संगीतोपचार (सायली पानसे-शेल्लीकेरी)

sayali panse
sayali panse

आपल्या आवडीचं गाणं लागलं की मन प्रसन्न होतं, म्हणजे संगीताचा मनाशी संबंध आहे आणि मनाचा आपल्या आरोग्याशी संबंध आहे, पर्यायानं संगीताचा आरोग्याशी संबंध आहे, असा विचार करून संगीताचा आणि आरोग्याचा नेमका काय आणि कसा संबंध आहे याचा अभ्यास करून तज्ज्ञांनी काही निष्कर्ष काढले. हे निष्कर्ष म्हणजेच संगीतोपचार. अर्थात्, संगीतोपचार म्हणजे कुणालाही कोणत्याही वेळी कसलीही गाणी ऐकवून बरं करणं नव्हे! त्याचंही शास्त्र आहे आणि ते मनाशी निगडित आहे.

संगीताचा माणसाच्या मनावर काही ना काही परिणाम होत असतोच. ही गोष्ट अनुभवानं सिद्ध झालेली आहे. ‘संगीतं श्रवणामृतं’! संगीत हे मनाला शांत करतं हे सर्वश्रुत आहे; पण संगीताचा उपयोग रोगनिवारणासाठीही करता येतो हे खूप कमी लोकांना माहीत असतं. वेदांपैकी सामवेदात संगीताबद्दल विस्तृत माहिती असून, संगीत हा आयुर्वेदाचाही भाग आहे. आपल्या आवडीचं गाणं लागलं की मन प्रसन्न होतं, म्हणजे संगीताचा मनाशी संबंध आहे आणि मनाचा आपल्या आरोग्याशी संबंध आहे, पर्यायानं संगीताचा आरोग्याशी संबंध आहे, असा विचार करून संगीताचा आणि आरोग्याचा नेमका काय आणि कसा संबंध आहे याचा अभ्यास करून तज्ज्ञांनी काही निष्कर्ष काढले. हे निष्कर्ष म्हणजेच संगीतोपचार. अर्थात्, संगीतोपचार म्हणजे कुणालाही कोणत्याही वेळी कसलीही गाणी ऐकवून बरं करणं नव्हे! त्याचंही शास्त्र आहे आणि ते मनाशी निगडित आहे.

मन म्हटलं की साहजिकच अनेक भाव-भावनांचा आणि विचारांचा मोठा पट आलाच. जितकी माणसं तितके मूड आणि जितके मूड तितकं शास्त्र गहन. तेव्हा कोणत्या विकारावर कोणत्या वेळी काय ऐकवलं पाहिजे याचा खूप खोलवर विचार करावा लागतो. संगीताचा परिणाम झाला की रक्ताभिसरण चांगलं होऊन त्याच्याशी संबंधित विकार दूर होतात. रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह हे आजच्या काळातले विकार मानसिकतेशी निगडित असल्यानं त्यांच्या चढ-उतारावर संगीताचा हमखास चांगला परिणाम होत असतो. आपल्याला अनेकदा चांगलं आणि आपल्या आवडीचंच संगीत ऐकायला मिळेल असं नाही. अनेकदा आपण नावडतं संगीत ऐकून खिन्न होतो, वैतागून जातो. म्हणूनच, नेमका कोणता विकार झाला आहे याची तपासणी संगीतोपचार करताना करावी लागते. त्यावर इलाज म्हणून कोणता राग ऐकवला पाहिजे याचा निर्णय करावा लागतो. त्यातलाही कोणता राग सकाळी आणि कोणता राग संध्याकाळी ऐकवायचा हे निश्‍चित करावं लागतं. संगीत ऐकता ऐकता मध्येच माणसाचा मूड बदलेल असे काही स्वर येण्याची शक्यता असते. तसं होऊ नये यासाठी काळजी घ्यावी लागते. आपण निवडलेला राग आणि माणूस यांचा मेळ बसला की तो राग किती वेळ आळवायचा याचा निर्णय घ्यावा लागतो, तरच ते उपचार, ती थेरपी गुणकारी ठरते.

आधुनिक वैद्यकशास्त्रात संगीतात असलेल्या रोगनिवारकशक्तीबद्दल नवनवीन शोध लागत आहेत. संगीताच्या माध्यमातून उपचार करण्यासाठी आपल्या शरीरातल्या पेशींना कंपनांच्या साह्यानं सचेत केलं जातं. या कंपनांमुळे जाणिवेवर चांगला परिणाम होतो व आरोग्य सुधारतं. आवडीचा राग योग्य त्या वेळी आणि योग्य तितका वेळ ऐकण्यानं माणसाच्या प्रकृतीत लक्षणीय फरक पडतो. माणसाची सकारात्मक वृत्ती जागी करण्याची क्षमता संगीतात असते. हजारो रुपये खर्चून जे विकार बरे होणार नाहीत ते विकार संगीत ऐकल्यानं कमीत कमी खर्चात बरे होऊ शकतात.

भारतीय संगीतात रागसमयचक्राची संकल्पना फार महत्त्वाची मानली जाते. त्यानुसार, दिवसाच्या प्रहरांप्रमाणे राग गायले-वाजवले जातात. याचा आढावा पूर्वी एका लेखात घेतला आहेच.

आयुर्वेदात त्रिदोष म्हणजे ‘कफ-पित्त-वात’ ही संकल्पना आहे. त्याचं प्रमाण प्रत्येक माणसाच्या शरीरात वेगवेगळं असतं. या दोषांचं प्रमाण नेहमी संतुलित असावं लागतं. ज्या वेळी या त्रिदोषांपैकी जो दोष वाढलेला असतो, त्यानुसार रागाची निवड केली जाते. हा राग विशिष्ट पद्धतीनं गायला-वाजवला तरच त्याचा अपेक्षित परिणाम होतो. एरवी नुसतं मनोरंजन होतं. शारंगदेवाच्या ‘संगीतरत्नाकर’ या ग्रंथात याविषयीचे श्लोक आहेत.
शास्त्रीय रागांचं विभाजन करून नऊ रस तयार करण्यात आले आहेत. त्यांचा आपल्या मनावर परिणाम होतो. आपल्या मनाचं स्थैर्य राखलं जावं यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्नशील असते. त्यासाठी रागातले नवरस उपयोगी पडू शकतात असं सिद्धान्त सांगतो. संगीतामुळे मनावरचा ताण कमी होतो. त्यानं दुःख कमी होऊ शकतं, मनाची खिन्नता, रुक्षता वाढलेली असेल तर ती कमी करून स्नेहभाव वाढवण्यासाठी उपयोग होतो. वीररसातल्या गीतांमुळे आत्मविश्वास व उत्साह वाढतो. आपल्या समस्यांशी धीरानं तोंड देण्याचीही दिशा मिळते.

जसे रागांचे नवरस असतात तसे वाद्यांचेही मूड असतात. व्हायोलिन हे वाद्य साधारणपणे कारुण्य दर्शवतं, म्हणूच चित्रपटांत दुःखाच्या प्रसंगी त्याचा वापर केलेला दिसून येतो. याउलट सतार किंवा सनई/शहनाई ही वाद्यं मंगलमय वातावरण तयार करतात. तालवाद्यांचंही असंच आहे. या सर्व वाद्यांच्या स्वभावाचाही उपयोग या उपचारपद्धतीत केला जातो. तज्ज्ञांच्या मते, आनंदोन्मेषात असलेल्यांना करुण वाद्यावर एखादा राग ऐकवला गेल्यास व अत्यंत दुःखी व्यक्तीला सतारीवर वीररसप्रधान राग ऐकवला गेल्यास चांगला परिणाम साधता येतो. निद्रानाश या विकारासाठी शांतरसाचे राग बासरीवर ऐकवल्यास ते उपयुक्त ठरतं.

आधुनिक वेगवान जीवनपद्धतीमुळे वेगवेगळ्या व्याधी वाढीस लागलेल्या दिसतात. अॅलोपथीच्या मर्यादा लक्षात घेऊन गेल्या अनेक वर्षांत रेकी, प्राणिक हीलिंग, संगीतोपचार यांसारख्या अनेक उपचारपद्धती लोकप्रिय होताना दिसत आहेत. अर्थात्, सुरू असलेल्या औषधांच्या जोडीनं ‘पूरक उपाय’ म्हणून या उपचाराचा फायदा होत असतो. मनोरंजनाच्या बरोबरीनं प्रकृती उत्तम ठेवण्यासाठी संगीताचा पुरेपूर उपयोग करून घेणं हे आता आपल्या हातात आहे.

यापुढच्या लेखात आपण गुरू-शिष्य परंपरेबद्दल जाणून घेऊ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com