Premium|Nitish Kumar political retirement : नितीशकुमार यांची राज्यसभा वाटचाल; बिहारच्या राजकारणातून वानप्रस्थाश्रमाकडे

Nitish Kumar move to Rajya Sabha and Bihar political transition : नितीश कुमार यांची राज्यसभेत रवानगी करून भाजपने बिहारमध्ये स्वतःचा मुख्यमंत्री बनवण्याचा मार्ग मोकळा केला आहे. वयोमान आणि राजकीय गणिते यामुळे 'सुशासन बाबू' आता वानप्रस्थाश्रमाकडे झुकल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
Nitish Kumar move to Rajya Sabha and Bihar political transition

Nitish Kumar move to Rajya Sabha and Bihar political transition

esakal

Updated on

नितीशकुमार यांचा चेहरा समोर ठेवल्याशिवाय बिहारमध्ये सत्ता मिळवणं कठीण आणि नितीश मुख्यमंत्रिपादवरून बाजूला होत नाहीत तोवर भाजपचा मुख्यमंत्री बनवण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येत नाही, हा भाजपसमोर पेच होता. ''पचीस से तीस फिरसे नितीश'' (म्हणजे २०२५ ते २०३०) ही घोषणा भाजपवालेही देत होते ती निवडणूक जिंकण्यापुरती. निकालात दान अनुकूल पडल्यानंतर तीसपर्यंत वाट पाहायचं कारण उरलं नव्हतं. त्यातून नितीशबाबूंनी राज्यसभेवर जावं ती त्यांचीच इच्छा आहे, अशी स्क्रीप्ट लिहिली गेली, ती लिहिणारा भाजप, त्यावर अभिनय करायची वेळ आली नितीशकुमार यांच्यावर. आपल्या पक्षातील ज्येष्ठांना शांतपणे मार्गदर्शन मंडळात पाठवणाऱ्या नेत्यांनी मग नितीशकुमारांचा राजकीय वानप्रस्थाश्रम व्हाया राज्यसभा ही वाटचाल तितक्याच शांतपणे ठरवली. उरला प्रश्न इतकाच, लगेच मुख्यमंत्रिपद घेऊन टाकायचं की काही काळ जदयूला देऊन तिथं फाटाफुटीची वाट पाहायची.

राजकीय अस्ताची सुरुवात

नितीशकुमार यांना अखेर बिहारच्या राजकारणातून अलविदा करायला लावण्यात भाजप यशस्वी ठरला आहे. लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार हे दोन नेते सुमारे तीस-पस्तीस वर्षे बिहारच्या राजकारणात तळपत राहिले. यांच्याखेरीज कोणतंही सत्तेचे समीकरण पूर्ण होऊच शकत नाही, असं सामर्थ्य त्यांनी उभं केलं. यातील नितीश यांना कोणत्याच राजकीय प्रवाहाचं वावडं नाही. लालूंच्या राजकीय गणितात मात्र भाजपशी जमवून घेणं मंजूर नाही. अलीकडंच झालेल्या बिहारच्या निवडणुकीत थकलेल्या आणि नियंत्रण हरवत चाललेल्या नितीशकुमारांनी दणदणीत विजय मिळवून धक्का दिला होता. तो विजय नितीश यांच्या करिष्म्याचा होता हे खरं तसंच त्या निवडणुकीतून नितीश यांच्या बिहारमधील राजकीय अस्ताची सुरुवात झाली होती. अवघ्या काही महिन्यांत नितीश यांना मुख्यमंत्रिपदावरुन बाजूला व्हावं लागेल अशी व्यवस्था भाजपनं केली आणि नितीशकुमार राज्यसभा लढवणार हे जाहीर झालं.

सामान्य कार्यकर्ता व्यथित

नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव हे दोघेही जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून पुढं आलेले नेते. नंतर मंडल आयोगाच्या शिफारशी झाल्या. त्यातून एक सामाजिक घुसळण देशात झाली. त्याचे परिणाम म्हणून देशभरात जे नेते ओबीसी समूहांचे प्रतिनिधी म्हणून पुढं आले आणि सत्तेच्या राजकारणात स्थिरावले, त्यातही हे दोघे होते. दोघेही समाजवादी पार्श्वभूमीतून राजकारणात सक्रिय झालेले. साहजिकच धर्मनिरपेक्षता मानणारे आणि त्यासाठी भाजपला विरोधकही मानणारे. पुढं नितीशबाबूंचा हा विरोध मावळला. त्यापेक्षा लालूंची एकाधिकारशाही आणि त्यांच्या कारकिर्दीतील भ्रष्टाचार याविरोधात नितीश उभे राहिले. लालूंची सत्ता घालवण्यात सगळ्या लालू विरोधकांनी यश मिळवलं. त्याचा सर्वाधिक लाभ नितीशकुमार यांना झाला. तब्बल दहा वेळा ते बिहारचे मुख्यमंत्री बनले. याच नितीशकुमार यांनी आपल्याला प्रतिस्पर्धी उभाच राहणार नाही काळजीपूर्वक रचना केली. जाॅर्ज फर्नांडिस यांच्यात त्यांचे पुढं मतभेद झाले. जाॅर्ज यांना लोकसभेला उमेदवारी नाकारणं आणि राज्यसभेत जायला भाग पाडणं हा जाॅर्ज यांच्या राजकीय खेळीचा शेवटचा अध्याय लिहिण्यासारखं होतं. आता याच नितीश यांना राज्यसभेवर जाण्यासाठी भाजपनं राजी केलं. नितीशकुमार यांची राज्यसभेत जाण्याची इच्छा होती, यातून त्यांना देशाच्या संसदेतील दोन्ही सभागृहांत प्रतिनिधित्व करायची संधी घ्यायची होती हे समर्थन लटके आहे, हे सारे जाणतात. जदयूमधील नितीश यांचे सहकारी असले तरी मनानं भाजपमय झालेले नेतेही याचं स्वागत करताहेत, मात्र जदयूचा सामान्य कार्यकर्ता व्यथित दिसतो. याचं कारण उघड आहे. नितीशकुमार यांनी राजकारणात उलटसुलट भूमिकांचा विक्रम केला. त्यासाठी लालूंचा ''ऐसा कोई सगा नही जिसे नितीशने ठगा नही'' असा वारही सहन केला. तो कायम मुख्यमंत्रिपद डोळ्यासमोर ठेवून. असे नितीशकुमार केवळ संसेदच्या दोन्ही सभागृहात जाण्याचं राजकीय पुण्य कमावण्यासाठी राज्यातील सत्तेची सूत्रं सोडतील ही शक्यता नाही.

Nitish Kumar move to Rajya Sabha and Bihar political transition
Premium|Nishant Kumar political entry: भाष्य: नितीश ते निशांत: भाजपचा बिहारी प्रयोग
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com