही झाडं, ही पाखरं, ही फुलं, ही फळं या सगळ्यांशी तिचं फार सुंदर नातं आहे. त्यांच्यातले संवाद हे नजरेचे आणि स्पर्शांचे आहेत. मोहरलेल्या झाडांकडे ती मायेनं, कौतुकानं बघते, तर फळांनी बहरलेल्या झाडांना ती अलगद मिठी मारते. या सगळ्यांच्या सहवासात ती मनोमन सुखावते. शिशिराची चाहूल लागताच ती उदास होते. हळूहळू एकेक करत पानं गळायला लागली की तिच्या हळव्या मनाला झाडांची ती अवस्था बघवत नाही. या पानगळीवर फुंकर घालणाऱ्या वसंताची वाट मग ती मोठ्या धीरानं बघत राहते. वसंतात सगळ्या वृक्षराजीला पुन्हा नवी कोवळी पानं फुटलेली बघून चैत्राचं चैतन्य नकळत तिच्यातही येतं. किती सुंदर नातं आहे तिचं या वृक्षवल्लींसोबत...तिचे हे सगे-सोबती आता दुरावले आहेत याची तिला खंत वाटत राहते. ती उदास होऊन या खिडकीबाहेर काही शोधायचा प्रयत्न करते; पण तिला जे हवंय ते तिच्या आसपास काहीच नाहीये. एकही झाड नाही आणि पक्षीही नाहीत...
...पण अचानक तिला तिच्या खिडकीच्या बाहेर एक छोटंसं, हिरवंगार रोपटं दिसतं. कसलं हे रोपटं? काय त्याचं नाव? काहीच माहीत नाहीये तिला...पण ते अतिशय देखणं आहे, रुबाबदार आहे! तिला ते फार फार आवडलंय...त्याची ती इवली इवली हिरवी पानं... त्याच्या त्या नाजूक, कोवळ्या फांद्या...आता ती रोजच खिडकीपाशी येऊन त्याला भेटू लागली...त्याला न्याहाळू लागली...निरखू लागली...त्याच्यावरून हात फिरवून त्याला गोंजारू लागली...मायेचं खतपाणी मिळाल्यानं तेही जोमानं वाढू लागलंय...इतके दिवस ती त्याला पाहायला खिडकीजवळ आवर्जून जायची...आता तेच खिडकीतून आत सहज डोकावू लागलंय! कुंपणभिंतीवर हेलकावे घेऊ लागलंय... रस्त्यानं येणारे-जाणारे काहीजण त्याच्याकडे कुतूहलानं बघत, तर काहीजण त्याच्याकडे बघून नाकही मुरडत...
‘हे जंगली झाड इथं कसं?’ असा प्रश्न विचारत! तेव्हा कुठं इतरांकडूनच तिला त्याचं नाव कळलं. चंदन! होय, मलयम्...चंदन. तिचा जीवलग!

तिला सतत सोबत करणारा...तिच्याशी हितगुज करणारा...तिचा एकटेपणा वाटून घेणारा...तिच्या सुख-दु:खांचा साक्षीदार! आता त्याच्या आसपास इतरही बरीच झाडं आहेत. आंबा, केळी, पेरू, डाळिंब, सीताफळ, पपई...या सगळ्या झाडांमध्ये तो वृक्ष मात्र खूपच निराळा आहे. सडसडीत, काळपट बुंधा...बारीक, बारीक विरळ फांद्या...छोटी, छोटी हिरवीकंच पानं...फारच देखणा दिसतो तो! भर उन्हातही टवटवीत दिसतो. पावसात तर अधिकच लोभस वाटतो. त्याच्या इवल्या इवल्या पानांतून जणू मोती टपटपतात. तिला छंद आहे त्याला न्याहाळण्याचा. चांदण्यात तर त्याचं सौंदर्य अनुपमेय असतं. त्याच्या विरळ, नाजूक, बारीक फांद्यांतून चांदण्याचे शीतल कवडसे अलगदपणे खिडकीतून आत येतात.

पहाटे पहाटे तो किती तरी पक्ष्याांना अंगा-खांद्यावर खेळवतो. निरनिराळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या आकारांचे सुंदर सुंदर पक्षी त्याची छोटीशी फळं खायला सतत येत असतात. दिवसभर या पक्ष्यांची खातीरदारी करून तो अजिबात थकत नाही. त्याच्यातला पुरेपूर परोपकार पाहून तिला वाटतं की हा कुणी तपस्वी, संत तर नाही ना? इतका गुणी कसा हा? कस्तुरीमृगाप्रमाणे याच्याही गाभ्यात मौल्यवान सुगंध आहे. हा सुगंधी वृक्ष आहे. त्याच्या पानांपासून ते मुळांपर्यंत सगळंच उपयोगी.
आयुर्वेदात तर याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. औषधं, सौंदर्यप्रसाधनं, सुवासिक तेलं असं बरंच काही याच्यापासून तयार केलं जातं. याशिवाय, याचं सुगंधी लाकूड, याचं सुगंधी खोड कुणाच्या परिचयाचं नाही? देवपूजेत गंधासाठी ते वापरलं जातं...याच्यापासून अतिसुगंधी अत्तरं तयार केली जातात...धूप, उदबत्त्या तयार केल्या जातात. याच्यापासून शोभेच्या किमती वस्तूही तयार होतात...किती गुण सांगावेत याचे? सुगंधी दरवळासह इतरांसाठी झिजणं हा तर याचा मुख्य गुण!
आपल्या नित्याच्या जीवनात, प्रत्येक गोष्टीत अशा कितीतरी झाडांचा, वृक्षांचा सहभाग आहे.

झाडांशिवाय, वृक्षांशिवाय, निसर्गातल्या या हरित वैभवाशिवाय माणूस किती अपुरा आहे...हे वैभव आसपास नसेल तर त्याचं जीवन, त्याचं जगणं किती रखरखीत होऊन जाईल...तरीही माणूस झाडांविषयी पुरेसा कृतज्ञ का नसतो...तिच्या मनात विचार येत राहिले...मात्र, आपल्याला झाडांविषयी कमालीचा जिव्हाळा वाटतो, अपार माया वाटते याचा एक वेगळाच आनंद तिला झाला. आणि खिडकीतून आत डोकावणाऱ्या त्या चंदनवृक्षाविषयी तर जरा जास्तच जिव्हाळा वाटतो. कारण, तो तिचा सखा आहे...जिवलग आहे!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com