गृहकुल : शहाणपणाची शाळा ! (राजा दांडेकर)

wisdom-school
wisdom-school

एकूणच मुलांच्या वेळेचा विचार केला, तर मुलं जास्तीत जास्त वेळ स्क्रीनसमोर असतात. यामुळं मुलांमध्ये एक नवीनच अॅडिक्शन (व्यसन) तयार होईल. त्यांची शारीरिक, मानसिक व बौद्धिक वाढ खुंटेल आणि त्यातून शारीरिक, मानसिक व बौद्धिक असे वेगळेच आजार निर्माण होतील. या गोष्टीचा गंभीरपणे विचार आपण पालकांनीच करणं गरजेचं आहे. अनुभविक शहाणपण असलेले आजोबा म्हणाले, "हताश होऊ नका. माझ्यासमोर एक कल्पना आहे. आपण सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारी माणसं आहोत. त्या प्रत्येक क्षेत्रातून मिळणारे अनुभव प्रत्यक्षात वापरायचे कसे, याचं नियोजन आपल्याकडं नाही. यासाठी गरजेची आहे ती ‘wisdom school’, म्हणजेच ‘शहाणपणाची शाळा’...

आमच्या ‘आयडियल गृहसंकुलात’ आज सृजनचा वाढदिवस होता. संध्याकाळच्या वेळेला आमच्या बिल्डिंगमध्ये ‘होम कॉरंटाइन’ असलेले सगळे पालक आणि मुलं सृजनच्या घरी जमली होती. तसंही लॉकडाउनच्या काळात ऑनलाइन शिक्षण सुरू झाल्यापासून आमच्या गृह संकुलातील मुलं एकत्र अभ्यास करत होती. मधून मधून मोठ्या मुलांचं आणि पालकांचं मार्गदर्शनही त्यांना मिळत होतं आणि त्यामुळं शालेय अभ्यास करणं सुकर झालं होतं. पालकही घरीच असल्याकारणानं बहुतेक मुलांना ॲन्ड्रॉइड फोनही उपलब्ध होता. एकूणच प्रचलित शिक्षण अपेक्षेप्रमाणं होत होतं.

घरामध्ये वाढदिवसासाठीची सर्व सजावट करून झाली होती. टेबलावर सुंदर असा एक केक ठेवला होता. आईनं सृजनचं औक्षण केलं, तेव्हा मंद तेवणार्‍या निरंजनाच्या प्रकाशात सृजनचा चेहरा उजळून निघाला होता. त्यानंतर सर्वांना केक कापण्याची उत्सुकता लागली होती. सृजन केक कापणार इतक्यात घराोतील विद्युतपुरवठा खंडित झाला. अचानक वीज गेल्यानं सगळ्यांचा विरस झाला. खिडकीमधून बाहेर पाहिल्यावर असं दिसलं, की सगळ्यांचा वीजपुरवठा सुरू आहे आणि फक्त आपल्याच बिल्डिंगचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. कोणीतरी म्हणालं, "बहुतेक फ्यूज गेलेला असेल?" मग शेजारचे काका म्हणाले, "फ्यूज घातला तर वीज येईल; पण कोण घालणार फ्यूज? मग फ्यूज वायर, टेस्टर सगळंच लागणार!" तिथंच बसलेले शेजारच्या घरातील आजोबा उठले. त्यांनी मोबाईल टॉर्च चालू केला. घरात जाऊन फ्यूज वायर व टेस्टर आणला आणि गेलेला फ्यूज बदलून वीजपुरवठा सुरळीत केला. वीजपुरवठा सुरळीत झाल्यावर पोरांनी एकच जल्लोष केला. सगळ्यांनी आजोबांना धन्यवाद दिले. आजोबा म्हणाले, "मी एवढं काही केलं नाही, हे तर कोणालाही करता येईल." त्यानंतर वाढदिवसाचा कार्यक्रम पार पडला. मुलं केक खाऊन आपापल्या घरी गेली. आजोबांनी पालकांना जरा थांबायला संगितलं.

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कॉफी घेता घेता आजोबांनी बोलायला सुरुवात केली. "ऑनलाइन शिक्षण सुरू झाल्यापासून मी विचार करतोय, नजीकच्या भविष्यात या मुलांचं काय होणार? ऑनलाइन तास संपल्यानंतर मुलं टीव्ही पाहत बसतात, कॉम्प्युटरवर, मोबाईलवर गेम खेळतात. एकूणच मुलांच्या वेळेचा विचार केला, तर मुलं जास्तीत जास्त वेळ स्क्रीनसमोर असतात. यामुळं मुलांमध्ये एक नवीनच अॅडिक्शन (व्यसन) तयार होईल. त्यांची शारीरिक, मानसिक व बौद्धिक वाढ खुंटेल आणि त्यातून शारीरिक, मानसिक व बौद्धिक असे वेगळेच आजार निर्माण होतील. या गोष्टीचा गंभीरपणे विचार आपण पालकांनीच करणं गरजेचं आहे." सगळ्यांच्या मनामध्ये हे प्रश्नचिन्ह होतंच; पण पर्याय काय? आपण असाहाय्य आहोत. अनुभविक शहाणपण असलेले आजोबा म्हणाले, "हताश होऊ नका. माझ्यासमोर एक कल्पना आहे. आपण सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारी माणसं आहोत. त्या प्रत्येक क्षेत्रातून मिळणारे अनुभव प्रत्यक्षात वापरायचे कसे, याचं नियोजन आपल्याकडं नाही. यासाठी गरजेची आहे ती ‘wisdom school’, म्हणजेच ‘शहाणपणाची शाळा’.

पूर्वी गुरुकुलं होती तशाच प्रकारचं आपल्या गृहसंकुलाचं आपल्याला ‘गृहकुल’ करता येईल का, कसं असेल ते गृहकुल, मी यावर गेले खूप दिवस विचार केलाय. आपण मुलांच्या दिवसभराच्या वेळेची विभागणी चार भागांत करूयात.

 पहिला भाग असेल ‘गृहपाठ म्हणजेच गृहविज्ञान’ ( home science),
  दुसरा भाग असेल ‘शालेय गृहपाठ’ (online study),
  तिसरा भाग असेल ‘बहुउद्देशीय तंत्रशिक्षण’ (multiskill practical training)
  आणि चौथा भाग असेल ‘ग्राउंड अॅक्टिव्हिटी’.

या चार भागांमध्ये मुलांच्या दिवसाच्या वेळेची विभागणी केली पाहिजे."

"आपण बसलोच आहोत आत्ता, तर आम्हाला हे चार भाग अजून विशद करून सांगा ना," असं एक पालक म्हणाले. प्रत्येक पालकाची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. "ठीक आहे सांगतो तर...." आजोबा म्हणाले.

"पहिला भाग गृहपाठ/ गृहविज्ञान (homescience) :-खरंतर साध्यासोप्या गोष्टी असतात. सकाळी उठण्यापासून विचार करू. बेड आवरणं, प्रात:विधी, सदस्यांनी आळीपाळीनं (घरातील सर्वांच्या) स्वच्छतागृहाची स्वच्छता, चहा / कॉफी तयार करणं, घरातील केर काढणं, पोछा मारणं, कुटुंबातील लोकांनी एकत्र बसून दिवा लावणं व प्रार्थना करणं... मग सुरू होईल, मुलांचं घरातील किचन लॅबचं ट्रेनिंग. त्यामध्ये कुकर लावणं, डाळ-भात करणं, भाज्या साफ करणं, चिरणं, कोशिंबीर करणं, ज्यूस, ताक, लस्सी तयार करणं, कणीक मळणं, कपबश्या - भांडी घासणं, मग पोळी/पुरी लाटणं, भाकरी करणं, भाज्या तयार करणं, स्वयंपाक करणं, मिक्सर/ ग्रँडर/ ज्यूसर वापरणं, घरगंटी वापरून पीठ काढणं, डिटर्जंट वापरून वॉशिंग मशिनवर कपडे धुणं, सुकवणं व वाळत टाकणं... आठवड्यातील एका वारामध्ये कुटुंबाचा स्वच्छता दिन असेल. त्यामध्ये फॅन, बल्ब, दारं-खिडक्या, फर्निचर, कपाट इ. स्वच्छ करणं. यासाठी दोन-तीन गोष्टी घरामध्ये आवर्जून असाव्यात. बहुउद्देशीय टूल संच (Multipurpose tool box), प्रथमोपचार पेटी, ओला कचरा, सुका कचरा व प्लॅस्टिक बॅग यांच्या स्वतंत्र डस्टबिन. यातून कुटुंबातील व्यक्तींना कचरा व्यवस्थापनाची सवय लागेल. हा गृहपाठ कुटुंबातील सर्वांसाठी असेल.

दुसरा भाग शालेय गृहपाठ (ऑनलाइन) :- हा भाग त्या त्या शालेय व्यवस्थापनानुसार होईल. मोठी मुलं आणि पालक लहान मुलांना मार्गदर्शन करतील. त्यातून त्यांचं शंकांनिरसन होऊ शकेल. यातून स्वयंअध्ययनाची सवय लागू शकते.

तिसरा भाग असेल ‘बहुउद्देशीय तंत्रशिक्षण’ (multiskill practical training) :- इमारतीमधल्या वरच्या फ्लॅटमधले एक इलेक्ट्रिकल इंजिनअर काका म्हणाले, "माझं इलेक्ट्रिकल गॅझेट्सच दुकान आहे. मी सगळ्या मुलांना इलेक्ट्रिकल गॅझेट्सच्या मेंटेनन्सची माहिती देऊ शकेन. यासाठी मी सर्व मुलांची एक दिवसाची कार्यशाळा घेईन. मुलांनी आपापल्या घरातील इलेक्ट्रिकल गॅझेट्सची यादी करावी आणि आपल्या घरातील बिघडलेल्या वस्तू आपण घरच्याघरी कशा दुरुस्त करता येतील, हे मी त्यांना शिकवेन. खरंतर मी माझ्याच हातानं माझ्या पायावर धोंडा पाडून घेत आहे. फॅन, ट्यूब, इस्त्री, टेबल फॅन, गिझर, सोलर आणि एलईडीच्या वस्तू. या शिक्षणाबरोबरच सोलर, एलईडीच्या वापरातून आपल्या कुटुंबाच्या आणि इमारतीच्या विजेचा वापर कसा कमी करता येईल, हे मी मुलांना शिकवेन. त्याचबरोबर सोलर कूकरसारख्या वस्तूंचा वापर करायलाही शिकवेन. घरोघरी गॅस गिझर व इलेक्ट्रिकल गिझर वापराऐवजी आपल्या सोसायटीत आपण सोलर वॉटर हिटिंग सिस्टिमही बसवू शकतो. सोलर स्ट्रीट लाइट, गार्डन लाइट बसवू शकतो."

इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स :- दुसरे एक काका म्हणाले, "मी मुलांना इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सविषयी काही शिकवू शकेन. आपल्याच सोसायटीमध्ये हार्डवेअर इंजिनिअर आहेत, सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत, मोबाईल शॉपी असलेले आहेत. हे सगळेच जण त्यांच्या त्यांच्या विषयातील प्रॅक्टिकल ट्रेनिंग आनंदानं आपल्या मुलांना देतील. सगळेच जण मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर वापरतात; पण अंतरंग कोणालाही माहीत नसतं. याच्यासाठी मुलं घरच्याघरी कॉम्प्युटर असेंबल करतील, मोबाईल रिपेअर करतील. या सगळ्या गोष्टींचं बेसिक नॉलेज आपल्याला मुलांना सहजरीत्या देता येईल. आठवड्यातला एक दिवस एका एका विषयाची कार्यशाळा आपल्याच सोसायटीमध्ये घेता येईल. प्रत्येक घरामध्ये आजकाल मोबाईल फोन, टॅब, नोटपॅड, लॅपटॉप, कॉम्प्युटर, पॉवरबँक या गोष्टी असतात. त्याचबरोबर घरातील घड्याळ, टेपरेकॉर्डर, रेडियो या गोष्टीही घरच्याघरी दुरुस्त करता येतील. सोल्डरिंग करण्यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी घरातल्या घरात शिकवता येतील. खरंतर मुलांना अशाच गोष्टींची आवड असते. म्हणूनच म्हणतात ना, ‘हातानं काम केल्यानं बुद्धीला चालना मिळते.’ परंतु आपण पालक त्यांची उत्कंठा मारून टाकत असतो."

गॅस :- एक पालक म्हणाले, "मी गॅसविषयीची माहिती मुलांना देऊ शकेन. त्यामध्ये रिकाम्या सिलिंडरचं वजन किती? भरलेल्या सिलिंडरचं वजन किती? सिलिंडर जोडणं, काढणं, रेग्युलेटर पाइप बदलणं, गॅसची शेगडी साफ करणं, गॅसच्या शेगडीचं बटन बदलणं इत्यादी. या छोट्याशा शिक्षणामुळं कुटुंबातील मोठे अपघात टळू शकतात."

प्लंबिंग :- बाथरूममधला गळणारा नळ बदलणं, वॉश बेसिन आणि सिंकच्या खालचा पाइप बदलणं, शॉवर क्लीन करणं, नळातील कचरा साफ करणं, पाण्याचा वापर कमी होईल असेच नळ, टॅप वापरणं, फ्लश टँकची दुरुस्ती करणं सहज शक्य असतं. तेवढ्यात गॅरेजवाले काका म्हणाले, "मी मुलांना सायकल दुरुस्ती, टूव्हीलर, फोरव्हीलर मेंटेनन्स, म्हणजेच चाक काढून बसवणं, मोटार सायकलचा प्लग साफ करणं इ. कामं शिकवेन.

या सगळ्या कौशल्याधारित शिक्षणातून घराघरांत ‘Handiman’ तयार होतील. आपली मुलं जेव्हा परदेशात जातात, तेव्हा त्यांना कोणतीच अडचण भासणार नाही. कारण परदेशात अशा कामांसाठी नोकर (मेड) मिळत नाहीत. आपल्या आयडियल गृहसंकुलात घेतली जाणारी ही कार्यशाळा मुलांना स्वावलंबी बनवेल." तेवढ्यात सोसायटीतील एक काकू म्हणाल्या, "मी बँकर आहे. अहो छोट्या छोट्या गोष्टीही मुलांना माहीत नसतात." "अगं मी पण पोस्टात काम करते," दुसर्‍या काकू म्हणाल्या. "आपण दोघी मिळून मुलांना बँकेचे व पोस्टाचे व्यवहार शिकवू. बँकेचं खातं उघडणं, चेक भरणं, NEFT करणं, ड्राफ्ट काढणं, ऑनलाइन बँकिंग, एटीएम, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डचा वापर करणं, त्यातले फायदे-तोटे, व्यवहारातले धोके, त्यासाठी घ्यायची काळजी, असं सारं शिकवायची गरज आहे, साधी भरणा स्लिप भरता येत नाही, अगं हल्ली मुलांना पोस्टाचे व्यवहार माहीत नसतात, मी पोस्टाचे व्यवहार शिकवेन. त्यामध्ये पोस्ट पार्सल, स्पीड पोस्ट, आंतरदेशीय पत्र, कार्ड, मनीऑर्डर करणं इ. शिकवेन. मुलांना बँकेच्या व्यवहारामध्ये हेही शिकवायचं, की बँकेत पैसे भरणं, काढणं, मोबाईल रिचार्ज, टीव्ही रिचार्ज, लाइट बिल, फोन बिल, गॅस बिल भरणं इ. शिकवता येईल."

इतकावेळ शांत बसलेले सोसायटीतले डॉक्टर काका म्हणाले, "प्रत्येकाला प्रथमोपचार येणं आवश्यक आहे. मी मुलांना प्रथमोपचार आणि हायजिनबद्दल माहिती देईन. अँडोलेसन एज्युकेशन (लैंगिक शिक्षण) वरती मी मुलामुलींची एक कार्यशाळा घेऊ शकेन; आणि हो.. पोषण आहाराविषयी (कोल्ड ड्रिंक आणि फास्ट फूड) मी मुलांशी बोलेन; आणि मुलांच्या स्थौल्याविषयी बोलावं लागेल. कारण तोही एक गंभीर प्रश्न आहे. सोशल मीडियाच्या वापराविषयीही मुलांशी चर्चा करावी लागेल."

गच्चीवरची शेती :- तेवढ्यात एक काकू उत्साहानं म्हणाल्या, "मी मुलांना कचरा व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, गार्डनिंग या तीन विषयांची प्राथमिक माहिती देईन. आपण आपल्या इमारतीच्या गच्चीचंच फार्म फिल्ड करूयात आणि तिथं छोटीशी शेती करूयात. त्यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, वेलभाज्या, औषधी वनस्पती, वेगवेगळी फुलं... असं खूप काही आपल्याला प्रत्येकाच्या घरातील कचऱ्याचा वापर करूनच करता येईल. त्यातूनच कचऱ्याचं व्यवस्थापनही होईल आणि आपल्याला सेंद्रिय भाजीही मिळेल."

चौथा मुद्दा फिजिकल फिटनेस - आमच्या सोसायटीतला जिम चालवणारा दादा आणि योगा क्लासवाल्या ताई म्हणाल्या, "लॉकडाउनच्या काळामध्ये आपण आपल्या सर्वांच्या फिजिकल फिटनेसकडं लक्ष द्यायला हवं. सकाळ - संध्याकाळ एक एक तास आपल्या सोसायटीच्या बागेत सोशल डिस्टन्स ठेवून मी सगळ्यांना योगा आणि प्राणायाम शिकवेन. घरातील वृद्ध मात्र घरातच प्राणायाम, योगा करतील." दादा म्हणाला, "संध्याकाळी सर्व मुलंमुली ग्राउंड अॅक्टिव्हिटी करतील. देशी खेळ त्यामध्ये खो-खो, कबड्डी, रनिंग, दोरीउड्या, शिवाय काही गमतीदार खेळ खेळतील (डुक्कर मुसंडी, विंचवाची नांगी, घोडीचा खेळ), तेही मी शिकवेन. तसंच कोरोनाचं वातावरण निवळलं, की मी मुलांना ट्रेकिंगला घेऊन जाईन." तेवढ्यात एक आजोबा म्हणाले, "मी मुलांना विटीदांडू कसा तयार करायचा आणि कसा खेळाचा, लगोरी कशी खेळायची हे शिकवेन. घरी जायच्या आधी सगळ्यांनी सोसायटीच्या मंदिरासमोर जमून मानवतेच्या कल्याणासाठी वैश्विक प्रार्थना म्हणूयात आणि सर्वजण आपापल्या घरी जातील. बघा बरं मुलांचा वेळ कसा जाईल कळणारही नाही आणि तो कारणी लागेल. त्यांना माणूस म्हणून जगण्यासाठी, तसंच मुलांच्या हातांमध्ये जगायला उपयोगी असणारी कला, कौशल्यं विकसित होतील."

तेवढ्यात सृजनची आई म्हणाली, "आपल्या आजच्या सगळ्या चर्चेचा मी एक राइटअप तयार केला आहे. तो आपण टाइप करून मुलांसमोर ठेवूयात आणि मुलं काय म्हणताहेत पाहूयात. मला खात्री आहे त्यांनाही हे सगळं आवडेल. आपल्या आयडियल गृहसंकुलाचा हा मॉडेल प्रोजेक्ट समाजामध्ये निश्चितच एक वेगळी दिशा देऊन जाईल." शेवटी आजोबा म्हणाले, "समाजात माणूस आत्मनिर्भर झाला तर कुटुंब आत्मनिर्भर होईल आणि कुटुंबं आत्मनिर्भर झाली, तरच देश आत्मनिर्भर होईल. आपण सर्वजण आत्मनिर्भर भारतासाठी हे निश्चितच करू शकतो."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com