esakal | तुम्हाला माहिती आहे? महाराष्ट्राची छवी राजावत कुठे राहते...
sakal

बोलून बातमी शोधा

She is the Maharashtra's Chhavi Rajawat

राजस्थान राज्यातील सोडा या छोट्याशा गावची कमी वयाची आणि उच्चशिक्षित असलेली सरपंच छवी राजावत ही जगविख्यात आहे. अशीच एक छवी गडचिरोली जिल्ह्यातील कोठी या गावात आहे. ती कोठी गावची सरपंच आहे. छवीसारखीच उच्चशिक्षित...आणि हो छवीपेक्षा कमी वयात सरपंच झालेली. लोकांनीच तिला सरपंच केले आणि लोकांसाठी ती अक्षरशः झटत आहे. महाराष्ट्राची छवी ठरलेली ही सरपंच कोण...सांगताहेत लोकबिरादरी प्रकल्पात कार्यरत अनिकेत आमटे... 

तुम्हाला माहिती आहे? महाराष्ट्राची छवी राजावत कुठे राहते...

sakal_logo
By
अनिकेत आमटे

भामरागड तालुक्‍यातील कोठी हे गाव तालुका मुख्यालयापासून साधारण 25 किलोमीटर लांब आहे. कोठी गट ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायत अंतर्गत मरकनार, गुंडुरवाही, फुलनार, कोपरशी, तुमरकोळी, मुरुमभुशी, बाळशी, तोयनार आणि कोठी ही गावे येतात. कोठी हे त्यातले मोठे गाव. कोठीला शासकीय आश्रमशाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस ठाणे ई. शासकीय सुविधा आहेत. मात्र, इतर गावे अतिशय दुर्गम आहेत. त्या गावांमध्ये पावसाळ्यात गाडीने जाणे केवळ अशक्‍य. बाळशी गावात तर एकच घर आहे, गावडे परिवाराचे. बाळशी येथे अनेकांची शेती आहे पण तेथील नागरिक कोठी येथे राहून बाळशी येथे शेती करतात. असेच एक दुर्गम गाव मरकनार आहे.

मरकनार या गावात 2019 च्या सप्टेंबर मध्ये पर्लकोटा नदीच्या महापुराचे पाणी काही घरांमध्ये शिरले होते. त्या पुरात अनेक मुक्‍या जनावरांचे प्राण गेले. पूर ओसरल्यावर आम्ही लोकबिरादरी प्रकल्पामार्फत गावात अन्न-धान्य, भांडी आणि कपड्यांची मदत पोहोचवली. त्यावेळी नाल्यात भरपूर पाणी असल्याने लाकडी नावेत प्रवास करून सामान पोहोचवावे लागले होते. त्या दिवशी पहिल्यांदा कोठीच्या सरपंच भाग्यश्री मनोहर लेखामीशी ओळख झाली. गुंडुरवाही हे तिचे मूळ गाव. मरकनार या गावात ते अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. कारण तिची आई राजश्री अंगणवाडी सेविका म्हणून गेली सत्तावीस वर्ष या गावात काम करीत आहे. राजश्रीताईंचे चवथीपर्यंतचे शिक्षण लोकबिरादरी आश्रमशाळेत झाले. त्यानंतर त्यांना अंगणवाडी सेविका म्हणून नोकरी मिळाली.

हेही वाचा - बीफार्म पदवीधर युवकाने केली कोरफडीची शेती अन् झाला लघुउद्योगाचा मालक...बेरोजगारांना दिला रोजगार

अजूनही शिकतच आहे

भाग्यश्रीचे वडील कोठीच्या जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. अशा परिवारात भाग्यश्रीचा जन्म फेब्रुवारी 1998 मध्ये झाला. घरात शिक्षणाचे वातावरण होते. कुठलाही बडेजाव न दाखवता या परिवाराने राहणीमान अतिशय साधे ठेवले आहे. गावात राहणाऱ्या आदिवासी बांधवांशी त्यांची पक्की नाळ जुळली आहे. आदिवासी संस्कृतीबद्दल त्यांना अभिमान आहे. भाग्यश्रीला एक मोठा भाऊ आहे. त्याचे कोठी येथे हार्डवेअरचे दुकान आणि फोटो स्टुडिओ आहे. तो बारावी पास झालाय आणि BSc फायनलला शिकत आहे. भाग्यश्री स्वतः एक खेळाडू आहे. थाळीफेकमध्ये ती राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत खेळून आली आहे. दहावीपर्यंत भामरागडला शिकलेल्या भाग्यश्रीचे बारावी चंद्रपुर जिल्ह्यातील राजुरा येथे झाले आणि आता बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशनचा कोर्स करते आहे.

गावातून एकमताने निवड

सन 2005 पासून कोठी ग्रामपंचायतला कोणीच सरपंच नव्हते. ग्रामसेवक-सचिव हीच मंडळी ग्रामपंचायत चालवायचे. 2005 ते 2019 पर्यंत गाव विकाससाठी आलेल्या निधीमध्ये अफरातफर होत असल्याची चर्चा जनतेमध्ये व्हायला लागली. त्यामुळे कोठी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नऊ गावांतील सर्व नागरिकांची बैठक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कोठीत आली. सर्वानुमते सुस्वभावी, सुशिक्षित आणि संस्कारी असलेल्या भाग्यश्रीचे नाव सरपंचपदासाठी पुढे करण्यात आले. जनतेच्या आग्रहास्तव तिने सरपंच होण्याचे मान्य केले. ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच बिनविरोध निवड होती. यात कुठलाही राजकीय पक्ष समाविष्ट नव्हता. आदिवासींनी "पेसा' कायदाचा वापर करून निवडलेले हे सरपंच आणि सदस्य होते.

अधिक माहितीसाठी - महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये रविवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

अख्खे गाव तिच्या पाठीशी

भाग्यश्रीला निवडणुकीचा फॉर्म भरायचा होता. सर्वांनी तिच्यावर विश्वास दाखवला पण जेव्हा ती फॉर्म सादर करायला गेली तेव्हा तेथील अधिकाऱ्याने तुझे वय 21 वर्षे पूर्ण नाही म्हणून अर्ज फेटाळला. तिला 21 वर्षे पूर्ण होण्यास फक्त 14 दिवस बाकी होते. आता करायचे काय असा प्रश्न पडला. तिने आणि गावकऱ्यांनी भामरागडचे तहसीलदार यांच्याकडे धाव घेतली. सरपंच नसल्यामुळे ग्रामपंचायतची खालावलेली कामगिरी गावकऱ्यांनी तहसीलदारांना सांगितली. तहसीलदारांनी सर्व समजून घेतले आणि प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनाही समजावून सांगितले. शेवटी तिचा अर्ज स्वीकारण्यात आला. 22 मार्च 2019 रोजी तिने सरपंचपदाची सूत्रे हाती घेतली. अतिशय तरुण वयात तिला सरपंच होता आले. 

अनेक गावांत वीज पोहोचवली

सरपंच म्हणून लहान मोठे सर्व जण तिला मान द्यायला लागले. पाठिशी अनुभव शून्य होता. पण सर्व समजून घेऊन कामाला सुरवात केली. आदिवासींसाठी असलेल्या योजना गाव-गावात पोहोचल्या पाहीजेत म्हणून धडपड सुरू झाली. इंदिरा आवास योजने अंतर्गत 80 जणांसाठी घरकुल मिळविले. कोठी गावात 35 घरांसाठी शौचालय बांधकामसाठी मंजुरी मिळविली. ते बांधकाम नीट होत आहे का नाही यावर जातीने लक्ष दिले. दुर्गम भागात वीज पोहोचावी यासाठी शासनाकडे भरपूर पाठपुरावा केला. त्यामुळे काही गावामध्ये वीज पोहोचली. तीन-चार गावांत ग्रामपंचायत अंतर्गत गावातील गल्ल्यांमधील सिमेंट रोड बांधकाम केले. पाण्यासाठी नळ योजना आणली. दुर्गम गावात नर्स पोस्टिंग असून सुद्धा सेवा देत नाही याची खंत तिला आहे. 

मो़डकळीस आलेल्या अंगणवाड्यांवर नजर

आशा वर्कर चांगल्या काम करतात. त्यांच्या माध्यमातून मलेरिया तपासणी करून औषध देण्याचे काम केले जात आहे. पावसाळ्यात या भागात मलेरियाची प्रचंड साथ येते. अनेक जण वेळेवर औषध उपचार न मिळाल्याने दगावतात. मेंदुचा मलेरिया येथे भयावह स्वरुपात आहे. असे काही अघटीत घडू नये म्हणून तिचे प्रयत्न सुरु आहेत. तिच्या कार्यक्षेत्रातील अनेक अंगणवाड्या मोडकळीस आल्या आहेत. त्यांची डागडुजी होणे अत्यावश्‍यक आहे. त्यासाठी निधी मंजूर होईल आणि ते काम पुढील वर्षी पूर्ण होईल, अशी तिला खात्री आहे. जेथे वीज पोहोचली आहे अशा गावांत असलेल्या अंगणवाडीत अथवा शाळेत संगणक, टीव्ही आणि प्रोजेक्‍टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्याची तिची इच्छा आहे. जेणेकरून आदिवासी बांधवांची पुढील पिढी सक्षम व्हावी.

क्लिक करा - 10 ते 12 जुलै पर्यंत 3 दिवस जनता कर्फ्यू, व्यापारी संघटनेचा निर्णय

चांगलेच काम करण्याची अपेक्षा

शेतीमध्ये विविध प्रयोग करण्याची तयारी आहे. तालुक्‍यातील सर्व सरपंचांचा अभ्यास दौऱ्यात ती सोलापूर भागात जाऊन आली. महाराष्ट्रातील नावाजलेले सरपंच पाटोद्याचे भास्कर पेरे पाटील आणि हिवरेबाजारचे पद्मश्री पोपटराव पवार यांचे मार्गदर्शन करणारे व प्रेरणा देणारे व्हिडिओ ती नित्य बघत असते. त्यांच्याशी संपर्क करून विविध अडचणींवर कशी मात करायची याचा सल्ला घेण्याचा तिचा प्रयत्न असतो. अशा दुर्गम भागात कुठलाही राजकीय अनुभव पाठीशी नसताना सरपंच म्हणून इतक्‍या लहान वयात कार्य करणे कौतुकास्पद आहे. भाग्यश्रीशी संवाद साधताना तिच्यामध्ये असलेली प्रगल्भता जाणवते. शासनाने अशा लोकांना चांगले प्रशिक्षण देण्याची गरज आहे. यामुळे ते अधिक सक्षम होतील आणि नव्या उत्साहाने गावाचा कायापालट करू शकतील. भाग्यश्रीचा सरपंचपदाचा कार्यकाळ संपायला अजून जवळपास चार वर्षे शिल्लक आहेत. पुढेही अधिक चांगले काम ती करेल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. 

संपादन - प्रमोद काळबांडे