Vidhan Sabha 2019 : असे असेल साताऱ्यातील 08 विधानसभा मतदारसंघातील राजकीय चित्र !

Vidhan Sabha 2019 Satara district nine constituencies analysis
Vidhan Sabha 2019 Satara district nine constituencies analysis

पाटण विधानसभा मतदारसंघ
पाटण विधानसभा मतदार संघात पारंपारिक देसाई-पाटणकर घराण्यातील सत्तासंघर्षाचा दहावा सामना अटीतटीचा होणार आहे. मैदानात इतर उमेदवार असले तरी खरी लढत सत्यजित पाटणकर विरुद्ध शंभुराज देसाई अशीच आहे. एक हजार 800 कोटीचा विकास, रोजगार निर्मीती, बंद पडलेले उद्योग, कारखान्यावरील जप्ती या भोवती प्रचार फिरत आहे. तालुक्‍याचे पुत्र श्रीनिवास पाटील यांच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीने राष्ट्रवादीला चांगलेच बळ मिळाल्याने चांगलीच रंगत येणार आहे. आमदार देसाई यांचा चर्चित एक हजार 800 कोटीचा विकास व त्याचा सत्यजितसिंह पाटणकरांनी घेतलेला पंचनामा, त्यावरुन होणारे आरोप-प्रत्यारोप होत आहे. यामुळे राजकीय वातावरण तीन महिने तापलेले आहे. सन 1983 पासुन तालुक्‍याला विकासापासुन वंचित ठेवल्याचे आरोप करुन व पाच वर्षात केलेला विकास याचा लेखाजोखा आमदार शंभुराज देसाई मांडत आहेत. तर एक हजार 800 कोटीचा विकास निधी, त्यातील कामे यावरुन सत्यजितसिंह पाटणकर यांनी आमदारांना चांगलेच कोंडीत पकडले आहे.

Vidhan Sabha 2019 : अशी असतील बीड जिल्ह्यातील 06 मतदारसंघाची राजकीय गणितं !​

कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघ
राजकीय घडामोडी होवून उंडाळकर गट माघार घेईल अशा अपेक्षा फेल ठरल्याने कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदार संघातील लढत तिरंगी मात्र चुरशीची लढत निश्‍चित झाली आहे. अत्यंत चुरशीच्या लढतीत काठावरचा विजय की, स्पष्ट मताधिक्‍क्‍याचे आव्हान पेलण्याचे टार्गेट कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडी समोर आहे. ते पेलाताना त्यांना अनेक समस्यांशी सामना करावा लागतो आहे. एकीकडे भाजप ताकद उभी करत असताना उंडाळकर गटाने बंडखोरीचा झेंडा फडकविल्याने राजकीय गुंतागुंत वाढली आहे. अतुल भोसलेंची ताकद वाढवत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून अनेक गट विभक्त होत आहेत. आमदार आनंदराव पाटील यांच्यासह, प्रा. मच्छिंद्र सकटे, पालिकेतील राजेंद्र यादव यांचा गट विभक्त झाला आहे. अशा स्थितीत रयत संघटनेतर्फे ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची रिंगणातील उमेदवारी कोणाला अडचणीची ठरणार हे महत्वाचे आहे. उंडाळकर गटाने शड्डू ठोकला आहे. पृथ्वीराज चव्हाण गटाचे आमदार आनंदराव पाटील भाजपकडे झुकले आहेत. पालिकेतील यादव गटाने भाजपशी हातमिळवणी केली आहे. बहुतांशी नगरसेवक वेगवेगळ्या पातळीवर भाजपच्या गोटात आहेत. गत 2014 पेक्षाही यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे सारेच संदर्भ बदलले आहेत. भाजपने पृथ्वीराज चव्हाण यांच्या भोवती चक्रव्यूव्ह केला आहे. तो राजकीय व्यूव्ह भेदण्याचे आव्हान चव्हाण यांना पेलावे लागणार आहे.

जाणून घ्या औरंगाबादमधील 9 मतदारसंघांची राजकीय गणितं !​

कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघ
कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील, शिवसेना महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम व भाजपचे बंडखोर मनोज घोरपडे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. गत 2014 च्या निवडणुकीतील लढतीची पुनरावृत्ती होत आहे. कराड, सातारा, खटाव व कोरेगाव या तालुक्‍यांमध्ये हा मतदारसंघ विभागला आहे. आमदार पाटील 1999 पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. मतदारसंघात कराड तालुक्‍यातील मतदारांची संख्या अधिक आहे. धनगरवाडी हणबरवाडी योजना, मेरवेवाडी तलावात पाणी देणे, शामगाव मधील शेतीसाठी टेंभूचे पाणी देणे यासह रस्ते व अन्य विविध प्रश्न निवडणुकीत कळीचा मुद्दा बनत आहेत. आमदार पाटील यांचा लोकसंपर्क व केलेली विकास कामे याद्वारे मतदारसंघावर पकड निर्माण केली आहे. महायुतीचे कदम यांनीही मोठे शक्तिप्रदर्शन करत त्यांच्या सोबत असणारा कॉंग्रेसची ताकद व नव्याने मिळालेली महायुतीची ताकद या जमेच्या बाजू आहेत. अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांनी शक्तीप्रदर्शन करत ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे कराड उत्तरेत कोण बाजी मारणार याकडे मतदारसंघासह जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

पुणे शहरातील 8 विधानसभा मतदारसंघातील अशी असतील राजकीय गणितं! ​

कोरेगाव विधानसभा मतदारसंघ
कोरेगाव मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार व कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे आणि भाजप शिवसेना युतीचे उमेदवार महेश शिंदे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. या मतदारसंघामध्ये आमदार शिंदे तिसर्यांदा लढत देत आहेत. गेली दहा वर्षे मतदारसंघामध्ये चांगला संपर्क असल्याने त्यांचे मोठे नेटवर्क आहे. पक्षांतर्गत विरोधामुळे मध्यंतरी एक गट त्यांना सोडून भाजपमध्ये गेला असला, तरी आता त्यांनी मोठ्या प्रमाणात बेरजेचे राजकारण करून निवडणुकीसाठीची आवश्‍यक यंत्रणा उभी करण्यात यश मिळवले आहे. त्यांचे विरोधी महेश शिंदे यांनी गेली तीन वर्षे भाजपच्या माध्यमातून जोरदार वातावरण निर्मिती करत मोठी हवा तयार केली होती; परंतु युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्यानंतर त्यांनी राजकीय चलाखी दाखवत शिवसेनेची उमेदवारी मिळवली. मात्र, त्यामुळे त्यांच्या आधीच्या भाजपच्या हवेला काही प्रमाणात सेट बॅक बसल्याचे आत्ताचे चित्र आहे.

वाई विधानसभा मतदारसंघ
वाई विधानसभा मतदार संघात पाटील आणि भोसले घराण्यातील आजी- माजी आमदारामध्ये सत्ता संघर्षासाठी चुरशीची पारंपरिक लढत होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदार संघात कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे चिरंजीव किसनवीर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मदन भोसले यांनी भाजप प्रवेश केल्याने सुरवातीला राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार मकरंद पाटील यांच्या दृष्टीने एकतर्फी वाटणारी निवडणूक अत्यंत अटीतटीची बनली आहे. राष्ट्रवादीचे वर्चस्व टिकवण्यासाठी मकरंद पाटील तर स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी दोघांनीही प्रचाराच्या निमित्ताने मतदारसंघ पिंजून काढला आहे. कारखान्याचा कारभार, रखडलेले, सिंचन प्रकल्प, विकास निधी, पर्यटन विकास, रोजगारनिर्मिती याभोवती प्रचार फिरत असून एकमेकांवरील आरोप- प्रत्यारोपामूळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. लोकसभेच्या पोट निवडणुकीतील उदयनराजे भोसले व माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या लढतीचा दोन्ही उमेदवारांना समान प्रमाणात फायदा होणार आहे. राजेंच्या चाहत्यांचे बळ मदन भोसले यांना मिळणार असून राजेबद्दल असलेली नाराजी मकरंद पाटील यांच्या पथ्यावर पडणार आहे. या निवडणुकीत सर्वसामान्यांच्या सुख दुःखातील सहभाग आणि प्रत्येक गावागावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची फळी यामुळे मकरंद पाटील बाजी मारतील असा राजकीय तज्ञांचा अंदाज आहे.

माण विधानसभा मतदारसंघ
माणमध्ये अतिशय चुरशीची व रंगतदार तिरंगी निवडणूक होत आहे. या मतदारसंघात भाजप, शिवसेना व आमचं ठरलंयचे अपक्ष उमेदवार यांच्यामध्ये थेट लढत होत आहेत. माजी आमदार जयकुमार गोरे हे भाजप, शेखर गोरे हे शिवसेना तर माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्यात थेट निकराची लढाई आहे. वंचित बहुजन आघाडी डॉ. प्रमोद गावडे यांच्या माध्यमातून आपलं अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करत आहे. मराठा बहुल असणाऱ्या या मतदारसंघात जातीय समिकरणे अतिशय महत्वाची भूमिका बजावत आहेत. धनगर व मागासवर्गीय मतदार निर्णायक भूमिकेत आहेत. हॅटट्रिक साधण्याचा प्रयत्नात असलेल्या जयकुमार गोरे यांना मतदारांसह पक्षातील नेतेमंडळींच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. शेखर गोरे हे शिवसैनिक व समर्थकांच्या जोरावर आपलं नशिब अजमावत आहेत. तर प्रभाकर देशमुख यांना आपलं ठरलंय टीम मधील राष्ट्रवादी, कॉंग्रेस, भाजप, शिवसेना, रासप, बहुजन वंचित आघाडी, रिपब्लिकन यांच्यासह सर्वपक्षीयांच्या पाठबळावर विजय खेचून आणण्याचा विश्वास वाटत आहे.

सातारा विधानसभा मतदारसंघ
सातारा विधानसभा मतदारसंघात माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि दीपक पवार यांच्यातच दुरंगी लढत होत आहे.राष्ट्रवादीच्या चिन्हावर तीन वेळा निवडून आलेले माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे यंदा भाजपमधून निवडणूक लढवित आहेत. आपल्याला मतदारसंघाचा विकास करावयाचा असल्याने पक्षांतर केले आहे. शहराची प्रलंबित हद्दवाढ, बोंडारवाडी धरण, औद्योगिक विकास आदी मुद्दे त्यांच्या प्रचाराचे अजेंडा आहे. शिवेंद्रसिंहराजेंचे चूलत बंधू उदयनराजे हे भाजपमध्ये आल्याने सातारा विधानसभा मतदारसंघात दोन्ही नेत्यांची ताकद एकवटली आहे.
शिवेंद्रसिंहराजेंच्या भाजप प्रवेशानंतर जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन दीपक पवार यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. त्यांना आता राष्ट्रवादीच्या माध्यमातून शिवेंद्रसिंहराजेंपुढे आव्हान उभे केले आहे. घराणेशाही हा मुख्य धागा पकडून पवार हे गावागावांमध्ये जाऊन आपल्याला निवडून देण्याचे आवाहन करीत आहेत. याबरोबरच अभिजित बिचुकले हे देखील निवडणूकीच्या रिंगणात आहेत.

फलटण विधानसभा मतदारसंघ
फलटण विधानसभा मतदारसंघात निवडणूकीचे पडघम जोराने वाजू लागले आहेत. एकूण 11 उमेदवार निवडणूक रिंगणात असून पैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण आणि भाजपचे उमेदवार दिगंबर आगवणे यांची लक्षवेधी लढत असली तरी तालुक्‍यातील दिग्गज नेते विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर व भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या राजकीय प्रतिष्ठेची लढत आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीची मतदारसंख्या या मतदारसंघात अंदाजे 42 हजार असल्याने त्याचा फटका कोणाला बसणार याची चर्चा तालुक्‍यात होताना दिसत आहे. गेल्या दशकात रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तालुक्‍यात आलेले धोम बलकवडी प्रकल्पाचे पाणी तसेच वाढलेले ऊसाचे व फळबागांचे क्षेत्र आणि सुरवडी नजिकच्या औद्योगिक वसाहतीतील कंपनीत युवकांना मिळालेला रोजगार, ग्रामीण रस्ते डांबरीकरण, शैक्षणिक सुविधा, साखरवाडीची फलटण शुगर कारखान्याचा सुटलेला तिढा त्यातून शेतकरी, कामगार यांना मिळणार थकीत देणी हे प्रमुख मुद्दे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दिपक चव्हाण यांचे आहेत. निरा देवघर पाटबंधारे प्रकल्पाचे बारामती तालुक्‍यात गेलेले जादा पाणी फलटण तालुक्‍यात आणले, शब्द दिल्याप्रमाणे फलटण लोणंद रेल्वे मार्ग सुरु, नाईकबोमवाडी येथे नव्याने औद्योगिक वसाहत सुरु करणार, युवकांना नव्याने रोजगाराच्या संधी हे प्रमुख मुद्दे भाजप उमेदवार आगवणे यांच्या प्रचारात रहातील. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com