बॅटन पास करायची वेळ आली!

मोठ्या सामन्यानंतरचा दुसरा दिवस नेहमी मजेदार असतो. २३ ऑक्टोबरला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना झाला आणि भारताने मिळवलेल्या अविश्वसनीय विजयाने २४ तारखेची सकाळ रम्य गेली.
ICC Mens T20 Worldcup Cricket Competition
ICC Mens T20 Worldcup Cricket CompetitionSakal
Summary

मोठ्या सामन्यानंतरचा दुसरा दिवस नेहमी मजेदार असतो. २३ ऑक्टोबरला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना झाला आणि भारताने मिळवलेल्या अविश्वसनीय विजयाने २४ तारखेची सकाळ रम्य गेली.

मोठ्या सामन्यानंतरचा दुसरा दिवस नेहमी मजेदार असतो. २३ ऑक्टोबरला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना झाला आणि भारताने मिळवलेल्या अविश्वसनीय विजयाने २४ तारखेची सकाळ रम्य गेली. त्याच्या अगदी उलट १० नोव्हेंबरच्या उपांत्य सामन्यात झालं. इंग्लंडने भारतीय संघावर मिळवलेल्या धक्कादायक मोठ्या विजयाने ११ नोव्हेंबरची सकाळ वाईट विचारांनी काळवंडली. एकंदरीतच ‘ट्वेन्टी-२०’ विश्‍वकरंडक स्पर्धा सगळ्याच अर्थाने धक्कादायक ठरली. दोनवेळा ‘ट्वेन्टी-२०’ विश्‍वकरंडक जिंकलेला वेस्ट इंडीजचा संघ पात्रता फेरीतून बाद झाला तेव्हापासून झालेली धक्कादायक निकालांची सुरुवात याची सांगता अखेर उपांत्य फेरीच्या दुसऱ्‍या सामन्यात भारतीय संघाच्या भल्यामोठ्या पराभवाने झाली.

उन्हाळ्याचे दिवस सुरू होऊनही ऑस्ट्रेलियात पावसाने धुमाकूळ घातला, ज्याचा भयानक परिणाम स्पर्धेवर झाला. आज रविवारी पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड असा अंतिम सामना होणार असताना मेलबर्नचं हवामान पावसाची धोक्याची घंटा वाजवत आहे. बऱ्याच संघांचे डोळे उघडणारा हा जागतिक करंडक स्पर्धेतला सामना होईल असं वाटत आहे.

१६ ऑक्टोबरला स्पर्धा सुरू झाली ती पात्रता फेरींच्या सामन्याने. एकाबाजूला अफगाणिस्तानचा संघ मानाने थेट मुख्य स्पर्धेला पात्र ठरला असताना दोन वेळा ‘ट्वेन्टी-२०’ विश्‍वकरंडक जिंकणारा वेस्ट इंडीजचा संघ पात्रता फेरीत खेळताना दिसला. त्यातून पहिल्याच पात्रता फेरीच्या सामन्यात एकदा ‘ट्वेन्टी-२०’ विश्‍वकरंडक जेतेपद पटकावलेल्या श्रीलंकन संघाला नवख्या नामीबियन संघाने मोठ्या फरकाने पराभूत केलं. पाठोपाठ स्कॉटलंडने वेस्ट इंडीजला पराभूत करून धक्का दिला. निर्णायक सामन्यात आयर्लंड संघाकडूनही वेस्ट इंडीज पराभूत झाले आणि पात्रता फेरीतच त्यांचं आव्हान संपुष्टात आलं. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर खेळात सुधारणा करून श्रीलंकन संघ मुख्य स्पर्धेत दाखल झाला.

मुख्य स्पर्धेची जोरात सुरुवात

२२ ऑक्टोबरला ‘ट्वेन्टी-२०’ विश्‍वकरंडकाच्या मुख्य सामन्यांची सुरुवात झाली. न्यूझीलंड संघाने यजमान ऑस्ट्रेलियन संघाला मोठ्या फरकाने नमवलं. ऑस्ट्रेलियन संघ माजी विजेता होता, तसाच यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेचा प्रमुख दावेदार मानला जात होता. त्या एका सामन्यातील पराभवाचं भूत असं काही ऑस्ट्रेलियन संघाच्या मानगुटीवर बसलं की, त्यानंतरचे सामने जिंकूनही नेट रन रेट सुधारता न आल्याने ऑस्ट्रेलियन संघाला बाद फेरीपासून दूर रहावं लागलं.

दुसऱ्‍या बाजूला बहुचर्चित भारत-पाकिस्तान सामन्याने शक्य ते सर्व रंग दाखवले. शेवटपर्यंत मैदानावर खंबीरपणे उभं राहत विराट कोहलीने भारताला अशक्यप्राय विजय मिळवून दिला आणि सगळे भारतीय चाहते मनोमन सुखावले. मधल्या टप्प्यात पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात बलाढ्य इंग्लंड संघाला आयर्लंडने हरवलं. झिम्बाब्वेने पाकिस्तानला पराभूत केलं आणि एकच गदारोळ झाला. पाकिस्तानने दोन सामने गमावल्याने स्पर्धेतील त्यांच्या अस्तित्वाला मोठा धक्का लागला. कराचीला जायच्या विमानात बसायला निघालेल्या पाकिस्तान संघाला नेदरलँडस् संघाने परत बोलावलं. नेदरलँडस् संघाकडून उपांत्य फेरीची वाट विश्वासाने चालू लागलेला दक्षिण आफ्रिकन संघ पराभूत झाला. पाकिस्तान संघाला प्रचंड मोठं जीवदान लाभलं.

न्यूझीलंड वि. पाकिस्तान आणि भारत वि. इंग्लंड उपांत्य फेरीच्या लढती जाहीर झाल्या तेव्हा क्रिकेटप्रेमी लोक रंगतदार सामने बघायला मिळणार या विचाराने आनंदी झाले. दुर्दैवाने दोनही उपांत्य लढती अगदीच एकतर्फी झाल्या. सिडनीला झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात वर्चस्वाची दोरी घट्ट पकडून ठेवत पाकिस्तानने न्यूझीलंडला सलग चौथ्यांदा आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत पराभूत केलं. तो सामना निदान शेवटच्या षटकात संपला, इतका अ‍ॅडलेडला झालेला दुसरा सामना एकतर्फी झाला.

खूप चांगला खेळ न करूनही भारतीय संघ मूलभूत सातत्य राखून उपांत्य सामन्यात पोहोचला होता. अर्थातच, लोकांच्या आशा-अपेक्षांना उधाण चढलं होतं. जोस बटलरच्या इंग्लंड संघाने त्याच आशा-आकांक्षांवर जबरदस्त सामना खेळून पाणी फिरवलं. भारताने कष्ट करून उभारलेल्या १६८ धावा इंग्लंडने १६ षटकांत आणि एकही गडी न गमावता पार केल्या.

चूक झाली तर मान्य करा

संपूर्ण स्पर्धेत विराट कोहलीने सातत्यपूर्ण आणि सूर्यकुमार यादवने कल्पक फलंदाजी करूनही ग्रुप म्हणून भारतीय फलंदाजी चाचपडत होती. पहिल्या ६ षटकांतील भारतीय संघाचा खेळ सुमार होता. के. एल. राहुल आपण खेळताना स्टायलिश कसे दिसू याच्या विचारात जास्त दिसला. दोन सामन्यांत राहुलने सामना चालू झाल्यानंतरचं पहिलं षटक निर्धाव खेळून काढलं, जी गोष्ट अनाकलनीय होती. कप्तान रोहित शर्माला सूर शेवटपर्यंत गवसला नाही. कप्तान आणि संघ व्यवस्थापनाने या गोष्टी सुस्पष्ट दिसत असून कोणतेही बदल केले नाहीत. उपांत्य सामन्यात भारताला १०० धावा जमा करायला १५ षटकं खेळावं लागलं, तर इंग्लंडने १०.१ षटकांत शंभरी गाठली होती. भारतीय संघाने आखलेल्या योजनांमध्ये वैगुण्य होतं. क्षेत्ररक्षणात चापल्याचा अभाव वारंवार दिसून येत होता. निर्णायक सामन्यात इतका मोठा पराभव झाला तो उगाच नाही. योजना आखण्यात व त्या मैदानावर राबवण्यात चूक झाली आहे हे कप्तान रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी कबूल करायलाच हवं.

२०१३ नंतर भारतीय संघाला आयसीसी स्पर्धेत निर्भेळ यश मिळालेलं नाही. कधी निवड समितीची चूक होते, तर कधी संघ व्यवस्थापनाची. आयपीएलचे सामने खेळून खेळून भारतीय खेळाडू ‘ट्वेन्टी-२०’ क्रिकेट कोळून प्यायले आहेत, असा नेहमी समज होतो. साहजिकच मग भारतीय संघाकडून सर्वोत्तम कामगिरीच्या अपेक्षा निर्माण होतात. असं असलं तरीही भारतीय संघ जागतिक टी-२० स्पर्धेत बिनधास्त आणि बेधडक क्रिकेट न खेळता अगदी पारंपरिक क्रिकेट खेळतो याचं आश्चर्य वाटतं. आयपीएल खेळणं वेगळं आणि जागतिक स्पर्धेत टी-२० क्रिकेट खेळणं वेगळं, असंच दिसून येत आहे. टी-२० क्रिकेट तरुणांचा आणि बेधडक खेळणाऱ्यांचा प्रकार आहे असं वाटतं.

ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघांकडे नजर टाकली तर अनुभवी खेळाडूंचा भरणा आपल्याला दिसतो. क्रिकेटमध्ये अनुभवाला मोल आहे यात शंका नसली, तरी टी-२० क्रिकेटमध्ये यशस्वी होण्याच्या गरजा संपूर्णपणे वेगळ्या आहेत, हे नाकारून चालणार नाही. भारतीय संघातील सर्व खेळाडू आणि प्रशिक्षक आम्ही निकालांवर नव्हे तर तयारीच्या प्रक्रियेवर लक्ष देतो, असं वारंवार सांगतात. त्यांना ओरडून सांगावंसं वाटतं की, तुमची विचार आणि तयारीची प्रक्रिया संघ निवडीपासून ते सामन्यात कसं खेळायचं या योजनांपर्यंत चुकत आहे.

‘ट्वेन्टी-२०’ विश्‍वकरंडक स्पर्धेत अपेक्षित कामगिरी झाली नाही तरी भारतीय खेळाडूंच्या अर्थकारणाला किंवा लोकप्रियतेला मोठा धक्का लागेल असं अजिबात वाटत नाही. जागतिक विजेतेपदाची झोळी रिकामी असली तरी सगळ्या भारतीय खेळाडूंना तिन्हीत्रिकाळ खायला पुरणपोळीच आहे. एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे, आता बॅटन पास करायची वेळ आली आहे. नव्या दमाच्या आक्रमक फलंदाजांना आणि कल्पक गोलंदाजांना संधी मिळाली, तरच सामन्याच्या निकालांमध्ये बदल होईल. आशा आहे की, ‘ट्वेन्टी-२०’ विश्‍वकरंडक स्पर्धेतल्या धक्कादायक गच्छंतीनंतर काळाची पावलं ओळखून क्रिकेट नियामक मंडळ, निवड समिती आणि कप्तान - प्रशिक्षक यांच्या विचारप्रक्रियेत बदल होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com