मुलांचा करिअर ब्रेक, एक नवी संधी!

करिअर ब्रेकचा विषय निघाल्यावर पालकांना आता आपला मुलगा किंवा मुलगी सरळ घरीच बसणार, नोकरीच नाही करणार किंवा बेरोजगार राहणार, असंच वाटत असतं.
child career opportunity
child career opportunitysakal

- विशाखा विश्वनाथ

करिअर ब्रेकचा विषय निघाल्यावर पालकांना आता आपला मुलगा किंवा मुलगी सरळ घरीच बसणार, नोकरीच नाही करणार किंवा बेरोजगार राहणार, असंच वाटत असतं. तो किंवा ती घरीच राहणार, लोक त्यांना रिकामटेकडा ठरवतील, अशीही चिंता वाटून जाते... पण मुलांच्या डोक्यात कदाचित थोडं वेगळं शिजत असतं.

मला माझं करिअर करायचं आहे, अशी ध्येयवेडी झपाटलेली फेज तरुणांच्या आयुष्यात येते. मात्र, त्या आधी कुठलं करिअर निवडू? अशी फेजही येऊन गेलेली असते. खरं तर तो प्रश्न पडल्यावर मुलांनी करिअर करण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी पदवी निवडलेली असते.

पुढे पदवीकरिता घेतलेल्या शिक्षणातून, मिळालेल्या ज्ञानातून आणि त्यांच्या फिल्डमध्ये होत असलेल्या बदलानुसार कोलांटउड्या मारायच्या असतात. त्या मारण्याआधी घरात घमासान चर्चा, वादावादी इतकं सगळं झालेलं असतं. कित्येकदा तुला हवं ते शिक, हा स्वातंत्र्याचा देखावा उभा केला जातो आणि मग हवं ते शिक्षण घेताना जरा ठेच लागली, ते शिक्षण घेतल्यावर नोकरी मिळवताना त्रास झाला वा मोठं पॅकेज नाही मिळालं, तर मुलांना दोषी ठरवलं जातं.

जरा बरं करिअर चालू असेल, तर सेटल होण्यासाठी दबाव आणला जातो. एकूण काय, लहान असल्यापासून टक्केवारी आणि पगाराचा आकडा अशा दोन्ही गोष्टींवर पालक सातत्याने लक्ष ठेवून असतात आणि त्या वाढतच जाव्यात म्हणून दबावही टाकत असतात. त्यामुळे करिअर आणि करिअर ग्रोथ फक्त मुलांच्या भविष्यापुरत्या मर्यादित राहत नाहीत. कुटुंबव्यवस्थेत त्यांवर नियंत्रण ठेवणारी एक अदृश्य दोरी पालकांच्या हातात असते.

ती सोडवून घेण्यासाठी मुलं झगडतात आणि झगडतच राहतात. हे पिढी-दर पिढी चालत आलं आहे. अशात मुलं करिअर ब्रेकचा विचार करत असतील, तर भारतीय पालकांना ठसका लागला नाही तरच नवल. सलग चार-सहा वर्षं एकाच फिल्डमध्ये जॉब केल्यावर हा करिअर ब्रेकचा किडा मुलांच्या डोक्यात वळवळू लागतो. त्यात स्वतःचं काही करायचं आहे किंवा फिल्ड बदलायचं आहे या दोन कारणांमुळे मुलांना करिअर ब्रेक घ्यावा, असं वाटत असतं.

शिक्षण, करिअर, संसार आणि मुलं अशा सरधोपट रस्त्यात करिअर ब्रेक किंवा उत्पन्नाचे पर्यायी मार्ग हे दोन्ही फाटे असतील ही कल्पना पालकांनी केलेलीच नसते. इतकंच काय, फ्री-लान्सिंग करणं हेदेखील पालकांना रुचणारं आणि पटणारं नसतं. महिन्याच्या शेवटी खात्यात एक ठोक जमा होणारी रक्कम महत्त्वाची आणि ती जिच्यामुळे जमा होतेय ती नोकरीही.

सर्वसामान्य कुटुंबातल्या पालकांची धारणा इतकी पक्की आहे, की तिला छेद देणारं सगळं त्यांना सपशेल चूक वाटतं. पण, खरंच तसं असतं का, हे समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे. नापास न होता सलग पास किंवा डिस्टिंक्शन मिळवत शिक्षण घेतल्यावर चटकन कमावतं होताना तरुण मोकळा श्वास घ्यायला विसरतात आणि एक मोठंसं वळण घेऊन झाल्यावर पुढचं वळण घेत असताना जरा थांबायचं म्हणतात.

या थांब्याचं नाव करिअर ब्रेक. पार्ट टाईम शिक्षण किंवा नवीन कोर्स करून स्वतःला अपग्रेड ठेवण्यात मुलांना ना नसतेच; पण नऊ तासांचा जॉब आणि प्रवासातला वेळ, टार्गेट, डेडलाईनची टांगती तलवार, वर्कलोड आणि कामाचा फॉलोअप घेणारे वीकेंड हे सलग चार-एक वर्षं करून कंटाळल्यावर त्यांना वाटतं, हे कुठं तरी थांबलं पाहिजे. कुठं तरी पळून गेलं पाहिजे. यातलं काही काही करावं लागू नये.

सगळी ओझी उतरवून ठेवावीत. हे सगळं मुलांच्या डोक्यात घोळत असतानाच पालक त्यांना सेटल होण्याचा अर्थात लग्नाचा आग्रह करत असतात. नोकरीत एव्हाना एकाच पदावर काम करून खूप कंटाळा आलेला असतो आणि नवीन बदल करायचे, तर नवं कुठलं तंत्रही अवगत केलेलं नसतं किंवा ते करण्यासाठी वेळ मिळालेला नसतो.

म्हणून मग ते करिअर ब्रेकचा पर्याय निवडतात. तुमच्या लेखी तो कदाचित पूर्ण बरोबर नसेल; पण आपण काहीच नवीन करत नाही आहोत या एका भावनेशी डील करत असताना, ज्यांनी हा पर्याय निवडलाय त्यांच्या दृष्टीने तो बरोबर असू शकतो.

करिअर ब्रेक घेतल्यावर मुलं पूर्णपणे न कमावता घरात बसलेली नसतात किंवा त्यांना पैशा-पाण्याचं, नोकरीचं काही पडलेलं नसतं, असंही होत नाही. कमाल पैसे हातात येतील, आपले वरखर्च भागतील याची काळजी मुलांनी घेतलेली असते. ती घेऊनच ते या निर्णयाप्रत येऊन पोहोचतात. पुरेसा वेळ घेऊन झाल्यावर ते पुन्हा आपल्या नव्या नोकरीच्या शोधातही घराबाहेर पडतात.

या एकूण प्रक्रियेकडे पालक म्हणून तुम्ही कुठल्या पद्धतीने पाहताय हे महत्त्वाचं आहे. बाहेरचे चार लोक म्हणतील तेव्हा म्हणतील; पण आपण आपल्या मुलांना रिकामटेकडं म्हणत आणि ठरवत तर नाही ना, हेही पाहणं गरजेचं आहे. नोकरीतल्या स्पर्धेपासून आणि नोकरीतले सहकारी सतत असण्याच्या वातावरणातून सुटका करून घेतल्यावर मुलं २४ तास घरात आणि घरच्यांच्या सहवासात राहू लागतात.

तेव्हाही त्यांच्या प्रत्येक कृतीकडे तोलून-मापूनच पाहत तर नाही आहोत ना, हा प्रश्न पालकांनी स्वतःला विचारणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कॉर्पोरेट वर्ल्ड आणि पूर्णवेळ असलेलं कौटुंबिक वातावरण यातला पूल फक्त मुलांनी नाही तर पालकांनीही तयार करायचा असतो, हेही लक्षात ठेवायला हवं.

संध्याकाळी पाखरं घरट्यात येऊन विसावल्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा चारा-पाण्याच्या शोधात बाहेर जातात तशीच ही मुलं करिअर ब्रेकनंतर पुन्हा नवीन नोकरी आणि चांगली संधी शोधायला बाहेर पडणार असतातच. त्यामुळे त्यांच्या निर्णयावरून आपण त्यांना किती कोसावं, याचा पालकांनी विचार करायला हवा. वेळ लागेल ही गोष्ट ध्यानात ठेवून मुलांनी आणि पालकांनी करिअर ब्रेककडे नवीन गोष्टी शिकण्याची संधी म्हणून पाहणं गरजेचं आहेच; पण ही चार पावलं मागे गेल्यानंतर एक मोठी झेप घेता येऊ शकते, हा आशावाद कायम मनात ठेवला पाहिजे.

(लेखिका ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’विजेत्या साहित्यिक आहेत.)

vishakhavishwanath११@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com