वाह उस्ताद...!

प्रख्यात तबलानवाझ उस्ताद झाकीर हुसेन यांचा ९ मार्च रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या कारकिर्दीचा सुरेल प्रवास...
ustad zakir hussain
ustad zakir hussainsakal

- तौफिक कुरेशी

प्रख्यात तबलानवाझ उस्ताद झाकीर हुसेन यांचा ९ मार्च रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या कारकिर्दीचा सुरेल प्रवास...

सरोदवादक अली अकबर खान यांच्या एका कार्यक्रमात छोटे झाकीर मंचावर मागे बसले होते. खान यांच्या सरोदवादनासोबत झाकीर यांचे हातही आपोआप थिरकत होते. खान यांनी ते हेरले. त्यांनी छोट्या झाकीर यांना मंचावर पुढे बोलावले आणि संगत करण्यास सांगितले. त्यानंतर झाकीर यांना कधीही मागे वळून बघावे लागले नाही...

उस्ताद झाकीर हुसेन तबलावादक, संगीत दिग्दर्शक आणि तालवाद्यवादक म्हणून परिचित आहेत. तबलावादक उस्ताद अल्लारखाँ यांचे ते सर्वात मोठे पुत्र. ९ मार्च १९५१ रोजी मुंबईत राहणाऱ्या पंजाबी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. झाकीर हुसेन यांचे बालपण आणि शिक्षण माहीममध्ये झाले. साहजिकच त्यांची संगीत साधना आणि पुढील सफरही माहीममधूनच सुरू झाली.

झाकीर यांचे आडनाव कुरेशी; पण त्यांना हुसेन असे आडनाव देण्यात आले. त्यांनी माहीममधील सेंट माईकल्स हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले. सेंट झेवियर कॉलेजमध्येही ते काही काळ शिकले. महत्त्वाचे म्हणजे, झाकीर यांच्यासह आम्ही भावंडे अस्खलित मराठी भाषा बोलतो. मुंबईकर असल्याचा त्यांना अभिमान आहे.

लहान असल्यापासून झाकीर संगीताच्या तालावर डोलत असत. दुधाच्या बाटलीवरही ते आपली बोटे फिरवत. बाळाचे पाय पाळण्यात दिसू लागल्याने त्यांचा तबलावादनाच्या दिशेने प्रवास सुरू होईल, हे घरच्यांच्या लक्षात आले होते. जमेची बाजू म्हणजे पखवाज असो किंवा तबला, त्यांचे सूर कायमच घरात ऐकायला मिळत होते.

आमच्या वडिलांनी झाकीर यांना वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच पखवाज शिकवायला सुरुवात केली. वडील पंजाबमधील तबलावादनाच्या परंपरेतील होते. त्यांनीच त्यांच्यावर त्या वाद्यांचे संस्कार केले. तेच त्यांचे पहिले गुरू ठरले.

वडील अल्लारखाँ देशभरात तबलावादनाचे कार्यक्रम करायचे. बऱ्याचदा रात्री उशिरा ते घरी परतत; पण जेवण आटोपून तबल्यावर रियाज करायला बसत. त्या वेळी ते झाकीर यांनाही साथसंगत करायला सांगत. अशा प्रकारे बालवयातच झाकीर यांचा मध्यरात्री रियाज सुरू होत असे. त्यानंतर त्यांनी अब्बांना साथ-संगत करणे सुरू केले. त्यानंतर त्यांनी अब्बांसोबत अनेक जुगलबंदीचे कार्यक्रम सुरू केले. जे त्यांच्या चाहत्यांनी डोक्यावर घेतले. 

आठवणीतील पहिली मैफल

झाकीर हुसेन यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिली मैफल सादर केली. त्या मैफिलीने झाकीर तबलावादन आणि संगीत क्षेत्रातील सर्वोच्च कलाकार होणार असल्याचे शिक्कामोर्तब केले. त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तबलावादन करायला पंडित शिवकुमार शर्मा, पंडित व्ही. जे. जोग, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज आणि अशा अनेक गायक अन् वादकांना तबल्याची साथ केली.

सुरेल कौटुंबिक संबंध

आमच्या अब्बांचे तीन मुले आणि दोन मुलींचे कुटुंब. झाकीर यांच्याबरोबरीने आम्ही दोघे भाऊ संगीत क्षेत्रात कार्यरत आहोत. झाकीर भावंडांमध्ये सर्वात मोठे. मी तालवाद्यवादक आहे आणि लहान भाऊ उस्ताद फझल कुरेशी तबलावादक. झाकीर आपल्या भावंडांमध्ये सर्वात मोठे. त्यामुळे त्यांचे घरात वेगळेच स्थान आहे. मात्र, घरात ते कलाकार नाही, तर मोठे भाऊ म्हणूनच वावरतात.

घरात अनेक विषयांवर ते चर्चा करतात, वादविवाद करतात... ते कधीही कुणाला सल्ला देत नाहीत. कधीही कुणाला नकार देत नाहीत. त्यांच्यात नकारात्मकता तसूभरही नाही. ‘माझं काम कसं झालं?’ असं कुणी विचारलं तर ‘तुम्हाला तुमचं काम कसं वाटलं’ असा उलट प्रश्न विचारून ते आपले म्हणणे त्यांच्यापर्यंत पोहचवतात. 

तबला वाद्याला नवीन आयाम

झाकीर हुसेन यांनी तबला वाद्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. परंपरा आणि नावीन्य यांचे सुंदर मिश्रण त्यांच्या वादनशैलीत आढळते. भारतीय आणि पाश्चात्त्य संगीताचे ते भोक्ते आहेत. तबलावादनातील त्यांचा जोश, बोटांची किमया आणि बेभानपणा ठळकपणे जागवतो. सूरांचा आविष्कार करताना त्यांनी लाखो रसिकांना आपल्या तालावर नाचवले. अमेरिकेतील अटलांटामध्ये झालेल्या उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा सामन्यांच्या उद्‍घाटनाची संगीतरचनाही त्यांनी केली.

गुरू-शिष्य परंपरेला महत्त्व

झाकीर हुसेन गुरू-शिष्य परंपरेला महत्त्व देतात. तबलावादनास त्यांनी दिलेले मोहक रूप मैफलीचे आकर्षण ठरते. प्रयोगशील तबलावादन त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य. तबलावादनातील शिखर ठरलेल्या झाकीर हुसेन यांनी अली अकबरखाँ, बिरजू महाराज, रविशंकर, शिवकुमार शर्मा आदी अनेक श्रेष्ठ गायक, वादक आणि नर्तक यांना तबलावादनाची साथ दिली आहे. त्यांचा स्वतःचा मोठा शिष्य परिवार आहे.

आंतरराष्ट्रीय मंचावर ठसा

झाकीर हुसेन यांनी आपल्या तबलावादनातील आंतरराष्ट्रीय कारकिर्दीस १९७० मध्ये प्रारंभ केला. एका वर्षात सुमारे १५० तबलावादनाचे कार्यक्रम त्यांनी भारतासह विविध देशांत सादर केले. त्यांनी सामूहिक तबलावादनासाठी विख्यात सरोदवादक आशीष खान यांच्यासोबत ‘शांतिगट’ (१९७०) आणि पुढे इंग्रज गिटारवादक जॉन मॅक्लॉफ्लिन व व्हायोलिनवादक एल. शंकर यांच्यासोबत ‘शक्तिगट’ (१९७५) स्थापन केला. शिवाय ते स्वतंत्र तबलावादनाच्या रंगतदार मैफली करत.

हिंदी-इंग्रजी चित्रपटांतून तबलावादन

झाकीर हुसेन यांच्या असंख्य ध्वनिमुद्रिका व ध्वनिफिती आहेत. त्यांनी अनेक हिंदी-इंग्रजी चित्रपटांतून तबलावादनाची साथ दिली आहे. ते स्टॅनफर्ड विद्यापीठात भारतीय शास्त्रीय संगीताचे प्राध्यापक आणि अभ्यागत प्राध्यापक होते. भारताच्या स्वातंत्र्याला साठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्याकडे केंद्र शासनाने राष्ट्रगीताची संगीतरचना सुपूर्द केली. त्यांनी ही जबाबदारीही बखुबी निभावली.

झाकीर यांनी अनेक हिंदी चित्रपटांना संगीत दिले आहे. सई परांजपे यांच्या ‘साज’ चित्रपटाला झाकीर यांनी संगीत दिले आहे. त्यातील त्यांची ‘क्या तुमने ये कह दिया’ आणि ‘फिर भोर भयी’ ही अविट आणि रागांवर आधारित दर्जेदार गाणी आजही रसिकांच्या ओठावर आहेत. त्याशिवाय ‘मंटो’, ‘फॉर रिअल’, ‘मिस्टर ॲण्ड मिसेस अय्यर’, ‘परझानिया’ इत्यादी चित्रपटांचे वैविध्यपूर्ण असे पार्श्वसंगीतही झाकीर यांनी दिले आहे. 

विविध पुरस्कारांचा साज

झाकीर हुसेन यांच्या सांगीतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारचा पद्मश्री (१९८८), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९९१), इंडो-अमेरिकन अवॉर्ड (१९९०), नॅशनल हेरिटेज फेलोशिप, अमेरिका (१९९९), पद्मभूषण (२००२), मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान (२००६), ग्रॅमी अवॉर्ड (२००९) आणि कोनारक नाट्यमंडप (ओडिशा) यांच्यातर्फे जीवनगौरव पुरस्कार (२०१२) आदी मानसन्मान त्यांना लाभले आहेत.

विविध संगीत महोत्सवांतून जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (‘पिफ’मधील) पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार (२०१७) आणि दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा ‘अकादमी रत्न’ पुरस्कार (२०१९) देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

झाकीर यांचे वेगळ्या धाटणीचे अनेक अल्बम प्रकाशित झाले आहेत. त्यांचे शास्त्रीय रागांवर आधारित काम त्यांच्या चाहत्यांना भावले. त्यांचे इव्हनिंग राग (१९७०), शांती (१९७१), रोलिंग थंडर (१९७२), शक्ती (१९७५) इत्यादी अनेक अल्बम प्रसिद्ध आहेत. त्यावर आधारित अनेक अल्बमही त्यांनी प्रकाशित केले आहेत.

त्यांनाही श्रोत्यांची मोठी पसंती लाभली. त्यांचे संगीत सृजनाचे काम अद्याप अविरत सुरू आहे. संगीताच्या पलीकडे त्यांनी कुठला विचार कधी केलाच नाही. आयुष्याचा प्रवास संगीताच्या तालावर सुरू राहावा, अशी त्यांची मनोकामना... ती अद्याप सुरू असल्याचे दिसते.

(लेखक उस्ताद झाकीर हुसेन यांचे छोटे बंधू असून एक शास्त्रीय संगीतकार आणि तालवाद्यवादक म्हणून प्रसिद्ध आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com