'दोघां'चं 'मैत्री'गीत (डॉ. आशुतोष जावडेकर)

डॉ. आशुतोष जावडेकर
रविवार, 5 ऑगस्ट 2018

लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर या दोघांमधली मैत्री अनेक पदर असलेली. पराकोटीचा स्नेह ते पराकोटीचे मतभेद. या अनोख्या नात्यावरचं ‘दोघे’ हे गाणं एक ऑगस्ट रोजी ‘सकाळ’च्या फेसबुक पेजवर सादर करण्यात आलं आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. या गाण्याच्या निर्मितीची ही कहाणी.

लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर... तीनेक वर्षांपूर्वी मी झपाट्यानं त्या दोघांवरच जे जे मिळेल ते वाचलं, अभ्यासलं होतं. मला त्या दोघांच्या राजकारणाइतकाच त्या दोघांच्या मैत्रीचा पट भव्य वाटला, खुणावत गेला. त्यांचं डेक्कन कॉलेजमध्ये भेटणं, रात्री बेरात्री टेकडीवर भटकायला जाणं, देशासाठी काय करता येईल याची तळमळ त्यांच्या मनात जागी होणं... मी पटकन लिहिलं ः ‘तुडवले माळरान दोघांनी वेगात, मनाचीही मशागत गप्पांच्या नादात’ आणि मग एकत्र शाळा, वर्तमानपत्र, कॉलेज सांभाळणं, तुरुंगात एकत्र जाणं, मग मतभेद, वाद, भांडण... ‘दुराव्याचे पाणी कसे कधी पाझरले, किती घाव किती दोघांनी घातले’... मी लिहितोय झराझरा, मागून चालदेखील शब्दांसोबत सुचते आहेच, ठेका पायानं धरलाय... आगरकर तर अकालीच गेले, उमेदीच्या काळात गेले. टिळकांना आठवत राहिले असावेत पुढं कायम. स्वतःचा मुलगा गेला तरी न रडलेले टिळक, आगरकर गेले तेव्हा मात्र डोळे पुसत त्यांच्यावरचा अग्रलेख तोंडी सांगत होते... मी ते चित्र डोळ्यासमोर उभं करतोय आणि मग शब्द सुचतात मला ‘हिशेबाला बसायाचे आहे पण कोणाला? तळापाशी दिसे बाकी दिसे ती दोघांना!’ आणि मग माझेही हात लिहिताना कापतात एक क्षण. मग ते अर्धंमुर्धं गाणं तसंच राहिलं मागं नित्याच्या धांदलीत. मधल्या काळात माझं इतर गोष्टी घडल्या, त्यात हे गाणं मागं गेलं; पण डोक्‍यातून नाहीसं नाही झालं. त्याची चाल डोक्‍यात खेळत होती. ती अपुरी वाटत होती. काही मित्र-मैत्रिणींना सहज ऐकवली. त्यांनाही ती अपुरी वाटली. काही महिन्यांपूर्वी मग चालच बदलली. ती नवी चाल चांगली झाली; पण त्या चालीत त्या संवेदनेचा जो कोरडा-करडा असाही सूर मला हवा होता, तो नाहीसा झाला होता असं पत्नीनं सांगितलं आणि पटलं मला.  आत्ता एक महिन्यांपूर्वी दुचाकी हाणत रात्री घरी परतत असताना एकदम जुन्या चालीतल्या कडव्यातलं जे राहिलंय, असं वाटत होतं ते संगीत ‘सापडलं’ अचानक! एकदम जिगसॉ पझल पूर्ण झाल्यासारखं वाटलं. त्या क्षणाला वाटलं ः ‘येस, आता हे गाणं पूर्ण झालं, तयार झालं’ आणि मग नुकतं एक ऑगस्टला ‘सकाळ’मार्फत ‘दोघे’ हे शीर्षक धारण करत हे गाणं प्रसिद्ध झालं आणि लोकांनी उचलून धरलं.

... आणि मग मला आठवतो गाण्याचा पुढचा प्रवास! गाणं सुचणं आणि प्रसिद्ध होणं यात खूप टप्पे असतात. केदार दिवेकर या कुशल संगीतकारानं नुकतंच ‘फर्जंद’ या चित्रपटाचं पार्श्वसंगीत दिलं आहे. त्यानं याही एका तऱ्हेनं ऐतिहासिक गीताचं संगीतसंयोजन केलं. आम्ही भेटलो, मी माझ्या सांगीतिक कल्पना त्याला सांगितल्या. संगीतकार आणि संगीतसंयोजक यांचं नातं चांगलं असेल, तरच गाणं चांगलं होतं आणि संगीतकाराला मुळात हे पक्कं माहीत असावं लागतं, की त्याला कशा तऱ्हेचं अरेंजिंग हवं आहे. चांगला संयोजक वाद्यांचा मेळ तशा तऱ्हेनं तर करतोच; पण त्यातही स्वतःची अशी अर्थपूर्ण भर घालतो. केदारनं तसं संयोजन केलं. मग रेकॉर्डिंग. गाणार मीच होतो. मी विचार केला सगळ्या अन्य नावांचा; पण मला फिरून तटस्थपणे वाटलं, मीच गावं हे गाणं. अशोक पत्की आणि सावनी शेंडे या संगीतातल्या दोन मोठ्या माणसांनी मला रेकॉर्डिंगच्या आधी  नेमक्‍या सूचना फोनवर दिल्या, धीर दिला. ध्वनिमुद्रणाच्या दिवशी माझा आवाज थोडा बसला होता; पण वेळ मर्यादित होता. कंबर कसून काम करावं तसं ‘गळा कसून’ गायलो. अनेकांना रेकॉर्डिंग हे रोमॅंटिक काम वाटतं. प्रत्यक्षात ते चिकाटीचं काम आहे. सतत टेक्‍स-रिटेक्‍स होतात. एकेक शब्द, ध्वनी, वाक्‍यं पुनःपुन्हा घासूनपुसून म्हणावी लागतात. श्रेयस दांडेकर या उमद्या रेकॉर्डिस्टनं उत्तम तऱ्हेनं गाणं रेकॉर्ड केलं. गाऊन धावत कामाच्या ठिकाणी पोचलो, तरी जणू मागं घसा गातच राहिला आहे की काय असं वाटत होत. ‘दोघांच्याहीपाशी होते दोघांचे गाऱ्हाणे, दोघांचे जे खरे होते हरवले ते गाणे’ ही ओळ गाताना समोर मला सारखे टिळक आणि आगरकर भासमान होत राहिले. वाटलं, कधीही समोर येतील आणि जरा जरबेनं, प्रेमानं म्हणतील ः ‘आशू, नीट गा रे!’ 

... उत्तम मिक्‍सिंग होऊन गाणं माझ्यापर्यंत पोचतं आहे. ‘सकाळ’ची टीम या वेगळ्या प्रयोगासाठी सतत मागं हवी ती मदत करत आहे, फोटो कोलाजचा व्हिडिओ ‘सकाळ’मध्ये बनतोय. रुढ गृहितकांना हे गाणं छेद देत आहे आणि तो छेद द्यायला ‘सकाळ’सारखं कृतिशील, समाजसन्मुख आणि युवककेंद्रित माध्यम गाण्याच्या मागं आहे, याचा मला खूप आनंद आहे. ...आणि मग गाणं नेटवर अवतरतं, धपाधप लाइक्‍स, शेअरिंग सुरू होतं; पण महत्त्वाचं म्हणजे माणसं त्यावर विस्तृतपणे लिहीत आहेत, बोलत आहेत आणि मग शेअर करत आहेत. संगीताचं हे ‘लोकशाहीकरण’ आहे आणि टिळक-आगरकरांच्या गाण्यासाठी तर ते अगदी सुयोग्य आहे! 

अनेकांना ते गाणं त्यांच्या स्वतःच्या मैत्रीचं वाटलं. तसंही ते आहेच. महेश लीलापंडित आणि योगिनी सातारकर-पांडे यांनी लगेच त्या गाण्याच्या युनिव्हर्सल अशा जाणिवेवर लिहिलं. अंतर आलेल्या कुठल्याही नात्याला हे गीत लागू होईलच. एक ऑगस्ट हा मैत्रदिन. अनेकांना हरवलेलं मैत्र या गाण्यात दिसेल, हेही खरं; पण मुळात हे गाणं फक्त टिळक आणि आगरकरांचं. त्यांचे नात्याचे आणि जगण्याचे ताणेबाणे किती भव्य होते! फार मोठी माणसं होती... आणि माणसंच होती ती अखेर हेही राहतंच... सगळं त्यांचं गाणं हरवलं, तरी त्यांचा समाजव्रताचा धागा समान राहिला. स्वतःच्या व्यक्तिगत आकांक्षांच्या पुष्कळ पुढं जात त्यांनी समाजासाठी अफाट काम केलं. त्याचे मार्ग वेगळे होत गेले. मतभेद झाले आणि मनभेदही झाले. आज जेव्हा सगळीकडं सामाजिक मूल्यांचा ऱ्हास दिसतो तेव्हा वाटतं, की आत्ताही असतीलच स्वर्गात ते दोघं आणि आजही आजच्या भारतातलं चित्र बघून त्यांचं रक्त तापून उठत असेल. त्यांचे हात आहेतच एकमेकांत... सगळ्या वादांनंतर... सगळ्या मतभेदांपलीकडं जात.. मी ते एकमेकांत मैत्रीनं घेतलेले हात बघितले आणि मग गायलो आहे इतकंच!

'सप्तरंग'मधील लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Song on Lokmanya Tilak and Gopal Ganesh Agarkar by Ashutosh Javadekar