"कष्ट आणि त्याग हसत करा' (सुनंदन लेले)

sunandan lele
sunandan lele

विख्यात बुद्धिबळपटू विश्‍वनाथन आनंद "कोविड-19' महासाथीमुळे जर्मनीत अडकून पडला आहे. खेळ प्राधिकरणाच्या एका उपक्रमाच्या निमित्तानं त्याच्याशी इंटरनेटद्वारे संवाद साधायची संधी मिळाली. करिअरच्या सुरवातीच्या टप्प्यापासून खेळ हे करिअर म्हणून निवडण्याबाबतच्या सल्ल्यांपर्यंत अनेक गोष्टी त्यानं उलगडल्या. या प्रत्यक्ष संवादावर आधारित हा वृत्तांत.

"सुनंदन, विश्वनाथन आनंदची मुलाखत घेशील का?'' माझा मित्र अभिजित कुंटेचा मला फोन आला तेव्हा मी चपापलो. खरंच...विश्वनाथन आनंदची मुलाखत घ्यायची संधी. क्‍या बात है... म्हणतात ना "नेकी और पुछ पुछ?'... मी क्षणार्धात होकार कळवला. स्पोर्टस ऍथॉरिटी ऑफ इंडियाचे डेप्युटी डायरेक्‍टर जनरल संदीप प्रधान आणि अभिजित कुंटे यांनी घाट घातला होता, की भारतीय खेळ प्राधिकरणाच्या निवडक उपसंचालकांसोबत विश्वनाथन आनंदची इंटरनेट मीटिंगद्वारे भेट घडवायची. मला त्या भेटीचं सूत्रसंचालन करत विश्वनाथन आनंदची मुलाखत घ्यायला मिळाली.
"कोविड-19'च्या महासाथीच्या समस्येत आनंद जर्मनीत अडकून पडला आहे. इंटरनेटद्वारे आनंदनं एक तासापेक्षा जास्त काळ मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे असे होते ः

बुद्धिबळ खेळायला लागल्यापासून ते पहिलं यश मिळेपर्यंतचा प्रवास...
आनंद : दहा वर्षांचा होण्याअगोदरच मला बुद्धिबळ खेळ मनापासून आवडू लागला. ही गोडी वाढत जायला लागली तसा मी राज्य स्तरावर सब ज्युनिअर वयोगटात खेळू लागलो. त्यावेळी तमिळनाडूत सब ज्युनिअर गटात माझ्यापेक्षा सरस खेळाडू होते. स्पर्धेत भाग घ्यायला लागल्यापासून मला जिंकणं कठीण जात होतं. त्यातून मला कणभरही निराशा येत नव्हती- कारण प्रत्येक लढतीतून मी शिकत होतो.
बाराव्या वर्षी मला आठवतं- हैदराबादला झालेल्या स्पर्धेत मी चौथा क्रमांक पटकावला आणि माझं मनोबल वाढलं. त्यावेळी मला असे नेमलेले प्रशिक्षक नव्हते. तमिळनाडूत चेस क्‍लब होते- त्याचा खूप फायदा झाला. शाळेचे उपमुख्याध्यापक टेबलटेनिसप्रेमी होते. त्यांनीही मला पाठिंबा दिला. माझे वडील रेल्वेमध्ये नोकरी करत असल्याने आम्हाला प्रवासात सवलत होती- त्याचा थोडा फायदा झाला. अखेर सन 1983 मध्ये मी पहिल्यांदा स्पर्धा जिंकलो. तसंच गोव्यात राष्ट्रीय सब ज्युनिअर स्पर्धेत विजयी ठरलो. भारतीय बुद्धिबळ संघटना भरपूर स्पर्धा सतत भरवत असल्यानं मला मुबलक प्रमाणात बुद्धिबळ स्पर्धा खेळता आल्या. त्यानंच सुधारणा झाली.

पालकांची भूमिका
आनंद : माझ्या पालकांनी मला कधीच बुद्धिबळ खेळण्यापासून मज्जाव केला नाही. शाळेत जाणं आणि अभ्यास पूर्ण केला, की त्यांचं बाकी काही मागणं नसायचं. मी ते बरोबर पूर्ण करून बाकीचा वेळ बुद्धिबळामध्ये रमू लागलो. मी चांगलं बुद्धिबळ खेळतोय, याचा त्यांना आनंद वाटायचा. मी बघत होतो, की माझ्या वयोगटात खेळणाऱ्या काही खेळाडूंचे पालक त्यांच्या मुलांवर सतत "जिंकण्याचं' दडपण टाकत होते. काहींना पोरगा खेळात रमतोय, तर त्याचं अभ्यासात पुढं काय होणार ही चिंता सतावत होती. माझ्या पालकांना उलटपक्षी बुद्धिबळ खेळल्यानं आपला पाल्य मेंदूचा योग्य वापर करायला शिकतो आहे, हे उमगलं होतं.
मला वाटतं, की प्रत्येक पालकाला हे कळायला हवं, की आपल्या मुलाला किंवा मुलीला खेळाच्या क्षेत्रात पुढे जायला घरून काय मदतीची गरज आहे. सर्वोत्तमतेचा ध्यास ठेवणं आणि त्याकरता भरपूर मेहनत करायला लावणं हे संस्कार पालक आणि प्रशिक्षक मिळून करतात- जे मोलाचे असतात. मात्र, असं करताना यश मिळायलाच हवं किंवा सतत सकारात्मक रिझल्टचं दडपण टाकणं विनाशाचं ठरू शकते. मलाही मुलगा आहे- त्यामुळे मी हाच विचार करतो आहे, की त्याला खेळातून आनंद कसा मिळेल आणि तो मनापासून मेहनत करण्याचं मोल कधी समजेल. तसं पोषक वातावरण पालक म्हणून मी आणि माझी पत्नी निर्माण करू शकलो, की आमचं काम झालं.

आयुष्यातला सुवर्ण काळ
आनंद : प्रत्येक खेळाडू हाच प्रयत्न करत असतो, की त्याचा चांगला फॉर्म जास्त काळ कसा टिकेल आणि खराब काळ लवकरात लवकर कसा संपेल. या प्रवासात तुम्हाला सर्वोत्तम खेळाडूंशी टक्कर देण्याची मानसिकता विकसित करावी लागते. जसजसे तुम्ही वरची पातळी गाठू लागता, तसा तुम्ही जसा समोरच्या प्रतिस्पर्ध्याचा नेटाने अभ्यास करता, तसाच अभ्यास समोरचा माणूस तुमचा करत असतो. एक नजर सतत तुमच्यावर रोखलेली असते. अर्थात दर स्पर्धेत यश मिळेल, असं होत नाही; पण चांगल्या खेळात सातत्य राखण्याचं आव्हान पेलावं लागतं. कधीही कोणतीही गोष्ट गृहीत धरून चालत नाही. सुधारणेचा ध्यास मनात बाळगावा लागतो. मी त्या काळात हे सर्व करू शकलो म्हणून तो चांगला फॉर्म मी प्रदीर्घ काळाकरता लांबवू शकलो. एका अर्थानं बारा वर्षांच्या काळाला तपश्‍चर्या का म्हणतात हे मला उमगलं.
याच काळात मी कास्पारोवबरोबर सतत खेळलो. त्याच्यासारख्या हुशार खेळाडूशी लढत देताना मला समजलं, की पुढची पायरी चढायची असेल, तर जे आवडत नाही त्याचाच सराव करणं सर्वांत मोलाचं ठरतं. होतं काय, की ज्या चाली, ज्या पद्धती तुम्हाला खेळाडू म्हणून आवडतात, त्यात सुधारणा आपोआप घडत राहते. अभ्यासाची गरज असते ती तुम्हाला न आवडणाऱ्या चाली किंवा डावपेच शिकताना. मग मला समजलं, की जे आवडत नाही त्याचा सराव करून तेच आवडायला लावणं ही प्रक्रिया खेळाडूला अंगिकारलीच पाहिजे. कोणताही खेळ असो समोरचा खेळाडू तुमच्या बलस्थानांपेक्षा तुमच्या कमजोरीचा अभ्यास जास्त करून त्यावर फटका मारायचा प्रयत्न करतो. म्हणून मला वाटतं, की आपली कमजोरी मान्य करून त्यावरच जास्त अभ्यास सराव केला गेला पाहिजे. यात ती त्रास देणारी सराव प्रक्रिया तुम्हाला आवडली पाहिजे. रोज सुधारणेचा ध्यास खेळाडूला पुढच्या पातळीवर घेऊन जातो.

बुद्धिबळाच्या खेळात तंत्रज्ञानाचा वापर
आनंद : होय हे सत्य आहे, की बुद्धिबळाच्या खेळात संगणक येऊन स्थिरावला आहे आणि आता आर्टीफिशिअल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञानही येऊन दाखल झालं आहे. मानवी मेंदूपेक्षा संगणक खूपच वेगानं बुद्धिबळाच्या चालींबाबत विविध पर्यायांचा विचार करू शकतो. खरी मेख अशी आहे, की संगणक ज्या विविध चाली सुचवतो त्यामागचा विचार काय आहे हे खेळाडूला कळणंही गरजेचं आहे. म्हणून मी काय सुचवीन, की बुद्धिबळाच्या पटावर कोणत्याही परिस्थितीला तुम्ही विचार करून तुमच्या पाच सर्वोत्तम चाली पर्याय म्हणून नोंदवा आणि मग संगणकाला तीच परिस्थिती सांगून तो काय सुचवतो याची तपासणी करा. मग तुम्हाला कळेल, की तुम्ही काय विचार करायला कमी पडलात.
काही खेळाडू फारच तंत्रज्ञानाच्या मागं लागतात. मान्य आहे, की त्याचा वापर करायला हवा खेळ सुधारण्याकरता; पण अखेर जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष लढती करता बसता, तेव्हा तुम्हाला तुमच्या मेंदूचा वापरच करावा लागतो ना!! म्हणून तयारी करताना तंत्रज्ञानाच्या आहारी किती जायचं याचं तारतम्य बाळगणं गरजेचं आहे.

खेळ कारकीर्द म्हणून निवडताना
आनंद : बरेच लोक म्हणतात, की खेळ करिअर म्हणून निवडताना धोका खूप आहे. होय मान्य आहे; पण मला सांगा कोणतं क्षेत्र एकदम सुरक्षित आहे मला सांगा. सगळ्याच क्षेत्रात काही ना काही धोका आहेच ना. खेळ कारकीर्द म्हणून निवडताना सर्वांत महत्त्वाची बाब मला वाटते ती म्हणजे हा निर्णय कोणी थोपवलेला आहे का खेळाडूनं मनापासून निवडलेला आहे. तसं बघायला गेलं, तर बुद्धिबळ असा खेळ आहे, की तुम्ही बाकी शिक्षण पूर्ण करून किंवा नोकरी करूनही तो मोठ्या स्तरावर खेळू शकता. मात्र, हा खेळ असाही आहे, की खेळताना तुम्हाला अभ्यास किंवा नोकरीचं आठवणार नाही; पण अभ्यास करताना किंवा नोकरी करताना बुद्धिबळाचा पट मनातून दिसत राहील.
मला वाटतं, की बारा-तेरा वर्षांचा असताना कोणाही खेळाडूला बुद्धिबळाच्या खेळात करिअर करायचा सल्ला देऊ नये. खेळाडूला खेळाची गोडी कशी लागते याकडे लक्ष द्यावं. मोठ्या स्तरावर जाण्याकरता खेळाडूला कष्ट आणि त्याग हसत करता यायला हवा. मी असंही सुचवीन, की खऱ्या वरच्या स्तरावर खेळायचा विचार असेल, तर खेळाडूला एक पूर्ण आठवडा काहीशा शांत एकांतवासाच्या जागी राहता येऊन फक्त बुद्धिबळाचा विचार करता येतो का हे ज्याचं त्यानं तपासावं. स्पोर्टस ऍथॉरिटी ऑफ इंडियासारख्या अग्रणी संस्था यात समुपदेशनाचं मोलाचं कार्य करत आहेत. खेळाडूला योग्यवेळी योग्य सपोर्ट कसा मिळेल हे बारकाईनं बघत आहेत. खेळाडूंच्या जडणघडणीत स्पोर्टस ऍथॉरिटी ऑफ इंडियासारख्या संस्थेची भूमिका अमूल्य ठरणार आहे.

"कोविड-19' महासाथीनं जग बदललं. त्याबाबत...
आनंद : बघ ना आपल्या डोळ्यांसमोर जग बदललं. जानेवारीत मी हॉलंड देशातल्या स्पर्धेत खेळत होतो. त्यावेळी माझ्या कानावर कॅनडात तिथलं सरकार कोविड-19 महासाथीला तोंड कसं द्यायचं याची तयारी करतानाच्या बातम्या आल्या आणि आता आपण बघतो आहोत, की आपलं जग 2020 वर्ष चालू होताना होतं तसं परत दिसणार नाहीये. सगळं सगळं बदलणार आहे. तसं बघायला गेलं, तर बुद्धिबळ खेळणाऱ्या माझ्यासारख्या लोकांना तयारी करायला तासन्‌तास घरात थांबणं अनोळखी नाहीये. तरीही ही परिस्थिती आपल्याला वेगळ्या जाणिवा करून देत आहे. माझ्या पन्नास वर्षांच्या जीवनात असा प्रसंग आलाच नव्हता ना. आपल्या सगळ्यांना आता समजलं आहे, की बाकी कशाहीपेक्षा मानवी जीवनाला खूप महत्त्व आहे. आशा आहे, की परिस्थिती सुधारेल आणि मला लवकरच जर्मनीहून मायदेशी परतता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com