esakal | 'आषाढ' एक छोटासा ब्रेक!
sakal

बोलून बातमी शोधा

ashadh month

'आषाढ' एक छोटासा ब्रेक!

sakal_logo
By
सकाळ वृत्त सेवा

एकाच ऑफिसमध्ये काम करत असुनही रामची आणि माझी भेट बऱ्याच वर्षांत झाली नव्हती. त्या दिवशी अचानकच तो भेटला. ऑफिसमध्येच. दाढी थोडीशी वाढलेली. कपाळावर भस्माचे पट्टे. इकडचं तिकडचं बोलणं झालं. म्हटलं... चल चहा घेऊ.

तर तो म्हणाला... नको माझं पारायण चालु आहे.

"अजुन करतोस तु पारायण?"

"हो वर्षातुन दोन पारायण करण्याचा नियमच आहे माझा. गुरुपौर्णिमा, आणि दत्त जयंती."

हो. माहीत आहे मला. पण अजुनही करतो म्हणजे विशेषच की. होतं का वाचन या वयात?"

"हं...आता सगळेच नियम नाही पाळले जात. पण करतो. जसं जमेल तसं"

रामच्या घरी पुर्वीपासुनच दत्त भक्ती. आता 'गुरुचरित्र' पारायण करणं म्हणजे त्याचे अनेक नियम. पारायण करणाऱ्याची अंतर्बाह्य शुचिर्भूतता...सोवळे, ओवळे...वाचनाची लय...पारायण काळातील आहार... ते पांढऱ्या धाबळीवर झोपणे... पारायणानंतरचे उद्यापन, महानैवेद्य.

हे सगळं रामकडुन आता या वयात कसं होत असेल?

"हे बघ...जेवढं जमेल तेवढं करायचं. आता मी वाचनही संध्याकाळी करतो. दिवसभर ऑफिस झालं की मग घरी गेल्यानंतर स्नान करून वाचनाला बसतो. तेही खुर्चीत. मांडी घालुन आता खुप वेळ नाही बसता येत. नियम म्हणशील तर या काळात बाहेरचं काही खात नाही. आपल्या कडुन होईल तेवढं करायचं. अखेर भावना मोठी.

कारण गुरुचरीत्रातच तर म्हटलंय.

'अंतःकरण असता पवित्र...

सदाकाळ वाचावे गुरुचरित्र'

एकीकडे पारायण सुरु असतानाच वारकऱ्यांना ओढ लागते ती पंढरीची. शेतकऱ्यांनाही जरासा विसावा, चेंज हवाच असतो ना! आता आषाढ सुरु झाला. वेगवेगळ्या संतांच्या पालख्या पंढरपुरच्या वेशीजवळ येऊ लागतात. वर्तमान पत्रात फोटो, बातम्या येऊ लागतात.

'आज या गावात पालख्या पोहोचल्या... या गावात रिंगण रंगले..'

हेही वाचा: सूर हरवलेला अहंकारी आलाप

आषाढ मंदा..तो सालभर धंदा!

एकंदरीतच आषाढ महीना म्हणजे थोड्याशा विश्रांतीचा. आपल्या नेहमीच्या रुटीनपासुन वेगळं काही करण्याचा. ईश्वरभक्ती करण्याचा. निसर्गाच्या जवळ जाण्याचा. छोटासा ब्रेक घेण्याचा.

आम्हा व्यावसायिकांचा हा महीना लाडका असायचा एकेकाळी. म्हणजे बघा... दोन तीन महीन्याची लग्नसराई आता संपलेली आहे. पुर्वी आषाढात लग्न होत नसायचे. तर लग्नसराईत चांगला धंदा झालेला. गाठीशी बऱ्यापैकी पैसा. दोन तीन महीने धावपळ, दगदग झालेली. अर्थात ती पण हवीहवीशी. तर आता या महीन्यात आराम करायचा. सगळा आसमंत हिरवागार झालेला आहे. बाहेर छान पाऊस पडतो आहे. चहाचे घोट घेत त्याचा आनंद घ्यायचा. बस्स...आपल्यासाठी जगायचं. मग श्रावण सुरु झाला...सणवार सुरु झाले की आहेच गिऱ्हाईकी.

आषाढात गिऱ्हाईकी नाही... धंदा शांत. पण त्याचा खेद करायचा नाही. कारण त्या पिढीतल्या लोकांचं म्हणणंच असायचं...

'आषाढ मंदा..तो सालभर धंदा'

- सुनील शिरवाडकर, नाशिक

हेही वाचा: || नित्य साधनेचे महत्त्व ||

loading image