

Sunrisers Hyderabad IPL controversy
esakal
शैलेश नागवेकर - shailesh.nagvekar@esakal.com
हंड्रेड ही इंग्लंडमधील लीग असल्यामुळे भारताचा थेट संबंध नाही. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडू तेथे लिलावासाठी उपलब्ध असतात. सनरायझर्स लीड्स नावाने फ्रँचायझी असलेल्या संघाने पाकिस्तानच्या अबरार अहमदची त्यांच्या संघात बोली लावून निवड केली आणि एकच संतापाची लाट उसळली. सनरायझर्सच्या या उपद्व्यापाचा ‘आयपीएल’मधील त्यांच्या संघावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
व्यवसायिकस्पर्धांमध्ये कोट्यवधी रुपये किंवा डॉलर खर्च करताना आपला संघ जिंकावा, असे प्रत्येक संघ मालकांना वाटणे व्यवहाराच्या दृष्टीने गैर नसेलही; परंतु विजयाची किंमत कशाशी लावली आहे, हेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे असते. कोणताही खेळ, प्रामुख्याने क्रिकेट आता केवळ खेळापुरता मर्यादित राहिलेला नाही. राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष जोडला जातोच. पाकिस्तानी संघ किंवा पाकिस्तानी खेळाडू समोर येतो तेव्हा राष्ट्रप्रेम अधिक तीव्र होत असते, हे वेळोवेळी दिसून आलेले आहे; पण सर्वच जण असा विचार करतात? अनावधानाने किंवा विचारपूर्वक काही घटना घडतात आणि त्याचे उमटलेले पडसाद भुवया उंचावणाऱ्या असतात.