‘देश अधिकच दुभंगत चालला आहे काय?’ असा प्रश्न एका संपादकांनी मला विचारला. आपल्या समाजाला आज तीव्रतेने भेडसावणाऱ्या जातीय दंगली, मॉबलिंचिंग किंवा गोरक्षकांचा हिंसाचार यासारख्या गोष्टींमुळेच त्यांनी हा प्रश्न विचारला असणार.
- शशी थरूर saptrang@esakal.com
‘देश अधिकच दुभंगत चालला आहे काय?’ असा प्रश्न एका संपादकांनी मला विचारला. आपल्या समाजाला आज तीव्रतेने भेडसावणाऱ्या जातीय दंगली, मॉबलिंचिंग किंवा गोरक्षकांचा हिंसाचार यासारख्या गोष्टींमुळेच त्यांनी हा प्रश्न विचारला असणार. पण तो ऐकल्या ऐकल्या आता नेहमीच्याच झालेल्या या साऱ्या निराशाजनक घटना काही माझ्या डोळ्यासमोर आल्या नाहीत. आजकाल हिजाब, हलाल किंवा भोंगे आणि अजान यासंबंधी हेतुपुरस्सर निर्माण केलेल्या वादांचाही विचार त्या क्षणी माझ्या मनात आला नाही. या साऱ्या वादांनी आपल्या देशातील मुस्लिम अल्पसंख्यांकांना अलग आणि दुय्यम बनवले आहे यात शंकाच नाही. तथापि संपादकांचा हा प्रश्न ऐकल्याक्षणी गेल्या काही दिवसांत माझ्या कानावर पडलेल्या तीन वेगवेगळ्या प्रसंगांची मला प्रकर्षाने आठवण झाली. वरवर पाहता हे प्रसंग किरकोळ वाटतील. परंतु समाजघटकांत निर्माण झालेल्या दरीचे, अगदी स्पष्ट नसले तरी थेट दर्शन मला या तिन्ही प्रसंगातून घडले.
प्रसंग पहिला :
जयपूरमध्ये नुकतीच माझी भेट एका सोनेरी केसांच्या लेबॅनीज महिलेशी झाली. गेली पंधरा वर्षे ही महिला हस्तकला आणि दागदागिने यांच्या व्यापारासाठी भारतात येत असते. ती परदेशी आहे हे चेहऱ्यावरूनच लक्षात येतं सगळ्यांच्या. परंतु भारतात तिचं यापूर्वी मोठ्या प्रेमाने स्वागत होत असे. 'नूर' हे तिचे नाव ऐकताच लोक म्हणत, 'किती छान नाव आहे तुमचं! आमच्याकडेही आहे हं हे नाव. त्याचा अर्थ प्रकाश असा होतो. माहिताय आम्हाला.' पण आज तिला विचाराल तर ही परिस्थिती बदललीय. 'नूर' असे आपले नाव तिने सांगताच आज लोक पटकन म्हणतात, 'हं , मुसलमान ना?' हा थेट प्रश्न आणि त्या प्रश्नाचा नूर सांगायचं ते सगळं सांगून जातो. पूर्वीप्रमाणे यापुढेही दरवर्षी इथं यावं की न यावं असा प्रश्न आता नूरला पडलाय.
प्रसंग दुसरा :
परराष्ट्र मंत्रालयातील आपल्या कारकीर्दीत एक भारतीय राजदूत पाकिस्तान आणि इस्लामी दहशतवाद याविरुद्ध अत्यंत कठोर भूमिका घेत. "ससाणा" च म्हणत त्यांना. त्यांनी आपल्या एका मित्राची कहाणी मला सांगितली. हे मित्र काबूलमधील एक ख्यातनाम सर्जन आहेत. आपल्या देशात तालिबानचा प्रभाव वाढतो आहे हे पाहून त्यांना तीव्र चिंता वाटू लागली. वाढत्या इस्लामी दहशतवादापासून आपले कुटुंब सुखरुप रहावे म्हणून या भारतीय राजदूत मित्राच्या सल्ल्यानुसार त्यांनी आपल्या मुलांना शिकायला त्यांच्या आईसह भारतात पाठवले. ध्यानात घ्या, भारतात पाठवले, पाकिस्तानात नव्हे ! गुरगावमध्ये एक फ्लॅट त्यांनी भाड्याने घेतला आणि आपल्या मुलांना एका चांगल्या शाळेत दाखल केले. पण हा निर्णय घेत असताना आपल्या कल्पनेत होता तसला भारत आता प्रत्यक्षात राहिलेला नाही हे वर्षभरातच त्यांच्या लक्षात आले. एक दिवस तर एक अतिशय त्रासदायक अनुभव त्यांच्या वाट्याला आला. या सर्जनची मुले साहजिकच अपार्टमेंटमधील इतर मुलांशी रोज खेळत असत. एके दिवशी ती मुले त्यांना म्हणाली, 'तुम्ही मुस्लिम आहात. आमच्या आईबाबांनी तुमच्याशी न खेळण्याची ताकीद आम्हाला दिलीय.' हे कळताच माझ्या राजदूत मित्रांना धक्काच बसला. निराश होऊन त्यांनी आपल्या सर्जन मित्रांना सांगितलं, 'तुमच्या मुलांना तुम्ही आता दुबईला किंवा लंडनला घेऊन जा. त्यांना माझ्या देशात ठेवण्याचा सल्ला मी तुम्हाला दिला याबद्दल मी खरोखरच शरमिंदा आहे.'
प्रसंग तिसरा :
यूनोच्या एका भारतीय अधिकाऱ्याबाबत घडलेला हा प्रसंग आहे. या अधिकाऱ्याला शांतता प्रस्थापनेसाठी वाटाघाटी करण्याचा दांडगा अनुभव होता. मध्य आशियातील अनेक अशांत प्रदेशांत त्याने अशी कामगिरी बजावली होती. काही दिवसांपूर्वी एका दाढीधारी, फेटाधारी आणि बंदूकधारी इस्लामी दहशतवाद्याबरोबरच्या बैठकीदरम्यान मात्र प्रचंड तणावाला सामोरे जाण्याची पाळी त्याच्यावर आली. सुरुवात तर छान झाली होती. रमजान महिना असूनही या दहशतवाद्याने खुशीत येऊन या युनो अधिकाऱ्याला सिगारेट देऊ केली आणि तो अगदी मनमोकळेपणाने हसू बोलू लागला. अतिशय जटिल समस्यांवर चर्चा होत असतानाही त्याने चिक्कार विनोदबिनोद केले. आणि मग एका क्षणी त्याने सहज विचारले, 'मूळचे कुठले तुम्ही?' 'भारत' हे उत्तर या अधिकाऱ्याच्या तोंडातून बाहेर पडताच बैठकीचा नूर क्षणार्धात पालटला. 'भारतातले तुम्ही? मुसलमानांना तुमच्या देशात तुम्ही कशी वागणूक देताय हे ऐकून आहे मी. उठा आणि निघा येथून पटकन. नाहीतर तुमचे जे काही होईल त्याला जबाबदार मी असणार नाही सांगून ठेवतो.' तुम्हाला चुकीची माहिती मिळालीय अशी समजूत पटवण्याचा या अधिकाऱ्याने परोपरीने प्रयत्न केला. बरोबरच्या दुसऱ्या युरोपिअन अधिकाऱ्यानेही त्याला दुजोरा दिला. पण हा दहशतवादी काही शांत झाला नाही. अनेक ठिकाणांहून आपल्याला ही माहिती मिळालीय. दहशतवादी असलो तरी जगभरातील माध्यमं आपण वाचत असतो, पहात असतो याची जाणीव त्याने या अधिकाऱ्यांना करून दिली. बैठक अर्थातच तिथेच संपुष्टात आली. कसाबसा आपला प्राण वाचवून भारतीय अधिकाऱ्याने बाहेरचा रस्ता पकडला.
केवळ अशा प्रसंगांच्या आधारे वस्तुस्थितीचे विश्लेषण करण्याला मर्यादा असतात याची जाणीव मला आहे. हे सारे वेगवेगळ्या परिसरातील आणि परस्परांशी संबंध नसलेले प्रसंग आहेत. गेल्या दोनतीन आठवड्यातच ते माझ्या निदर्शनास आले. आपल्या समाजातील जातीय दरी किती मोठ्या प्रमाणात रुंदावली आहे हीच बाब या तिन्ही प्रसंगांतून स्पष्ट होते. जातीय ध्रुवीकरण व्हावे या क्षुद्र राजकीय हेतूपायी आपल्या देशाच्या राजकीय जीवनात हे विष पेरले गेले आहे. परंतु या विषाचे दूरगामी परिणाम पेरणाऱ्यांच्या खात्यावर जमा होणाऱ्या निवडणुकीतील यशापुरतेच मर्यादित न राहता सर्वदूर जाणवत आहेत. आपल्या साऱ्या समाजालाच त्याने विषाक्त करून टाकले आहे. आपला भारत यापूर्वी कधीही नव्हता असा वेगळाच देश बनू लागला आहे.
झालेल्या या बदलाचे पदर पदर तपासणे, त्यांची विश्लेषक चिकित्सा करणे काही अशक्य नाही. ज्या गोष्टी पूर्वी आपल्या घराच्या चार भिंतीआड बोलणेसुद्धा अयोग्य मानले जाई त्या गोष्टी आज सार्वजनिक व्यासपीठावरून उघडपणे बोलल्या जात आहेत. इतकेच नव्हे तर त्या चित्रित करून समाजमाध्यमांवर प्रसृत केल्या जात आहेत. कट्टर धर्मांध मतप्रणाली आता उघड उघड व्यक्त केली जात आहे. द्वेषयुक्त भाषणे तर इतकी सर्रास होत आहेत की त्यावर फारसे कुणी बोलतही नाही. एक काळ असा होता की जातीय सलोख्याचे उदाहरण घालून देण्यासाठी आणि तो बिघडवणारे वर्तन जनतेला नापसंत आहे हे दाखवून देण्यासाठी संघराज्य आणि घटकराज्यांचीही सरकारे आपल्या मर्यादेपलिकडे जाऊन प्रयत्न करत असत. आज अधिकारपदावर असलेले लोक अशा उदगारांच्या निषेधार्थ चकार शब्द शक्यतो काढत नाहीत. त्या उद्गारांमुळे हिंसा उफाळली तर चिथावणी देणाऱ्या लोकांविरुद्ध कोणतीही कारवाई करत नाहीत. अट एकच. अशी चिथावणी देणारी माणसे “बहुसंख्यांक समाजाची” असली पाहिजेत.
‘गंगा जमनी तहजीब’ उत्साहपूर्वक आचरली जाई आणि ‘राष्ट्रीय एकात्मता’ निव्वळ घोषणेत नव्हे तर व्यवहारातही दिसे अशा भारतात मी लहानाचा मोठा झालो. आज बहुसंख्यांकवाद हाच राष्ट्रवाद मानला जात आहे आणि सामर्थ्यशाली समाजाच्या म्हणण्यापुढे निमूटपणे मान तुकवणे हाच एकात्मतेचा अर्थ उरला आहे. माझ्या बालपणी ‘अमर अकबर अँथनी’ सारख्या चित्रपटांना करमणूक कर माफ केला जाई. तान्ही बाळे असतानाच ताटातूट झालेल्या, पुढे हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन कुटुंबात मोठे झालेल्या आणि अखेरीस एकत्र येऊन दुष्प्रवृत्त लोकांवर विजय मिळवणाऱ्या तीन मुलांची ती कथा होती. आज ‘द काश्मीर फाईल’ हा चित्रपट संपताच तो आवडणारे लोक चित्रपटगृहातच मुसलमानांचा बदला घेण्याच्या आरोळ्या ठोकत आहेत आणि असल्या चित्रपटाला करमाफी मिळत आहे.
अखिल मुस्लिम जगतात त्याकाळी भारतीयांना आदराने आणि सन्मानाने वागवले जाई. मुस्लिम नागरिक अभिमानपूर्वक ज्याला आपली भूमी म्हणून मिरवतात असा हा देश आहे हे सर्व भारतीयांना मिळणाऱ्या या सन्मानाचे एक प्रमुख कारण होते. आज भारत म्हटले की मुसलमानांना सोसावा लागणारा त्रास आणि वेगाने फैलावणारा इस्लामोफोबिया जगाच्या डोळ्यासमोर येतो.
एक काळ असा होता की भारतात तब्बल १८ कोटी मुसलमान रहात असूनही केवळ मूठभर भारतीय मुस्लिमच तालिबान,अल कायदा किंवा दाइश (आयसिस) सारख्या इस्लामी दहशतवादी संघटनांत सामील झाले ही गोष्ट परदेशी लोकांना आम्ही मोठ्या अभिमानाने सांगायचो. भारतीय मुस्लिमांना भारत हा मनापासून आपला स्वतःचा देश वाटे आणि भारताच्या यशात आपला वाटा, आपली गुंतवणूक आहे असेच ते मानत हे त्याचे कारण होते. आज ‘भयग्रस्त होऊन तुटलेपण अनुभवणारे अल्पसंख्यांक’ या विषयावरच जास्त बोलणे होते. शक्य असेल तर भारत सोडून दूर जावे या निर्णयाप्रत येणाऱ्या मुस्लिमांबद्दल बोललं जातं. किंवा इस्लामी प्रवचनांमुळे नव्हे तर भारतात स्वतःलाच आलेल्या अनुभवांमुळे जहाल बनू लागलेल्या मुस्लिमांचा विषय निघतो. अतिरेकी विचारांची स्वीकारार्हता वाढत चालली आहे असे गुप्तचर अधिकाऱ्यांनाही आता वाटू लागले आहे.
जातीय दरी नुसती रुंदावत चाललेली नाही. आपल्या समाजात तिचं विष पुरतं भिनलंय. आणि अधिकाधिक जालिम बनत चाललंय. त्याच्या अतर्क्य दुष्परिणामांच्या अनेकविध शक्यता खुल्या होऊ लागल्या आहेत. अगणित अव्यक्त धोके समोर दिसत आहेत. राष्ट्रीय एकात्मतेच्या युगाचा अंत झालाय. आता निदान राष्ट्रीय विघटनाचे युग तरी येऊ नये अशी दक्षता घेण्याचे शहाणपण आपल्या राज्यकर्त्यांना सुचो अशी आशा बाळगणेच काय ते आपल्या हातीं उरले आहे.
अनुवाद : अनंत घोटगाळकर
anant.ghotgalkar@gmail.com
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.