मत बोलो, जुबाँ केसरी!

एखाद्या गोष्टीचे अनुकरण करणे, हा मनुष्यजातीचा स्थायीभाव आहे. त्याची सुरुवात अगदी बालवयातच होते. घरातील वडीलधाऱ्या मंडळींचे तो कळत-नकळत अनुकरण करत जातो.
Celebrity
CelebritySakal

एका क्षणी आपल्याला पडद्यावरच्या कलाकारांचे दिसणे आणि वागणे प्रचंड आवडून जाते. काही सेलिब्रेटी जे सांगतात, करतात ते सगळे खरे आणि चांगलेच असले पाहिजे, अशा भ्रामक समजुतीतून तरुण पिढी त्यांना आपला आदर्श मानतात. एका जमान्यात कलावंतांच्या फॅशनपुरती मर्यादित असलेली तरुणाईची आवड काळाच्या ओघात विकृत रूप धारण करत आहे. अशा सेलिब्रेटींना ‘रोल मॉडेल’ मानून त्यांना फॉलो करताना आजच्या युवा वर्गाचा पाय कधी खोलात पडतोय याचे भान त्यांनाही राहिलेले नाही. म्हणूनच त्यांची काळजी त्यांच्याच सो-कॉल्ड ‘रोल मॉडेल’ने घ्यायला हवी.

एखाद्या गोष्टीचे अनुकरण करणे, हा मनुष्यजातीचा स्थायीभाव आहे. त्याची सुरुवात अगदी बालवयातच होते. घरातील वडीलधाऱ्या मंडळींचे तो कळत-नकळत अनुकरण करत जातो. मोठेपणीही समाजात वावरताना आपल्या अवतीभोवतीच्या बऱ्या-वाईट गोष्टींचे पडसाद त्याच्या आयुष्यावर उमटतच असतात. दुर्दैवाने चांगल्याऐवजी वाईट प्रवृत्तींकडे झपाट्याने वाहवत जाण्याची त्याची खोड ही खेदाची बाब म्हणावी लागेल.

मात्र नेमकी हीच गोष्ट ओळखून चित्रपती व्ही. शांताराम यांनी एका सत्कार सोहळ्यात उद्‌गार काढले होते, ‘चित्रपट हे समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे.’ त्यांच्या या अत्यंत मार्मिक विधानाचा दुसऱ्या बाजूने विचार करताना काही गोष्टी लक्षात येतात. मुख्य म्हणजे पडद्यावरच्या कलाकारांचे सर्वसामान्यांना वाटणारे अतीव आकर्षण.

त्यांचे दिसणे, वागणे; एवढेच नव्हे तर ही मंडळी जे सांगतील, करतील ते सगळे खरे आणि चांगलेच असले पाहिजे, याच भ्रामक समजुतीतून समाज- विशेषतः तरुण पिढी या सेलिब्रेटींना आपला आदर्श मानू लागली. परिणामी एका जमान्यात या कलावंतांच्या फॅशनपुरती मर्यादित असलेली तरुणाईची आवड झपाट्याने बदलणाऱ्या काळाच्या ओघात एवढ्या व्यापक स्वरूपात बदलली की, आजच्या घडीला तिने जीवघेणे विकृत रूप धारण केले आहे. त्याचेच गोंडस नाव म्हणजे मार्केटिंगचा फंडा!

आपल्या उत्पाद‌नाची किंवा धंद्याची जाहिरात करून दोन पैसे मिळवणे यात काहीच गैर नाही. किंबहुना अशी जाहिरात समाजातील प्रतिष्ठित, लोकप्रिय व्यक्तीकडून करवून घेण्यातही वावगे असू नये. मात्र समाजविघातक गोष्टींसाठी जर या तंत्राचा अवलंब होत असेल तर ते केव्हाही निषेधार्ह मानले जावे. व्यसन - मग ते कुठले का असेना वाईटच. शारीरिक अथवा मानसिक अशा दोन्ही दृष्टीने.

अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे हल्लीची पिढी अधिकाधिक आभासी विश्वात रमू लागली आहे. चंगळवादी वृत्ती वाढीस लाग‌ल्यामुळे फारसे कष्ट न घेता अल्पावधीत झटपट पैसा कसा मिळवता येईल, इकडेच त्यांचा कल दिसून येतो. तो तसा न मिळाल्यास येणारे नैराश्य आणि पाठोपाठ उभे आयुष्यच संपवून टाकण्याची टोकाची भूमिका वाढत चालली आहे.

आजवर जुगार खेळून कोणीही श्रीमंत झालेले नाही, हे वैश्विक सत्य समोर असताना प्रसिद्ध चित्रपट अभिनेते, खेळाडूंसारखे रोल मॉडेल ‘रमी खेळा आणि रग्गड पैसे कमवा’ असे खुशाल सांगतात. शिवाय आपल्या बेताल वक्तव्याला पुष्टी देण्यासाठी कुठल्या तरी अमक्या-तमक्या जिंकलेल्या विजेत्याचा फोटो दाखवतात, तेव्हा ते समाजाला नेमका कोणता संदेश देतात, हाच प्रश्‍न निर्माण होतो.

मुळात या मंडळींकडे गडगंज संपत्ती आहे. ‘जुगार खेळा’ असे दुसऱ्यांना सांगण्याचेही त्यांना बक्कळ पैसे मिळतात, ते वेगळेच. पण त्यांच्या या बेजबाबदार कृतीमुळे भरडला जातो तो सर्वसामान्य माणूस. याच नादामुळे होते-नव्हते ते गमावून कफल्लक झालेल्या कितीतरी जणांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या मध्यंतरी वृत्तपत्रात वाचायला मिळाल्या होत्या. याला समाजप्रबोधन म्हणायचे का?

अर्थात सेलिब्रेटींना असे रोल मॉडेल बनवून जाहिराती करण्याचा धंदा तसा जुनाच. एके काळी ‘याऽऽ हू ऽऽ’ अशी आरोळी ठोकून नायिकेशी धसमुसळेपणा करीत प्रणयाराधन करणारा रिबेल स्टार शम्मी कपूर ऐंशीच्या दशकात टीव्हीवरील एका जाहिरातीत स्वतःचा अवाढव्य देह सांभाळत मुलाची वरात घेऊन येतो आणि वधू पित्यासमोर ‘आमची एक अट आहे’ असं सांगतो.

मुलीच्या लग्नाच्या काळजीने आधीच खंतावलेला तो वधू-पिता चिंताक्रांत मुद्रेने शम्मी कपूरकडे पाहताच खळखळून हसत आपल्या भावी व्याह्याच्या खांद्यावर हात टाकत उद्‌गारतो, ‘हमें कुछ नहीं चाहिए. सिर्फ आप बारातीयों का स्वागत (एका पान मसाला उत्पादनाचे नाव) से कीजिए.’ शम्मी कपूरच्या विशिष्ट शैली आणि लकबींमुळे ही जाहिरात तेव्हा चांगलीच गाजली होती.

पण त्या काळात आजच्यासारखा सोशल मीडिया फोफावलेला नसतानाही सामाजिक हित जपणाऱ्या कुठल्या तरी संस्थेने कोर्टात या जाहिरातीविरोधात जनहित याचिका दाखल केल्याचे आठवते. अर्थात कंपनीने त्यावर ‘आमच्या उत्पादनात कुठलाही तंबाखूजन्य घटक नसून तो फक्त मुखशुद्धीचा मसाला असल्याचे’ स्पष्टीकरण दिले होते. त्यामुळे नंतर त्या ‘उत्पादना’ची जाहिरात दादामुनी ऊर्फ अशोक कुमार यांनीही सद‌‌ऱ्याच्या खिशातून ‘पान मसाल्या’चा डबा काढताना ‘हमे क्या मालूम, आप भी (उत्पादनाचे नाव) के शौकीन है’ हा असा डायलॉग म्हणत केली होती.

आपल्याकडे गुटख्यावर बंदी आहे, असे कोणाला सांगितले तर वेड्यात काढतील आपल्याला. कारण ती फक्त कागदोपत्रीच पाहायला मिळते. तिची कडक अंमलबजावणी व्हायला हवी ना... शाळा-कॉलेजच्या परिसरापासून काही विशिष्ट अंतरापर्यंत पान-तंबाखू वा सिगारेटच्या टपऱ्या असता कामा नये, असा एक फतवा आहे. तोही फसवाच ठरल्याची अनेक उदाहरणे आहेत.

काही दिवसांपूर्वी अशाच पानटपरीविरोधात एका स्थानिक समाजसेवकाने आणि प्रसिद्ध लेखकाने पोलिसांच्या मदतीने बडगा उगारला खरा, पण त्या मुजोर टपरीवाल्यांनी काही दिवसांनी त्या भल्या माणसाला एकटे गाठून एवढा चोप दिला की बिचाऱ्याला हॉस्पिटल गाठावे लागले. सत्कृत्य केल्याचे परिणाम असेही भोगावे लागतात आणि आजचे तथाकथिक रोल मॉडेल बिनदिक्कत दुष्कृत्य करत फिरत आहेत. तेही जग जिंकल्याच्या थाटात.

पडद्यावरच्या हिरोला अल्फा मेल बनवण्याच्या नादात विकृती जन्माला येते आणि स्वच्छ-निखळ मनोरंजनाची कलाकृती मागे पडते. आजच्या जनरेशला जर हेच हवे असेल तर सगळेच फासे चुकीचे पडताहेत हे नक्की... सिनेनिर्माते आणि त्यांच्या तालावर नाचणाऱ्या सेलिब्रिटींनी आजच्या तरुणाईची प्रत्येक हौस आणि सगळेच लाड पूर्ण करण्याचं शिवधनुष्य पेलण्याची गरज नाही. त्यांच्यासाठी कधी तरी थ्री इडियट्सही बना.

सिनेमातील नायक, खलनायक, चरित्र अभिनेते वगैरे मंडळींना पडद्यावर सिगारेट ओढताना किंवा मद्यप्राशन करताना पाहून प्रेक्षकांना कधीही विशेष काही वाटत नसे. क्वचितप्रसंगी व्हॅम्प किंवा क्लब डान्सरच्या हातातही सिगारेट दिसून येई. पण कुणाला त्याचं सोयरसूतक वाटत नसे. मग अचानक अशा प्रसंगांवर बंदी घालण्याला प्रस्ताव मांडला गेला.

कलाकार दारू अथवा सिगारेट पिण्याचे समर्थन करतात, असा संदेश प्रेक्षकांपर्यंत जाऊ नये, अशा उदात्त हेतूने स्क्रीनच्या कोपऱ्यात शक्यतो सहज वाचता येणार नाही एवढ्या बारीक अक्षरात ‘शराब सास्थ्य के लिए हानिकारक है'' किंवा ‘सिगारेट स्मोकिंग इज इन्जुरिअस टू हेल्थ’ अशा टॅग लायनी दिसू लागल्या. सिगारेटच्या पाकिटावरही असाच वैधानिक इशारा छापण्यात आला. त्यातून काय निष्पन्न झालं कुणास ठाऊक!

कारण मुळात अशा अवैध गोष्टी आत्मसात करायच्या की नाही, ही ऊर्मी प्रत्येकाच्या आतून स्वप्रेरणेने यावी लागते. साठच्या दशकात आमची पिढी शालेय जीवनात असताना, एका सिगारेटचा नवा ब्रॅण्ड बाजारात आला होता. कंपनीने त्याचं मार्केटिंग करताना मुंबईतल्या भररस्त्यावरून पायाला उंच काठ्या बांधलेल्या युनिफॉर्मधारी माणसांचा ग्रुप आणि त्यांचा साहेबी थाटाचा म्होरक्या यांची मिरवणूकच काढली होती.

आभाळाएवढ्या उंचीसारखी ती माणसे बघायला तोबा गर्दी होत असे; पण कोणाच्या मनात त्या सिगारेटच्या जाहिरातीवर बंदी घालण्याचा विचारही डोकावला नाही. जिज्ञासूंना जर त्या सिगारेटची जाहिरात करणाऱ्या कंपूची झलक पाहायची इच्छा असेल तर देव आनंद‌च्या ‘असली नकली’मधले ‘गोरी जरा हॅँस दे तू’ (रफी) हे गाणं अवश्य बघावं.

मागे एके काळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कौस्तुकास्पद उद्‌गार काढले होते. तो म्हणाला होता, ‘काय वाटेल ते झालं तरी मी कधीही मद्याची जाहिरात करणार नाही.’ तोच कित्ता इतर सेलिब्रेटींनी काही समाजविघातक गोष्टींसाठी गिरवायला काय हरकत आहे? पण आज त्याच सचिनवरही टीका होतेय. कारण, भारतरत्न असलेल्या सचिनने एका ऑनलाईन जुगाराची जाहिरात करणे त्याच्या फॅन्सनाही पटलेलं नाही.

परवा देवेंद्र फडणवीस यांनीही सिने तारे-तारकांना ऑनलाईन बेटिंग वा जुगाराच्या जाहिराती करू नका, असे आवाहन करत थेट विधानसभेत त्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यातून काही चांगले निष्पन्न झालेच तर माणुसकीवरचा विश्वास अधिक गहिरा होईल, यात शंका नसावी, असो.

एक जाहिरात करताना नव्वदच्या दशकातील इंग्रजी सिने मॅगझिन्समधले शत्रुघ्न सिन्हाचे हावभाव, उजव्या हातात सोड्याची बाटली तर डाव्या हातात बर्फ टाकलेला ग्लास, बेधुंद डोळे नेमकं काय दर्शवतात? अलीकडच्या काळात अजय देवगणने टीव्हीवर केलेली याच सोड्याची जाहिरात, त्यातली त्याची ती ‘जब मिल बैठेंगे तिनो, मैं आप और...’ आणखी वेगळं काय दर्शवते? ही मंडळी खरंच नुसत्या सोड्याची जाहिरात करतात की आणखी काही, असा संदिग्ध भाव निर्माण होतो.

कोणे एके काळी रोल मॉडेल मिलिंद सोमण आणि मधू सप्रे या जोडगोळीने कुठल्याशा बुटाच्या कंपनीची जाहिरात करताना चक्क दिगंबरावस्थेत सर्वांगाभोवती भलामोठा अजगर गुंडाळून केवढी तरी खळबळ माजवली होती. तो प्रकार पाहिल्यानंतर त्या काळी प्रगतशील मानवाची वाटचाल पुनश्च अश्म युगाकडे तर सुरू होणार नाही ना, अशी भयावह शंका मनाला चाटून गेली. चिंताजनक म्हणजे, ती आजही खरी ठरतेय.

काही दिवसांपूर्वी सोमणांचा मिलिंद पुन्हा गोव्याच्या बीचवर अंगातील कपड्यांचं जोखड फेकून देऊन धावला. ऊर्फी जावेद काहीबाही घालून अंग-प्रत्यांगाचे दर्शन देत फिरतेय... तिकडे हिमालयाच्या पर्वतराजीत अभिनेता विद्युत जामवाल नग्न होऊन वाढदिवसाचं अनोखे सेलिब्रेशन करतोय... का? कशासाठी?

त्यांना कोणी अटकाव करत नाही आणि इकडे वांद्र्यातील बॅण्ड स्टॅण्डवर सहजीवनाच्या आणाभाका घेणारे प्रेमीयुगुल जरा कुठे ‘हातघाई’ला आले की, त्यांना पांडूचा बांबू बसलाच समजा... तुम्हाला जे काय करायचंय ते बंदिस्त होऊन करा. तुमचा असा अतिरेकी आनंद चव्हाट्यावर आणू नका. समाजमन दूषित होईल, असं काही करू नका...

आपल्या आक्षेपार्ह कृतीतून आपण नेमका कोणता आदर्श समाजासमोर ठेवत आहोत, याचे थोडे तरी भान सेलिब्रटी मंडळींनी बाळगले तर समाजावर त्यांचे उपकारच होतील. तसे नाही घडले तर शाहरूख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांच्या सुरात सूर मिसळून त्यांना आपल्या इष्टाईलने सांगावे लागले, ‘मत बोलो, जुबाँ केसरी’!

shingornikar@gmail.com

(लेखक ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com