ट्रोलर्स, ‘नेम’ चुकतोय...

सोशल मीडियावर आक्रमकतेची लढाई लढताना त्यांच्या हे लक्षातच येत नव्हतं, की हे आपण का आणि कोणासाठी करतोय ते? काजोल म्हणते तेच खरं,
Trollers
Trollerssakal

अभिनेत्री काजोलने नुकतंच प्रसारमाध्यमाशी बोलताना शिक्षणाच्या महत्त्वाबाबत एक धाडसी विधान केलं. त्यात तिने राजकीय नेतेमंडळींना गोवलं; पण कोणाचं नाव घेतलं नाही... तरीही तिने तसं करायला नको होतं, असं देशभरातील ट्रोलर्सने ठरवून टाकलं. धडाधड तिला ट्रोल करणं सुरू झालं. त्यात आघाडीवर होते अंधभक्त. सोशल मीडियावर आक्रमकतेची लढाई लढताना त्यांच्या हे लक्षातच येत नव्हतं, की हे आपण का आणि कोणासाठी करतोय ते? काजोल म्हणते तेच खरं, आपल्या देशात वैचारिक बदलाची प्रक्रिया खूपच संथगतीने सुरू आहे...

गेल्या काही दिवसांत ट्रोलर्स जमाती वाढीस लागल्या आहेत. आपल्या हातातील इवल्याशा मोबाईलनामक बोलक्या बाहुल्याचा उपयोग कशासाठी करायचा, याचा विसर त्यांना पडलाय. एखाद्याने आनंद शेअर केला, तरी त्याला ट्रोल करायचं किंवा कोणी दु:ख व्यक्त केलं, तरी त्याला झोडून काढायचं... पातळी सोडून शब्दांचे वार करत हाणून काढलं की यांचं मस्तक शांत होतं. बेताल ट्रोलिंगचं एक नवं व्यसन सध्या वेगाने पसरतंय आणि दुर्दैव म्हणजे त्याची नशा वाढत चाललीय.

‘भले तरी देऊ कासेची लंगोटी... नाठाळाचे माथी हाणू काठी’ अशी रोखठोक भूमिका सतराव्या शतकात घेणारे तुकाराम महाराज बुद्धिप्रामाण्याने प्रस्थापितांविरोधात लढणारे संत होते. त्यांनी सामाजिक प्रबोधनाचा मार्ग दाखवला. टीका कशासाठी करायची ते त्यातून शिकायला हवं.

आताचे ट्रोलर्स ऊठसूठ कोणावरही टीका करताहेत. जणू काही ट्रोलिंग त्यांच्या दिनचर्येचा एक भागच असावा किंवा एक सामाजिक जबाबदारी असावी, जी पार पाडणं त्यांचं आद्यकर्तव्यच आहे. मुळात आपल्या देशात विचारस्वातंत्र्याला फार महत्त्व आहे. आपले विचार मांडणं काही चूक नाही. काही जणांना ते पटतात, अनेकांना नाही रुचत; पण त्यावर सोशल मीडियावर जाहीरपणे झोड उठवणं अजिबात सयुक्तिक नाही. त्याचं समर्थन होऊच शकत नाही, मग तो कितीही मोठा माणूस असो की एखादी महनीय व्यक्ती असो. एक सांगावंसं वाटतं, की ट्रोलर्स तुमचा ‘नेम’ चुकतोय...

आपण सगळे विरंगुळा म्हणून नाटक-सिनेमा-वेबसीरिज पाहतो. आपली मतं बनवतो, त्याची जाहीर चर्चा करतो, टुकार पिक्चर, फालतू अॅक्टिंग, बेसूर गाणी किंवा रटाळ स्टोरी अशी दूषणं देतो... मग पुढच्या कामाला लागतो आणि सारं विसरतो, एवढं सोपं आहे हे. जगात घडत असलेल्या प्रत्येक कृतीवर टिप्पणी करत बसाल तर कठपुतळी होऊन जाल. जरूर व्यक्त व्हा; पण एखाद्या सशक्त मुद्द्यावर आवाज उठवताना आणि तेही डोळे उघडे ठेवून.

नुकताच ‘लस्ट स्टोरीज २’ चित्रपट माझ्या पाहण्यात आला. म्हणजे ठरवूनच पाहिला. कारण तिथे होती माझी फेव्हरिट अभिनेत्री काजोल... काजोल बऱ्यापैकी माॅडर्न असली तरी तिच्या सोज्वळ भूमिकांनी मनाचा ताबा कधीच घेतला होता. आठवा, ‘डीडीएलजे’, ‘कुछ कुछ होता है’ किंवा ‘फना’... ‘लस्ट स्टोरीज’मध्ये तिचं ‘सेंसेटिव्ह’ काम पाहिलं. दुसऱ्याच दिवशी तिचं ‘सेन्सिबल’ रूपही दिसलं.

राजकीय नेत्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल तिने रोखठोक मत मांडल्याचे वाचून शालजोडीतलं मारणं म्हणतात ते हेच का? असा प्रश्न पडला. ‘आपण अजूनही परंपरा आणि जुन्या विचारधारेत अडकलो आहोत. अर्थातच शिक्षणाच्या अभावामुळे. देश चालवणाऱ्या अनेक नेत्यांकडे दूरदृष्टीचा अभाव दिसून येतो.

शिक्षणामुळेच तुमच्यात दूरदृष्टी येते,’ असं थेट विधान तिने केलं; परंतु ट्रोलर्स टपून होतेच. साहजिकच तिला प्रचंड ट्रोल केलं गेलं. काहींनी तर तिनेही शालेय शिक्षण अर्धवटच सोडल्याचा मुद्दा मांडला. अनेकांनी तर तिचा पती अजय देवगण आणि मुलगी न्यासा यांना अनुक्रमे जाहिरात अन् ड्रेसिंग सेन्सवरून खडे बोल सुनावले. मोठ्या प्रमाणात ट्रोल झाल्याने काजोलला दोन पावलं मागे जात आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागलं. पण मला वाटतं, सध्याची आपल्या देशातील एकंदरीत राजकीय स्थिती पाहता काजोल एकदम परफेक्ट बोलली, असं म्हणायला वाव आहे.

कोरोना काळात आपण अनेक नवे शब्द एेकले. गृहविलगीकरण, अलगीकरण, लाॅकडाऊन, मुखपट्टी, पीपीई किट, आरटी-पीसीआर, रेमडेसिवीर वगैरे वगैरे. सध्याच्या सत्तासंघर्षात काही जुनेच शब्द नव्याने प्रचलित झालेत... भूकंप, बंडखोरी, गद्दारी, पुरावे, शक्तिप्रदर्शन, खोके, पाॅवर, कलंक, ईडी... लिस्ट मोठी आहे. सांगायचा मुद्दा हा, की शब्द जुनेच आहेत; पण त्याचा नवा अर्थ राजकीय शब्दकोशात पाहायला मिळतोय.

फक्त ‘विकास’ शब्द मात्र तोलूनमापून वापरला जातोय. कारण असाही तो होतच असतो. मग सरकार कोणाचंही असो. थोडा वेळ लागतो एवढंच... सध्या एकमेकांवर कुरघोडी करण्याचे सुरू असलेले प्रकार वेदनादायी आहेत. दुसरीकडे ट्रोलर्सही स्वतःला तथाकथित न्यायदात्याच्या खुर्चीत बसवून योग्य-अयोग्य गोष्टींचा हिशेब मांडताहेत, याला काय म्हणावं? ट्रोलिंग जरूर करा; पण कोणाला आणि कोणत्या मुद्द्यावरून करतोय याची तमा बाळगा.

कोणावरही पातळी सोडून टीका करणारे तुम्ही कोण? असे ‘ट्रोल’भैरव वाढू लागले असून विचारांची लढाई लढणाऱ्यांसाठी ते घातक ठरत आहेत. खऱ्या अर्थाने ‘दिग्गज’ म्हणता येतील, अशी जगभरातील व्यक्तिमत्त्वेही यांच्या तावडीतून सुटत नाहीत. आम्हाला शहाणपण शिकवू नका, आम्ही जन्मजात टॅलेंटेड आहोत, असा आविर्भाव काय कामाचा? हे चित्र बदलायला हवं.

काजोलच्या वक्तव्यानंतर प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे, शिक्षणामुळे दृष्टिकोन येतो म्हणजे नेमकं काय होतं? तिला नेमकं काय म्हणायचं होतं, हे कोण सांगू शकेल? किंवा तिच्या बोलण्यामागचा नेमका अर्थ कोणाला कळलाय? उत्तर सांगणं कठीण आहे. जेव्हा एखादा काही महत्त्वाचा मुद्दा मांडतो तेव्हा आपण एेकण्याची भूमिका ठेवणं कधीही चांगलं. सांगणारा चुकीचं सांगत असेल तर त्याला टीकेने ठोकून काढा; पण डोळे बंद अन् मेंदू बधिर ठेवून अंधभक्तीत तल्लीन होऊ नका. कारण त्याचीही खिल्ली उडवली जाईल.

महात्मा जोतिबा फुले यांनी शिक्षणाचा पुरस्कार केला. ‘विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले’ असा संदेश त्यांनी दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ अशीच शिकवण दिली.

राजकारणात शिक्षण किती महत्त्वाचं असतं, याची झलक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीही अनेकदा आपल्या भाषणांतून ठाकरी स्टाईलने दाखवून दिलीय. काजोलनेही कुणालाही टार्गेट न करता शिक्षणाचं महत्त्व सांगितलं. मग ते का झोंबलं? असा प्रश्न ट्रोलर्सनाही निरुत्तर करणारा आहे. कितीही झालं तरी संस्कार आणि शिक्षणाचा प्रभाव जाणवतोच.

कमी शिक्षण असलेल्यांनी कर्तृत्वाची अत्युच्च भरारी घेतलेली अनेक उदाहरणं आज भारतात आहेत; पण त्यांच्या अशिक्षितपणाला संस्काराची जोड होती. वैचारिक दृष्टिकोन होता. अगदी काजोल म्हणते त्याचा दुसऱ्या बाजूने विचार केला, तर शिक्षणच व्यापून उरते, असेही नाही; पण ते असेल तर नक्कीच तुमच्या मनावर आणि मेंदूवर कोणत्याही धर्माची, कर्माची, मग्रुरीची, बंडखोरीची, अहंकाराची, अप्रतिष्ठेची आणि असभ्यतेच्या अफूची गोळी परिणाम करू शकणार नाही. ‘शहाणपण देगा देवा’ असं म्हणण्याची वेळ वारंवार येऊ नये, हीच अपेक्षा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com