चीनमध्ये पुन्हा टेस्ट, ट्रेस, आयसोलेट

कोरोनाच्या तीन लाटांना तोंड देत संपूर्ण जग आता कुठे सावरत असल्याचे दिसत असताना चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने तोंड वर काढले आहे.
China Lockdown
China LockdownSakal
Summary

कोरोनाच्या तीन लाटांना तोंड देत संपूर्ण जग आता कुठे सावरत असल्याचे दिसत असताना चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने तोंड वर काढले आहे.

- विक्रम गोपीनाथ

जगभरात कोरोना आटोक्यात आल्याचे दिसत असताना चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. दोन्ही लाटांचा अनुभव लक्षात घेत कठोर उपाययोजना राबवण्यात येत आहेत. पहिल्या लाटेप्रमाणेच टेस्ट, ट्रेस आणि आयसोलेट या त्रिसूत्रीचा अवलंब केला जात आहे. कोरोनाकाळात आतापर्यंत सार्वजनिक ठिकाणी एकदाही मास्क वापरण्याबाबत शिथिलता देण्यात आली नाही. त्यामुळे चीनमधील नागरिकही मास्कशिवाय कुठेच बाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. सरकारने ‘हेल्थ कीट’ हे ॲप प्रत्येक नागरिकाच्या मोबाईलमध्ये सक्तीचे केले आहे. एकंदरीत चीन कोरोनाने पुन्हा चिंताग्रस्त झाला आहे.

कोरोनाच्या तीन लाटांना तोंड देत संपूर्ण जग आता कुठे सावरत असल्याचे दिसत असताना चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने तोंड वर काढले आहे. शेन्झेन प्रांतातील १३ शहरांमध्ये कडक लॉकडाऊन लावण्यात आल्याने जवळपास साडेतीन कोटी नागरिकांना घरातच राहावे लागत आहे. झिरो कोविड पॉलिसीअंतर्गत काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी केली जात असल्याने नागरिकांवर मोठ्या प्रमाणात निर्बंध लागू करण्यात आले आहे.

चीनमध्ये पुन्हा कोरोना संसर्ग उफाळून आल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. एकीकडे जगभरात साधारणपणे तीन लाटा येऊन गेल्या आहेत. पहिली लाट, डेल्टाची दुसरी आणि तर ओमिक्रॉनच्या तिसऱ्या लाटेशी अख्खे जग लढले आहे. चीनमध्ये ओमिक्रॉनचा फारसा प्रभाव जाणवला नव्हता. ज्या वेळी संपूर्ण जग ओमिक्रॉनला तोंड देत होते, त्या वेळी चीनमध्ये फारसा संसर्ग नव्हता. आता बहुतांश सर्वच देशातील कोरोना परिस्थिती निवळल्याने सगळीकडे शिथिलता आली होती. त्यातच आता चीनमध्ये कोरोनाने डोके वर काढले आहे. चीनमध्येच पुन्हा कोरोना का उद्भवला, त्यामागील कारणही जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळीच चीनमध्ये लसीकरणाला सुरुवात करण्यात आली, तेव्हा चीनच्या अखत्यारीत असलेल्या हाँगकाँगमध्ये लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. हाँगकाँगमध्ये बहुतांश लोकसंख्या ही ज्येष्ठांची असल्याने त्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती तुलनेने कमी होती. त्यामुळे कोरोनाकाळात हाँगकाँगमध्ये अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांची संख्याही अधिक होती. परिणामी इतर भागाच्या तुलनेच हाँगकाँगमध्ये कोरोना मृत्युदर हा अधिक होता. ज्येष्ठांची अधिक संख्या, कमी प्रतिकारशक्ती आणि अधिक मृत्युदर असे आरोग्य यंत्रणेपुढे मोठे आव्हान होते. त्यातच हाँगकाँगमध्ये लसीकरणाचे प्रमाणदेखील कमी असल्याने चिंता अधिकच वाढली. त्यामुळे जेव्हा जगभरात कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्याने निर्बंध बऱ्यापैकी शिथिल झाले, तेव्हा हाँगकाँगमध्ये नवे रुग्ण आढळतच होते.

हाँगकाँगमध्ये वाढत जाणारा संसर्ग पुढे तेथून जवळच असलेल्या शेन्झेन प्रांतात फैलावला. प्राथमिक माहितीनुसार हा संसर्ग ओमिक्रॉन विषाणूचा असल्याचे सांगण्यात येत आहे. शेन्झेन प्रांतातून सुरू झालेला हा संसर्ग आता १३ शहरांमध्ये फैलावला आहे. जिलिन प्रांतातही मोठ्या प्रमाणात संसर्ग फैलावला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने झिरो कोविड पॉलिसीअंतर्गत कठोर निर्बंध लागू केले आहेत. लॉकडाऊन लावण्यात आलेल्या प्रांतातील नागरिकांना अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. राजधानी बीजिंग, शांघाय शहरातून देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अनेक शहरांत इमारती सील करण्यात आल्या आहेत. उत्तर कोरियाच्या सीमेवर असलेल्या जिलिन प्रांतातील आणि बाहेरून येणाऱ्या नागरिकांवर तसेच परिसरात प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

उपाययोजनांवर भर

कोरोनाची पहिली लाट चीनमधूनच सुरू झाल्याने उपाययोजनांची बहुतांश सुरुवातही चीनमधूनच झाली. आतापर्यंत आलेल्या दोन्ही लाटांचा अनुभव लक्षात घेत सरकारने कठोर उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले आहेत. पहिल्या लाटेप्रमाणेच टेस्ट, ट्रेस आणि आयसोलेट या त्रिसूत्रीचा अवलंब केला जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे चीनमध्ये सुरुवातीपासून केवळ सरकारी पातळीवरच नव्हे, तर नागरिकांकडूनही कोरोना नियमांचे पालन योग्य प्रकारे केले जाते. कोरोनाकाळात आतापर्यंत सार्वजनिक ठिकाणी एकदाही मास्क वापरण्याबाबत शिथिलता देण्यात आली नाही. त्यामुळे चीनमधील नागरिकही मास्कशिवाय कुठेच बाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे सरकारने ‘हेल्थ कीट’ (भारतातील आरोग्यसेतू ॲपप्रमाणे) ॲप विकसित केले आहे. प्रत्येक नागरिकाच्या मोबाईलमध्ये हे ॲप असणे सक्तीचे केले आहे. त्यानुसार तुम्ही प्रतिबंधित क्षेत्रात असल्यास किंवा त्या क्षेत्रातून जाऊन आल्यास या ॲपमध्ये ‘रेड सिग्नल’ लागतो. ज्या व्यक्तीच्या मोबाईल ॲपमध्ये ‘रेड सिग्नल’ हा ‘ग्रीन सिग्नल’मध्ये रूपांतरित होत नाही, तोपर्यंत त्यांना सार्वजनिक ठिकाणी येण्यास मज्जाव केला जातो. तसेच नियमित कोरोनाचाचणीमध्ये पॉझिटिव्ह आल्यास किंवा प्रतिबंधित क्षेत्रातून इतर शहरात आल्यास २१ दिवसांचे संस्थात्मक विलगीकरण आणि त्यानंतर सात दिवसांचे गृहविलगीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. बाधितांचे केवळ विलगीकरणच केले जात नाही, तर त्या कालावधीत संबंधित व्यक्तीच्या सरासरी चार ते पाच वेळा चाचण्या केल्या जातात.

अर्थव्यवस्थेवर अल्प परिणाम

कोरोनाकाळात जगभरातील अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला होता. अनेक देशांतील नागरिकांची वेतनकपात करण्यात आली, तसेच अनेकांना नोकरीवरून कमी करण्यात आले. चीनमध्ये मात्र तुलनेने कमी परिणाम झाला. त्यामागील कारण म्हणजे चीनची निर्यातीवर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था. चीनच्या अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे येथील कुशल कामगारवर्ग, परिस्थितीनुरूप बदलण्याची आणि मिळेल ते काम करण्याची तयारी. कोरोनाचा ज्या वेळी इतर देशांमध्येही फैलाव सुरू झाला, तेव्हा मास्क, पीपीई कीट, ऑक्सिजन आदींचा तुटवडा निर्माण झाला, तेव्हा चीनने संपूर्ण जगाला त्याचा पुरवठा केला. कोरोनामुळे जे उद्योग बंद करावे लागले, त्यांनी तातडीने संरचनेत बदल करत आरोग्यविषयक उत्पादनांची निर्मिती करण्यास सुरुवात केली. वर्क फ्रॉम होम संकल्पनेवर भर देत अर्थव्यवस्था सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

(लेखक चीनमधील बीजिंग येथे आठ वर्षांपासून पत्रकारिता करीत आहेत.)

vikramgopinath19@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com