कलाकाराची सृजनशीलता (सायली पानसे-शेल्लीकेरी)

artist-creativity
artist-creativity

कलाकाराच्या आयुष्यातली सृजनशीलता जेव्हा सक्रिय असते तेव्हा अनेक नवीन गोष्टी त्याला सुचत राहतात. आज इंटरनेटच्या अतिवापरामुळे प्रत्येकाच्या आयुष्यातली सृजनशीलता कमी झालेली जाणवत असली तरीसुद्धा निसर्गातली किंवा दैनंदिन जीवनातली एखादी छोटीशी गोष्टही कलाकाराला प्रेरणा देऊन जाते. मन प्रफुल्लित होतं आणि नवनिर्मिती होते. या प्रतिभेमुळे कलाकाराला खूप सकारात्मकता मिळते, नवीन ऊर्जा मिळते... 

माणसाला निसर्गाकडून बुद्धीचं वरदान मिळालेलं आहे. बुद्धीचा आणि मानवी मेंदूचा निकटचा संबंध आहे. मेंदूत डावा आणि उजवा असे दोन भाग असतात. चित्रकार, गायक, लेखक, कवी वगैरेंसारखे कलाकार उजव्या मेंदूचा अधिक वापर करत असतात. याचमुळे कलाकारांना सतत काही तरी नवीन करण्याची कायम ऊर्मी येत असते. मेंदूत कायमच विचारचक्र सुरू असतं, कल्पना सुचत असतात. व्यक्ती जरी शांत बसलेली दिसत असली तरी डोक्यात विचारांची मालिका सुरूच असते. एखादा नवीन सकारात्मक विचार सुचणं यालाच ‘सृजनशीलता’ असं म्हणतात. स्वतःच्या बुद्धीचा, विचारांचा, अनुभवांचा, स्मृतींचा आणि आंतरिक स्फूर्तीचा वापर करून कल्पनाशक्तीच्या जोरावर स्वनिर्मिती होत असते. आलेली कल्पना कशी प्रयोगात आणली जाते यावरून प्रत्येक कलाकाराची सृजनशीलता ठरते. ही एक नैसर्गिक देणगी आहे आणि कलाकाराच्या कलेतून ती दिसून येते. सृजनशीलतेत मन, बुद्धी आणि सर्व इंद्रियं जेव्हा एकाग्र होतात तेव्हा मनासारखी निर्मिती होते. ही ऊर्मी कधी, कुठं, कशामुळं, केव्हा स्फुरेल हे सांगणं अवघड आहे म्हणूनच कधी झोपेत, तर कधी दैनंदिन व्यवहार करताना, कधी कामात असताना, तर कधी एखादी कलाकृती बघून नवीन रचना झाल्याचं दिसून येतं. या सृजनाच्या आनंदाची तुलना मात्र दुसऱ्या कुठल्याच आनंदाशी करता येत नाही.

जीवनात सृजनशीलता आपल्या प्रत्येक कार्यावर सुपरिणाम करते आणि एक नवीन आकार देते. शास्त्रीय संगीत हे तर कल्पनाविस्तारानं खुलत जाणारं आहे, त्यामुळे त्यात सृजनशीलतेला खूप वाव आणि महत्त्व आहे. याव्यतिरिक्त प्रत्येक कलाकार आपापल्या प्रतिभेनं नवीन रचना करून सांगीतिक भर घालत असतो. ही आंतरिक स्फूर्ती असल्यामुळं ‘आज अमूक एक गोष्ट नवीन करायची’ असं म्हणून प्रत्येक वेळी नवीन मनासारखं काही घडतंच असं नाही, म्हणूनच ज्या वेळी ही सृजनशीलता सक्रिय असते किंवा प्रतिभा काही तरी नवीन खुणावत आहे अशी शंका येते, त्याच वेळी तिला मूर्त रूप देणं महत्त्वाचं असतं. सृजनशीलता म्हणजे मनमानी नव्हे! जीवनात नवीन विचार आणि निर्मिती करण्यासाठी, एकाग्रता महत्त्वाची ठरते. मनाच्या शक्तीवर विश्वास ठेवल्यास नियुक्त केलेलं कार्य सिद्ध व्हायला मदत होते. विचार, चिंतन, कठोर परिश्रम यांमुळे विचारांत परिपक्वता येते. परिणामी, सांगीतिक व्यक्तिमत्त्वात आश्चर्यकारक सुधारणा घडत राहते.

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कलाकाराच्या आयुष्यातली सृजनशीलता जेव्हा सक्रिय असते तेव्हा अनेक नवीन गोष्टी त्याला सुचत राहतात. आज इंटरनेटच्या अतिवापरामुळे प्रत्येकाच्या आयुष्यातली सृजनशीलता कमी झालेली जाणवत असली तरीसुद्धा निसर्गातली किंवा दैनंदिन जीवनातली एखादी छोटीशी गोष्टही कलाकाराला प्रेरणा देऊन जाते. मन प्रफुल्लित होतं आणि नवनिर्मिती होते. या प्रतिभेमुळे कलाकाराला खूप सकारात्मकता मिळते, नवीन ऊर्जा मिळते, नवीन काही करण्याची झिंग येते! मात्र, प्रतिभेच्या आणि सृजनशीलतेच्या दृष्टीनं कलाकाराचे सर्वच दिवस सारखे नसतात. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात असा एक काळ येतो, जेव्हा ही सृजनशीलता जवळजवळ नाहीशी होते. काही नवीन सुचेनासं होतं. संगीतकाराला चाल सुचत नाही, लेखकाला विषय सुचत नाहीत, चित्रकाराकडून नवीन चित्रकृती उमटत नाही आणि कवीला काव्य स्फुरत नाही. अर्थात्, थोडा काळ सरला की, हा नको असलेला टप्पा, पार पडतो आणि गाडी पूर्वपदावर येते. हा बदल अचानक होत नाही. एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी, थंडीच्या दिवसांत हळूहळू नदी गोठत जावी तसं सगळं नकळत घडत जातं. वरकरणी पाहता आधी सगळं नेहमीसारखंच असतं. थंडी हळूहळू वाढायला लागते तसे पाण्यात तरंग कमी उठायला लागतात. सुरुवातीला हे कळतदेखील नाही. हा फरक जाणवेपर्यंत काही काळ जातो. तरीसुद्धा सृजनशीलतेचे तरंग उठतील अशी आशा असते. थंडी वाढायला लागते आणि नदी पूर्णपणे गोठते. ही स्थिरता जीवघेणी असते. हा काळ कलाकारासाठी कठीण असू शकतो. आपल्यातला कलाकार आपल्याला आता परत भेटेल का...सगळं पूर्ववत्‌ होईल का...अशा शंका घेरून टाकतात. या अनुभवाची सवय असेल तर स्वतःबद्दलची शंका कमी होते. हळूहळू या स्तब्धतेची आणि काही न सुचण्याच्या काळाचीही सवय होते. कलाकाराला त्रास होतो तो आजूबाजूच्या बोचऱ्या नजरांचा. ‘या कलाकाराची प्रतिभा आता कायमची गेली’ असा विचार आपल्याविषयी करणाऱ्या लोकांचा. कलाकाराबद्दलची कीव, काळजी इतरांच्या नजरेतून स्पष्ट दिसत असते. अशा वेळी कुणाचा सहवास, कुणाचे सल्ले, कुणाची सहानुभूती, कुणाचं प्रेम नकोसं होतं, त्यावर चर्चा नकोशी वाटते. अशा या परिस्थितीत नवीन काही करण्याचा मोह होत असतो; पण प्रतिभा साथ देत नाही. नवीन सुचतही नाही आणि सुचलं तरी त्यात पुनरावृत्तीचा गंध असतो; पण अशा वेळी कलेची साधना करत राहण्याला जास्त महत्त्व असतं. परिस्थितीला खंबीरपणे तोंड देणं महत्त्वाचं असतं. कारण, आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करणं हेच कलाकाराच्या हातात असतं. कात टाकल्यानंतरच पुन्हा नवा जोम प्राप्त होतो आणि प्रतिभा कलाकाराला नव्यानं आपलंसं करते.

निसर्गात पानगळ येते तशी पालवीही येणारच असते, तसाच हा काळही सरणार असतो. पानगळ म्हणजे निसर्गाचा अंत नसून तो एक टप्पा असतो, जो सरणार असतो. याचं स्मरण राहिल्यास हा काळ सहज संपतो. या काळात स्वतःवर विश्वास ठेवणं फक्त महत्त्वाचं असतं. नवी उमेद घेऊन पूर्वीची प्रतिभा परत एकदा दार ठोठावते. परत एकदा नवीन काही तरी स्फुरतं. नवीन कल्पना,  नवीन दारं उघडते आणि कला जिवंत असल्याची ग्वाही देते.

श्रोत्यांच्या दृष्टीतून कलाकार कसा दिसतो याविषयी पुढच्या लेखात...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com