सावध, ऐका पुढल्या हाका...

कळत-नकळत कधी कुठून बाधा होईल याचा नेम नाही. असं असलं तरीही जीवनरहाटी जशी सुरूच आहे, तशीच खेळांची दुनियाही पुन्हा एकदा पाय घट्ट रोवत आहे.
सावध, ऐका पुढल्या हाका...
Summary

कळत-नकळत कधी कुठून बाधा होईल याचा नेम नाही. असं असलं तरीही जीवनरहाटी जशी सुरूच आहे, तशीच खेळांची दुनियाही पुन्हा एकदा पाय घट्ट रोवत आहे.

कोरोनाची तिसरी लाट पहिल्या लाटेइतकी धोकादायक नसली तरी कमालीचा संसर्ग पसरवणारी ठरत आहे.

कळत-नकळत कधी कुठून बाधा होईल याचा नेम नाही. असं असलं तरीही जीवनरहाटी जशी सुरूच आहे, तशीच खेळांची दुनियाही पुन्हा एकदा पाय घट्ट रोवत आहे. भारतात सुरू असलेल्या व्यावसायिक लीग प्रो कबड्डी आणि आयएसएलमध्ये काही खेळाडूंना संसर्ग झाला तरी स्पर्धा सुरू आहेतच. ‘इंडिया ओपन’ आणि ‘सय्यद मोदी बॅडमिंटन’ या कोरोनानंतर देशात झालेल्या पहिल्या मोठ्या स्पर्धाही हेच अडथळे ओलांडून पार पडल्या. मात्र, प्रतिष्ठेच्या `एएफसी महिला आशियाई करडंक स्पर्धे`त भारतीय संघाचं मोठं नुकसान झालं. कबड्डी, फुटबॉल, बॅडमिंटन हे

सर्व खेळ एका बाजूला आणि भारतात सर्वाधिक बोलबाला असलेलं क्रिकेट आणि त्यातही लाईट-ॲक्शन-कॅमेरा असा झगमगाट असलेली आयपीएल दुसऱ्या बाजूला असं चित्र आहे. आता आयपीएल अधिक व्यापक होऊन, म्हणजे आठऐवजी दहा संघ असलेली स्पर्धा, भारतासह सर्व क्रिकेटक्षेत्रावर आपली मोहिनी टाकण्यास सज्ज होत आहे...रंगमंच तयार होत असला तरी दिल्ली अजून दूर आहे आणि तिथपर्यंत पोहोचण्यात अनेक अडथळे आहेत.

थोडंसं मागं वळून पाहिलं तर, गेल्या एप्रिल-मे महिन्यात डेल्टाच्या कहरातही आयपीएल सुरू झाली होती. एकीकडे प्राणवायूसाठी सर्वसामान्यांची धडपड सुरू असताना आयपीएलचा फड रंगत होता. अखेर, काही खेळाडू बाधित झाल्यानंतर स्पर्धा अर्ध्यात थांबवण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित स्पर्धा अमिरातीत पार पडली खरी; परंतु भारतीय खेळाडूंची एकूणच झालेली दमछाक आणि तिचा परिणाम झाल्यामुळे ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत झालेली वाताहत विसरता येण्याजोगी नाही.

आता वास्तवाकडे पाहू या. काही दिवसांत पूर्ण दहाही संघांसाठी खेळाडूंचा महालिलाव होणार आहे. त्यानंतर महिन्याभरानंतर आयपीएल आपला तंबू उभारणार आहे. त्यासाठी ठिकाणही निश्चित होत आहे. मुंबई-पुणे यांवर आता शिक्कामोर्तब होणं शिल्लक आहे. सन २०२० ची पूर्ण स्पर्धा आणि २०२१ मधील अर्धी स्पर्धा अमिरातीत खेळवून बीसीसीआयनं खेळाडूंसह आयपीएलशी संबंधित असलेल्या कुणाचंही नुकसान होऊ दिलं नाही, हा सौरव गांगुली अध्यक्ष असलेल्या बीसीसीआयचा मुत्सद्दीपणा होता; पण पुन्हा तोच धोका समोर उभा राहू पाहत आहे. वेस्ट इंडीजविरुद्धची मर्यादित षटकांची मालिका सुरू होण्यास काही दिवस शिल्लक असतानाच चार खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील तिघं-चौघं बाधित झाले. संघातील सर्व जण आपापल्या राहत्या शहरातून मुंबई एकत्र आले आणि तिथून ते अहमदाबादला रवाना झाले. घरातून निघताना त्यांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या होत्या, म्हणजे विमानप्रवासादरम्यान संसर्ग झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. शिखर धवन (दिल्ली), श्रेयस अय्यर (मुंबई) आणि ऋतुराज गायकवाड (पुणे) यांना नेमका कुठं संसर्ग झाला याचा शोध घेणं महत्त्वाचं आहे.

इतिहासाची पुनरावृत्ती नको

आयपीएलसाठी अनेक परदेशी खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ बाहेरून भारतात येणार आहे, त्यामुळे आयपीएलचा संघ हा संघखेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांच्यासह कमीत कमी ३० जणांचा असतो. आता असे १० संघ असणार आहेत, त्यामुळे इतक्या जणांची काळजी घेत दोन महिन्यांची स्पर्धा पार पाडणं सोपं नाही.

परदेशात आयपीएल खेळवणं खर्चिक असतंच आणि आता गतवर्षीप्रमाणे मध्यावर स्पर्धा थांबवणं आणि पुन्हा अर्ध्या स्पर्धेसाठी परत प्रयत्न करणं हे दरवेळी शक्य होईलच असं नाही, तसंच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत ऑस्ट्रेलियात ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होऊ द्यायची नसेल तर पुढचा धोका ओळखून बीसीसीआयला आत्ताच पावलं उचलावी लागणार आहेत. History repeats itself असं म्हटलं जातं ते उगीचच नाही.

‘रणजी’चं शिवधनुष्य कसं पेलणार?

अगोदरचा इतिहास पाहता, बीसीसीआयला अनेक अडथळे पार करायचे आहेत. बीसीसीआयची तिजोरी भरण्यासाठी आयपीएल ही महत्त्वाची स्पर्धा असेल; पण देशाच्या क्रिकेटचा पाया बळकट ठेवण्यासाठी रणजी स्पर्धा होणं हेही सर्वाधिक महत्त्वाचं आहे. सन २०२१ चा मोसम पूर्णपणे गेला. यंदाच्या मोसमासाठी शिवधनुष्याला हात घातला गेला आहे खरा; पण ते व्यवस्थितपणे उचलण्याचं कार्य त्याहूनही अधिक कठीण आहे. देशातील ३८ संघ एकत्र येणार आहेत. भले गटवारीनुसार पाच ठिकाणी त्यांची विभागणी करण्यात आली आहे; परंतु आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी असलेलं जैवसुरक्षा वातावरण त्यांच्यासाठी नसेल, त्यामुळे स्वतःची काळजी खेळाडूंना स्वतःच घ्यावी लागणार आहे. दुर्दैवानं खेळाडूंना लागण झाली तर चाचण्यांच्या आणि विलगीकरणाच्या फेऱ्यात खेळाडूंसाठी मोसमच वाया जाऊ शकेल. परिणामी, आयपीएलएवढंच लक्ष रणजी स्पर्धेवरही देणं अनिवार्य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com