

Vande Mataram
esakal
‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या दीडशे वर्षपूर्तीच्या निमित्ताने त्यावर लोकसभेत चर्चा होण्याची गरज होती का? हा प्रश्न विचारला जात असतानाच विरोधी पक्षाचे नेते असा आरोप करत आहेत, की सरकारने पुढील वर्षी होणाऱ्या पश्चिम बंगालमधील निवडणुकीचा विचार करून ‘वंदे मातरम्’वर चर्चा घडवून आणली. बंकिमचंद्र चटोपाध्याय यांच्या या ऐतिहासिक गीताचा राजकीय वापर करता येईल, अशी सरकारची अपेक्षा असावी. या गीताच्या माध्यमातून हे दाखवून देता येईल की ज्याला स्वातंत्र्यलढ्यातील वंदनीय गीत मानले गेले ते म्हणण्यात काही लोकांचा आक्षेप आहे. साहजिकच, यामागचा उद्देश या गीताला धार्मिक रूप देण्याचाही मनसुबा होता. या चर्चेच्या माध्यमातून हे सिद्ध करण्याचा मानस असावा, की मुस्लिम समुदाय हा देशभक्त नाही, त्यांचा वंदे मातरम् गाण्यास विरोध आहे.
संसदेत या गीताच्या चर्चेदरम्यान जे काही सांगितले गेले, ते मात्र अधिकच चिंताजनक आहे. एका अर्थाने इतिहास आणि स्मृतीशी पुन्हा केलेला तो एक खेळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह दोघांनीही सांगितले, की काँग्रेसने वंदे मातरम् या गीताचे विभाजन करून देशाच्या विभाजनाची पार्श्वभूमी निर्माण केली. त्यासाठी त्यांनी असे सांगितले, की काँग्रेसने १९३७ मध्ये हे पूर्ण गीत नव्हे, तर त्याचे कापलेले - संक्षिप्त केलेले स्वरूप मंजूर केले, त्यासाठी त्यांनी जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार धरले.