नेताजी, पंडितजी आणि राजकारण

पंडित जवाहरलाल नेहरू आणि नेताजी सुभाषचंद्र बोस.
पंडित जवाहरलाल नेहरू आणि नेताजी सुभाषचंद्र बोस.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं हे १२५ वं जयंतीवर्ष. नेताजींचं नेतृत्व, कर्तृत्व आणि स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग पाहता ते साजरं होणं आवश्‍यकच. त्यातच पश्र्चिम बंगालची निवडणूक तोंडावर, जिथं नेताजी हा आजही भावनेचा मुद्दा. साहजिकच नेताजींवर हक्क सांगण्याची स्पर्धा होणारच. मात्र, ज्यांच्याकडं स्वातंत्र्यलढ्यात खऱ्या अर्थानं लढलेले अस्सल आयकॉन नाहीत ते उधारीवर दुसऱ्याचा वारसा सांगू पाहताहेत. त्यांचाच आवाज जणू ‘आपणच नेताजींचे वारस आहोत,’ अशा थाटात मोठा होता. खरंतर आज देशात बलिष्ठ असलेल्या हिंदुत्ववाद्यांना नेताजींचा वारसा कोणत्याच अर्थानं झेपणारा नाही, तसा तो पटेलांचाही नाही आणि गांधीजींचाही नाही. तरीही या सर्वांना आपलंसं केलं जातं आहे. हे करताना एकच धागा वापरला जातो तो या नेत्यांमध्ये आणि पंडित नेहरूंमध्ये द्वंद्व-शत्रुत्व होतं असं दाखवण्याचा. नेहरूंनी नेताजींना पुढं येऊ दिलं नाही, नेहरूंनी पटेलांना पंतप्रधान होऊ दिलं नाही यांसारख्या वावड्या उडवणं आजच्या राजकारणात सोईचं असेलही; पण ऐतिहासिकदृष्ट्या ते धादांत असत्य आहे.

नेहरू आणि नेताजींचे मार्ग वेगळे झाले हे खरंच; पण दोघंही कट्टर धर्मनिरपेक्ष, विज्ञानवादी, समाजवादाकडं झुकलेलं आणि नियोजनबद्ध विकासाची कल्पना मानणारे होते. यातलं काय आजच्या सत्ताधाऱ्यांना मान्य आहे? मग मतभेदांना शत्रुत्व ठरवून नसलेला वारसा मिरवायचा सोस कशासाठी? ‘हिंदू महासभा बंगालमध्ये राजकीय पक्ष म्हणून उभा राहू पाहत असेल तर त्या पक्षाच्या जन्मापूर्वीच, प्रसंगी बळानं, हा प्रयत्न मोडू’ असं नेताजी  सांगत होते. त्यांचा वारसा केवळ नेताजींसारखी टोपी घालून कसा सांगता येईल? 

काँग्रेस : आदर्श सांभाळण्यात अपयशी
आपल्याकडं काही समज शांतपणे पसरवले जातात व नंतर ते जणू वास्तव आणि इतिहासाचा भाग असल्याचा भ्रम तयार होतो. यातला एक युक्तिवाद म्हणजे, नेताजी सुभाषचंद्र बोस असते तर नेहरू पंतप्रधानच झाले नसते आणि मग देशानं कशी भक्कम प्रगती केली असती...हे सांगितलं जातं नेताजींच्या जयंतीच्या आसपास. सरदार पटेलांच्या जयंतीच्या आसपास सांगितलं जातं, सरदार पंतप्रधान व्हायला हवे होते, त्यामुळे नेहरूंनी देशाची जी वाट लावली ते टळलं असतं. भगतसिंग यांच्या जयंतीच्या वेळी सांगितलं जातं की त्यांना काँग्रेसनं, म्हणजे पुन्हा नेहरूंनी, वाऱ्यावर सोडलं. पूर्वी या सगळ्या पापात महात्मा गांधीजी भागीदार असल्याचं सांगितलं जात असे. काळासोबत सांगणाऱ्यांच्या असं लक्षात आलं की गांधीजी पुसून टाकणं, त्यांचं योगदान नाकारणं शक्‍य नाही तेव्हा त्यांना आपलसं केलेलं चांगलं. त्यापेक्षा नेहरूंना ठोकून काढणं सोईचं.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सत्तेच्या राजकारणात गांधीजींचा वारसदार कुणी नाही; पण नेहरूंचे वंशज आहेत. यातून इतिहासातील गांधी, नेहरू, पटेल, सुभाषबाबू या व्यक्तिमत्त्वांमध्ये प्रसंगोपात्त झालेल्या मतभेदांना शत्रुत्वाचा जामानिमा घालून पेश करण्याचे उद्योग केले जातात. बरं, ज्यांना नेहरू सलतात किंवा त्यांच्यापुढं नेताजी, पटेलांचं आव्हान उभं करणाऱ्या पंथाशी यातल्या कुणाचाही संबंध नाही. पटेल, नेहरू, गांधी, नेताजी ही सारी स्वातंत्र्यलढ्यातील मोठी माणसं. यातले तिघं अखेरपर्यंत काँग्रेसमध्येच राहिलेले. सुभाषबाबू काँग्रेसमधून मतभेद होऊन बाहेर पडले तरी त्यांना काँग्रेसच्या स्वातंत्र्यप्रयत्नांविषयी आदरच होता. तेच सुभाषबाबू आज त्यांचा वारसा सांगू पाहणाऱ्यांच्या वैचारिक पूर्वसुरींना अक्षरशः झोडपून काढतात. तरीही नेताजी- पंडितजी शत्रू हे असल्यासारखं वातावरण का उभं राहतं? याचं कारण, काँग्रेसवाल्यांना आपले आदर्श सांभाळता येत नाहीत आणि भाजपवाल्यांना सार्वजनिक आकलन तयार करण्यातील सिद्धी प्राप्त आहे. 

मतभेद होते ते मार्गाविषयी
नेताजींच्या १२५ व्या जयंतीवर्षात हे सारं पुनःन्हा पुढं येणार हे उघड आहे. नेताजींची जयंती साजरी होताना पश्र्चिम बंगालमध्ये निवडणूक होऊ घातली आहे आणि तिथं नेताजींविषयी अंमळ अधिकचा जिव्हाळा आहे हे गणितही प्रत्येक गोष्टीचा आपल्या राजकीय लाभासाठी वापर करणाऱ्यांकडून विसरलं जाणं अशक्‍य. महाराणा प्रताप यांच्या चेतक घोड्याची आई गुजराती असल्याचा शोध लावणारे आणि सम्राट अशोकाचा वारसा सांगतानाही न कचरणारे आता ‘टागोरांचे आणि नेताजींचे आपणच खरे वारस असल्याचं सांगू लागले तर आश्र्चर्य नाही. तसं सांगायची पहिली पायरी म्हणजे काँग्रेसनं आणि नेहरूंनी नेताजींना दुय्यम वागणूक दिली हे ठसवणं. मग त्यांनी दुय्यम वागणूक दिली म्हणून ते आमचे असं प्रमेय प्रस्थापित करणं. यात अडचण इतकीच की सत्ताधारी ज्या विचारसरणीचं प्रतिनिधित्व करतात, नेताजी नेमके त्याच्या विरुद्ध बाजूला उभे होते. नेहरूंनी या मंडळींना कधीच मुख्य प्रवाहात पाय रोवू दिला नाही हे त्यांचं दुखणं. मग त्यांचं कर्तृत्वच नाकारणं, त्यासाठी इतिहासात नसलेल्या कुस्त्या तयार करणं हा उपाय बनवला जातो. म्हणूनच नेताजींची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती साजरी करताना राजकारण्यांनी काही सांगितलं तरी नेताजी -पंडितजी संबंध खरेच कसे होते आणि नेताजी हिंदुत्ववाद्यांविषयी काय सांगत होते हे समजून घेतलं पाहिजे. 

नेहरूंनी नेताजींचं महत्त्व कमी करायचा प्रयत्न केला का, स्वातंत्र्यानंतर नेताजींचं नाव मागं पडेल असा प्रयत्न झाला का यावर जरूर चर्चा करता येईल. मात्र, उघड बहुसंख्याकवादाचा पुरस्कार करणाऱ्यांना कडवे धर्मनिरपेक्ष असलेल्या आणि समाजवादाकडं झुकलेल्या नेताजींचा वारसा कसा सांगता येईल? नेहरू आणि बोस यांच्यातील संबंधात गांधीजींची भूमिका महत्त्वाची ठरते, तशीच पटेलांचीही. नेताजी काँग्रेसमध्ये एकाकी पडले यात नेहरूंपेक्षा गांधी-पटेलांचा वाटा मोठा होता. स्वातंत्र्यासाठी नेताजी सांगत असलेला मार्ग गांधीजींना पसंत पडणं शक्‍य नव्हतं. नेताजी दुसऱ्यांदा काँग्रेसच्या अध्यक्षपदी विजयी झाले तेंव्हा गांधीजींनी पट्टाभिसीतारामय्या यांचा पराभव व्यक्तिगत पराभव मानला. त्यांनतर नेताजींना अध्यक्षपदी राहणं शक्‍य नव्हतं. गांधीजींचा तसा करिश्‍माच होता. दुसरीकडं पटेलांचे नेताजींशी गंभीर मतभेद होते.

नेहरू आणि नेताजी हे दोघंही काँग्रेसमधल्या समाजवादी गटाचे म्हणून तुलनेत अधिक जवळचे. दोघांनाही नियोजनबद्ध विकासाची कल्पना मान्य होती. नेताजी अध्यक्ष असताना यासाठी नेहरूंच्या नेतृत्वाखाली समिती नेमली होती. पुढच्या नियोजन आयोगाची पायाभरणी त्यातच होती. गांधीजी की नेताजी यात नेहरूंनी गांधीजी स्वीकारले. ते त्यांच्या दीर्घकालीन भूमिकेशी सुसंगतही होतं. खासकरून नेताजी आणि नेहरूंमध्ये अंतर होतं ते जगाकडं कसं पाहावं या दृष्टिकोनात. याबाबतीत एका लेखात भगतसिंग नेहरूंची बाजू उचलून धरतात. नेहरूंचा जागतिक दृष्टिकोन अधिक प्रगल्भ असल्याचं नोंदवून ठेवतात. नेहरूंना ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य हवंच होतं. मात्र, त्यांचा फॅसिस्टांना टोकाचा विरोध होता. 

शत-प्रतिशत लोकशाही-उदारमतवादी नेहरूंचं हिटलर-मुसोलिनीसारख्या हुकूमशाही-विस्तारवादी प्रवृत्तींशी पटणं अशक्‍य होतं. नेताजींना मात्र देश स्वतंत्र करताना कुणाची मदत घेण्यात गैर वाटत नव्हतं. मतभेद होते ते मार्गाविषयी. मात्र, ब्रिटिशांची सत्ता घालवली पाहिजे यावर एकमतच होतं. त्यासाठी दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांची कोंडी करण्याची वेळ योग्य आहे यावरही सहमती होती. 

काँग्रेसनं ‘चले जाव’ आंदोलन सुरू केलं. नेताजींनी ‘आझाद हिंद फौजे’ची स्थापना केली. यात स्वातंत्र्य या प्रयत्नांना मिळालं की त्या, यावर ज्यांचं स्वातंत्र्यलढ्यात सांगण्यासारखं काही योगदान नाही, त्यांनी वाद माजवावा याला अर्थ नाही. काँग्रेसचं अध्यक्षपद सोडावं लागलं तेव्हा नेहरूंनी आपली बाजू घेतली नाही याची खंत नेताजींना होती, ती त्यांनी पत्रातून व्यक्तही केली होती. मात्र, नेहरूंचा उल्लेख ‘मोठा भाऊ’ असाही तेच करतात. नेहरूंनाही नेताजींच्या देशकार्याबद्दल शंका नव्हती. ‘बोस यांनी राजीनामा मागं घ्यावा,’ असा ठरावही नेहरूंनी आणला होता. 

द्वेष दिसतो कुठं?
ज्या रीतीनं नेहरू-नेताजी यांच्यातील मतभेदांचं चित्र रंगवलं जातं, त्या पार्श्‍वभूमीवर नेताजींनी आझाद हिंद फौजेतील तुकड्यांना गांधी-नेहरू आणि मौलाना आझाद यांची नावं दिली होती याहून चोख उत्तर काय असू शकतं? नेताजींनी कुणीही तत्कालीन हिंदुत्ववादी नेत्याच्या नावाची तुकडी उभारल्याची कसलीही नोंद शोधूनही सापडत नाही. आझाद हिंद फौजेच्या कॅलेंडरवर नेहरू आणि आझादांची चित्रं प्रसिद्ध केली गेली. नेताजींनीच पहिल्यांदा गांधीजींना ‘राष्ट्रपिता’ संबोधलं. गांधीजींशी मतभेदानंतर ‘मी काँग्रेस कार्यकारिणीचा विश्र्वा‍स मिळवला; पण देशातील सर्वात महान नेत्याचा विश्र्वास मिळवू शकलो नाही,’ असं गांधीजींना उद्देशून नेताजी म्हणाले होते. हे आदराशिवाय घडतं काय? गांधीजींना सशस्त्र उठावाचा मार्ग मान्य नव्हता. मात्र, गांधीजी नेताजींविषयी म्हणतात, ‘नेताजींचं सर्वात महान काम कोणतं असेल तर त्यांनी जात आणि वर्गभेद संपवून टाकले ते पहिल्यांदा भारतीय राहिले आणि अखेरही भारतीयच.’ 

यात कुठं द्वेष औषधाला तरी दिसतो काय? नेताजी यांना स्पष्ट विरोध असणारे पटेल आझाद हिंद फौजेतील जवानांचं पुनर्वसन करण्यात पुढाकार घेतात. हे कशातून येतं? स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या भाषणात नेहरू हे गांधीजींखेरीज फक्त नेताजींचं नावं घेतात, आझाद हिंद फौजेतील अधिकाऱ्यांच्या बचावासाठी कित्येक वर्षांनी वकीलीचा कोट घालतात, ब्रिटिशांच्या दृष्टीनं आझाद हिंद फौज ही त्यांच्या साम्राज्याच्या विरोधात युद्ध पुकारणारी फौज होती. साहजिकच युद्ध जिंकल्यानंतर साम्राज्याच्या विरोधात बंडासाठी कारवाई त्यांना करायची होती. मात्र, ती होऊ नये यासाठी नेहरूंनी जमेल ते प्रयत्न केले. कायदेशीर लढाई लढणाऱ्या चमूचं नेतृत्व करणारे भुलाभाई देसाईंसारखे कायदेतज्ज्ञ ‘गुलाम बनवणाऱ्या सत्तेच्या विरोधात उठाव करण्याचा अधिकार आहे, तो देशद्रेह नव्हे’ असा युक्तिवाद करतात. यात नेताजी किंवा त्यांच्या प्रयत्नांचा द्वेष कुठं दिसतो? 

धर्माधारित वर्चस्वाला विरोध
हिंदुत्ववादी आणि नेताजींच्या विचारात अंतर होतं. त्यांचं एकमेकांशी जमण्यासारखं नव्हतंच. जेव्हा गांधी-नेहरू ‘चले जाव’चा लढा उभारत होते आणि नेताजी आझाद हिंद फौज स्थापन करत होते तेव्हा ब्रिटिशांच्या सैन्यात सहभागी झालं पाहिजे यासाठी तेव्हाचे हिंदुत्ववादी आग्रही होते. नेताजींची फौज ब्रिटिशांशी लढणार होती. या ब्रिटिश फौजेत भारतीयांनी सहभागी व्हावं असं आवाहन करणाऱ्यांचे वैचारिक वारसदार नेताजींचा वारसा कसा सांगू शकतात? हिंदू महासभा आणि मुस्लिम लीगचं आघाडी सरकार बंगालसह तीन प्रांतांत होतं. या दोन्ही संघटनांवर नेताजींनी जोरदार टीका केली. कोणत्याही प्रकारच्या धर्म-जातीवर आधारलेल्या वर्चस्ववादाला नेताजींचा विरोध होता. त्यांनी आझाद हिंद फौजेच्या सरकारला ‘अर्जी हुकुमत’ असं म्हणवलं. नेताजी हे अध्यक्ष असतानाच काँग्रेसच्या कुणाही सदस्याला हिंदू महासभा किंवा मुस्लिम लीगचा सदस्य राहण्याचा अधिकार असणार नाही असा निर्णय झाला. बहादूरशहा जफरना ते हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचा नेता मानत. अकबराचा गौरवानं उल्लेख करत. ‘मुस्लिम आक्रमकांनी देशावर राज्य केलं तरी ते या भूमीचेच झाले, ब्रिटिशांनी मात्र इथली साधनसंपत्ती लुटली,’ असं निरीक्षण नेताजी नोंदवतात. यातल्या कशाचं आज त्यांचा वारसा मिरवू पाहणारे समर्थन करतात? श्‍यामाप्रसाद मुखर्जी हिंदुत्ववादी होते यात शंकेचं कारणच नाही. त्यांनी नेताजींची भेट घेतली तेव्हा नेताजींनी हिंदू महासभेच्या राजकीय अवताराला नुसता विरोधच दाखवला नाही, तर ‘असा प्रयत्न झाला तर बळानं मोडून काढू,’ असा इशाराही दिला. नेताजींच्या अनुयायांनी ते प्रत्यक्षातही आणलं. कोलकत्याच्या महापालिकेची सत्ता नेताजींकडं आली तेव्हा त्यांनी मुस्लिमांना नोकऱ्यांत आरक्षण जाहीर केलं. 

इव्हेंटबाजी वेगळी, बुद्धिवाद वेगळा
नेताजी आणि नेहरूंमध्ये शत्रुत्व असल्याचं दाखवण्यासाठी एक प्रयत्न कुजबूज-ब्रिगेडनं मध्यंतरी केला होता. यात एक पत्र नेहरूंच्या नावानं पसरवलं होतं. त्यात नेहरूंनी नेताजींना युद्धगुन्हेगार म्हटल्याचं दाखवलं. हे पत्र नेहरूंनी क्‍लेमंट ॲटली या इग्लंडच्या पंतप्रधानांना लिहिल्याचं भासवलं गेलं. प्रत्यक्षात नेहरूंनी असं पत्र कधी लिहिलंच नव्हतं. त्यांचा सर्व पत्रव्यवहार उपलब्ध आहे. ब्रिटिशांचं रेकॉर्डही उपलब्ध आहे. हा सारा खेळच बोगस. त्या पत्रात व्याकरणाच्या ढीगभर चुका. हे पत्र नेहरूंनी दिल्लीत लिहायला सांगितल्याचा कथित दावा खोसला समितीसमोर केला गेला, त्या दिवशी नेहरू दिल्लीत नव्हतेच. त्यादरम्यान त्यांनी लिहिललेया सर्व पत्रांच्या नोंदी उपलब्ध आहेत. कुणाचं तरी संदर्भहीन विधान वापरायचं, ते पुनःपुन्हा उद्धृत करून जणू त्याचा पुरावा बनवायचा हे या बोगसगिरीचं तंत्र आहे. 

नेताजींविषयीच्या शेकडो फाईल्स गोपनीय होत्या, त्या खुल्या केल्यास नेहरूंच्या विरोधात घबाड सापडेल असं मानणारा एक वर्ग आपल्याकडं होता व अजूनही आहे. प्रत्यक्षात पश्र्चिम बंगाल सरकार आणि केंद्र सरकारनं बहुतेक फाईल खुल्या केल्या तेव्हा त्यात असं कसलंही घबाड सापडलं नाही. दुसरीकडं नेहरूंनी नेताजींच्या पत्नी आणि मुलीला व्हिएन्नात मदत मिळावी यासाठी व्यक्तिगत लक्ष घातल्याच्या नोंदी समोर आल्या. तर नेहरू तुरुंगात असताना त्यांच्या पत्नीच्या परदेशातील उपचारात तेव्हा युरोपात असलेल्या नेताजींनी मदत केल्याचे तपशीलही उपलब्ध आहेत. नेहरू आणि नेताजी यांच्यात नसलेलं भांडण लावून आजच्या राजकारणाच्या पोळ्या शेकू पाहणाऱ्यांसाठी हे सारंच अडचणीचं. त्याहून अडचणीचं त्यांच्या वैचारिक पूर्वसुरींना नेहरूंनी कधीच डोकं वर काढू दिलं नाही, तर नेताजींनी धारदार टीकेचं लक्ष्य केलं. 

नेजाती यांचा सन्मान काय तो सन २०१४ नंतरच सुरू झाला असा समज बाळगणाऱ्यांसाठी - सन १९५७ ला अस्तित्वात आलेल्या नेताजी रिसर्च ब्यूरोपासून ते ७५ पासूनचा नेताजी आंतरराष्ट्रीय परिसंवाद, ८५ चं मणिपूरमधील आझाद हिंद फौजेतील हुतात्म्यांचं स्मारक, दार्जिलिंगचं नेताजी संग्रहालाय, नेताजींच्या पूर्वजांच्या निवासस्थानी उभारलेलं संग्रहालाय हे सारं आधीच झालंय. 

इतक्‍या सगळ्या तपशिलानंतरही नेहरूंना खलनायक ठरवायचं, त्यासाठी नेताजींचा वापर करायचा हा धंदा संपण्याची चिन्हं नाहीत. नेताजींच्या १२५ व्या जयंतीवर्षात तो नव्या जोमानं सुरू राहील. नेताजींच्या आझाद हिंद फौजेची टोपी घालून इव्हेंटबाजी करण्याइतकं नेताजींचा प्रखर बुद्धिवादी, विज्ञानवादी आणि धर्मनिरपेक्ष वारसा सांगणं-चालवणं सोपं नाही. एवढी नोंद तरी यानिमित्तानं करायलाच हवी. 

श्रीराम पवार लिखित/ संपादित आणि ‘सकाळ’ प्रकाशित 
‘राजपाठ : वेध राष्ट्रीय राजकारणाचा’, ‘जगाच्या अंगणात : वेध आंतरराष्ट्रीय घडामोडींचा’, ‘धुमाळी (करंट : अंडरकरंट)’ ‘संवादक्रांती’ आणि ‘मोदीपर्व’ ही पुस्तके उपलब्ध. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com