पाऊस मुंबईचा

वेगवेगळ्या बलस्थानांमुळे जगभरात मुंबई शहर प्रसिद्ध आहे. भौगोलिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षमतेसोबतच एकेकाळी सात बेटांचे शहर म्हणून नैसर्गिक श्रीमंतीचे वैभव म्हणून मुंबईची ओळख होती.
Mumbai Rain
Mumbai RainSakal
Summary

वेगवेगळ्या बलस्थानांमुळे जगभरात मुंबई शहर प्रसिद्ध आहे. भौगोलिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षमतेसोबतच एकेकाळी सात बेटांचे शहर म्हणून नैसर्गिक श्रीमंतीचे वैभव म्हणून मुंबईची ओळख होती.

- सुरेश पाटणकर

वेगवेगळ्या बलस्थानांमुळे जगभरात मुंबई शहर प्रसिद्ध आहे. भौगोलिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षमतेसोबतच एकेकाळी सात बेटांचे शहर म्हणून नैसर्गिक श्रीमंतीचे वैभव म्हणून मुंबईची ओळख होती. याच मुंबईचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. नागरीकरण वाढले आणि अलीकडच्या काळात सुखावणारा पाऊस मुंबईकरांच्या मनात धडकी भरवणारा ठरतो आहे. मुंबई तुंबण्याची परिस्थिती आपल्यावर का ओढवली, याचे विश्‍लेषण...

सात बेटांची मुंबई. ऐतिहासिक महत्त्व असलेली. आपल्या देशाची आर्थिक राजधानी. भौगोलिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षमता ओळखून राज्यकर्त्यांनी मुंबईचा विकास केला. मानदंड निर्माण केले. साधारण ४३७ चौ.कि.मी. क्षेत्रफळाच्या मुख्य बेटाला विस्तारित केले गेले आणि स्वातंत्र्यापूर्वीच्या ३० लाखांची लोकसंख्या १३५ लाख झाल्यावर, लोकसंख्येची घनता, वाहतुकीची कमतरता, अस्वच्छता वाढत गेली; पण आर्थिक राजधानीचे बलस्थान कधीही कमी झाले नाही. मुंबईची अनेक बलस्थाने आहेत. नैसर्गिक बलस्थान म्हणजे पाऊस, जैवविविधता, पर्यावरण, आजूबाजूचे पाण्याचे स्रोत. उदा. समुद्र, खाड्या, नद्या वगैरे. त्यातील मुख्य नैसर्गिक बलस्थान म्हणजे पाऊस. पश्‍चिम किनारपट्टीवरील भाग म्हणून मुंबईला कोकणसदृश पावसाची श्रीमंती लाभली. मागील ७५ वर्षांच्या मुंबईच्या या श्रीमंतीत कसा बदल झाला आणि त्याचा जगण्यावर काय फरक पडला, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

मुंबईतील पावसाचे प्रमाण ७५ वर्षांत वाढले की कमी झाले? अर्थातच नोदंणीकृत आकडेवारीप्रमाणे ते फार वाढले, असे दिसत नाही. पावसाचे ७० ते ८० टक्के पाणी जमिनीत मुरत होते. त्यामुळे जमिनीवर वाहणारे पाणी कमी होते. प्रचंड नागरीकरणामुळे हे २५ टक्के वाहणारे पावसाचे पाणी वाढून आज ९० ते ९५ टक्क्यांवर पोचले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी तुंबून आता नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत.

मुंबईकर नागरिक सर्व प्रकारच्या परिस्थितीला, आव्हानांना तोंड देऊन आर्थिक गाडा चालू ठेवण्याची वृत्ती दाखवतो, हे अनेकदा सिद्ध झाले आहे; परंतु अलीकडच्या काळात ही परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे चित्र दिसते. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यात फरक पडला आहे. सात बेटांची आणि आजूबाजूच्या खाड्या, समुद्रातील पाण्याच्या स्रोतांचा दूरदृष्टीने विचार न झाल्यामुळे असंख्य समस्या निर्माण झाल्या. मुंबईच्या सात बेटांवरील जमिनीचे नियोजन विचारपूर्वक झाले नाही. मुंबईचा सखल भाग आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था किंवा गटारे बऱ्यापैकी वरच्या पातळीवर आणायला हवी होती; पण ही दूरदृष्टीही दिसली नाही. उपनगरामधील भूखंडाचे नियोजन करतानासुद्धा हा विचार न करण्याचे, फसव्या नियोजनाचे परिणाम आज मुंबईकर भोगत आहेत. अर्थात अशा तऱ्हेच्या नियोजनाची गरज असूनसुद्धा ते केले गेले नाही, त्याचे कारण आर्थिक असू शकते.

१९ व्या शतकात साधारणत: मुंबईत संपूर्ण पाऊस चार महिन्यांत सम प्रमाणात पडायचा. २० व्या शतकात ही परिस्थिती वेगवेगळ्या कारणांमुळे वेगाने बदलली. पाऊस लहरी आणि अनिश्‍चित झाला. हवामान खाते आणि इतर संस्थांच्या आकडेवारीचा अभ्यास करताना असे दिसते की, सन १९५४ मध्ये पाऊस ३,४५२ मि.मी. झाला होता आणि ६५ वर्षांनंतर म्हणजे २०१९ मध्ये ३,४५४ मि.मी. झाला. मधल्या कालावधीत २२००, २५००, २८०० अशा तऱ्हेच्या नोंदी दिसतात. म्हणजे मागील ७५ वर्षांत सातत्याने पावसाची वृद्धी झाली, असे म्हणता येणार नाही. हवामान संस्थांच्या अभ्यासाप्रमाणे सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण वाढले, ही एक महत्त्वाची नोंद आहे. जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यांतसुद्धा अशा प्रकारची अनियमितता झालेली दिसते. याचा अर्थ सात दशकांमध्ये अनिश्‍चिततेचे प्रमाण जास्त झाले. त्यामुळे गटारांची संख्या आणि आकार याचा पुनर्विचार करावा लागला. पावसाची प्रखरता प्रत्येक तासाला २५ ते ५० मि.मी. आणि त्याची सातत्यता सलग चार तास दिसते. याच प्रखरतेच्या कालावधीत गटारे तुंबणे, भरती-ओहोटी हे कळीचे मुद्दे ठरतात. सर्वात कहर म्हणजे २६ जुलै २००५ रोजी मुंबईत २४ तासांत ९४४ मि.मी. पाऊस नोंदवला गेला. अशा तऱ्हेची परिस्थिती पुन्हा केव्हा येईल आणि आणखी अशाच समस्येला पुन्हा सामोरे जावे लागेल का, हे काळच ठरवेल. मान्सूनची वाट पाहताना हवेच्या वरच्या स्तरावरील प्रवास, इंटरनॅशनल कॉनव्हर्जनस्‌ झोन आणि पॅसिफिक महासागरातील अल-निनो आणि ला-निनो या घटकांवर पावसाचे प्रमाण आणि त्यातील बदल महत्त्वाचे ठरते.

मुंबईकरांना आणखी एक उत्सुकता म्हणजे पडणाऱ्या पावसाचे स्वागत करण्यामध्ये काही बदल झाल का? त्यासाठी भौगोलिक भूगर्भीय आणि सामाजिक स्तर, याचा एकत्रित विचार करावा लागेल. १९ व्या शतकातील पाच दशकांत मुख्य फरक मुंबईमध्ये झाला तो म्हणजे शीव आणि माहीम एवढीच सीमा असलेला मुंबईचा प्रदेश मुलुंड आणि दहिसरपर्यंत गेला. त्यामुळे मुंबईचे क्षेत्रफळ तीन-चार पटीने वाढले. समाविष्ट केलेला जास्तीचा प्रदेश आणि आधीच्या सात बेटांचा संबंध नव्हता.

बेटयुक्‍त प्रदेशात पावसाचे विशिष्ट प्रमाण होतेच; पण जास्त प्रदेशातील डोंगराळ भाग आणि ठाणे जिल्ह्याची जवळिक वाढली. त्याचा फायदा अर्थातच पवई, विहार आणि तुलसी हे पिण्याच्या पाण्याचे स्रोत निर्माण करता आले, ते जास्तीच्या पावसामुळे आणि भूगर्भीय अनुकूलतेमुळे. चांगल्या पावसाच्या उपलब्धतेने खुद्द मुंबई शहर पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हायला मदत नक्कीच झाली. सोबतच महापालिकेच्या इतर जबाबदाऱ्या वाढल्या. स्वातंत्र्यपूर्व काळात पडणाऱ्या पावसाचा निचरा भूमिगत गटारांमधून करण्याची योजना कार्यान्वित झाली होती. या गटारांच्या शेवटी, पावसाचे पाणी समुद्रात आणि खाडीत जाण्यासाठी आऊटफॉलही बांधले गेले होते. अर्थात हे आऊटफॉल्स समुद्रपातळीपेक्षा भरतीच्या वेळेस खाली जात; पण १९ व्या शतकातील पाच दशकांतील पाऊस पडण्याच्या सातत्यामुळे पूर परिस्थिती फारशी होत नसे. नागरीकरण जास्त झाल्यामुळे जमिनीवरून वाहणारे पावसाचे पाणी तुलनात्मकदृष्ट्या जास्त होते. याउलट सामावून घेतलेल्या जास्तीच्या प्रदेशात नागरीकरण फारसे झाले नव्हते. त्यामुळे मुरण्याचे प्रमाण जास्त आणि जमिनीवरचे वाहते पाणी कमी, अशी परिस्थिती होती.

भूमिगत गटारांऐवजी चढ-उतारांच्या अनुषंगाने या भागात पावसाचे पाणी वाहून माहुल, ठाणे, मालाड, वर्सोवा आणि वांद्रे येथील समुद्रात जाण्याची सोय निसर्गानेच तयार केलेली होती. अर्थात झोपडपट्टी आणि इतर कारणांमुळे या वॉटर कोर्सेसचे स्वरूप सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांमध्ये झाले. हीच परिस्थिती साधारण २० व्या शतकातील दोन दशकांमध्ये तशीच राहिली. अतिक्रमण, बेशिस्त आणि चुकीचे नियोजन यामुळे या वॉटर कोर्सेसची वाहक क्षमता दर वर्षी कमी होणे आणि त्यामुळे त्यातील गाळ काढणे हे अभियान राबवावे लागते. कळीचा मुद्दा म्हणजे पाऊस पडण्याच्या आधी सातत्यात किंवा प्रखरतेत मोठा बदल मानवी आणि इतर हस्तक्षेपामुळे झाला. काँक्रीटीकरण झाले. या सगळ्याचा परिपाक म्हणजे विसाव्या शतकातील पहिल्या दोन दशकांत मुंबईभर पाणी साठण्याच्या जागांमध्ये वाढ झाली, तीव्रता वाढली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हातून या सगळ्या गोष्टी होऊ नयेत म्हणून, अपेक्षित असलेली कार्यतत्परता झाली नाही. मुंबईतील पावसाच्या बदलाचा हा एक मोठा पैलू मुंबईकरांना सतत सतावत आहे. यात सुधारणा होण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक स्वराज्य संस्थेकडून बऱ्याच अपेक्षा निर्माण होतात.

मुंबईच्या पावसाचे बदल आणि परिणाम अधोरेखित करताना मुख्यत्वे तांत्रिक, भौगोलिक आणि भूगर्भीय गोष्टींचा विचार केला; पण सामाजिक बदल हेही तितकेच महत्त्वाचे आणि उत्सुकतेचे ठरते. मुंबईकर आधी पावसाची अत्यंत उत्सुकतेने वाट पाहायचे. कुठल्याही प्रकारची भीती जाणवत नव्हती. लहान मुले ‘ये रे ये रे पावसा’ अशी गाणीही दिलखुलास म्हणायचे. आता मातीच राहिली नसल्यामुळे पहिल्या पावसानंतर येणाऱ्या मातीच्या सुगंधालाही मुंबईकर मुकला आहे. आता पाऊस आला आणि सुखद गारवा निर्माण झाला, तरी मुंबईकरांच्या मनात भीती जाणवते. पूर येईल का? पाणी साचेल का? पाऊस आरोग्यासाठी धोकादायक ठरेल का? गाड्या बंद होतील का? अशा तऱ्हेचे असंख्य विचार मुंबईकरांच्या मनात घर करतात.

पहिल्या पावसात मुलांनी कागदी होड्या सोडणे, मनसोक्त भिजणे या गोष्टी आता भीतीपोटी फारशा होत नाहीत. मुंबईकराला पावसाचा आनंद होतो; पण तो १९ व्या शतकासारखा निखळ आनंद होत नाही. झाडे लावणे, पावसातील खेळ खेळणे वगैरे गोष्टी हा अविभाज्य भाग होता. त्यामध्येसुद्धा बदल झालेला दिसतो. कच्च्या घराची पावसाळी कामे कमी होऊन घरात साचलेले पाणी काढून टाकणे, याकडे जास्त लक्ष द्यावे लागते. विस्तारित उपनगरामध्ये तर पाऊस सुरू झाल्यावर झाडाखाली आश्रय शोधला जात होता. आता पहिल्या पावसाच्या धूळयुक्‍त पाण्याने कपडे खराब होतील, या भीतीपोटी दुकानाच्या वाढीव जागेतून मार्गक्रमण करतो. गिरगावातील ठाकूरद्वार, काळबादेवी, नळबाजार वगैरे भागात पावसातून मार्गक्रमण करताना आपल्या आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घेण्याची मजा कमी झालेली दिसते. शाळेचा पहिला दिवस आणि पाऊस एकत्रच यायचे. ती मजा आता अनुभवायला येत नाही. पाऊस सुरू व्हायच्या आधी पावसाची सूचना देणाऱ्या बेडकांची डराव-डराव हल्ली ऐकायलाच येत नाही. मुंबईतील पावसात झालेला बदल याचा साधारण आलेख आणि गोषवारा घेतल्यास असे वाटते, की मागील दोन दशकांत पावसाच्या प्रखरतेत बदल घडल्यामुळे जनजीवन विस्कळित होणे, आरोग्यावर परिणाम होणे वगैरे दुष्परिणामांना मुंबईकराला सामोरे जावे लागते. दुष्परिणामाची तीव्रता वाढली आहे. पावसाच्या कालावधीतील अनिश्‍चितता आणि पावसाची प्रखरता हे दोन मुख्य बदल मुंबईकरांना सहन करावे लागत आहेत.

(लेखक मुंबई विकास समितीचे सदस्य असून, मुंबई महापालिकेचे निवृत्त मुख्य अभियंता आहेत.)

snpatnkar@rediffmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com