सिनेमा म्हणजे प्रेक्षक राजा!

‘ओटीटी’च्या आक्रमणामुळे काही दिवसांपूर्वी चित्रपटगृहं ओस पडू लागली होती; पण आज तिथेच एवढी गर्दी होतेय की जणू काही देशाच्या विजयाचा जल्लोष सुरू आहे. त्या जल्लोषाचं नाव आहे ‘गदर २’.
Sunny Deol
Sunny DeolSakal

‘ओटीटी’च्या आक्रमणामुळे काही दिवसांपूर्वी चित्रपटगृहं ओस पडू लागली होती; पण आज तिथेच एवढी गर्दी होतेय की जणू काही देशाच्या विजयाचा जल्लोष सुरू आहे. त्या जल्लोषाचं नाव आहे ‘गदर २’.

आशय आणि विषयाच्या पातळीवर काही गोष्टी खटकत असल्या, तरीही सनी देओलचा नवा चित्रपट धो-धो चालतोय, कारण ‘पब्लिक इज किंग’. प्रत्येक जण आपल्या देशाच्या पारंपरिक सिनेउत्सवाचा एक भाग होतोय आणि दुसरीकडे ‘ओटीटी’ला ओहटी लागत चालली आहे.

80 च्या दशकात आपण सगळेच फार ‘फिल्मी’ होतो. म्हणजे साधारण सत्तरीत जन्मलेली आणि त्यानंतरच्या काही वर्षांतली पिढी टिपिकल बॉलीवूडपटांवर जगली. करमणुकीचा दुसरा काही चॉईसच नव्हता तेव्हा... मोठ्या पडद्यावर दिसणाऱ्या हिरो-हिरोईनमध्ये आपण स्वतःला शोधत आलो.

त्यांचं पडद्यावरील कचकड्याचं जगणं वास्तवात मिरवण्याचा प्रयत्न करत होतो. कधी तरी बंद खोलीत आरशासमोर आपल्याही घरात त्या काळी धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, अनिल कपूर वगैरेंसारखं ‘तारका’मंडळ अवतरलं असेल. त्यांच्या अॅक्टिंगची अन् डायलॉगची पारायणं करून आपणही स्वतःची रग जिरवली असेल.

एखादा सुंदर चेहरा कमालीचा आवडून गेला असेल... सगळंच स्वप्नवत होतं ते, तरीही आपण आपल्या अकलेचे तारे तोडत होतो. कारण चित्रपटांतील अशा ‘ताऱ्यां’विषयी असलेलं आकर्षण कधीच कमी झालेलं नाही आणि होणारही नाही. आज आपली ‘चांद्रयान ३’ मोहीम यशस्वी ठरलीय; पण ४० वर्षांपूर्वी बॉलीवूडच्या क्षितिजावर उगवलेला एक तारा आजही तेवढ्यात तडफेने तळपतोय...

आपल्या गर्जनेने ‘हिंदुस्थान झिंदाबाद’चे नारे पाकिस्तानच्या भूमीत देतोय. त्याचं नाव आहे, ‘तारा’सिंग. अर्थात ढाई किलोचा हात असलेला अभिनेता सनी देओल. काय जादू आहे कळत नाही, पण ‘अवघ्या’ ६६ वर्षांचा सनी पाजी ‘गदर २’ सिनेमातील एका दृश्‍यात संतापाने हातपंपाकडे धावत सुटतो आणि पाकिस्तानच्या अख्ख्या लष्करी फौजेची पळता भुई थोडी होते म्हणजे बघा...

२२ वर्षांपूर्वी प्रचंड गाजलेल्या ‘गदर : एक प्रेमकथा’ सिनेमाची पुण्याई त्यामागे असली, तरी एक लक्षात घ्यायला हवं, की आजच्या डिजिटल युगातही मास अपील असलेला ‘पिटा’तला प्रेक्षक बदललेला नाही. हातातील मोबाईलमध्ये जगभरातील मनोरंजन एका क्लिकवर सोयीनुसार काही पैशात पाहता येत असतानाही तो काही ‘शे’ रुपये खर्च करत थिएटरात जातो आणि खऱ्या अर्थाने आपल्या पारंपरिक चित्रपटांची मजा लुटतो.

अशा प्रेक्षकांच्या भावनांना कोणी हात घातला की तो भारावून जातो. त्याच्यावर एकदा का प्रेमाच्या बरोबरीने ‘इमोशनल अत्याचार’ झाले की तो तुमचा होऊन जातो. पडद्यावर खलनायकांना लोळावणाऱ्या हिरोंवर तो जीव ओवाळून टाकतो. त्यांची मंदिरही उभारतो... वारंवार हे सिद्ध झालंय. त्यात काही रॉकेट सायन्स नाही; पण इमोशनची भट्टी नीट जमून यायला हवी.

‘गदर २’ सिनेमा त्याचं उत्तम उदाहरण. त्यात आहे तारासिंग आणि सकिनाची प्रेमकथा, सोबतीला आहे जाज्वल्य देशभक्तीचा उत्साह, पहिल्या भागाचा नॉस्टेल्जिक फॅक्टर, प्रदर्शनाचं अचूक टायमिंग, सिंगल स्क्रीनचं पुनरुज्जीवन, टाळ्या-शिट्ट्या मिळवणारी अॅक्शन अन् धारदार डायलॉग, ‘दुश्मन मुल्क’ पाकिस्तानची हार आणि अर्थातच पैसावसूल करमणूक...

२०११ मध्ये आलेल्या ‘यमला पगला दिवाना’नंतर सनीच्या नशिबी फार काही यश आलेलं नाही. त्याचं काय चाललंय, कोणाला माहीत नव्हतं. राजकारणातील सक्रिय सहभागामुळे मात्र तो कमी-अधिक प्रमाणात चर्चेत होता. दरम्यानच्या काळात ‘ओटीटी’चा उदय झाला आणि त्यावरील ‘आश्रम’ वेबसीरिजमुळे सनीचा भाऊ बॉबी देओल अभिनय जगतात पुन्हा अवतरला. सनीची नौका मात्र किनाऱ्याला लागत नव्हती.

‘गदर २’ने मात्र धमाका केला. देशभरातील, विशेषतः उत्तर भारतातील थिएटर्स ओसंडून वाहत आहेत. पंजाब-हरियानातील प्रेक्षक चक्क ट्रॅक्टर घेऊन पिक्चर पाहण्यासाठी येत आहेत. सनीची भव्य पोस्टर्स थिएटरबाहेर झळकलीत. त्याच्या फोटोंना हार घातले जाताहेत. मिठाई वाटली जातेय. पडद्यासमोर जल्लोष होतोय. सनीचे डायलॉग्ज मोठमोठ्याने म्हटले जाताहेत. टाळ्या-शिट्ट्या घुमताहेत.

‘हिंदुस्थान झिंदाबाद’चा गगनभेदी जयघोष थांबत नाहीय... का होतंय असं? चित्रपट समीक्षक अन् अभ्यासकही चक्रावले आहेत. काही प्रेक्षक तर सिनेमाची उणीदुणी काढताहेत... परखड समीक्षकांच्या लेखीही सिनेमा फार काही ग्रेट नाही... मेंदू घरात ठेवा. सनीचा रुद्रावतार अतार्किक आहे.

विजेचा खांब उखडणं वगैरे बकवास आहे, असं सगळं निगेटिव्ह बोलताना सिनेमा एकदा पाहाच, असाही आग्रह करताहेत. काय समजायचं आम्ही? ते असं सांगताहेत कारण त्यांनाही जाणीव आहे, की ‘कमाल’ एवढं एकच विशेषण सध्या ‘गदर २’ला लागू पडतं. पब्लिक पॉवर आणि माऊथ पब्लिसिटीची जादू मान्य करण्यावाचून त्यांच्यासमोरही पर्याय नाहीय.

सिनेमा म्हणजे मुळात एक मनोरंजन. मग ते कशा प्रकारे होतं हे महत्त्वाचं नाही. सिनेमाच्या डायहार्ड प्रेक्षकांना वाटतंय, की आपण तिकिटासाठी घालवलेल्या पैशांची पुरेपूर वसुली होतेय. म्हणूनच ते ‘गदर २’चं कौतुक करताहेत. जे ‘गदर’चा पहिला भाग पाहून भारावून गेले ते सिनेमागृहात सनी देओलच्या गर्जनेची पुन्हा वाट पाहत होते.

‘गदर २’चा विजयी घोडा नॉस्टेल्जिया, देशाच्या स्वातंत्र्याचा अभिमान आणि करमणुकीवर स्वार झाल्यानेच बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत आहे. असं आधीही झालंय की... ‘गदर २’सोबतच प्रदर्शित झालेला मेगास्टार रजनीकांत यांचा तेलुगू सिनेमा ‘जेलर’ आणि अक्षयकुमारचा ‘ओ माय गॉड २’ही तोडीस तोड पसंत केला जातोय. गेलाबाजार बाहुबली, पुष्पा, केजीएफ चॅप्टर २, पठाण इत्यादींसारखे महाबली हिरो असलेले सिनेमे दे मार चाललेच की...

‘जंजीर’-‘शोले’-‘दिवार’पासून सुरू झालेला ७० एमएम पडद्यावरील ‘अँग्री यंग मॅन’चा प्रवास अंकुश, अर्जुन, डर, घायल, घातक, गजनी, दबंग आणि सिंघम असा सुरूच आहे की! मग ‘गदर’चंच एवढं कौतुक का... मला वाटतं, की माणूस समाजात रमणारा प्राणी आहे. कोरोना काळादरम्यान आणि नंतरही तो एका अनपेक्षित चौकटीत बंदिस्त झाला.

मनानेही आणि शरीराने. एक प्रकारे मेंदूमृत झाला. चौफेर जगणं विसरला. लाखोंच्या गर्दीत वावरणारा तो एकटा पडला. हातातल्या मोबाईलमध्ये जग पाहू लागला. अगतिक होऊन दुःखात सुख शोधण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हाच नुकत्याच जन्माला आलेल्या ‘ओटीटी’ने बाळसं धरलं. मनोरंजनाचं नवं दालन खुलं झालं. काही मिनिटांच्या वेबसीरिज खुणावू लागल्या.

अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू झाले. त्यांचं सबस्क्रिप्शन कोरोना व्हायरससारखं वाढू लागलं. कोरोना गेला तरी ‘ओटीटी’चं इन्फेक्शन सुरूच राहिलं. क्लास आणि मास अशा दोन्ही प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची ताकद वेबसीरिजमध्ये होती. मुळात चित्रपट, नाटक, म्युझिक कॉन्सर्ट किंवा क्रिकेट-फुटबॉल-टेनिसचे सामने म्हणजे बेभान होऊन मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांनी एकत्रित एन्जॉय करण्याचा विषय.

ते असे हाताच्या पंजाएवढ्या स्क्रीनवर पाहण्यात काय अर्थ? घरच्या एचडी टीव्हीवर कितीही लख्ख दिसत असली, तरी एखाद्या स्टेडियममध्ये जाऊन क्रिकेट मॅचचा घेतलेला आनंद काय वर्णावा! एखादी म्युझिक कॉन्सर्ट लाईव्ह ऐकली किंवा पाहिलीय का? एक धमाल पिकनिक एन्जॉय करण्यासारखं आहे ते. आपल्या प्रेक्षकांचं सध्या तेच झालंय. दोन घटका करमणूक करण्यासाठीची अधिरताच मग थिएटर हाऊसफुल्ल करून टाकते.

म्हणूनच कसलंही लॉजिक नसलेले, पण प्रेक्षकांची नाळ अचूक ओळखलेले ‘गदर २’सारखे सिनेमे आपल्याला भावतात... अनेकांना ते आपले वाटतात. एका सर्व्हेनुसार ओटीटीच्या ग्राहकांची संख्या काही कोटींनी घसरत चालली आहे. शेवटी ‘पब्लिक इज किंग’, हेच खरं!

सनी देओलच्याच भाषेत सांगायचं झालं, तर ‘गदर २’च्या रूपात आज जे यश मिळतेय ते जनतेलाच हवं होतं. तारासिंग आणि सकिनाच्या व्यक्तिरेखा त्यांच्या हृदयात खोलवर रुतल्या आहेत. अडचणींच्या वेळी प्रत्येक कुटुंबाला देवाची साथ मिळते आणि तीच ताकद आपण चमत्कार म्हणून ओळखतो. प्रेक्षकांना सिनेमा पाहताना त्याचाच अनुभव येत आहे.

सनीने मांडलेलं मत अर्धसत्य असलं तरी नाकारता येत नाही. आजची काहीशी जागरूक तरुणाई आपल्या देशाची महती अशा चित्रपटांमधून शोधण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणूनच ‘हिंदुस्थान झिंदाबाद था, झिंदाबाद है और झिंदाबाद रहेगा’ असं सनी म्हणतो तेव्हा अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

sushil.amberkar@esakal.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com