विस्मृतीत गेलेल्या धगधगत्या क्रांतीचा इतिहास

लेखक अभिजीत भालेराव यांची ‘द मॅन हू ॲव्हेंज्ड भगतसिंग’ कादंबरी म्हणजे विश्वासघात, सूड आणि बलिदानाची कथा आहे.
the man who avenged bhagat singh book
the man who avenged bhagat singh booksakal

- ॲड. विवेक ठाकरे

लेखक अभिजीत भालेराव यांची ‘द मॅन हू ॲव्हेंज्ड भगतसिंग’ कादंबरी म्हणजे विश्वासघात, सूड आणि बलिदानाची कथा आहे. कादंबरीच्या केंद्रस्थानी भारतीयांच्या भगतसिंग यांची शोकांतिका आहे.

१९२९ मध्ये दिल्ली असेंब्लीत बॉम्बस्फोट करून भगतसिंग आत्मसमर्पण करतात. पुढे तुरुंगातून ब्रिटिश साम्राज्याविरोधात लढण्याची योजना तयार करतात; पण त्यांचा एक विश्वासू साथी फणींद्रनाथ घोष पकडला जाताच त्यांच्याशी गद्दारी करून तो माफीचा साक्षीदार होणे पसंत करतो. क्रांतिकारी पक्षाचा वरिष्ठ सदस्य असणारा फणींद्रनाथ हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (एचएसआरए)ची सगळी गुपिते इंग्रजांपुढे उघड करायला सुरुवात करतो.

त्याच्या निंदनीय साक्षीमुळे इंग्रज सरकार अनेक क्रांतिकारकांना शोधून अटक करतात आणि जॉन सॉन्डर्सच्या हत्येसोबत आणखी एक भयंकर गुन्हा क्रांतिकारकांच्या विरुद्ध सिद्ध होतो, तो म्हणजे राजद्रोह! फणींद्रनाथच्या गद्दारीमुळेच ब्रिटिशांकडून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी व इतर क्रांतिकारकांना जन्मठेप सुनावली जाते.

पुढे फणींद्रनाथ आणखी चार खटल्यांमध्ये साक्षीदार झाला. एकूण सहा क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा झाली आणि जवळपास ५० जणांना अंदमानात जन्मठेप झाली. ‘राजाचा साक्षीदार’ म्हणून प्रसिद्ध झालेल्या फणींद्रनाथने सशस्त्र क्रांती संपुष्टात आणली.

चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग गेल्यानंतर ब्रिटिश दडपशाही शिगेला पोहोचते. परिणामी, ‘एचएसआरए’चे उरलेले सदस्य एका ज्वलंत भावनेने एकत्र येतात तो म्हणजे, सूड आणि त्यांचे लक्ष्य बनते फणींद्रनाथ घोष... ज्या गद्दाराने सशस्त्र क्रांती संपवली, मात्र मर्यादित संसाधन आणि नेतृत्व नसल्याने, त्यांची आशा एका युवकावर येऊन थांबते.

बिहारमधील एक तरुण शिक्षक बैकुंठ सुकुल हा भगतसिंगांना आपला आदर्श मानतो आणि तो समस्त भारतीयांच्या वतीने त्यांच्या मृत्यूचा सूड उगवण्याची शपथ घेतो. या अशक्यप्राय मिशनमध्ये तो यशस्वी होतो का? भयंकर ब्रिटिश राजवटीशी हा सामान्य शिक्षक कसा झुंज देतो? भगतसिंगांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी तो कुठपर्यंत जातो? या प्रश्नांची उकल अतिशय रहस्यमय रीतीने अभिजीत भालेराव यांची ‘द मॅन हू ॲव्हेंज्ड भगतसिंग’ कादंबरी वाचताना होते.

‘द मॅन हू ॲव्हेंज्ड भगतसिंग’ ही भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर विश्वासघात, सूड आणि बलिदानाची चित्तथरारक कथा आहे. लेखक अभिजीत भालेराव यांनी बलाढ्य ब्रिटिश राजवटीला आव्हान देण्याचे धाडस करणारा सशस्त्र क्रांतिकारकांचा विस्मृतीत गेलेला इतिहास जिवंत केला आहे. या कादंबरीच्या केंद्रस्थानी भारतीयांच्या हृदयावर राज्य करणारे महान क्रांतिकारक भगतसिंग यांची शोकांतिका आहे.

बैकुंठ सुकुल एक सामान्य शिक्षक आहे, तरीही तो भगतसिंगांवरील अफाट प्रेमाने आणि फणींद्रनाथच्या विश्वासघाताने संतप्त होतो. सूडाचा मार्ग बैकुंठला एका धोकादायक वळणावर घेऊन जातो, कारण तो फणींद्रनाथचा वध करण्याच्या धाडसी प्रयत्नात ब्रिटिश साम्राज्याच्या प्रतिष्ठेला थेट हात घालतो.

१९२० आणि १९३०च्या दशकातील भारतातील अस्थिर राजकीय परिस्थिती या कादंबरीद्वारे भालेराव प्रभावीपणे मांडतात. इंग्रजांची दडपशाही आणि क्रांतिकारकांचा निकराचा प्रतिकार पुस्तकाच्या पानापानावर ठळक दिसतो. भूमिगत जीवनात बैकुंठ आणि इतर क्रांतिकारकांना किती त्रास सहन करावा लागतो हे मन हेलवणारे आहे.

बैकुंठच्या क्रांतिकारी आवेशामागे आणि असामान्य पराक्रमामागे एक साधा माणूस आहे, जो अन्यायाने पेटून उठला आहे. एक महान ध्येय आणि राष्ट्रकार्यासाठी आयुष्य झोकून देताना त्याचे मनपरिवर्तन टप्प्याटप्प्यात कसे होते, हे फार सुंदर पद्धतीने लेखकाने रंगवले आहे.

कादंबरीच्या काही भागांत क्रांतिकारकांनी बोललेल्या किंवा लिहिलेल्या सुप्रसिद्ध ओळी वापरल्या आहेत. भगतसिंगांची जेल डायरी कदाचित त्यामागचा प्रमुख स्रोत आहे. (अभिजीत भालेराव यांनी भगतसिंगांच्या जेल डायरीचे सुमारे दशकभरापूर्वी मराठीत भाषांतर केले आहे.) जेव्हा शांततावादी जतिन दास शेवटी क्रांतिकारी लढ्यात सहभागी होण्यास तयार होतो.

तेव्हा तो भगतसिंगांना उपहासाने म्हणतो, ‘चल सांग, तुमच्याबरोबर कुठे जाऊन मरायचं आहे?’ (अजय देवगण याच्या ‘द लिजेंड ऑफ भगतसिंग’ चित्रपटातील हा क्षण तुम्हाला आठवत असेल.) जेव्हा फणींद्रनाथ माफीचा साक्षीदार बनल्यानंतर भगतसिंगांचा सामना करतो, तेव्हा ते जमिनीकडे बोट दाखवून म्हणतात, ‘तू माझा नाही तिचा विश्वासघात केला आहेस...’ अशा प्रकारचे भावनिक क्षण भालेरावांनी काळजीपूर्वक उलगडले आहेत. विशेषत: पुस्तकाचा उत्तरार्ध एखादा सिनेमा पाहावा तसा रंजक संभाषणाने रंगवला आहे.

कथा जसजशी शेवटाकडे धावते तसतसा पात्रांच्या आयुष्यावर ताण वाढत जातो. बैकुंठची योजना जवळजवळ उघडकीस येते आणि क्रांतिकारकांचे नेटवर्क मुळासकट नष्ट करण्यासाठी इंग्रज आकाशपाताळ एक करतात. बैकुंठला शेवटी ज्या पर्यायांचा सामना करावा लागतो आणि त्याची पत्नी राधिका देवी यांचा त्याग आतडे पिळवटून टाकणारा आहे. ब्रिटिश साम्राज्य फणींद्रनाथला संरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असते; तर बैकुंठ आपल्या आदर्शांसाठी आणि भगतसिंगांचा सूड घेण्यासाठी जीवाचाही त्याग करायला तयार असतो.

कादंबरीत बैकुंठसोबत आणखी काही विस्मृतीत गेलेल्या क्रांतिकारकांच्या रंजक कथा येतात. उदा. लाहोरचा दहा वर्षांचा यशपाल नावाचा मुलगा बाल भारत सभेचा सचिव होता. त्याचे वडील ‘मिलाप’ नावाच्या वृत्तपत्राचे संपादक होते. भगतसिंगांच्या प्रेरणेने यशपाल लहान मुलांना एकत्र आणून मोर्चे काढायचा.

जुलै १९३० मध्ये यशपालला पकडण्यात आले आणि एक महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली; परंतु त्याच्या वडिलांनी भरलेल्या एक हजार रुपयांच्या जामिनावर त्याची सुटका झाली. भगतसिंग, राजगुरू अन् सुखदेव यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यावर यशपाल दुखावला अन् अजून जोशात मोर्चे काढू लागला. नोव्हेंबर १९३० मध्ये, त्याला एका हवालदारावर हल्ला केल्याबद्दल पुन्हा पकडण्यात आले आणि त्याला तीन महिन्यांचा तुरुंगवास व तीन वर्षे बालसुधारगृहात राहण्याची शिक्षा ठोठावण्यात आली.

दहा वर्षांच्या मुलाला एवढी कठोर शिक्षा दिल्यामुळे ही बातमी लंडनपर्यंत पोहोचली. वृत्तपत्रे ब्रिटिशराज लहान मुलांना चांगली वागणूक कशी देत नाहीत, याबद्दल लिहायला लागली. लंडनवरून सीआयडी चौकशी बसवण्याचे आदेश आले. दरम्यान, लाहोरच्या लोकांनी यशपालच्या जामिनासाठी दहा हजार रुपये जमा केले. हा तो काळ होता जेव्हा एक तोळा सोन्याची किंमत फक्त १८ रुपये होती.

भालेराव यांच्या लेखनशैलीवर जॉन ले कॅरे आणि इतरांच्या महान गुप्तहेर कादंबऱ्यांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. जलद गतीने चालणाऱ्या कथानकाला साजेसे पेज टर्नर लिहिताना लेखकाने राजकारण, भारतीय समाज आणि वसाहतवाद याविषयी काही तिखट निरीक्षणेही नोंदवली आहेत. अशाप्रकारे, वाचकांचे मनोरंजन करत ही कादंबरी त्यांची उत्कंठा शेवटपर्यंत कायम ठेवते.

क्रांतिकारक जीवनाचा दैनंदिन प्रवाह, जडणघडण आणि त्याग समजून घेण्यासाठी विशेषत: तरुण वाचकांसाठी ‘द मॅन हू ॲव्हेंज्ड भगतसिंग’ हा एक उत्तम प्रारंभ बिंदू आहे. ऐतिहासिक संशोधन दोषरहित ठेवून कादंबरीचा वेग वाचकाला रोखून धरतो. भालेराव यांच्या कादंबरीत श्वास रोखून धरायला लावणारे अनेक प्रसंग आहेत.

प्रख्यात इतिहासकार एस. इरफान हबीब, प्रोफेसर चमन लाल, संजीव सन्याल, हिंदोल सेनगुप्ता आणि सतविंदरसिंग जस यांसारख्या दिग्गज लेखक आणि इतिहासकारांनी ‘द मॅन हू ॲव्हेंज्ड भगतसिंग’ची अधिकृतरीत्या पाठराखण करत स्तुतिसुमने उधळली आहेत.

अभिजीत भालेराव यांनी ‘द मॅन हू ॲव्हेंज्ड भगतसिंग’ या कादंबरीच्या रूपात एक प्रचंड शक्तिशाली ऐतिहासिक थ्रिलर तयार केली आहे. जी अनेक स्तरांवर यशस्वी होते. वाचकाला पकडून ठेवणारी लेखनशैली, सशक्त व्यक्तिचित्रण आणि ऐतिहासिक तपशिलांवर प्रभुत्व मिळवून सूडाची एक भावनिक गाथा इथे निर्माण झाली आहे.

‘पेंग्विन इंडिया’ प्रकाशनाच्या वतीने डिसेंबर २०२३ मध्ये प्रकाशित झालेली ही कादंबरी भारतीय स्वातंत्र्यचळवळीचा एक महत्त्वाचा अध्याय डोळ्यापुढे जीवंत करते. बैकुंठ सुकुल यांसारख्या भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील विस्मृतीत गेलेल्या जाज्वल्य क्रांतिकारकाला अभिजीत भालेराव यांनी या कादंबरीच्या रूपात योग्य न्याय दिला आहे.

कादंबरी : द मॅन हू ॲव्हेंज्ड भगतसिंग

लेखक : अभिजीत भालेराव

प्रकाशक : पेंग्विन इंडिया

पृष्ठसंख्या : ३७६

किंमत : ३२० रु.

vivekthakarestarmedia@gmail.com

(लेखक मुंबई उच्च न्यायालयात वकिली करतात तसेच ते मुक्त पत्रकार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com