esakal | विद्रोही कवितांनी दिली वेगळी दिशा
sakal

बोलून बातमी शोधा

Story-Reading

ग्रंथप्रभाव
माझा जन्म सातारा जिल्ह्यातील साखरवाडीचा. माझं बालपण, माझं संपूर्ण शिक्षण हे सातारा इथंच झालं. माझ्या लहानपणी म्हणजे जवळपास ५०-६० वर्षांपूर्वी वाचन हीच संस्कृती होती. त्या काळी खास करून पोथी वाचन हे जास्त जवळचं वाटायचं.

विद्रोही कवितांनी दिली वेगळी दिशा

sakal_logo
By
सयाजी शिंदे saptrang@esakal.com

माझा जन्म सातारा जिल्ह्यातील साखरवाडीचा. माझं बालपण, माझं संपूर्ण शिक्षण हे सातारा इथंच झालं. माझ्या लहानपणी म्हणजे जवळपास ५०-६० वर्षांपूर्वी वाचन हीच संस्कृती होती. त्या काळी खास करून पोथी वाचन हे जास्त जवळचं वाटायचं. दर श्रावणात गावातली सगळी मंडळी जमायची आणि पोथी वाचनाचे कार्यक्रम व्हायचे. आणि त्या वाचनावेळी सांगितलेल्या पुराणकथांची आपापसात देवाणघेवाण व्हायची; लोकं त्या गोष्टी आचरणात आणायचे. मीही त्यावेळी कृष्णाच्या कथा, रामायण, महाभारत वाचायचो.

लहानपणापासूनच या सगळ्या कथा ऐकत, वाचत असल्यामुळे त्या वयात माझ्यात वाचनाची आवड निर्माण झाली. मग थोडं मोठं झाल्यावर गो. नी. दांडेकर यांचं ‘माचीवरला बुधा’ हे पुस्तक, वि. स. खांडेकर यांची ‘अमृतवेल’ ही कादंबरी मी आठवी - नववीत असताना वाचली. माझा सगळ्यात आवडता आणि जवळचा विषय होता मराठी. त्यामुळं शालेय शिक्षण झाल्यावर मी सातारा येथील लालबहादुर शास्त्री महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला. 
तेव्हा मला प्राध्यापक शंकर पाटील आणि कुंभोजकर सर यांनी मला मराठीतल्या एका वेगळ्या साहित्य प्रकाराची आवड लावली; तो साहित्य प्रकार म्हणजे कविता. त्यावेळी विद्रोही कविता हा काव्यलेखनाचा नवीन प्रकार आला होता. या प्रकारामुळे मला कविता वाचनाची आवड निर्माण झाली. यासोबतच ज्ञानेश्वरीचा सोळावा अध्याय, वेगवेगळ्या कवींच्या कविता, कादंबऱ्या अभ्यासाला होत्या. त्यामुळे महाविद्यालयीन काळात विविध प्रकारच्या पुस्तकांचं सखोल वाचन झालं. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाविद्यालयात असतानाच मी एकांकिकांमध्ये कामं करायला लागतो, नाटकांत कामं करायला लागलो तसतशी माझ्या मनातली कवितांविषयीची आवड आणखी वाढत गेली. मग तेव्हा मी वेगवेगळ्या नाटककारांनी लिहिलेली नाटकं वाचायला लागलो. ग्रंथालयात जाऊन रोज एक तरी नाटक वाचायचं हा मी निर्धार केला होता. त्याप्रमाणे राम गणेश गडकरी, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, वि. वा. शिरवाडकर अशा अनेक दिग्गजांची नाटकं मी वाचली. 

याशिवाय त्याच काळात मला कन्स्तान्तिम स्तानिस्लावस्की यांच्या श्बोता अकत्त्योय नाद सबोय या रशियन पुस्तकाचा नारायण काळे यांनी मराठीत केलेल्या अनुवादाचं पुस्तकं मिळालं. त्या मराठी पुस्तकाचं नाव अभिनय साधना. ते पुस्तकं मी वाचायला सुरुवात केली आणि मला ते इतकं आवडलं की त्या या पुस्तकाचा मी फडशा पडला. दिवस रात्र मी ते पुस्तक वाचायचो. त्यानंतर लग्न झाल्यावर मी मुंबईला राहायला आलो. इथे आल्यावरही माझ्याकडे दुपारी १२ ते ४ हा वेळ रिकामा असायचा. तेव्हा मी ग्रंथालयात जाऊन  अभिनय साधना आणि भूमिका शिल्प या दोन पुस्तकांच्या नोट्स काढू लागलो. यासोबतच भरतमुनींनी लिहिलेलं नाट्यशास्त्र वाचलं. 

सप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा.

त्या ४-५ वर्षात मी नाट्यशास्त्राचा सखोल अभ्यास केला. काही वर्षांनी जसजसा मी चित्रपटांमध्ये काम करू लागलो, दक्षिणेकडच्या चित्रपट सृष्टीत काम करू लागलो तसं माझं वाचन थोडंसं मागे पडलं. परंतु गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात मी अनेक पुस्तकं वाचली. ‘हिंदू’ कादंबरी त्याच काळा वाचली, रंगनाथ पठारे यांची सातपाटील ही कादंबरी वाचली. तसंच आताच्या काळातील, पूर्वीच्या काळातील अनेक कवींच्या कविता मी वाचल्या. अभिनयासोबत मी गेली कित्येक वर्ष सामाजिक कार्यातही सक्रिय आहे.

श्रीकांत इंगळहळ्ळीकर यांचा झाडांवरचा अभ्यास खूप चांगला आहे तो मी वाचला आहे. त्याचं ''लीफ बेस्ड आयडेंटीफिकेशन फॉर ट्रीज ऑफ सह्याद्री'' हे  पुस्तकं मला आवडलं. ज्यात त्यांनी ४०० झाडांच्या पानांवरून झाडं कशी ओळखायची हे  सविस्तर सांगितलेलं आहे. सामाजिक क्षेत्रात काम करताना मला भेटलेली माणसं हीच मोठी ग्रंथ संग्रहालय आहेत असं म्हणायलाही हरकत नाही. आता जसजसं तंत्रज्ञान प्रगत होत चाललं आहे तसतसे आपल्याला वाचन करण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे जसा देश तसा वेष ही पूर्वीपासून आपल्याला परिचित असलेल्या म्हणीनुसार आपण वागलं पाहिजे. वाचनासाठी नवीन माध्यमांचा वापर केलाच पाहिजे; परंतु वाचन करणं हे आयुष्यभर सुरू राहिलं पाहिजे.

Edited By - Prashant Patil