‘ध्यासाला जोड हवी मेहनतीची’ (सुनंदन लेले)

sunandan lele
sunandan lele

‘‘क्षेत्र कोणतंही असो, तुम्हाला त्यात खरा रस असला, तर ‘उपरवाला’ त्याला प्राथमिक साथ मिळावी म्हणून गुणवत्ता देतोच. मग देवानं दिलेल्या गुणवत्तेला न्याय देण्याकरता आपण प्रामाणिकपणे मेहनत करतो का, हा बॉल आपल्या कोर्टात असतो. कोणाला मोठी मिळेल कोणाला छोटी; पण संधी प्रत्येकाला मिळतेच मिळते, असं माझं ठाम मत आहे. हाती आलेल्या संधीची कदर करणं आणि त्याचं सोनं करण्यासाठी सर्वस्व पणाला लावणं हे संपूर्णपणे आपल्या हाती आहे...’’ क्रिकेटपटू विराट कोहली यानं खास ‘सकाळ’ला दिलेली मुलाखत.

‘‘इतने दिन अनुष्काजी गाना गाती थी, की ‘दूरी सही जायी ना’...अब वोही गाना मैं गाना चाहता हूँ यार....शंभरपेक्षा जास्त दिवस झाले आणि तुझी भेट झालेली नाही...’’ विराट कोहलीबरोबर बातचीत चालू झाली, तेव्हा मी पहिला गुगली टाकला. ‘‘हो ना सर, खरंच असं गेल्या बारा वर्षांत झालं नाहीये- कारण क्रिकेट मैदानापासून ना मी लांब असतो ना तुम्ही- त्यामुळे भेट होतेच. आत्ताची परिस्थिती अभूतपूर्व आहे. संयम ठेवला पाहिजे सर...हम सब जानते है की ये मुसीबत भी जायेगी,’’ विराट मनापासून हसत हसत बोलला.

विराट कोहलीनं सन २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, तेव्हापासून गेल्या बारा वर्षांत असं झालंच नाही, की महिनाभर त्याच्याशी भेट झाली नाही. कोविड महासाथीनं सगळ्यांनाच पाठ्यक्रमाच्या बाहेरचे प्रश्न विचारून भेंडावून सोडलं. विद्यार्थी असो वा नोकरदार, आणि कारखानदार असो वा दुकानदार सगळ्यांच्या प्रगतीला चांगलीच खीळ बसली आहे. महासाथीपासून बचाव करत आपणा सगळ्यांना मेहनतीनं प्रगतीचा मार्ग परत शोधून काढावा लागणार आहे. मग मनात विचार आला, की कोण सकारात्मकरित्या सल्ला देईल. म्हणूनच पदार्पण ते सर्वोत्तमतेच्या ध्यासाचा प्रवास करणाऱ्या विराट कोहलीशी गप्पा मारून प्रगतीच्या चार पायऱ्यांयांचा प्रवास समजावून घ्यावा हा विचार पक्का केला. खास मुलाखत द्यायला विराट फारसा राजी नसतो; पण विषय त्याच्या मनाला पटला, तेव्हा मग तो ‘सकाळ’शी बोलायला तयार झाला.

गुणवत्ता आणि कामगिरी
विराट कोहली : क्षेत्र कोणतंही असो, तुम्हाला त्यात खरा रस असला, तर ‘उपरवाला’ त्याला प्राथमिक साथ मिळावी म्हणून गुणवत्ता देतोच, असं माझं म्हणणं आहे. मग देवानं दिलेल्या गुणवत्तेला न्याय देण्याकरता आपण प्रामाणिकपणे मेहनत करतो का, हा बॉल आपल्या कोर्टात असतो. वरच्यानं दिलेल्या देणगीला आपण किती विनम्रतेनं स्वीकारतो त्याकरता कृतज्ञ राहतो. कोणाला मोठी मिळेल कोणाला छोटी; पण संधी प्रत्येकाला मिळतेच मिळते, असं माझं ठाम मत आहे. हाती आलेल्या संधीची कदर करणं आणि त्याचं सोनं करण्यासाठी सर्वस्व पणाला लावणं हे संपूर्णपणे आपल्या हाती आहे.
मेहनत करून एका टप्प्यावर पोचणं त्या मानानं शक्य असतं प्रत्येकाला; पण तिथं जम बसवणं असो वा तिथून पुढं जाण्याची जिद्द असणं हा प्रवास खडतर होत जातो. कारण त्याच्याकरता अगदी नित्यनियमानं मेहनत करावी लागते. ही मेहनत नेहमी शारीरिक असते असं नाही. कधीकधी ही मेहनत विचार प्रगल्भ करण्याची असते. हे सगळं विचारपूर्वक आणि सातत्यानं करणं याला खूप महत्त्व आहे.

जम बसवणं
विराट कोहली : अभ्यास असो वा नोकरी, किंवा व्यवसाय असो वा खेळ कोणीही तुम्हाला हाताला धरून पुढं नेत नाही. जाणकार बडे बुजुर्ग हे असे कर आणि ते तसे कर असं काही मांडीवर बसवून संस्कार करत नाहीत. त्यांच्या जीवनशैलीकडे बघून, त्यांच्या मेहनतीच्या निष्ठेकडे बघून तुम्हाला त्या चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्या लागतात.
यात मला ‘जम बसवणं’ या मुद्दयावर वेगळा विचार मांडायचा आहे. क्षेत्र कोणतंही असो, जम बसवायचा विचार प्रत्येकाच्या मनात असतो; पण आपला जम बसवण्याच्या नादात आपण आत्मकेंद्री विचार करू लागतो का नाही, हे जरा तपासून बघा. नोकरी असेल, तर माझ्या कामाचा माझ्या खात्याला आणि पर्यायानं माझ्या ऑफिसला मोठा फायदा झाला, तर तुम्ही नाही तर तुमचं डिपार्टमेंट, तुमचं ऑफिस, तुमचा व्यवसाय हे जिंकतात. विद्यार्थी असाल, तर तुमचा वर्ग आणि शाळा किंवा कॉलेज जिंकतं. त्याचा थेट फायदा तुम्हाला होणार आहेच- कारण चांगल्या कामगिरीच्या यशानंतर तुमची नोकरीतली प्रगती किंवा अभ्यासातली, व्यवसायातली प्रगती कोणीच रोखू शकत नाही. तुम्ही खरे सांघिक माणूस बनता. तुम्ही तुमच्या चांगल्या कामानं आणि वर्तणुकीनं त्या त्या जागी ‘सकारात्मक गुणात्मक बदल’ घडवून आणता का हे तपासून बघा, म्हणजे तुम्हाला मी काय मुद्दा मांडतो हे लगेच समजेल. या विचारांनी मार्गक्रमण केलं, तर दोन गोष्टी होतात असा माझा अनुभव आहे. एकतर आपल्यावरचं दडपण दूर होतं- कारण तुम्ही आत्मकेंद्री विचार करत नाही. दुसरं म्हणजे तुम्ही इतका लांबचा आणि खडतर प्रवास कसा पार केला हे तुमचं तुम्हाला समजणार नाही.
मला लग्नानंतर खूप गोष्टी अनुष्काच्या विचारांमुळे उमगल्या. लग्नाअगोदर मी काहीसा आत्मकेंद्री होतो. लग्नानंतर जेव्हा दोन जीव एकत्र वेगळा प्रवास चालू करतात तेव्हा तुम्ही दुसऱ्याचा जास्त विचार करू लागता. अनुष्का मला समोरून सगळ्या पटणाऱ्या न पटणाऱ्या गोष्टी प्रामाणिकपणे आणि स्पष्ट सांगते- ज्यानं मला विचार करणं भाग पडतं. अनुष्कानं स्वत: अत्यंत तीव्र स्पर्धा असलेल्या क्षेत्रात काम करते आणि तिनं स्वत:चं स्थान निर्माण करायला खडतर प्रवास केला आहे. ती बऱ्याच गोष्टी स्पष्टतेनं बघू शकते, त्यामागे हेच कारण असेल. मला याचा खूप मोठा फायदा झालाय.

आत्मज्ञानाचा साक्षात्कार
विराट कोहली : प्रत्येकाला जीवनाच्या विविध टप्प्यांवर आत्मज्ञानाचा साक्षात्कार होतो. मला वाटतं, एका क्षणानंतर कोणी तुम्हाला जास्त काही शिकवू शकत नाही, की पटवू शकत नाही. जेव्हा त्या त्या गोष्टींची अनुभूती तुम्हाला आपणहून होते, तेव्हाच जीवनात बदल घडायला सुरुवात होते. मला खेळातल्या सुधारणेकरता सरावाचा किंवा नंतर तंदुरुस्तीकरता व्यायाम करायचा किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्याकरता हसतहसत शिस्त पाळण्याचा आत्मज्ञानाचा साक्षात्कार झाला आहे. मी झालेल्या साक्षात्काराचा आदर राखून प्रवास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, ही चांगली गोष्ट म्हणता येईल.
मला इतकंच सांगायचं आहे, की आत्मज्ञानाचा साक्षात्कार प्रत्येकाला होतोच होतो. त्यावेळी अनावश्यक गोष्टींकडे लक्ष देत आपण या सिग्नलकडे दुर्लक्ष केलं, तर मोठी चूक होते आणि प्रगतीला खीळ बसते. महत्त्वाची बाब ही आहे, की ही गोष्ट तुम्हाला कोणी शिकवू शकत नाही- कारण मुळातच हा आत्मज्ञानाचा साक्षात्कार असतो. तो तुम्हालाच समजून त्यावर सातत्यानं काम करावं लागतं. ‘उपरवालेने दी सिग्नलका आप कितना सम्मान करते हो, कितनी अहमियत देते हो उसके उपर आपकी प्रगती की गती निर्भर होती है.’

सर्वोत्तमतेचा ध्यास
विराट कोहली : काही काळ काम केल्यावर किंवा विद्यार्थी दशेत अभ्यास केल्यावर आपली खरी क्षमता काय आहे, हे कळून चुकतं. आपल्यात काय गुण, काय दोष आहेत. गुणांना खतपाणी घालून त्यात वृद्धी करणं किंवा ज्ञानाला धार आणणं गरजेचं आहे; तसंच दोष मान्य करून त्यात सुधारणा घडवत पुढं जाणं निर्णायक ठरतं. खेळाडूकरता अथक सुधारणेचा ध्यास मोठं काम करून जातो. मला सर्वोत्तमतेचा ध्यास आहे का नाही हे काळ ठरवेल; पण एक नक्की आहे, की मला भारतीय संघात आणि नंतर मी जिवापाड प्रेम करत असलेल्या क्रिकेटच्या खेळात एक संस्कृती रुजवायची आहे- ज्यात सर्व खेळाडू संघाचा विचार करून खेळतील, संघ कसा चांगली कामगिरी करेल आणि त्यात आपलं गुणात्मक योगदान काय असेल याचा विचार करतील. मला नुसतं बोलायला नाही आवडत, तर स्वत: कृतीतून ते सहकाऱ्यांना पटवून द्यायला आवडतं. सरावात सर्वस्व झोकून देणं जमलं, की सामन्यात प्रत्येक क्षणाला एकाग्रता टिकवून खेळणं कठीण जात नाही. संघाच्या भल्याचा विचार करून सगळे खेळू लागले आणि एक ध्येय समोर ठेवून अविश्रांत मेहनत हसतहसत करू लागले, की योग्य निकाल लागायला वेगळं काही करावं लागत नाही. मला एकच विनंती करायची आहे, की तुम्ही चांगले प्रयत्न करून आहे त्यापेक्षा जास्त चांगल्या अवस्थेत तुमचा संघ, तुमचं ऑफिस, तुमचं कुटुंब सोडू शकता.

अभ्यासक्रमाच्या बाहेरचे प्रश्न
विराट कोहली : आम्ही खेळाडू प्रत्येक सामन्याअगोदर समोरच्या संघाचा, मैदानाचा, खेळपट्टीचा अभ्यास करून रणनीती ठरवतो आणि सराव करून लढतीत उतरतो. तरीही सामना चालू झाल्यावर बऱ्याचवेळा समोरचा संघ भलतेच प्रश्न विचारून भंडावून सोडतो. आम्हा खेळाडूंना याची सवय असते, की खेळात अभ्यासक्रमाच्या बाहेरचे प्रश्न हमखास विचारले जातात- ज्याची उत्तरं तिथल्या तिथं शोधावी लागतात. कोविड महासाथीची परिस्थिती बघितली, तर मला जाणवतं, की आपण सगळेच वेगळीच परीक्षा देत आहोत. क्रिकेटपटू म्हणून मला फायदा इतकाच झाला आहे, की फलंदाज या नात्यानं मला कधी आक्रमक रूप धारण करावं लागतं, तर कधी एकदम संयम ठेवावा लागतो. कधी प्रमुख भूमिका बजावावी लागते, तर कधी आनंदानं दुय्यम भूमिका निभवावी लागते. याचा विचार करता मला कोविड महासाथीत जगणं खूप कठीण गेलेलं नाही. आलेली परिस्थिती स्वीकारून मार्ग शोधणं कठीण आहे; पण अशक्य नाही असंच वाटतं. परिस्थिती अनपेक्षित आहे, हे मान्य आहे. खरी मेख ही आहे, की या संकटाशी तुम्हाला लढायचं नाही. याच्यापासून दूर राहायचं आहे. स्वयंशिस्त हा शब्द या प्रक्रियेत मला मोलाचा वाटतो. स्वत:चा विचार करायचा; पण दुसऱ्याचाही जास्त करायचा. अंतिमत: सर्वांत मोठं चित्र काय साध्य करायचं आहे, याचा विचार सर्वोच्च ठेवायचा. आपण सगळ्यांनी एकच लक्षात ठेवायला हवं, की या युद्धात संयम बाळगून आणि शिस्तपालन करून आपण आपले योगदान देणे नितांत गरजेचे आहे. जर आपण ही शिस्त पाळली, तर जेव्हा हे संकट दूर होईल, तेव्हा ताज्या दमानं नवीन इनिंग खेळायला आपण सज्ज असू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com