नुसतेच बघणार की काही शिकणार?

भारतीय संघाने रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवला, त्याला आता एक आठवडा झाला. अजून त्या सामन्याची चर्चा थांबत नाहीये.
Virat Kohli
Virat KohliSakal
Summary

भारतीय संघाने रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवला, त्याला आता एक आठवडा झाला. अजून त्या सामन्याची चर्चा थांबत नाहीये.

भारतीय संघाने रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवला, त्याला आता एक आठवडा झाला. अजून त्या सामन्याची चर्चा थांबत नाहीये. हा सामना म्हणजे ‘शोले’ सिनेमासारखा वाटला, ज्यात सर्व रंग दिसून आले. क्रिकेटदेवाने भारत-पाकिस्तान सामन्याकरिता जणू वेगळेच स्क्रीप्ट लिहून ठेवले होते. आपल्या सगळ्यांकरिताच तो सामना संस्मरणीय होता, यात शंका नाही. प्रश्न हा आहे की, आपण नुसतेच बघणार की काही शिकणार? हा मुद्दा मी अशासाठी मांडतो आहे की, त्या सामन्यात नुसताच विराट कोहली नव्हे तर भारतीय संघातील विविध खेळाडूंनी केलेल्या कामगिरीतून शिकण्यासारखे बरेच काही आहे, असे मला वाटते. काही मुद्दे मांडतो... पटतात का बघा.

पाकिस्तानसमोरची खेळी स्मरणात असतानाच विराट कोहलीला भेटायची संधी मिळाली. त्याच्याबरोबर बोलणे केल्यावर जो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा त्याने मांडला, विराट म्हणाला की, ‘‘मी सर्वोत्तम तंदुरुस्ती राखायला व्यायाम आणि आहार दोन्ही अगदी काटेकोरपणे पाळतो.’’ निर्णायक सामन्यात निर्णायक क्षणी केलेल्या मेहनतीचे महत्त्व मला जास्त समजले.

तो म्हणाला, ‘‘होते काय की, जेव्हा खूप दडपणाखाली कोणतेही काम करायची वेळ येते, तेव्हा शरीराबरोबर विचार करून मेंदूही थकतो. शरीर अखडायला लागते. जर तंदुरुस्ती बरोबर राखलेली असेल, तर शरीराकडून मेंदूला जाणारे संदेश वेगाने जातात, जे योग्य निर्णय घ्यायला मदत करतात. जणू ‘५जी’चा स्पीड मिळतो. जर शरीर आणि मन थकलेले असेल, तर तेच संदेश वेगाने जात नाहीत. मग आपण अयोग्य निर्णय घेण्याची चिडचिड करायची शक्यता वाढते. मैदानावर खेळाडूला काय किंवा बाकी काम करणाऱ्या कोणालाही काय, मला वाटते मनात आहे ती गोष्ट १०० टक्के राबवायला शरीराने योग्य साथ द्यायला हवी. जर तंदुरुस्ती सर्वोत्तम असली तर अत्यंत दडपणातही योग्य निर्णय घेऊन योग्य कृती आपल्या हातून घडायची शक्यता वाढते, असा माझा अनुभव आहे, ज्याचा प्रत्यय मला पाकिस्तान समोरच्या सामन्यात परत आला.’’ (शिकवण : क्षेत्र कोणतेही असो, योग्य निर्णय घ्यायला योग्य तंदुरुस्ती असणे गरजेचे आहे.)

कोणतीही योजना राबवताना आपण खूप मागचा किंवा खूप पुढचा विचार करतो. कित्येक वेळा भूतकाळात आलेल्या अपयशाचा विचार सोबत घेऊन वर्तमानाला भिडतो. पाकिस्तान समोरच्या सामन्यात आव्हानात्मक परिस्थिती होती तसेच मागील दोन पराभवांची चर्चा माध्यमांत सतत होत होती. हार्दिक पंड्याने नेमके उलटे केले. मैदानात फलंदाजीकरिता पाऊल ठेवल्यावर त्याने विराट कोहलीला आपण एक एक पाऊल ताकदीने पुढे सरकूया, इतकेच सांगितले. तो सतत सकारात्मक विचार मांडत होता. सामना खोलवर लढवत घेऊन जाणे गरजेचे आहे, इतकेच हार्दिक सतत बोलला. दोघांनी शतकी भागीदारी करताना कठीण गणित बरोबर सोडवले. ना त्यांनी मागचा विचार केला ना फार पुढचा. (शिकवण : भूतकाळात रमायचे नाही आणि भविष्यात डोकावायचे नाही... फक्त वर्तमानावर लक्ष देत काम करायचे.)

सहा महिन्यांपूर्वी खराब कामगिरीमुळे विराट कोहलीवर खूप टीका होत होती. कामगिरीवरून जी टीका होत होती ती रास्त होती, पण त्याला संघाबाहेर फेकून दिला पाहिजे, अशी गरळ ओकणारे लोक काय विचार करत होते देव जाणे. जी गोष्ट विराटची, तीच काही सामन्यात धावांचा मार खाल्लेल्या भुवनेश्वर कुमारची. दोघांनीही पाकिस्तान समोरच्या सामन्यात भन्नाट कामगिरी केली. भुवनेश्वरने साडेपाच धावांच्या सरासरीने चार षटके टाकली जी ‘टी-२०’ क्रिकेट सामन्यात सर्वोत्तम कामगिरी मानली जाते. दोघांनीही एकच गोष्ट केली. यश-अपयशाच्या झोपाळ्यावर झुलत असून मेहनत एक कण कमी केली नाही. व्यायाम असो की सराव... अजिबात कुचराई केली नाही. लोक काय म्हणतात याकडे लक्ष न देता आपल्याकडून तयारीत कोणतीही कमतरता राहत नाही, याकडे लक्ष दिले. विराटच्या भाषेत सांगायचे, तर मेहनतीची तयारीची सर्व बॉक्सेस टीक करणे आपल्या हाती असते... यश-अपयश देणे क्रिकेटदेवाच्या हाती असते. (शिकवण : कष्टात आणि प्रयत्नात कमतरता राहिली नसेल तर अपयश आल्यावर लोक काय म्हणतात, याकडे अजिबात लक्ष द्यायचे नाही. अपयशाने खचायचे नाही आणि यशाने माजायचे नाही.)

दडपण घ्यायचे नाही... द्यायचे

विरेंदर सेहवागचा एक विचार मला नेहमी वेगळा वाटायचा. मोठ्या सामन्यात दर्जेदार गोलंदाजांसमोर जाताना तुला दडपण येत नाही का, असे विचारले असता तो म्हणायचा, दडपण घ्यायची गोष्ट नाहीये... द्यायची गोष्ट आहे. समोरच्या गोलंदाजांना दडपण यायला हवे की सेहवागला गोलंदाजी कुठे करायची. मला सेहवागचा हा विचार कमाल वाटला होता. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दडपणाची सुई भारतीय संघाकडून हळुवारपणे पाकिस्तानकडे कशी वळाली याचा विचार करा. त्याला कारण होते विराट कोहलीचा शांतपणा आणि स्थिरता. विराट म्हणतो की अटीतटीच्या सामन्यात दडपण सगळ्यांना असते, फक्त त्या अवस्थेत मन शांत ठेवून योग्य विचार करायची परीक्षा असते. त्या परीक्षेत तुम्ही पास झालात की बघता बघता दडपण समोरच्या संघावर जाते. आपल्यावरचे ओझे कमी करून समोरच्यावरचे वाढवायची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने करावी लागते. (शिकवण : दडपण येणे साहजिक असते. ते समजून घेऊन त्यावर विचारपूर्वक काम करून मार्ग शोधावा लागतो.)

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे

खेळ... मग तो कोणताही असो, खेळाडूंना एक गोष्ट मनोमन पक्की माहीत असते की, सर्वोत्तम कामगिरीच टीकाकारांना उत्तर देण्याचा मार्ग आहे. आपण मनातील खदखद बोलून व्यक्त करतो,

खेळाडू फक्त मेहनत करून चांगल्या कामगिरीचा मार्ग शोधून त्याला उत्तर देतात. फलंदाज बॅटीतून धावांचा धबधबा काढून देतो तर गोलंदाज विकेट्स काढून. क्रिकेटमध्ये एक म्हण आहे, ‘बॅट चलता है तो थाट चलता है।’ फलंदाजाला माहीत असते की बॅटीतून निघणाऱ्या धावाच त्याला योग्य मान मिळवून देतात. समोरच्या संघाच्या डोळ्यांत दिसणारी भीती खेळाडूला सर्वोत्तम कामगिरी करायला प्रोत्साहित करते. (शिकवण : संतवाणी हेच सांगते की, क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.)

अशक्य काहीच नसते

खेळाडूंच्या कोशात ‘अशक्य’ शब्द नसतो. कठीण असेल अवघड असेल पण अशक्य काहीच नसते. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात शेवटच्या तीन षटकांत किती जास्त धावा काढायच्या होत्या. गोलंदाज दर्जेदार होते. सीमारेषा प्रचंड मोठ्या होत्या. तरीही विराट कोहलीने अशक्य काही मानले नाही. प्रत्यक्ष मैदानावर असो वा टीव्हीवर असो, बघणाऱ्या प्रेक्षकांना त्या धावसंख्येचा पाठलाग करणे कर्मकठीण वाटत होते, जे विराटने शक्य करून दाखवले. शेवटपर्यंत त्याने जिद्द सोडली नाही. अखेर त्याच सकारात्मक विचारांचे गोड फळ त्याला विजयाच्या रूपाने मिळाले. (शिकवण : हार न मानता प्रयत्न करत राहणे.)

यश एकट्याचे नसते

सर्वांत शेवटचा विचार तितकाच महत्त्वाचा आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर सगळ्यांनी विराट कोहलीची तोंड फाटेपर्यंत स्तुती केली, ज्याला तो लायक होता. पण ते यश त्याच्या एकट्याचे नव्हते आणि ही गोष्ट त्याला मनोमन माहीत होती. म्हणून सामन्यानंतर बोलताना त्याने पहिल्यांदा हार्दिक पंड्याच्या योगदानाची वाहवा केली. दोघांनी मिळून अर्शदीप-हार्दिकचे प्रत्येकी तीन बळी, अश्विनने निर्माण केलेल्या संधी आणि भुवनेश्वर कुमार-शमीच्या माऱ्याची वाच्यता कौतुकाने केली. (शिकवण : यश... मग ते खेळात असो वा संसारात, व्यवसायात असो वा नोकरीत, ते कधीच कोणा एकट्याचे नसते, याची जाणीव ठेवणे नितांत गरजेचे आहे.)

पाकिस्तानविरुद्धच्या रोमहर्षक सामन्याचे वार्तांकन करत असताना डोळ्यांसमोर उलगडलेल्या नाट्याने माझ्या मनात हे विचार आले. मी मांडलेले मुद्दे तुम्हाला पटतात का आणि अजून काही पैलू त्या सामन्यातून आपणासाठीच्या शिकवणीचे दिसतात का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com